Home | Magazine | Madhurima | apala-atri-katha

पालनापासून वंचित म्हणूनच अपाला

अंबुजा साळगावकर पुणे | Update - Jun 03, 2011, 08:00 PM IST

लहानपणी आजीच्या मांडीवर डोकं ठेवून ऐकलेली गोष्ट. आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर आपल्यासोबतच अनुभवाची शिदोरी घेऊन समृद्ध झालेली कथा. कधी बोध देणारी, तर कधी सामाजिक संदेश देणारी, कधी हळुवार भावनांना अलगद उलगडणारी, तर कधी स्वत:ची स्वत:शीच नव्याने ओळख करून देणारी. अशी ही कथा वाचूया....

  • apala-atri-katha

    मी अपालाची गोष्ट ऐकली तेव्हापासून तिने माझा कब्जा घेतला आहे. अपाला ही अत्री ऋषींची कन्या. ऋग्वेदात तिने रचलेल्या ऋचा आहेत. पुराणातील एका कथेनुसार ती त्वचारोगी वा शापित होती. नव-याने टाकलेली, पालनापासून वंचित म्हणूनच अपाला असलेली आणि बापाच्या घरी राहत असलेली. एका कथेत असे वर्णन आहे. एके दिवशी अपाला पाणी आणायला गेली असता तिला सोम वनस्पती दिसली. ती वनस्पती चावत चावत ती म्हणते, इंद्रा, मी तुझी स्तुती करीत आहे. शुक्रा, हे इंद्राचेच दुसरे नाव, मी तुझी स्तुती करते आहे. कथेच्या शेवटी इंद्र तिच्यावर संतुष्ट होतो, तिच्या प्रेमात पडतो, नि तिला तीन वर देतो. ती तिच्या वडिलांची भरभराट, सर्वांसाठी चांगले पीक आणि स्वतासाठी रोगयुक्त त्वचा मुक्ती मागते. तिच्या इच्छा पूर्ण होतात. ती सूर्यत्वक म्हणजे सूर्यासारखी तेजस्वी त्वचा मिळवते. अपालाच्या गोष्टीत मला ब-याच विचार करण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. पुराणात स्त्रियांनी इंद्राची वा ऋषींची स्तुती केल्याचे प्रसंग अनेकदा येतात. वैषयिक आकर्षणात राजे पडतात पण मोहाच्या क्षणानंतर जागे झालेले राजे त्यांना त्यांच्या उचित कार्यापासून दूर केल्याबद्दल त्या स्त्रियांना शाप देऊन मार्गस्थ होतात, असे दिसते. इथे मात्र, इंद्र अपालावर प्रेम करतो. इतकेच नव्हे तर चांगले तीन वर देऊन तिच्यावरच्या प्रेमाची ग्वाही देतो. असे का? अपाला ही विवाहित आहे. ती स्वताला कन्या संबोधते आहे. सर्वसामान्यपणे कन्या शब्दाचा अर्थ कुमारी असा घेतला जातो. मग ही काही चूक आहे का. की दुस-या एका पौराणिक संदर्भानुसार अपाला विवाहित राहूनही अभ्यास करणारी विदुषी होती, असे म्हटले जाते ते खरे मानायचे. अपालाच्या या गोष्टीत त्या काळच्या सामाजिक परिस्थितीचा एक पैलू प्रतिबिंबित झालेला दिसतो. अशा कथांचे एक प्रयोजनच असा समाजव्यापार संक्रमित करणे हे असते, म्हणूनच त्या समजावून घेणे आवश्यक ठरते. कन्या या शब्दाचा व्युत्पत्तीशास्त्रानुसार एक अर्थ कुटुंबातील सर्वात लाडकी असा होतो. या सूत्रावरून मला सुचले ते असे. लग्न होऊनही बापाघरी मुलगी कन्याच असणार. हे कौतुक कधीमधी भेटीला येणा-या माहेरवाशिणीचे असले तर वेगळे नाही. मुलगी परित्यक्ता म्हणून दीर्घकाळासाठी राहायला येते, तेव्हा तिला ही प्रेमाची वागणूक मिळते का? आता जिला अपाला म्हणून संबोधले आहे, तिच्याकडे वळूया. रोगी आणि म्हणून नव-याने नाकारलेली ती, स्वताला कन्या संबोधून काय सुचविते आहे? कदाचित तिला या घरात कौतुकाने, प्रेमाने स्वीकारले आहे, असेच ती सांगते आहे. केवढा मोठा आधार आहे हा. त्या समाजसंस्थेला नमस्कार करायलाच हवा. केवळ हा आधार होता म्हणूनच तिला अभ्यास करणे शक्य झाले. आणि त्यातूनच अधिकारप्राप्ती झाली. प्रसंगवशात दीर्घकाळ माहेरी राहावे लागणार असलेल्या मुलीला तिच्या सासरवंचित अवस्थेचा विसर पडावा, म्हणून अभ्यासात रमवण्याचे असेच उदाहरण भास्कराचार्यांचे आहे. अत्यंत उच्च दर्जाच्या अभ्यासाची निवड मुलीच्या दुखावर उतारा म्हणून करणारे हे बापलेक. त्यांना सलाम करायला हवा. त्यांचे त्या दुर्दैवी मुलींवर उपकार आहेत, तसेच समाजावरही. लीलावतीची निर्मिती असो वा अपालाच्या ऋचा, समाजाला लाभलेली ती देणी आहेतच.आधी मला वाटलं की स्वताला कन्या संबोधून ती तिचं दुख व्यक्त करते आहे. कदाचित कन्यासदृश अशी ती... माहेरी मुक्तपणे तिने अभ्यासाला वाहून घेतले आहे. ती अविवाहितही असू शकते कारण इंद्राची तिने पती मानून स्तुती केली आणि तो प्रसन्न झाल्यावर तिने पतीकल्याणार्थ काहीही मागितल्याचा उल्लेख नाही. वर लाभताच ज्या पित्याने तिला केवळ जन्मच दिला असे नव्हे तर तिच्या आयुष्याला अर्थ दिला, त्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण तिला सर्वप्रथम होणे स्वाभाविक आहे. पुढे ज्या समाजाने तिला मान्यता दिली, त्याचीही आठवण तिला होणे साहजिक आहे. शेवटी तिने स्वतासाठी मागितलेले दान खूप महत्त्वाचे आहे. तिची रोगी त्वचा हे तिच्या आणि तिच्या पतीच्या सांसारिक जीवनातील अडचणींचे कारण. तेच नाहीसे करून तिने तिच्या पतीसाठी मोठेच बक्षीस निर्माण केले नाही का? तिने त्याला टाळलेही नाही, खास स्वीकारले नाही पण क्षमा केली आहे. तो विषय तिच्यासाठी संपला आहे. अभ्यासातून परिपक्व झालेल्या तिला संसाराची गोडी आता किती राहिली असेल, माहीत नाही. त्यामुळेच तिच्या स्वतासाठी मागितलेल्या वराच अर्थ मुक्ती असाही लावता येईल. ऋषी म्हणून असलेला विद्वत्तेचा अधिकार वापरूनही कदाचित कष्टी मुलीला कन्या म्हणून प्रेम, विदुषी म्हणून अधिकार मिळवून देणा-या पित्याचेही येथे दर्शन आहे. कष्टी स्त्रीच्या मनोवस्थेला न नाकारता, तिच्या भावनांचा प्रेमादरपूर्वक उचित स्वीकार करून उत्थापनाच्या तिच्या प्रयत्नांचे कौतुक करून तिच्या इच्छेनुसार तिला मुक्त करण्याचे दातृत्त्व असणा-या देवाचे येथे दर्शन आहे. सामाजिक संकेत निर्माण होण्याच्या प्रक्रियेत अशा कथांचे मूल्य म्हणूनच महत्त्वाचे आहे. अपाला इतर स्त्रियांसारखी सुखात रमलेली असताना इंद्राची स्तुती करीत नाही वा अप्सरादिकांसारखे स्वताला सजवून इंद्राचे लक्ष आकर्षून घेण्याचाही तिच्या प्रयत्न नाही. ती तिच्या नशिबातल्या परिस्थितीचा स्वीकार करून नित्यकर्मात आहे. ती कर्माला दोष देत रडत बसलेली नाही. अभ्यासपूर्वक स्वताचे स्थान उंचावते आहे. समाजासाठी भार न होता उलट त्यासाठी उपयुक्त असे काही करते आहे. इंद्राच्या रूपात असलेल्या पतीचे ती स्मरण करते आहे.

Trending