आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Archana Narsapur Article About Teenagers And Connectivity

वेळीच लक्ष्‍मणरेषा आखावी !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अरे वैभव, जरा ये ना इकडे, बोल ना मावशीशी. तू आता मुंबईला जाणार, पुन्हा लवकर भेट होणार नाही, म्हणून ती मुद्दाम आली तुला भेटायला.’ सीमा त्याला बोलवत होती. वैभव मात्र हातानेच खुणावत, थांब... आलोच, म्हणत लॅपटॉपवरच बसलेला होता.

कालपासून सीमाची बहीण प्रतीक्षाही बघत होती, वैभव कधी लॅपटॉपवर, कधी टॅबलेट, तर कधी मोबाइलच्या अॅपवर.

इतका हुशार मुलगा. चांगला शिकला, नोकरी व छोकरी दोन्ही मनासारखं मिळालं, पण हा समोर प्रत्यक्ष भेटून बोलणं मात्र दुर्मिळ झालं होतं. मावशीला वाढदिवसाला आठवणीने फेसबुकवर विश करणार, व्हॉट्सअॅपवर फुलं पाठवणार, पण प्रत्यक्ष कधी गेलं तर याला त्या अॅप्सच्या जंजाळातून डोकं काढायला फुरसत नसायची.

अलीकडे हे प्रमाण वाढतच चालल्याचं दिसून येतंय. सीमा जेव्हा स्त्री जागरण मंचाकडे ही समस्या घेऊन आली, तेव्हा अशा कितीतरी घटना आठवून गेल्या. का घडतंय असं?

मुलं आठवी-नववीत गेली की, त्यांचे शाळेव्यतिरिक्त क्लासेस असतात. हे लांब असतात. मुलं पोहोचली का, उशीर होणार आहे वगैरे कम्युनिकेशनसाठी पालक मुलांना मोबाइल देतात. व्यक्ती संपर्कात राहावी, हाच खरा उद्देश. घरी प्रोजेक्टची कामं, त्यासाठी माहिती गोळा करणं यासाठी इंटरनेट सुविधा, पीसी, लॅपटॉप, टॅबलेट आदी साधन घेऊन दिली जातात. पण याचा कामापुरता उपयोग करता करता मुलं तर मुलं, आता मोठी माणसंसुद्धा त्यात खूप अडकून जाताना दिसतात.

आपण बदलत्या काळानुसार या साऱ्या सुविधा वापरायला हव्या, त्या वापरणं शिकून घ्यायला हवं; पण प्रत्यक्ष माणसांशी संवाद महत्त्वाचा आहे ना? तो तर जमायलाच हवा. खरंच बोलणं हृदयाला साद घालतं की मेसेज?

तुम्हाला खोटं वाटेल, पण हा माझ्यासमोरच घडलेला प्रसंग. मी रेल्वेने प्रवास करत होते आणि माझ्या बाजूच्या सीटवर एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं. त्यांचं वय, हातावरची मेंदी, चुडा हे सारं नवेपण दाखवत होतं. सहजीवनाचा तो नवथर काळ, मिळालेला मोकळा वेळ आणि ही जोडी मात्र आपापल्या मोबाइलवर व्हॉट्सअॅप, फेसबुक पाहण्यात गर्क. इतके आपण या माध्यमांच्या आहारी गेलो आहोत.

परवा घरी सहलीचं नियोजन चाललं होतं. कारने जाण्याचा सगळा रस्ता गुगल दाखवत होता. विमान, रेल्वे, हॉटेल सगळ्याचं बुकिंग घरबसल्या झालं. अगदी सोयीचं झालं. तसंच जिथे जाणार आहोत तिथलं हवामान, सध्याचं वातावरण याची माहिती मिळाली, हे सगळं छानच झालं. प्रवासात काही अडचण आली तर क्षणात मदत मागता येते. एकाच वेळी अनेकांशी संपर्क करता येतो. प्रत्यक्षात भेटू शकत नसलो तरी एकमेकांची खुशाली कळते. हे सगळं आपलं जीवन सुकर व्हावं, यासाठीच आहे. पण आपण मात्र याचा अतिरेक करतोय, असं नाही वाटत?

प्रवास सुरू झाला न झाला तोच, आता निघाले, आता हे गाव, हे खाल्लं-प्यालं, अमुक शेजारी वगैरे घरी पोहोचेपर्यंत असंख्य फोन्स, एसएमएस हे सगळं करताना आपण प्रवासाचा, निसर्गाचा आनंद घेणं, निवांत क्षणी स्वत:शी संवाद साधणं, निरीक्षण करणं, नवीन ओळखी करून घेणं हे विसरूनच गेलो आहोत. शिवाय आपण कुठे, काय, हे टाकून आपली, घराची सुरक्षितताही धोक्यात घालत असतो. तसेच वैयक्तिक माहिती, फोटोदेखील सोशल मीडियावर बिनधास्त शेअर करत असतो. यातून अनेकांचे संसार, आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे कितीतरी आहेत.

गुगल हा तर नव्या पिढीचा Lifeguardच झाला आहे. पुस्तकाचे नाव? लेखक कोण? गायक? कोणती नदी? कोणतीही माहिती एका क्षणात, अल्लाद्दीनच्या चिरागाप्रमाणे हजर. अगदी गाण्याच्या भेंड्यादेखील मुलं यात पाहून खेळतात. माहिती मिळवा; पण शोधण्याची, विचार करण्याची जी गंमत आहे ना, ती मुलं विसरली. डोक्याला चालनाच मिळत नाही. कोणत्या नाटकातला बरं हा संवाद? कोणाची ही कविता? हा खेळ खेळताना उत्तर सापडलं की होणारा आनंद, यातून साधली जाणारी मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती खूप कमी होत चालली आहे. मेंदूचादेखील व्यायाम झाला पाहिजे. पण आता टीव्ही, नेट, मोबाइलमुळे शरीराचा व्यायाम नाही व मेंदूचाही नाही, फक्त डोळे आणि बोटांना व्यायाम होतो एवढे खरे. तीच गोष्ट टीव्हीची, जाहिरातींची. मुलं त्या भासमयी जगात वावरतात. त्यातील पात्राप्रमाणे आपण असावं, आपला जोडीदारही तसा असावा/दिसावा, अशी ही यादी वाढतच जाते. मन नकळत तुलना करू लागतं, अपेक्षा करतं. अपेक्षाभंग, स्टेटस वगैरेच्या भ्रामक कल्पनांतून मग मुलं नैराश्याला बळी पडतात.
म्हणूनच असं वाटतं की, सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे, तिचा वापर जपूनच करायला हवा. टेक्नॉलॉजी जरूर वापरावी, पण डोळसपणे. सध्याच्या तरुण पिढीत ही मोबाइल, नेटची व्यसनाधीनता इतकी वाढली आहे की, बंगलोर, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांत मोबाइल, नेट व्यसनमुक्ती केंद्रे सुरू झाली आहेत. ती आता गल्लोगल्ली व्हावीत, एवढे हे प्रमाण वाढू नये.
आपल्यासाठी माध्यमे आहेत, आपण माध्यमांसाठी नाही. मनोरंजन व आहारी जाणं, यांच्यातली लक्ष्मणरेषा ओलांडता कामा नये. नाहीतर माध्यमरूपी रावण कधी आपल्याला पळवून नेईल, ते कळणारही नाही.
archananarsapur@gmail.com
(लेखिका औरंगाबाद येथील स्त्री जागरण मंचाच्‍या सदस्य आहेत.)