आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग्य पूरक आहार योग्य पोषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेदाने आरोग्य जपण्यासाठी जीवनाचे आधारस्तंभ म्हणून आहार, निद्रा, ब्रह्मचर्य यांचे वर्णन केले आहे. आहार म्हणजे खाण्यापिण्याचे सर्व पदार्थ होय. आहार-विहार-पथ्य-व्यायाम आरोग्याचे महत्त्वाचे घटक आहेत. आहार आणि आरोग्य यांचा अनन्यसाधारण संबंध आहेच. आरोग्य संघटनेने आरोग्य म्हणजे शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याची पूर्णावस्था, अशी व्याख्या केली आहे. यासाठीच आपला आहार हा उत्कृष्ट योग्य पोषणमूल्ययुक्त असणे गरजेचे आहे.


आहार फक्त भूक शमविण्यासाठी किंवा जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नाही. स्वास्थ्य टिकवण्यासाठी उत्कृष्ट आहाराद्वारे शरीराची उंची, वजन योग्य प्रमाणात वाढणे, सर्वांगाने शरीर व मनाचे पोषण होणे, ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियाचे कार्य योग्यरीतीने होणे, मनाची प्रसन्नता, उत्साह वाढणे, शारीरिक व मानसिक कार्यक्षमता वाढणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढणे, दीर्घायुष्य प्राप्त होणे ही सर्व कार्ये होत असतात. आहार घटकात पाणी, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, मिनरल्स (क्षार,लवण), जीवनसत्त्वे आणि प्रथिने असायला हवी आय सी एम आर- इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या आहारशास्त्र सल्लागार समितीद्वारा आहारीय द्रव्यांच्या पोषणमूल्यांची माहिती वर दिलेली आहे. ऋतू, वय, लिंग व्यवसाय, शारीरिक अवस्था, लहान मूल, प्रौढावस्था, वृद्धावस्था, गर्भावस्था इत्यादींचा तसेच पोषक तत्त्व, पोषणमूल्य आदींचा विचार करूनच संतुलित आहार योजला आहे. संतुलित आहार म्हणजे मुख्य आहार अधिक पूरक आहार होय.


पूरक आहार म्हणजे सहायक आहार :
मुख्य आहारासोबत सहायक आहारालाही तितकेच महत्त्व आहे. पूरक आहार हा पोषणमूल्ययुक्त, स्नेहयुक्त, रुचि उत्पन्न करणारा, मनाला प्रिय, पाचन गुणधर्माचा असतो. स्वास्थावस्थेत व आजारपणातही पूरक आहार देता येतो. रोजच्या आहारातील महत्त्व लक्षात घेता या पूरक आहाराचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येते.


* पूरक आहाराचे प्रकार :
1. जेवणापूर्वी 2. जेवणाबरोबर 3. जेवणानंतर :
1.जेवणापूर्वी- आले, विविध सूप घेतले जातात.
2.जेवणाबरोबर - दीपन पाचन, रुचकर, बलवर्धक प्रसंगानुसार पापड, कुरड्या, वडे, भजी तसेच रोजच्या जेवणात चटण्या ओली-सुकी, कोशिंबिरी, लोणचे, मुरब्बे.
3. जेवणानंतर - पाचक, औषधी सुपारी, सरबते
पूरक आहारातील काही पदार्थ ताजे लगेचच खाण्यास उपयुक्त तर काही टिकाऊ जास्त दिवस टिकणारे असतात.
अ) आले लिंबू पाचक - भूक वाढविणारे, पाचन करणारे पोट साफ करणारे
ब) कढीलिंब चटणी - स्वादिष्ट, दाहशामक, पोटदुखी, जंतूनाशक
क) मुरांबा - रुचीकर, पौष्टिक, पित्तदोषनाशक, रक्तविकारात उपयुक्त
ड) पापड - तांदळाचे, उडदाचे आणि मुगाचे
इ) गरम मसाला - भाज्यांमध्ये, उसळींमध्ये भातांच्या प्रकारात अनेक मुख्य आहारात रुचिकर
अशाप्रकारे ऋतुनुसार, त्यांच्या गुणधर्मानुसार योग्य प्रमाणात या सर्वांचा विचार करून विविध पूरक म्हणजेच साहाय्यकारी पदार्थांचा जेवणांत समावेश केल्यास आपले स्वास्थ्य टिकण्याच्या व आयुष्य वाढण्याच्या दृष्टीने हा आहार नक्कीच फायद्याचा ठरेल.