आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानदानाचा दिवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक वर्षांपासून आपण डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करतो आहोत. वर्गातील बालके, सरस्वतीची प्रतिमा, उत्साही परिपाठ, आनंददायी कविता, आशयसमृद्ध पाठ्यांश, वनभोजन, शैक्षणिक सहली, शनिवारची कवायत, दुपारची मधली सुटी, मातीची फळे, घोटीव कागदापासून तयार केलेल्या विविध वस्तू, मामाचे पत्र हरवलेचा खेळ आणि आपण शिक्षक. शिक्षकाच्या हातून एक विद्यार्थी घडला म्हणजे एक कुटुंब घडते. ते कुटुंब राष्ट्रीय विकासात योगदान देते. म्हणून शिक्षकाचा वेळ मूल्यवान असतो, तो वाया घालवू नये. जोपर्यंत ज्ञानेंद्रिये साथ देतील तोपर्यंत शिक्षक अध्यापनाचे काम करत असतो. त्यामुळेच आपण शिक्षक असण्याचा आपल्याला अभिमान असावा.
          
आपण शाळा डिजिटल करतो, शाळांना आकर्षक रंगसजावट करतो, मुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील असतो तरीही एक दिवस एखादा गावकरी दारू पिऊन येतो आणि शिक्षकांचा अपमान करून जातो. तरीही ज्ञानदानाचे काम सोडू नका. विद्यामंदिरात केवळ ज्ञानदानाचेच कार्य नसून अनेक कामे करावी लागतात. अधिकारी वर्गाचे दडपण असते. कौटुंबिक समस्या असतात. पण त्रासू नका. शाळेत कोणी सोबत देवो न देवो, ज्ञानदानात खंड पडू देऊ नका. आपण जीव तोडून शिकवत असतो तरीही १००%काम पूर्ण होत नाही.  ज्ञानदानाचा दिवा तेवत ठेवा. एकट्याने प्रयत्न करत राहा म्हणणे खूप सोपे आहे. शिक्षकाचा विद्यार्थी जेव्हा आत्मविश्वासाने बोलू लागतो, तेच त्याचे खरे बक्षीस असते. 

- अर्चना पाटील, अंमळनेर
बातम्या आणखी आहेत...