आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कारांचे चांदणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संस्कार संस्कार म्हणून जे काही असतं त्याची पाळंमुळं घट्ट रुजलेली असली तर प्रलोभनांची वादळं अंगावर घ्यायचा मोह होत असतानासुद्धा ती पार होतात. हे नीट तपासून बघायचं असेल तर ‘तार्‍यांचे बेट’ हा मराठी सिनेमा अगदी जरूर बघायलाच हवा. मुलांना आपल्या विश्वामागे फरफटत न्यायचे की मुलांच्या भावविश्वात आपण वाहवत जायचे हा अगदी वैयक्तिक पातळीवरचा मुद्दा आहे. पण काय केले की आरसा कुठले प्रतिरूप दाखवणार आहे, हे ‘तार्‍यांचे बेट’ आपल्याला दाखवते.
कोकणातले एक मध्यमवर्गीय, छोट्या-छोट्या गोष्टींत आनंदी होणारे कुटुंब. बाबा ग्रामपंचायतीत नोकरी करणारा, आई गृहिणी, थोरली मीरा अभ्यासात, गाण्यात हुशार अन् धाकटा ओंकार अतिशय हूड पण चलाख, चुणचुणीत असा मुलगा आणि या सार्‍यांवर माया करणारी त्यांची आज्जी. बाबाच्या मुंबईच्या कामानिमित्त एकदा सारेच मुंबई फिरायला जातात अन् तिथल्या झगझगाटात ओंकार दिपून जातो. त्याला तिथले र्शीमंती थाटाचे सगळेच हवे असते, अगदी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहणेही. अर्थात या सार्‍या हव्याहव्याशा गोष्टींच्या अभावी हिरमुसून तो घरी येतो आणि सतत दे-दे पाढा करणार्‍या ओंकारकडे आई परीक्षेत पहिला नंबर मागते व बाबा त्या बदल्यात फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायला नेण्याचं अमिष दाखवतो. मुलांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर काय नाही होऊ शकत? दिवसरात्र एक करून ओंकार अभ्यास करतो; पहिला येतो.
ओंकारची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता त्याचे बाबाही झपाटल्यागत होतात. त्यापायी चोर्‍यामार्‍या, भ्रष्टाचार, नाही ते उद्योग करतात. संस्कारांच्या ओझ्याने या सार्‍याबाबत पश्चात्तापितही होतात. अखेर त्यांना एक काहीतरी असे गवसते की ओंकारची इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर असते. काय असते ते? संयमी अन् आपल्या जबाबदार्‍यांची जाणीव असलेली आई त्याला मान्यता देते? परिस्थितीच्या रेट्यात अकाली समंजस झालेली मीरा काय करते? ते फाइव्ह स्टारमध्ये जातात की नाही? हे सगळे तुम्ही आपल्या मुलांबरोबर निवांत बघा. कारण हे बघणे निव्वळ मनोरंजन नाही तर आपल्यासाठीही पालकत्वाचा वस्तुपाठ असतो.
‘तार्‍यांचे बेट’ बघून झाल्यावरही ते पुसले जात नाही. त्यातले मूल्यसंस्कारांचे चांदणे सतत झिरपत राहते आपल्या मनात.