आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेघनेच्‍या किनारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझ्या नियमाप्रमाणे मी साइटवर होते त्या वेषात जेवायला न जाता सलवार कुर्ता घालून गेले. त्या त्या देशाचे, त्या त्या ठिकाणचे काही अलिखित नियम असतात आणि मुद्दाम असे कोणतेही नियम मोडणं मी नेहमीच कटाक्षाने टाळलं आहे. याची कारणे अनेक आहेत जी सगळीकडे सारखी नसतात, पण माझ्यापुरतं मी हे सांभाळते, हे नक्की.

मार्केटिंग हे माझं डिपार्टमेंट नाही; परंतु, रीट्रोफिटिंगचा नेहमीपेक्षा वेगळा प्रोजेक्ट घेताना इंजीनिअरिंगच्या माणसाची साइट व्हिजिट आवश्यक असते. अशीच एक बांगलादेशमधली एनक्वायरी होती. बांगलादेशमधले नैसर्गिक वायूवर चालणारे ऊर्जा निर्मितीचे बरेचसे प्रकल्प हे त्या कंपनीचे होते. मोठा ग्रूप होता. आणि त्यांच्या एका प्लांटमध्ये काही आवश्यक असलेल्या सुधारणा करायच्या होत्या. याबद्दलची संकल्पना आमच्या सेल्स टीमने क्लायंटकडे यशस्वीरीत्या मांडली होती. मुख्य युनिट, म्हणजे हीट रिकव्हरी करणारे युनिट, आणि त्याला गॅस टर्बाइनकडून येणारे डक्टिंग यामध्ये उपलब्ध असलेल्या जागेत हे कसं बसेल, याचा मात्र अंदाज त्या टीमला येत नव्हता.

कोणीतरी इंजीनिअरिंगच्या माणसाने जायला हवं होतं. निर्णय घेण्याची घाई असल्याने मीच जावं, असं ठरलं. प्रश्न फक्त एक दिवसाच्या साइट व्हिजिटचा होता. आमच्या कॉर्पोरेट ऑफिसने दोन दिवसांत व्हिसा करून दिला. दुपारी तीनला ऑफिसमधून निघाले. घरी येता येता कॉर्पोरेट ऑफिसमधून व्हिसा मिळालेला पासपोर्ट घेतला. घरी आले. बॅग भरली आणि अाठ वाजताच्या विमानाने दिल्लीला पोहोचले. पुढचं विमान सकाळी ७ वाजता होतं. संपूर्ण रात्र दिल्ली विमानतळावर काढली. खरं तर मुंबईहून फ्लाइट उपलब्ध होतं पण वेळ जमत नव्हती, त्यामुळे हाच एक मार्ग होता.
 
सकाळी सातच्या विमानाने ढाका गाठलं. क्लायंटने कार आणि ड्रायव्हरची व्यवस्था केली होती. हुसेन त्याचं नाव. एकटीच होते म्हणून आमच्या ढाका ऑफिसने साइटवर पोहोचेपर्यंत एस्कॉर्ट दिला होता. जाताना वाटेत हुसेन म्हणाला, ‘दीदी, आप लोग और यहाँ के लोग, इन में बहुत भाईचारा है. मेरा देस गरीब है पर आप के देस को बहुत मानते हैं हम सब.’ पूर्ण वेळ तो अतिशय मनापासून, भरभरून बोलत होता. मला खरंच खूप छान वाटलं.
दुपारी बाराला गेस्ट हाउसला पोहोचले. १५-२० रूम असलेल्या त्या गेस्ट हाउसवर खालच्या मजल्यावर खोल्यांमध्ये कोणी ना कोणी होतं. पण मी पहिल्या मजल्यावर होते तिथे मात्र बाकी सगळ्या खोल्या रिकाम्या. आवरून लगेच साइटवर गेले.
 
तिथल्या चीफची सेक्रेटरी खूपच चांगली होती. मला ती चीफकडे घेऊन गेली.
शर्ट-ट्राउझर्स घातलेले, पायात सेफ्टी शूज, कानात घालायचे इयर प्लग गळ्यात अडकवलेले आणि हातात डायरी, मेजरिंग टेप आणि सेफ्टी गॉगल अशा अवतारात मला पाहून त्या चीफला काय वाटलं माहीत नाही. व्हिजीटला येणारी एक स्त्री आहे, हे माहीत असलं तरीही बहुधा हे सहसा असं नसतं. त्यामुळे की काय, पण अर्धा तास जी काही चर्चा झाली, त्यामध्ये ते एकदाही माझ्याकडे पाहून बोलले नाहीत. त्यांनी त्यांच्या ऑपरेशन हेडशी गाठ घालून दिली आणि मी त्याच्यासोबत युनिटपाशी गेले. प्राथमिक अभ्यास करून परत मीटिंगला जाण्याआधी त्यांच्या कँटीनला जेवायला गेलो आम्ही.
 
मी शाकाहारी आहे, हे गेस्टहाउसच्या व्यवस्थापकाने मी आले तेव्हाच विचारून घेतले होते. मोठ्या टेबलच्या एका टोकाला माझी व्यवस्था केली होती. रोटी, बटाट्याची भाजी पण अगदी वेगळ्या मसाल्यामध्ये केलेली, सॅलड आणि डाळ-भात असं जरा वेगळ्या चवीचं जेवण जेवायला छान वाटलं. आदल्या रात्री पण जेवण असं झालंच नव्हतं. मग परत मीटिंग. त्यानंतर परत एकदा युनिटवर जाऊन काही स्केचेस काढून, वेगवेगळी मोजमापे घेऊन एकंदर उपलब्ध जागेमध्ये आमच्या सेल्स टीमची संकल्पना कशी काय बसवता येईल, यावर विचार झाला. त्यातील अडचणींची यादी बनवली आणि ऑफिसला परत आलो. आता त्या चीफला हळूहळू माझ्याबद्दल विश्वास वाटू लागला की, मी हे काम अगदी उत्तमरीत्या करते आहे. त्यामुळे आताची मीटिंग खूपच चांगली झाली.
 
मीटिंग संपता संपता जोरात पाऊस आला. चीफने खिडकीचा पडदा उघडला आणि समोरच्या दृश्याकडे मी पाहातच राहिले.
मेघना नदीचं दुथडी भरून वाहणारं पात्र, त्यामध्ये माणसांना घेऊन चाललेली नाव, धुवांधार पडणारा पाऊस आणि ऑफिस आणि नदी यांच्यामध्ये असलेलं पॉवर जनरेशन युनिट. आमचे मिनिट्स ऑफ मीटिंग होईपर्यंत पाऊस थांबला. सहा वाजले होते. मी गेस्ट हाउसला परत आले. आदल्या दिवशी चार वाजल्यापासून आत्तापर्यंत सतत काही ना काही सुरू होतं, पण आता मीटिंग चांगली झाल्याचा आनंद होता. आमच्या ऑफिसला फोन करून सरांना वृत्तांत दिला. आता दोन तास निवांत होते. कंपनीच्याच आवारात एक फेरफटका मारून आले आणि जेवायला गेले.
 
प्लांटचा चीफ, ऑपरेशन हेड आणि मी आम्ही तिघेही एकत्र जेवायला बसलो. मोकळेपणाने गप्पा झाल्या. त्यांनी हे बोलून दाखवलं की, एक स्त्री अशी साइट व्हिजिटला प्रथमच आली होती तिथे. आणि म्हणूनच सुरुवातीला त्यांना थोडी शंका होती. पण ज्या प्रकारे प्रत्यक्ष युनिटपाशी मी काम केलं, त्यामुळे आता त्यांना पूर्ण विश्वास होता की, काम नीट झालं आहे.

माझ्या नियमाप्रमाणे मी साइटवर होते त्या वेषात जेवायला न जाता सलवार कुर्ता घालून गेले. त्या त्या देशाचे, त्या त्या ठिकाणचे काही अलिखित नियम असतात आणि मुद्दाम असे कोणतेही नियम मोडणं मी नेहमीच कटाक्षाने टाळलं आहे. याची कारणे अनेक आहेत जी सगळीकडे सारखी नसतात, पण माझ्या माझ्यापुरतं मी हे सांभाळते, हे नक्की.
 
दुसऱ्या दिवशी परत निघाले तेव्हा आपुलकीने बोलणारा हुसेन, आग्रह करून जेवायला वाढणारा आणि रात्रीच्या जेवणात “आज तुमच्यासाठी मुद्दाम भारतीय पद्धतीची डाळ बनवली आहे बरं का,” असं सांगणारा तिथला खानसामा, मी शाकाहारी म्हणून माझ्यासोबत शाकाहारी जेवणारे प्लांट चीफ आणि ऑपरेशन हेड, सुरुवातीला अगदी कमी बोलणारे पण नंतर प्रांजळपणे माझ्याबद्दलचे मत सांगणारे प्लांट चीफ हे जसे मनाला कुठेतरी जवळचे वाटून गेले; तितकीच मनात साठवली गेली ती दुथडी भरून वाहणारी मेघना नदी, धुवांधार कोसळणारा पाऊस आणि नदीकाठी असलेलं ते पॉवर जनरेशन युनिट.
 
jayashree.anu@gmail.com
बातम्या आणखी आहेत...