आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arogyavidya.net Proving To Be A Good Health Guide

आरोग्याचा मार्गदर्शक आरोग्य विद्या नेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजचे जग हे माहितीच्या विस्फोटाचे जग आहे. वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी, रेडिओ तसेच इंटरनेटच्या माध्यमातून आज हवी ती माहिती आपण मिळवू शकतो. आरोग्यविषयक माहितीचाही सध्या महापूर आलेला दिसतो. दुर्दैवाने आरोग्य हेदेखील एक विकण्याजोगा माल बनल्याने ब-याचदा छुप्या हेतूसहित आरोग्य शिक्षण उपलब्ध केले जाते. यात वर्तमानपत्रातील प्रायोजित लेख, रेडिओ-दूरचित्रवाणीवरील प्रायोजित कार्यक्रम व धंदेवाईक वेबसाइट्स यांचा समावेश होतो. या सर्व बाबींमुळे तज्ज्ञांकडून विश्वासार्ह असे आरोग्य शिक्षण मिळणे ही आज समाजाची महत्त्वाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचे सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. श्याम अष्टेकर यांनी 14 फेब्रुवारी 2010 रोजी वेबवर प्रकाशित केलेल्या मराठी ई-पुस्तकाचे अर्थात www.arogyavidya.net चे यश लक्षणीय म्हणावे लागेल. गेल्या तीन वर्षांत या संकेतस्थळाला सतरा लाख वेळा भेटी नोंदवल्या गेल्या असून दररोज हे प्रमाण सरासरी 2000 इतके आहे. भेट देणा-यांमध्ये भारतातील तसेच इतर देशातील नागरिकांचा समावेश आहे.

सुमारे एक हजार सचित्र पाने, इंटर अ‍ॅक्टिव्ह अर्थात संवादी रोगनिदान, व्हिडिओ आणि रोगनिदान तक्ते यातून प्राथमिक आरोग्याची परिपूर्ण माहिती या ई-पुस्तकातून मिळते. या ई-पुस्तकात शब्दशोध अर्थात ksearchl ची सोय उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षी या मराठी संकेत स्थळाला राज्य मराठी विकास परिषद आणि सिडॅक यांच्या वतीने प्रथम पारितोषिक देऊन गौरवण्यात आले होते. हे संकेतस्थळ मोफत असून खूप जास्त वाचकांनी त्याचा लाभ घेणे अपेक्षित आहे. शाळेतील शिक्षकांनी या ई-बुकचा विद्यार्थ्यांना परिचय करून द्यायला हवा. त्यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी विश्वासर्ह माहिती मिळेल. सामान्य आजारांवर योग्य ते प्राथमिक उपचार व शक्य तोथे घरगुती उपचारदेखील यात देण्यात आले आहेत. भारत वैद्यक संस्थेच्या डॉ. श्याम अष्टेकर व डॉ. रत्ना अष्टेकर यांचे या ई-पुस्तकाबद्दल करावे तेवढे अभिनंदन थोडेच आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या ई-पुस्तकात नवीन माहितीची भर घालण्याची व त्यासाठी सर्वांचा सहभाग घेण्याची त्यांची इच्छा आहे. या पुस्तकात भर घालायची इच्छा असलेल्या वाचकांनी shyamashtekar@yahoo.com या ई-मेलवर संपर्क साधावा.