आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Archana Deshmukh Article About Gulabai And Bhulabai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुलाबाई भुलाबाईचे स्वागत असो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातल्या काही भागात भोंडला, हादगा, मध्य प्रदेशात व महाराष्ट्रातल्या काही भागात भुलोजी - भुलाबाई तर खान्देशात ‘गुलोजी-गुलाबाई’ या ग्रामदैवतांची श्रद्धेय मनाने पूजा केली जाते. शिव-पार्वतीची उपासना म्हणजे शक्तीची पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून अहिराणीच्या लोकमानसात रुजली आहे. कारण जगताचे मातापिता म्हणून लोकांच्या भावविश्वात या देवता प्रविष्ट आहेत. खान्देशातील गुलाबाई - गुलोजीच्या चित्रात किंवा मातीच्या मूर्तीत गुलाबाईच्या मांडीवर बाळ व सोबत पाळणा दाखवलेला असतो.

गुलाबाई-गुलोजी हा कुमारिका किंवा सोळा वर्षांच्या आतील मुलींनी खेळण्याचा, मनोरंजनाचा उत्सव आहे. हा उत्सव व्रतासारखा बंदिस्त विधीयुक्त चौकटीत जखडलेला नसतो. हा कुमारिकांचा लोकोत्सव आहे. महाराष्ट्रात मातीच्या मूर्तीची पूजा परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. इनामगाव, चांडोली येथील उत्खननात डॉ. अन्सारी व डॉ. ढवळीकर यांना एका मातीच्या पेटीवर स्त्रीची मृण्मय मूर्ती आणि मातीचा बैल आढळला. मातीचा बैल पोळ्याच्या पूजेत आणि स्त्रीची मृण्मय मूर्ती गुलाबाई तेव्हापासून पुजली जात असल्याचे आढळले. ताम्रपाषाण युगातील ही परंपरा सद्य:स्थितीत साडेतीन हजार वर्षांपूर्वीची ठरते. सुफलन आणि संततिवर्धन हा उद्देश या विधिविधानामागे आहे एवढे निर्विवाद. भाद्रपद पौर्णिमेपासून अ आश्विन पौर्णिमेपर्यंत महिनाभर गुलाबाईचा उत्सव चालतो. शंकराची बायको अर्थात भोलानाथाची बायको तीच पार्वती किंवा गुलाबाई होय.

लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांच्या मते हादगा, भोंडला, गुलाबाई स्वतंत्र असावेत, परंतु नंतर त्यांचे स्वरूप सारखे होऊन ते सर्व खेळ एकमेकांत मिसळून गेले. त्यामुळे त्यांचा विधी, उत्सव, गाणी एकसारखी असतात. गुलाबाई ही कुंवार मुलींची देवता आहे. भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या उत्साहाने घरोघरी गुलाबाई-गुलोजीची मूर्ती आणतात. विविध प्रकारची चित्रे भिंतीवर, जमिनीवर रांगोळीच्या माध्यमातून साकारतात. गुलाबाईचा परिसर रंगरंगोटी करून शोभिवंत करण्याचा प्रयत्न असतो. फुटलेल्या कपबश्यांच्या बारीक तुकड्यांनी वा बांगडीच्या तुकड्यांनी गुलाबाईच्या उत्सवात काढलेल्या रांगोळ्यांची लोककला अहिराणीच्या खेड्यांत आजही पाहायला मिळते. खेड्यातील घरांचे तळ मातीचे असल्याने, या मातीत कपबश्यांचे वा काचतुकड्यांचे लहानलहान तुकडे पुरून या रांगोळ्या साकारल्या जातात. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील खेड्यांमध्ये कित्येक घरात अशा रांगोळ्या पाहावयास मिळतात. ही झाली गुलाबाईच्या निमित्ताने घरात केली जाणारी सजावट. परंतु गुलाबाईचा एकूण पूजाविधीच रांगोळी चित्रांचे एक अनोखे संमेलन असते. सजवलेल्या कोनाड्यात पाटावर गहू, तांदूळ टाकतात, लोटीत पाणी भरून नागवेलीची पाच पाने ठेवतात. त्यावर कळसाचे नारळ ठेवतात. कळसाच्या शेजारी नागवेलीची दोन पाने ठेवतात व एका पानावर सुपारी तर दुस-या पानावर तांदूळ ठेवून त्यावर पैसे ठेवतात. या कळसाची आणि सुपारीची प्रथम पूजा, नंतर गुलाबाईची पूजा अशी प्रथा आहे. पूजेच्या वेळी गुलाबाईला पिवळी वस्त्रे नेसवायचा कुळाचार पळाला जातो. ज्वारीच्या पाच ताट्याची खोपडी (मंडप) उभी करून आजूबाजूला रांगोळ्या काढल्या जातात. फळांचा नैवेद्य दाखवला जातो. वांगे, दोडके, भोपळा, पडवळ, भेंडी, सीताफळ, कारले, काकडी, मिरची, गाजर, मुळा, तोंडले, घेवडा, मका वगैरे सर्व फळे व भाजी एकत्र करून पूजा बांधली जाते. विविध रंगांची, आकारांची, प्रकारांची सुगंधित फुले रोज बदलत्या क्रमाने व कुमारिकेच्या आवडीने गुलाबाईला वाहिली जातात. ही सर्व फळेफुले आणि भाजीपाला खानदेशातील तापी, गिरणा, पूर्णा, नर्मदा या मुख्य नद्या व त्यांचामध्ये समविष्ट झालेल्या छोट्यामोठ्या अनेक उपनद्यांच्या प्रदेशातील सुबकतेचे प्रतीक आहे.
खान्देशात ब्राह्मणांपासून आदिवासींपर्यंत सर्व जातीजमातींच्या मुली गुलाबाईची आनंदाने मांडणी करून पूजा करतात. सायंकाळी या गावातल्या मुलींनी एकत्र जमायचे व घरोघरी जाऊन गुलाबाईची पूजा, गाणी, आरत्या, रांगोळ्या, खाऊ असा कार्यक्रम महिनाभर नित्याने असतो. गुलाबाईची गाणीदेखील सासरच्या नात्यांची गंमतशीर कहाणी सांगतात. उदा.
गुलाबाई गुलाबाई, सासू कशी? सासू कशी?
चुलीवर बसलेली मांजर जशी,
गुलाबाई गुलाबाई सासरा कसा? झाडावर बसलेला माकड जसा
गुलाबाई गुलाबाई जेठ कसे, रुपायातले आठाणे जसे
गुलाबाई गुलाबाई जाऊ कशी, आठाण्यातली चाराणी जशी
सुनेला माहेरी जाण्याची ओढ, कधी नवराबायकोच्या प्रेमातील गोडवा तर कधी सासूसुनेच्या नात्यातील खट्याळपणा या गाण्यांमधून जाणवतो. अशा विविध आशयपूर्ण अशी गाणी मुलींच्या तोंडून ऐकायला मिळतात. भाद्रपद पौर्णिमेला सुरू झालेल्या उत्सवाची सांगता आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी संपन्न होते. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सामूहिकरीत्या उत्सव साजरा केला जातो. अंगणात सडा-रांगोळ्या घातल्या जातात. ज्या ठिकाणी एकत्रितपणे गुलाबाई - गुलोजीचा उत्सव साजरा करावयाचा तो ओटा मुली सडारांगोळ्या घालून कल्पकतेने सजवतात. गुलाबाईची पूजा, आरती झाल्यानंतर मुली आपापल्या घरच्या गुलाबायांना ठरलेल्या ओट्यावर घेऊन येतात. मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी होतात. गुलाबाईची विविध प्रकारची गाणी, विनोद, नाट्य, नृत्य, आदींची रेलचेल होते. महिनाभराचे माहेरपण संपवून ती आता सासरी जाणार म्हणून मुली कासावीस होतात. गुलाबाईच्या बिदाईसाठी मुलींनी प्रसाद म्हणून स्वत: स्वयंपाक केलेला असतो. उदा. बासुंदी, पुरी, कानोले, भाजी, बर्फी, असे ज्याच्या त्याच्या आवडीचे पदार्थ मुली बनवतात. गुलाबाईला नैवेद्य दाखवून मध्यरात्रीच्या सुमाराला चांदण्या रात्री सामूहिक जेवण करतात. भोजन संपल्यानंतर गुलाबाईच्या मूर्तीचे नदी किंवा विहिरीवर जाऊन विसर्जन करावयाचे.
गुलाबाई म्हणजे आदिमाता. या आदिमातेने खान्देशात मोठा सांस्कृतिक ठेवा जतन करून ठेवला आहे. हे संस्कृतिरक्षणाचे काम लहान मुलींच्या कितीतरी पिढ्यांनी शतकानुशतके केले आहे. सासुरवाशीण तरुणींच्या मनातील सुप्त लोकछंदाचे मुक्त रूप या उत्सवातून आढळून येते. खान्देशच्या संस्कृतीला त्यामुळे रुपेरी किनारच लाभली आहे.