आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान : पुरोगामी, आधुनिक आणि नास्तिकसुद्धा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तान म्हटले, की दहशतवादी, मुंबईवर झालेला 26/11चा हल्ला, अजमल कसाब, सततचे बॉम्बस्फोट, इस्लामी मूलतत्त्ववादी, भारतीय सैनिकांना क्रूरपणे मारणारे पाकिस्तानी लष्कर अशा नकारात्मक प्रतिमाच चटकन डोळ्यासमोर येतात...
पाकिस्तानमध्ये दहशतवादाशिवाय काहीच नाही, तिथले लष्कर सरकारपेक्षा वरचढ आहे, डोकेफिरू मूलतत्त्ववादी समाजाला पुन्हा जुन्या काळात रेटत आहेत, अशी मतेही सातत्याने व्यक्त होत राहतात. पण, कल्पना आणि ऐकीव माहितीपेक्षा वास्तव कमालीचे भिन्न असते. त्यानुसार इथल्या तरुणांना भारतामध्ये असलेल्या विचार स्वातंत्र्याचे सुप्त आकर्षण असल्याचे जाणवते. भारतात मोकळेपणाने हिंडणारी, वावरणारी तरुण पिढी त्यांना आपलीशी वाटते. उच्च शिक्षणासाठी भारतात असलेले पर्याय त्यांना सतत खुणावतात आणि पाकिस्तानमध्येही भारतासारखेच पुरोगामी वातावरण निर्माण होईल, असे स्वप्नही ते उराशी बाळगतात...
जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात लाहोर येथे झालेल्या ‘साऊथ एशिया फ्री मीडिया’(साफ्मा)च्या परिषदेच्या निमित्ताने दुसर्‍यांदा पाकिस्तानला भेट दिल्यावर तिथल्या तरुण मित्र-मैत्रिणींशी बोलताना, भारताबद्दल त्यांना असणारे हे आकर्षण पुन:पुन्हा जाणवत राहिले. एकूणच, प्रतिकूल परिस्थितीतही नास्तिकता, आधुनिक विचार जोपासताना धर्मभोळेपणाला विरोध करणारे हे तरुण मित्र पाकिस्तानात कशा पद्धतीने ‘स्ट्रगल’ करत आहेत, हे जाणून घेणे हा जाणिवा विस्तारणारा अनुभव ठरला...
लाहोरमध्येच वाढलेल्या रब्बियाने तेथील सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली सुरू केली आहे. ती अल्ला मानत नाही. पण इतक्या मोकळेपणाने हे समाजामध्ये सांगणे तिच्यासाठी कठीण आहे. केवळ तिच्यासारख्या विचारांच्या मूठभर लोकांमध्येच ती हा विचार मोकळेपणाने मांडू शकते. अनेक नातेवाईक, घरातले सदस्य मुस्लिम धर्माची काही तत्त्वे न पाळण्याबद्दल फारसा विरोध करत नाहीत; पण नास्तिक असणे ही संकल्पनाच त्यांच्या पचनी पडू शकत नाही, असे रब्बियाने सांगितले. त्याबाबत ‘का?’ असा प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही, असे त्यांना वाटते. त्यामुळे भारतामध्ये देव न मानण्याचे स्वातंत्र्य तिला खूपच प्रभावित करते. नास्तिक असणे, हे भारतातल्या हिंदू धर्मातील मूलतत्त्ववाद्यांच्या पचनी न पडणारी गोष्ट असली तरी हा विचार मांडण्यासाठी कोणीही आडकाठी करू शकत नाही. पण पाकिस्तानामध्ये मुस्लिम आणि नास्तिक या दोन संकल्पनांचा मेळच बसू शकत नाही, असे तिने सांगितले. अर्थात, भारतातही इस्लामबाबत तशी परिस्थिती आहेच. रब्बियाची आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, शहीद भगतसिंग यांना 23 मार्चला फाशी देण्यात आली, त्या दिवशी दरवर्षी ती व आणखी काही मित्रमंडळी लाहोरमध्ये त्याचे स्मारक व्हावे म्हणून निदर्शने करतात. भगतसिंग फाळणीपूर्वी शहीद झाले होते. त्यामुळे ते दोन्ही देशांचे शहीद आहेत, असे ती आणि तिच्यासारखे काही तरुण मानतात. त्यांच्या स्मारकाची मागणी सतत रेटण्याचा प्रयत्न करतात. भगतसिंग यांनी फाशीवर जाण्यापूर्वी वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी सांगितलेले तत्त्वज्ञान रब्बियासारख्या तरुणीला खूप मोलाचे वाटते. तिच्या सहा वर्षांच्या मुलाला शाळेतून मिळत असलेल्या धार्मिक शिक्षणाबद्दलही तिची नाराजी आहे. एवढ्या लहान मुलांना सक्तीचे धार्मिक शिक्षण नको, असे तिला मनोमन वाटते.
कराचीमधील एका न्यूज चॅनेलमध्ये काम करणार्‍या झेनोबियाला आधुनिक जगातील संगीत, म्युझिक बँड्स, पुस्तके यांचे खूप आकर्षण आहे. स्वत:चे टोपण नावसुद्धा तिने 70च्या दशकातल्या रॉक सिंगर ‘झिग्गी स्टारडस्ट’च्या नावावरून झिग्गी स्टार असे ठेवले आहे. पाकिस्तानमधल्या आधुनिक संगीतकारांना ती कायम आपल्या कार्यक्रमात बोलावते. दहशतवाद, मूलतत्त्ववादी यांच्या विरोधातील ‘टॉक शो’ करायला तिला आवडतात, कारण अशा कार्यक्रमांना तरुणांमध्ये पसंती आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीमध्ये ‘इनव्हेस्टिगेशन टीम’चा प्रमुख एहमर हा शैलीदार इंग्रजी बोलणारा, एखाद्या विषयावर तावातावाने वाद घालणारा, आजच्या भाषेत ‘कूल’ लाइफचा चाहता असा एक तरुण पत्रकार. घोळक्यात उभे राहून आम्ही पाच-सहा जण बोलत असताना एकाने त्याला सहज म्हटले, की तूसुद्धा मुंबईचाच का? त्यावर तो एवढा खुश झाला, की आपण मुंबईहून आलेल्या मुलांप्रमाणेच दिसतो, याचाच त्याला आनंद वाटत राहिला; ‘वॉव! आय अ‍ॅम जस्ट लाइक यू!’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रियाही त्याने दिली. त्याच्या टीमने अजमल कसाब पाकिस्तानी असल्याची बातमी पहिल्यांदा ‘ब्रेक’ केली होती. त्या वेळी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला, निदर्शने झाली, धमक्या दिल्या गेल्या. पाकिस्तान सरकार हे मानायलाच तयार नव्हते, की कसाब हा त्यांचा नागरिक होता. अर्थात, नंतर ही बातमी आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही लावून धरली आणि कसाब हा पाकिस्तानचाच होता हे सिद्ध झाले. त्यामुळे एक नुकसान मात्र असे झाले, की इन्व्हेस्टिगेशनच्या बातम्यांसाठी देण्यात येणारे बजेट चॅनेलने कमी केल्याचे एहमरने सांगितले.
उझेरने अलीकडेच ‘इंटरनॅशनल रिलेशन्स’ हा विषय घेऊन पदवी मिळवली आहे. सध्या तो या विषयातच मास्टर्स डिग्री मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. पण इंग्लंड किंवा अमेरिकेमध्ये जाऊन शिक्षण घेण्यापेक्षा त्याला भारतात दिल्लीमध्ये येऊन उच्च शिक्षण घ्यायचे आहे.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी परिसरामध्ये ‘सार्क’ देशांच्या नावाने एक शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आली असून या संस्थेतूनच त्याला आपले उच्च शिक्षण घ्यायचे असल्याचे तो सांगतो. पाकिस्तानमध्येही उच्च शिक्षणासाठी अनेक चांगल्या संस्था आहेत, पण उझेरला मात्र भारतातच येऊन शिकायचे आहे.
एबादही एका आंतरराष्ट्रीय संस्थेसाठी पत्रकार म्हणून काम करतो. भारतात अलीकडेच झालेल्या भ्रष्टाचारविरोधी आणि दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर झालेल्या आंदोलनाविषयी त्याला खूपच उत्सुकता होती. भारतातला मध्यमवर्ग ज्या पद्धतीने एकत्र आला, याचे त्याला खूप कौतुक होते. येथे झालेले आंदोलन योग्य की अयोग्य, त्यातून फलनिष्पत्ती काय, हे वादाचे मुद्दे असू शकतात; पण दुर्दैवाने पाकिस्तानमध्ये मध्यमवर्गच कमी असल्याने अशा पद्धतीने एकत्र येऊन आंदोलन करणे ही गोष्ट सहज शक्य नसल्याचे तो सांगतो. पाकिस्तानमध्ये लोक एक तर खूप श्रीमंत वर्गातले आहेत किंवा गरीब तरी आहेत. त्यांना जोडणारा मध्यमवर्ग येथे संख्येने कमीच असल्याचे एबादने सांगितले. भारतामध्ये दिल्लीला त्याने भेट दिली असली तरी मुंबई बघण्याची त्याची इच्छा अजून अपूर्णच आहे.
केवळ गंभीर विषयांवरच ही तरुण मुले-मुली बोलतात, असे नाही. त्यांनाही गॉसिप करायला आवडते. मग ते बॉलीवूडच्या स्टारबद्दल असो किंवा त्यांच्याच एखाद्या राजकीय नेत्याबद्दल. या सर्व प्रसंगांमधून, चर्चेमधून सांगण्याचा मुद्दा हा की बॉलीवूडचे चित्रपट, हिंदी टीव्ही मालिका यामुळे त्यांना भारतीय समाज हा ‘व्हर्च्युअली’ परिचयाचा वाटतो. भारताबद्दल त्यांना एक प्रकारे जवळीक वाटत राहते.
आपला एखादा मित्र किंवा मैत्रीण भारतीय आहे, हे सांगायला त्यांना आवडते. या सगळ्यांशी बोलल्यावर आपण भारतात की पाकिस्तानात, हा प्रश्नच पडत नाही. तेच विषय, तोच मोकळेपणा, गंभीर चर्चेला थोडा गॉसिपचा तडका; हे तर आम्ही इथेही अनुभवतो. अगदी भारत-पाक युद्धाच्याही विरोधात ही तरुण मंडळी आहेत. कारण त्यांच्या मते, पाकिस्तानसमोर गरिबी, शिक्षण, आरोग्य हे प्रश्न अधिक गंभीर आहेत. पण लष्कर, सनदी अधिकारी आणि मूलतत्त्ववाद्यांनी या देशाला बदनाम केले आहे. त्यामुळेच सामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्याच वेळी देशातल्या बहुसंख्य मुलांना अजूनही आधुनिक शिक्षण मिळत नाही, त्यांच्यासमोर रोजगाराचे प्रश्न उभे आहेत, त्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांच्या हाती शस्त्रे दिली जातात आणि दहशतवादाला खतपाणी मिळत राहते, याची जाणीवही या तरुण वर्गाला आहे. समाजातील एका विशिष्ट स्तरातून आल्यामुळे शिक्षण, नोकरी हे प्रश्न या मित्रमंडळींना भेडसावणारे नव्हते; पण आजूबाजूची परिस्थिती मात्र मन सुन्न करणारी असल्याची टोचणी त्यांच्या मनात कायम जाणवली. त्यांच्याच वयाची मुले जेव्हा मानवी बॉम्ब बनतात आणि देशातल्या किंवा बाहेर जाऊन निरपराध लोकांना मारतात, त्या वेळी संताप येण्याबरोबरच असे आपल्याच देशात का घडते, असा उद्विग्न प्रश्न त्यांना पडल्याशिवाय राहत नाही. अशा वेळी शेजारी म्हणून भारताचा त्यांना आधार वाटत राहतो आणि अपेक्षेने ते आपल्याकडे पाहत असतात...

shruti.sg@gmail.com