आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Argument In Pratishthannagar,no Discusion On Liteature

प्रतिष्ठाननगरीत वाद, साहित्याशिवाय पार पडलेले संमेलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


राज्य सरकारमधले हेवीवेट राजकीय धुरीण तथा पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते 22 डिसेंबरला दुपारी उद्घाटकीय सोहळा दिमाखात पार पडला. त्या वेळी त्यांनी म्हटले की, साहित्य संमेलन म्हटले की वाद आलाच...! संमेलनाध्यांची निवड, निवडणूक प्रक्रिया यावरून पूर्वीची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने गाजली, पण पैठण येथील मराठवाडा साहित्य संमेलनात कुठलाही वाद झाला नाही. त्यामुळे साहित्य संमेलनाचा त्यांनी निर्विवाद झालेले संमेलन असा उल्लेख केला, पण पैठणमध्ये साहित्य संमेलनाच्या पूर्वी आणि नंतर काय कवित्व झाले याचा त्यांना अजिबात अंदाज नव्हता, किंबहुना त्यांनी तसे उपस्थितांना जाणवू दिले नाही. स्वागताध्यक्ष आमदार संजय वाघचौरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने त्यांनी सर्व सूत्रे आपल्या ताब्यात घेतली होती. संमेलन सर्वसमावेशक करून आपल्या शिरपेचात तुरा खोवण्याऐवजी त्यांच्याकडे स्वागताध्यक्षपद असल्यामुळे इतर पक्षांच्या नेत्यांनी संमेलनाकडे पाठ फिरवली होती. हे भुजबळ यांना कदाचित माहीत होऊ दिले नसणार. शिवसेना, मनसे, भाजप, काँग्रेससहित अन्य पक्ष संघटनांचे कार्यकर्ते संमेलनस्थळी आलेच नाहीत. पैठण तालुका जालन्याचे भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्या मतदार संघात आहे. निमंत्रण पत्रिकेत त्यांच्या साध्या नावाचाही त्यांनी उल्लेख होऊ दिला नाही. त्याऐवजी त्यांनी चंद्रकांत खैरे यांचे नाव घातले, मात्र त्यांनी दोन दिवसांत एकदाही पैठणला हजेरी लावली नाही. जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती आणि मनसेचे नेते डॉ. सुनील शिंदे, शिवसेनेचे माजी आमदार तथा संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन संदिपान भुमरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, उपनगराध्यक्ष जीतसिंग करकोटक यांनी तर संमेलनावर खुलेआम बहिष्कार पुकारला होता. त्यामुळे संमेलन सर्वसमावेशक होण्याऐवजी केवळ ‘वाघचौरेमय’ झाल्याची चर्चा उपस्थित जाणकार लोकांमध्ये होती. पैठणचे भूमिपुत्र संमेलनाध्यक्ष बाबा भांड यांना त्याची साधी भणक ही त्यांनी जाणवू दिली नाही. तोकडा सभामंडप, निमंत्रितांची गैरसोय, साहित्यिकांना पुरेसा मानसन्मान मिळू शकला नाही. त्यात कौतिकराव ठाले पाटलांनी मंत्र्यांना खडे बोल सुनावल्यामुळे मंत्र्यांनीही नाराजीचाच सूर आळवला होता. छगन भुजबळ यांचे दुपारी आदरातिथ्य आटोपले आणि त्यांना मार्गी लावल्यानंतर स्वागताध्यक्ष वाघचौरे यांनी घेतलेली विश्रामगृहातील ‘वामकुक्षी’ही चांगलीच गाजली.

परिसंवादत झाली दमदार चर्चा : ‘शालेय विद्यार्थ्यांना भाषिक ज्ञान देण्यास सध्याचे अभ्यासक्रम अपुरे पडत आहेत का..? या विषयावर मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष दादा गोरे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या परिसंवादात दमदार चर्चा करण्यात आली. डॉ. वसंत मून, प्रा. मच्छिंद्र चाटे यांनी व्यक्त केलेले विचार अभ्यासक्रम आणि प्रमाण मराठीला आव्हाने देणारे ठरले. त्यानंतर अध्यक्षीय समारोपामध्ये गोरे यांनी मागासलेल्या प्रदेशानुसार अभ्यासक्रमांची रचना करणे गरजेचे असल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांची आकलनशक्ती आणि त्यांच्या ज्ञानाची कुवत लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची रचना केली तरच गुणवंत शालेय विद्यार्थी घडतील. प्रदेशांचे मागासलेपण लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची रचना करण्याचा एक नवीन विचार देणारे हे साहित्य संमेलन होऊ शकले. मात्र, त्याशिवाय अनेक विषयांवर चर्चा होऊ शकली असती.‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता’, ‘ मराठवाड्याचा पाणीप्रश्न’ यावर स्वतंत्र परिसंवादातून चर्चा होणे अपेक्षित होते.

संमेलनाध्यक्षांची स्पष्ट भूमिका :
मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाने सरकारचीही झोप उडवली आहे. त्यातच संमेलनाची व्याप्ती जर मराठवाड्याची असेल आणि संमेलनाध्यक्ष बाबा भांड यांच्या अध्यक्षीय भाषणाची मध्यवर्ती भूमिकाही भीषण पाणीटंचाई हीच होती. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांनी जल, जंगल आणि गड किल्ल्यांवर सर्वांचा समान अधिकार दिल्याचे गौरवाने उल्लेख केला आणि विरोधाभास म्हणून पश्चिम महाराष्ट्र आणि उद्घाटक भुजबळ यांच्या उत्तर महाराष्ट्रानेही जायकवाडीला हक्काचे पाणी देणार नसल्याची भूमिका घेतली. याचा उल्लेखही केला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या असमान पाणी वाटपाच्या भूमिकेवर स्वतंत्र परिसंवादातून चर्चा होऊ शकली असती. मात्र, तसे करणे आयोजकांना संयुक्तिक वाटले नाही. भ्रष्टाचाराचे मागील दोन वर्षात अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे सरकारची प्रतिमा त्यामुळे कधी नव्हे ती डागाळली आहे. त्यावर परिसंवादातून चर्चा होऊ शकली असती. त्यावर डोळेझाक करण्यात आली त्यामध्ये स्वागताध्यक्षांचे कटकारस्थान असण्याची शक्यता उपस्थितांमध्ये होतीच.

34 व्या संमेलनाचे 23 डिसेंबरला ‘सूप’ वाजले. समारोपीय सत्रासाठी निमंत्रित असलेले आणि पत्रिकेतील उल्लेखित नियोजित पाहुण्यांपैकी एकानेही हजेरी लावली नाही. त्यामुळे संमेलनाध्यक्षांच्या उपस्थितीत ‘वांझोटा’ समारोप करण्यात आला. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, माजी विधानसभाध्यक्ष अरुण गुजराथी, काँग्रेस आमदार डॉ. कल्याण काळे, कोकणचे शिक्षक आमदार रामनाथ मते आणि पुण्याचे शिक्षक आमदार भगवान साळुंके यांची नावे पत्रिकेत घालण्यात आली. मात्र, यापैकी एकही राजकीय नेता हजर झाला नाही. फक्त बडेजाव करण्यासाठी निमंत्रण पत्रिकेत नावे घातली, अशी चर्चा साहित्यिकांमध्ये झाली. 48 कि. मी. अंतरावरील औरंगाबादेत स्थायिक फुलंब्रीचे आमदार डॉ. काळेंनीही वाघचौरे यांच्या हातावर तुरी दिल्या. शनिवारपासून आलटून पालटून जी मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. त्यांनाच नाईलाजाने विराजमान करून समारोप करण्यात आला.