आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला शाळेत जायचंय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शालेय शिक्षणात मुलींना अनेक सवलती आहेत. शिष्यवृत्ती आहेत. पण तरीही त्यांना मिळणारा आर्थिक लाभ त्यांच्या शिक्षणासाठी का उपयोगात आणला जात नाही?

ग्रामीण भागात प्रत्येक गावात काही मुली अशा असतात, ज्या ओरडून ओरडून सांगत असतात की, मला शाळेत जायचंय. उदाहरणं अनेक आठवतात मला. काही वर्षांपूर्वी इयत्ता तिसरीत कांचन शिकत होती. त्याच वर्षी तिचे वडील वारले. आईने गावातच दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले आणि कांचनची शाळेतील गैरहजेरी वाढली. तिला एक वर्षातच भाऊ झाला. कांचनचे दुसरे वडील कामधंदा करत नसत. त्यामुळे सासू, दोन मुलं व ते दोघं अशी पाच जणांची जबाबदारी कांचनच्या आईवर येऊन पडली होती. त्यामुळे ती रोज शेतात जात होती. आणि हळूहळू कांचनचा उपयोगही शेतकामासाठी होऊ लागला. शाळेतील शिक्षकांनी खूप प्रयत्न करूनही कांचनची शाळा सुरू झालीच नाही.

पहिलीच्या वर्गातली दिव्या. काही दिवस शाळेत आली. थोड्याच दिवसांत केवळ अकरा महिन्यांचं बाळ तिच्या अंगावर टाकून आई शेतात जायला लागली. एके दिवशी पेपर लिहिण्यासाठी तिला बोलवले तर ती तिच्या भावालाच कडेवर घेऊन शाळेत आली. त्या बाळाला घेऊन तिला बेंचवर बसताही येत नव्हतं. शेवटी ती खाली बसली तर इतकी मुलं पाहून ते बाळ रडायला लागलं. तसाच तिने पेपर लिहायला घेतला तर बाळाने शी केली. शेवटी शिक्षकांनीच तिला घरी पाठवून दिले. 

शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून दर वर्षी त्यांना शाळेत पाठवले जाते. अशाच एका सर्वेक्षणात ओमी नावाची एक पावरा समाजाची मुलगी शाळेत दाखल झाली. तिची वहिनी दीड व अडीच वर्षांच्या दोन मुलांना तिच्याजवळ सोडून शेतात जात असे. उरलेल्या वेळेत दिवसभर ओमी हंड्याहंड्याने पाणी वाहायचे काम करायची. सहा वर्षांच्या कोवळ्या मुलींवर जेव्हा नकळत असे बालसंगोपन लादले जाते, तेव्हा कुठून त्यांना मुळाक्षरांची ओळख होणार आहे.

अशा भरपूर मुली टप्प्याटप्प्यावर आपल्याला ग्रामीण भागात भेटतात. सतत स्थलांतर करणाऱ्या कुटुंबातील मुलींचा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नसतो. आजही मुलगी आणि घरकाम हे समीकरण सुटता सुटत नाही. रविवारी सुट्टी आली तरी मुलींना आनंद होत नाही, कारण घरी राहिलं म्हणजे भांडी घासणे, कपडे धुणे, घरातील ऊरसूर कामे करणे आले. त्यापेक्षा शाळाच बरी, अशी ग्रामीण भागातील मुलींची प्रतिक्रिया असते. इयत्ता चौथीच्या मुली ग्रामीण भागात सुंदर भाकरी टाकतात. हे त्यांचं कौशल्य समजावं की, आईने टाकलेल्या जबाबदारीचा परिणाम?

मुलग्यांना जसे बालपण असते तसेच मुलींनाही असते. पण ग्रामीण भागात एक मुलगी म्हणून ते बालपण कधीच वाट्याला येत नाही. पापड आणि शेवाळ्यांचा सीजन तर त्यांचा पापड सुकवण्यातच जातो. अशा वेळी शाळेत साहेब येवो की शाळेची सहल जावो, त्यांना काही देणेघेणे नसते. काही वेळेस मुली शाळेत येतात तेव्हा इतक्या थकलेल्या असतात की, फळ्यासमोर बसल्यावर त्यांना डुलकी येत असते. शाळेत येण्यापूर्वी काही उच्च प्राथमिक वर्गातील मुली नदीवर कपडे धुणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे ही कुटुंबातील एका वडीलधाऱ्या स्त्रीची कामे करून येतात. त्या कामांना इतक्या कंटाळलेल्या असतात की, शाळेत त्यांना चुकून कोणी काही काम सांगण्यासाठी आवाज दिला तर त्या मागे वळून पाहातपण नाहीत. 

काहींना प्राथमिक शिक्षणात अडचणी येतात, तर काहींना उच्च शिक्षणात. बऱ्याच वेळा हुंडा पद्धतीनेही मुलींच्या जीवनमानावर आणि शिक्षणावर फरक पडत असतो. लेकीच्या लग्नाच्या खर्चामुळे शिक्षणाचा खर्च टाळायचा प्रयत्न होतो. बीई करण्यापेक्षा बीए करून लग्न लावण्याचा प्रयत्न पालकवर्ग करीत असतात. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांचा परिपाठ पाहिला तर निदान चार मुलींसोबत तरी एकदीड वर्षाचे बाळ प्रार्थनेसाठी बसलेले असते. घरी कोणी नाही का, असे विचारले तर उत्तर मिळते, सर्व जण शेतात गेले आहेत. अशा वेळी त्या बाळाला घरी सोडून ये, असे सांगितले की, त्या मुली शाळेत येतच नाहीत. अशा या जबरदस्तीच्या बालसंगोपनातून केवळ एक आईच आपल्या मुलीची सुटका करू शकते. 

सासूला तिच्या सासरी त्रास झाला म्हणून ती सुनेला त्रास देते, त्याचप्रमाणे मी लहानपणापासून घर सांभाळते आहे तशीच माझी मुलगीही सांभाळेल, असे हे पिढ्यान‌्पिढ्या चालणारे पण न सुटणारे कोडे आहे.  शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना राबवली जाते. त्या वेळी वर्गात कधीही न चमकणाऱ्या मुली शाळेच्या ओट्यावर दिसतात. त्या पटकन खिचडीची ताटली भरतात आणि गायब होतात. त्या ताटलीतली खिचडीपण त्या घरी जाऊन त्यांच्या लहान भावंडांना भरवतात. म्हणजे बुद्धीची पोषक मूल्ये तर त्या घेतच नाहीत, पण शरीराची पोषक मूल्येदेखील त्या लादलेल्या बालसंगोपनामुळे त्यागतात. आजही काही ठिकाणी मुलगी दहावी होताच तिचा विवाह आटोपतात. त्यामुळे पुढील शिक्षणाचा प्रश्नच राहात नाही. आपल्या कन्येच्या आयुष्यातील शिक्षणाचे दरवाजे बंद करून आपण किती मोठी चूक केली, याची जाणीव पालकांना जेव्हा मुलीच्या वैवाहिक जीवनात काही दुर्घटना घडते, तिची मुले आणि ती रस्त्यावर येतात, तेव्हा होते. पण तोपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते. 

शालेय शिक्षणात मुलींना अनेक सवलती आहेत. शिष्यवृत्ती आहेत. पण तरीही त्यांना मिळणारा आर्थिक लाभ त्यांच्या शिक्षणासाठी का उपयोगात आणला जात नाही?

“बेटी बचाओ, बेटी पढाओ”, “सब पढे, सब बढे”, “माझी कन्या भाग्यश्री” इत्यादी अनेक योजना मुलींसाठी शासन राबवत आहे. पण तरीही आज अनेक मुली शाळेपासून दूरच आहेत.

- अर्चना पाटील, अंमळनेर
archup412@gmail.com
बातम्या आणखी आहेत...