आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबव्ह अँड बिया्ॅंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण केलेल्या कामाबद्दल वरिष्ठांकडून प्रशंसा  मिळणं ही खूप मोठी गोष्ट. कारण अशी प्रशंसा हे केवळ कौतुक नसतं. ती असते तुम्ही केलेल्या कामाची  पावती. तुमच्यावर दाखवलेला विश्वास. आणि पुढं आणखी जोमानं जाण्यासाठी दिलेलं पाठबळ. 
 
“अनू, सगळे तुझी वाट पाहतायत सीआर १२मध्ये,” जोनाथन निरोप द्यायला आला होता. मी ख्रिससोबत काही चर्चा करत होते. ख्रिस आमचा प्रोजेक्ट मॅनेजर. आज माझा या वेळच्या इथल्या वास्तव्याचा शेवटचा दिवस होता.

ख्रिस, मी आणि जोनाथन सीआर १२मध्ये (कॉन्फरन्स रूम १२) तातडीने गेलो. मला कळत नव्हतं की, माझी वाट का पाहताहेत सगळे. माझ्या ऑफिस (केबिनला अमेरिकेत ऑफिस म्हणतात)पासून चालत सीआर १२ला जाईपर्यंत माझ्या मनात अनेक विचार येऊन गेले. आणि या अचानक बोलावलेल्या मीटिंगबद्दल उत्सुकता वाढली. सहसा अशा तातडीच्या मीटिंग होत नसत. पुरेशी पूर्वकल्पना दिली जात असे, जेणेकरून कोणीही आपली तयारी करूनच जाईल. आम्ही तिघेही कॉन्फरन्स रूममध्ये पोहोचलो. इंजीनिअरिंग डिपार्टमेंटचे सगळे हजर होतेच, पण आमचा तिथला व्हाइस प्रेसिडेंट ज्योपण होता. रूमच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्याने बरेच जण उभे होते, म्हणून मीही उभी राहिले. टॉम म्हणाला, ‘अगं, बस बस. ही खुर्ची तुझ्यासाठीच ठेवली आहे.’ मला अजूनच आश्चर्य वाटलं.

ज्यो जागेवरून उठला आणि त्याने माझं, माझ्या कामाचं कौतुक करणारं एक छोटंसं भाषण केलं आणि त्याने मला माझ्या कामावर, माझ्या “कॅन डू” ॲटिट्यूडवर लिहिलेलं एक प्रशस्तिपत्र दिलं. ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं - अबव्ह अँड बियाँड (Above and beyond.)
हा खूपच सुखद धक्का होता माझ्यासाठी.

माझ्या डोळ्यासमोर नकळतच तीन महिन्यांपूर्वीचा दिवस आला. आमच्या भारतातल्या ऑफिसला देण्यात येणाऱ्या अंतर्कंपनी कामाचं प्रमाण वाढावं, आम्ही करू शकतो हा विश्वास आमच्या अमेरिकेतल्या मुख्य कार्यालयाला द्यावा, यासाठी मला तीन महिन्यांपूर्वी पाठवण्यात आलं होतं. या आधी आम्ही केलेल्या कामावर आमचे हे इंटर्नल कस्टमर समाधानी नव्हते. मलाही इथे कामाला लागून जेमतेम पाच-सहा महिनेच झाले होते. किंबहुना मी नुकतीच चार महिने इथे ट्रेनिंगला येऊन गेले होते. ते ट्रेनिंग इंजीनिअरिंग ॲनॅलिसिसबद्दल होतं. या विभागात काम करणारे आम्ही एकूण सात इंजीनिअर होतो. अमेरिकेतील मुख्य कार्यालयात  पाच, युरोपमधील कार्यालयात एक आणि भारतात मी. पण यासोबतच अमेरिका आणि युरोपमधील कार्यालयातून आम्हाला आरेखनांचीही कामे नियमितपणे मिळत असत आणि त्याबद्दलच काही क्वालिटीचे प्रश्न उपस्थित झाले होते.

पहिलाच दिवस. एक शंका विचारायला मी जोनाथनच्या ऑफिसच्या बाहेर थांबले होते आणि दोन वेळा आत येऊ का, असं विचारूनही तो मला दाद देत नव्हता. शेवटी एकदा त्याने ये असं सांगितलं आणि माझा प्रश्न सोडवला. अंतर्गत असले तरीही आमचे क्लायंटच ते. सो आमच्या कामातील चुकांमुळे त्यांना झालेला त्रास जोनाथन, जॉर्ज आणि इतरही दोघातिघांच्या वागणुकीतून दिसत होता. हे सगळं मी कसं काय बदलणार, असा मोठाच प्रश्न होता मला. माझं जे ट्रेनिंग झालं होतं त्या संदर्भातील काम सांभाळून मला ही जबाबदारीही  पार पाडायची होती. दोन-तीन दिवसांनी एका मीटिंगमध्ये एका मोठ्या असेंब्लीची आरेखने परत एकदा पूर्ण चेक करावी लागतील, अशी चर्चा सुरू होती. ती आरेखने भारतातील ऑफिसने केलेली नव्हती, पण तरीही मी धीर करून म्हणाले, ‘मी हे काम करू का?’
ॲनॅलिसिस डिपार्टमेंटचा बॉस, स्टीव्ह, त्याला माझं काम माहीत होतं आणि त्याच्या शब्दाला तिथे खूप मान होता.
स्टीव्ह पटकन म्हणाला, ‘हो. अनू करेल हे काम.’
मला खूप आनंद झाला. आमच्याबद्दलचा  विश्वास परत मिळवायची ही एक मोठी संधी माझ्या हातात होती. दुसऱ्याच दिवशी मी जॉनकडून त्या आरेखनांची माहिती घेतली आणि काम सुरू केलं. त्या प्रकारची असेंब्ली माझ्यासाठी नवीन होती. पण हे करायचंंच, असं मी पक्कं ठरवलं होतं.
स्टीव्हचा विश्वास माझ्या पाठीशी होता. फक्त माझं ॲनॅलिसिसचं काम सांभाळून मी या कामाला पुरेसा वेळ कसा देणार, याबद्दल स्टीव्हलाही शंका होती. मी त्याला सांगितलं, मी जास्त काम करेन.
दुसऱ्या दिवसापासून पुढचे पंधरा दिवस मी पहाटे सहा वाजता ऑफिसला जायचे ते संध्याकाळी चारला घरी निघायचे.
मला स्वतंत्र अपार्टमेंट होतं, त्यामुळे रोज संध्याकाळी स्वयंपाक, शनिवार रविवार अपार्टमेंटची साफसफाई आणि आठवड्याची बेगमी करणं प्राप्त होतं . पण हे सगळं सांभाळून ते पंधरा दिवस मी झपाटल्यासारखं काम केलं. असेंब्लीचे बारकावे समजून घेतले. जॉनला अनेक शंका विचारल्या. त्यानेही मला पुरेसा वेळ दिला आणि १५ दिवसांनंतरच्या तशाच मीटिंगमध्ये सर्व आरेखने तपासून तयार होती. मग एक कॉमन रिव्ह्यू झाला आणि ती आरेखने ड्राफ्टिंग डिपार्टमेंटकडे दुरुस्तीसाठी दिली गेली. स्टीव्हने मला वेगळं बोलावून माझी पाठ थोपटली. इतकंच नाही तर इंजीनिअरिंग ॲनॅलिसिस डिपार्टमेंटमधल्या आम्हा इंजीनिअर्सना त्या वीकएंडला थाई फूड खायला घेऊन गेला. यानंतर आमच्या भारतातील ऑफिसला आरेखनांची कामे नियमित मिळू लागली आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी ती जबाबदारी उत्तम पार पाडली. 
अमेरिकेतील कामाच्या पद्धतीबद्दलचे  माझे अनुभव पुढील लेखात.
 
jayashree.anu@gmail.com
बातम्या आणखी आहेत...