आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पनामा: प्रगतीचा शतकमहोत्सवी जलमार्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीराच्या वरच्या बाजूला शीर असावे, तशी वर उत्तर आणि मध्य अमेरिका. खालच्या बाजूला धड असावे, तशी दक्षिण अमेरिका. शीर आणि धडाच्या मध्ये बारीकशी मानगूट असल्यासारखे ग्वाटेमाला, होंडुरा, निकाराग्वा, कोस्टारिका, पनामा हे देश आहेत. अटलांटिक महासागराचा भाग असलेला कॅरेबियन सी आणि पॅसिफिक महासागर यांच्यामध्ये असलेला अतिशय अरुंद असा भूभाग म्हणजे हे देश. त्यात पनामा अगदी दक्षिणेला आणि खूपच अरुंद. इतका की, एके ठिकाणी जमिनीची रुंदी फक्त 80 किलोमीटर. या जमिनीच्या दोन्ही बाजूला विशाल महासागर.


कोपा एअरलाइन्सच्या विमानाने आम्ही न्यूयॉर्कच्या जेएफके एअरपोर्टवरून पनामाकडे निघालो. पनामाचीच ती विमान कंपनी होती. बहुधा एवढी एकच एअरलाइन्स त्या देशात असावी. पनामा एअरपोर्टवर उतरल्यानंतर इमिग्रेशन चेक इन आणि व्हिसा ऑन अरायव्हलसाठी रांग लावली. पनामाचा व्हिसा आम्ही भारतातून काढलेला नव्हता. व्हिसासाठी भारतात आठ हजार रुपये इतकी फी पडणार होती. पनामात ऑन अरायव्हल व्हिसासाठी फक्त 50 डॉलर्स फी पडते, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. प्रत्यक्षात मात्र कोणतीही फी न भरता आम्हाला व्हिसा मिळाला. आम्ही अमेरिकेतून पनामामध्ये उतरलो. आमच्याकडे अमेरिकन व्हिसा होता. त्यामुळे पनामामध्ये व्हिसा फी लागली नाही. आमची गाईड होती एक कृष्णवर्णीय मध्यमवयीन स्त्री. अरामिंटा तिचे नाव. ती वेस्ट इंडीजची होती. पनामामध्ये उतरल्यानंतर इंग्लिश भाषेचा जो ठणठणाट आढळला त्या तुलनेत ती चांगले इंग्लिश बोलत होती.


जेमतेम 35 लाख लोकसंख्या आणि 77 हजार चौ.मी. क्षेत्रफळ असलेला हा लहानसा देश. एक झाड ज्याचा बुंधा फुगीर गोलाकार पसरलेला आहे, म्हणून ते विशिष्ट आकाराचे जाणवते. त्या झाडाचे पनामा हे नावच या देशाला दिले गेले आहे. ‘स्टेरालिया अपेटाटा’ हे त्या झाडाचे बॉटनिकल नाव. पनामामध्ये त्यांची स्वत:ची मॅन्डेरीन ही भाषा असली तरीही मुख्य भाषा स्पॅनिशच आहे. इंग्लिश काही ठरावीक लोकांनाच येते. तरीही इंग्लिश ही जगाची भाषा आत्मसात करण्याचे प्रयत्न पनामाच्या नागरिकांमध्ये आता जाणवतात. या देशात घटनात्मक लोकशाही असून अध्यक्षीय पद्धतीने देशाचा प्रमुख निवडला जातो.


पनामा हे राजधानीचे शहर नुकतेच उभारल्यासारखे नवे नवे भासत होते. मुंबईत नरिमन पॉइंटवर आहेत अशा गगनचुंबी इमारती, आंतरराष्‍ट्रीय बॅँका, हॉटेल, रिबॉकसारखे अमेरिकन ब्रॅँडस्, टोयोटा वा हुंदाईच्या कार्स असे आधुनिक शहरातील सर्व काही पनामा शहरात आहे. अर्थातच ते एक सुंदर आणि भव्य शहर आहे. समुद्रकिना-यावर मच्छीमार कोळी मात्र अजून आपल्या जुन्या वसाहती टिकवून आहेत. 35 लाख लोकसंख्येपैकी एक तृतीयांश म्हणजे बारा लाख लोक तर फक्त पनामा शहरातच एकवटलेले आहेत. पनामाची अर्थव्यवस्था नौकानयन (शिपिंग)आणि त्यावर अवलंबित व्यवसायावरच आधारित असली तरी मुख्यत: ती अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. पनामाला स्वत:चे चलन नाही. अमेरिकन डॉलर हेच चलन. पनामाला सैन्य नाही. थोडक्यात, स्पॅनिश भाषा वगळता पनामावर अमेरिकन प्रभाव ठायी ठायी जाणवतो. 1990 पर्यंत पनामामध्ये बहुमजली उंच इमारती नव्हत्या. आता जास्तीत जास्त 56 मजली उंच इमारत आहे. आपल्याकडे देशी किंवा आयुर्वेदिक औषधे जशी आढळतात तशी तेथे पारंपरिक वनस्पतींची औषधे प्रचलित आहेत. ‘ला बोटीका’ हे त्या औषधांचे नाव. रस्ते प्रशस्त आणि चांगले होते; पण त्यावर टोल द्यावा लागत होता. पनामा शहरात एक चोरबाजारही होता.


पनामामध्ये आंबा हे फळ भारतातून आले. पनामाची रेल्वे भारतीयांनी बांधली आहे. मार्केटमध्ये फिरत असताना ‘सॅबर ला डी इंडिया’ नामक एक भारतीय रेस्टॉरंट मिळाले. भारतीय जेवण मिळाल्याने दोन दिवस तेच जेवलो. त्या रेस्टॉरंटचा मालक छोटुलाल नावाचा उत्तरप्रदेशी होता. बारा वर्षांपूर्वी तो पनामामध्ये आला आणि हे रेस्टॉरंट सुरू केले.
अशा या पनामा देशाचे अस्तित्व जगामध्ये आहे ते केवळ पनामा कालव्यामुळे. 16व्या शतकात स्पॅनिश खलाशी पनामामध्ये आले तेव्हाच त्यांच्या लक्षात आले की, अटलांटिक आणि पॅसिफिक हे दोन महासागर या ठिकाणी एकमेकांना जोडले जाऊ शकतात. गरज आहे फक्त एका कालव्याची. या खलाशांना इजिप्तजवळचा सुएझ कालवा ज्ञात होता. तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा 163 कि.मी. लांबीचा सुएझ कालवा 1869पासून अस्तित्वात होता. त्यामुळे युरोपमधील जहाज आफ्रिकेला वळसा घालून जाण्याऐवजी थेट सुएझ कालव्यातून आशिया खंडात अतिशय कमी अंतरात, कमी वेळेत आणि कमी खर्चात जाते, ही माहिती असल्याने जमिनीचा अरुंद भाग दिसताच त्यांना पनामा कालव्याची कल्पना सुचली.


प्रत्यक्षात फ्रेंच लोकांनी 1880मध्ये हा जलमार्ग बांधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यासाठी येणारा प्रचंड खर्च त्यांना झेपला नाही, शिवाय उष्ण कटिबंधातील व्याधींनीसुद्धा ते लोक त्रस्त झाले. त्यामुळे त्यांनी हा कालवा बांधण्याचा प्रयत्न सोडून दिला. 1903मध्ये पनामा कोलंबियापासून स्वतंत्र झाला. अमेरिकेने कालवा बांधण्यासाठी पनामाशी करार केला, तसेच कालव्याभोवतालच्या जमिनीवर कब्जाही केला. 15 ऑगस्ट 1914रोजी कालव्याचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला झाला. अमेरिकेने दक्षिण अमेरिकेतील देशांवर दबावासाठी लष्करी कारणास्तव हा कालवा जरी बांधला, तरी त्याचा व्यापारी उपयोगही चांगला होऊ लागला. काळाच्या ओघात हा कालवा आमचा आम्हाला परत मिळाला पाहिजे, अशी जोरदार मागणी पनामाकडून होऊ लागली. 1977मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर आणि पनामाचे तत्कालीन अध्यक्ष ओमर टोरोजॉस यांच्यामध्ये एक करार झाला, त्यानुसार 1999मध्ये कालवा पनामाला देण्याचे ठरले. दरम्यान, अध्यक्ष जिमी कार्टर यांनी 1977मध्ये केलेला ठराव बदलून पुन्हा नवीन करार करावा, असा अमेरिकेचे नूतन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी आग्रह धरला होता. पण पनामाचे ओमर टोरोजेस यांनी ठामपणे ही मागणी नाकारली. रेगन यांच्या दबावाला ते डगमगले नाही. त्यांनी जुना करारच मान्य असेल, असे ठणकावले. पनामाच्या स्थानिकांच्या हक्कासाठी लढणारे आणि अमेरिकेला विरोध करणारे ओमर टोरोजेस हे दक्षिण अमेरिकेतील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व होते; मात्र लवकरच म्हणजे 31 जुलै 1981रोजी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. पनामा कालव्याचे प्रत्यक्ष हस्तांतरण करणे अमेरिकेच्या जिवावर येऊ लागले. पनामा सरकारने जपानच्या आर्थिक मदतीने नवीन कालवा विस्तारित करण्याचे ठरविले. साहजिकच एका लहानशा पण स्वतंत्र अशा पनामाच्या हाती कालव्याचे नियंत्रण जाऊ नये म्हणून परकीय शक्तींनी 1986 पासून पनामामध्ये अस्थिरता निर्माण केली. 1989मध्ये अमेरिकेने सरळ सरळ पनामावर आक्रमण केले. पनामाच्या नागरिकांवर बॉम्बहल्ले केले. पनामाने अमेरिकेला व इतर कुणालाही काही धमक्या दिल्या नाही, की कुरापती काढल्या नाहीत. तरीही हे आक्रमण केले होते. रेगनपेक्षा बुश हे दोन पावले पुढेच गेले. अमेरिकेने कोलंबियापासून पनामा स्वतंत्र केल्यानंतर ओमर टोरोजॉस येईपर्यंतच्या मधल्या काळात ज्या लोकांनी अमेरिकेचे प्यादे म्हणून काम केले होते, त्यांनाच 1989नंतर पुन्हा पनामाची सत्ता अमेरिकेने दिली. कालव्याचा तह अशा रीतीने आपल्या बाजूने करून घेतला. थोडक्यात, पनामाच्या नावाखाली या आंतरसागरीय कालव्यावर वॉशिंग्टनने पुन्हा एकदा नियंत्रण प्राप्त केले, पण 31 डिसेंबर 1999रोजी कागदोपत्री कॅनॉल पनामाच्या ताब्यात दिला गेला. पनामा कॅनॉल अथॉरिटीमार्फत कालव्याची व्यवस्था, नियंत्रण व प्रशासन बघितले जाते.
फक्त 80 कि.मी. लांबीची ही पाण्याची फीत म्हणजे अटलांटिक महासागरातून पॅसिफिकमध्ये जाण्याचा अगदी जवळचा मार्ग आहे. बारा हजार किलोमीटरचा वळसा दक्षिण अर्जेंटिनाला न घालता फक्त ऐंशी किलोमीटरच्या कालव्यातून जाणे हे अतिशय कमी श्रम, कमी वेळ आणि कमी खर्चाने होते. सन 1914पासून दहा लाखापेक्षा जास्त जहाजांनी या कालव्याच्या कमी अंतराचा लाभ घेतला. 4 सप्टेंबर 2010 रोजी दहा लाख संख्या पूर्ण करणारे ऐतिहासिक जहाज येथून मार्गस्थ झाले.


हा आंतरमहासागरीय जलमार्ग असल्याने मोठे मोठे गेटस् लॉक करणारी व उघडणारी यंत्रणा आहे. दोन्ही समुद्रांच्या पाण्याच्या पातळीमध्ये कमी-अधिक उंचीचा थोडासा फरक असल्याने, ही गेट्सची योजना आहे. प्रचंड गेटमधून जहाज आत आल्यानंतर गेट्स बंद होतात आणि त्यात पाणी सोडले जाते. पाण्याची पातळी वाढून जहाज वर उचलले जाते आणि पुढच्या गेटमध्ये प्रवेशते. अशा रीतीने तीन-चार ठिकाणी गेट्स उघडझाप होऊन जहाज या समुद्रात जाते. त्यामुळे या गेट्सना ‘लॉक्स’ अशी संज्ञा आहे. ‘मीरा फ्लॉर लॉक्स’ हे त्या कॅनॉलच्या एका गेट चॅनेलचे नाव. पर्यटकांना कॅनॉल बघण्यासाठी प्रत्यक्ष कॅनॉलपर्यंत जाण्याची परवानगी नाही. पर्यटकांसाठी कॅनॉलपासून काहीशा दूर अंतरावर एक खास गॅलरी बांधण्यात आलेली आहे. उंचावर असलेल्या गॅलरीतून मीरा फ्लॉर गेट्स बघता येतात. जहाजांचे आगमन व निर्गमन दिसते.


सध्या पनामा कॅनॉलचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. 15 ऑगस्ट 2014 रोजी शंभर वर्षे पूर्ण होतील. त्या दिवशी विस्तारित नवा कालवा सुरू झालेला असेल आणि आधुनिक काळातील अधिक मोठी जहाजे त्यातून पास होऊ शकतील. जगातील वाढत्या व्यापारामुळे दळणवळणाची ती निकड आहे. वन्यजीवसृष्टी आणि पर्यावरणाचा समतोल राखून कालव्याचे काम करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. असा हा पनामा कालवा, या 15 ऑगस्ट रोजी 99 वर्षे पूर्ण करून शतकमहोत्सवी वर्षात प्रवेश करीत आहे.