आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगाली जामदानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळीने टाकली हाळी, आता थंडी पळाली. वसंत पंचमीच्या छान-छान रंगांना आपलंसं करत तर कधी त्यांच्याही पुढे जाते, वसंत ऋतूतील विविध फुलं व फुलांचे बहर अंगीकारत येते ‘जामदानी’. तिच्या नावातून हाच अर्थ प्रतीत होत राहतो. पर्शिया कुळातील याचा मूळ अर्थ होतो ‘फुलदाणी’ (जाम = फूल; दानी = दाणी)! आज आपल्याला नक्की कळायला मार्ग नाही की पर्शिया कुळातून आलेली ही कला मोगलांच्या राज्यात कशी, कशामुळे व केव्हा बहरली. मात्र इ.पू. तिस-या शतकापासून हिचे ‘बांगला’ गोत्र सिद्ध होते. पुरातन उल्लेखच तसे सुचवतात. तसे हेही निश्चितच आहे की सुमारे 2000 वर्षांपूर्वीपासून बंगालला अवगत असलेली वस्त्र विणण्याची कला- वस्त्र साधेसुधे नव्हे तर अत्यंत तलम वस्त्र- ज्याचे खास नाव होते ‘मस्लिन’. या कलेचा संगम झाला फुलं, फुलदाणी, फुलांचा बहर इ. पर्शियन वा मोगल कलाप्रकाराशी. मग काय विचारता! हा मिलाफ एक अलौकिक कला प्रकार सादर करता झाला. दोन शटल्स वापरून ही फुलं गोवली गेली त्या ताण्या-बाण्यातून. आधीची मोठीशी वृक्षराजी आता ऐन वसंतात जणू बहरास आली! मात्र ही किमया आपल्याला सहज, नैसर्गिक वाटते तशी ती खरंच असते का? हे तर कोणी निसर्गतज्ज्ञच सांगू शकेल. आपली जामदानी मात्र पुष्कळ श्रमांनीच तयार झालेली असते हो! निष्णात कारागीर विणण्याची ही कला साधतात. काही दिवसांच्या अवधीने हातमागावर या साड्या तयार होतात. अर्थात, त्याआधी तशाच व त्यांच्या तोडीच्या काही इतर कारागिरांनी साध्या कापसाच्या बोंडापासून उच्च प्रतीचे सूत त्यांना तयार करून दिलेले असते. हा तलमपणा तर असावा, म्हणजे नेसणारीस येथील उन्हाळा सहन व्हावा. मात्र ती नाजूक साडी टिकायला तर हवी. मग या अबलेला सबला कशी बरं करावी? तर तिचे काठ जरा जाडसर धाग्यांनी विणावेत. आता अर्थात हे सर्व काम इतके जिकिरीचे होते की त्या राजदरबारीच जाऊन बसण्याच्या योग्य होत. त्यामुळे मोगल सम्राट अकबर, जहांगीर व तत्सम काळात ही बहरत गेली.
मोगल साम्राज्याबरोबर उदयास आलेली ही कला त्यांच्याचबरोबर लयासही गेली. जामदानीची गजबज असणारी मधुरापूर, जंगलबारी ही गावं व त्यांची कीर्ती काळाच्या पडद्याआड धूसर होत गेली. कदाचित जामदानीच्या -हासाला आणखीनही काही गोष्टी जबाबदार होत्या का? का बुडत्याचा पाय खोलात असे झाले असावे? चढी किंमत कमी करता यावी म्हणून इजिप्शियन कॉटन वापरण्यात आला, परंतु या आयात केलेल्या धाग्यांनी या नूरीचा नूर खूपच फिका झाला! त्या राजेशाही नजाकतीची सवय (अपेक्षा) असणा-यांना हा धक्का कसा पेलवणार. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, असं म्हणणा-या; आपण म्हणू तेच श्रेष्ठ असा भ्रम असणा-या ‘पारखी’ मंडळींना ‘कमी कि मतीची’ किंमतच कळत नव्हती. त्यात भरीस पुढच्या काळात येणा-या राज्यकर्त्यांनी (इंग्रजांनी) तर राजाश्रय सोडाच तिच्या आश्रयावरच; नव्हे तिच्या अस्तित्वावरच काळ आणला! त्यांचे - मँचेस्टरचे जाडेभरडे तागे.हिचं अनुपम सौंदर्य. पण हाय! नावडतीचं मीठ अळणी! त्यामुळे बिचारी त्यांच्या क्रूर कारस्थांनाना बळी पडली, हाल सहन करत राहिली, हे तर सर्वश्रुतच आहे. आता-आतापर्यंत ज्येष्ठ विणकरांना ‘तांती’/ ‘उस्तादास’ मिळकत होती 2500 ते 3000 टके/महिना! कनिष्ठ विणकरांना त्याहून कमी व नवोदितांना? न विचारलेलेच बरे! त्यामुळे त्यांनी कुठल्याशा सामान्य ‘गारमेंट’ इंडस्ट्रीची वाट धरली तर चुकले ते काय? पण मग आपल्या जामदानी वा तिचे अवतार- तंत, ढाकाई, तांगाईल... यांचे काय?
सरकाररूपी म्हणा, तर कधी काही इतर हितकारी संस्था यांनी हिच्यावर संजीवनी उपचार केले. पिळवणूक करणा-यांना (मध्यस्थांना) दूर केले, गि-हाइकांशी थेट भेट व्हावी म्हणून दुकाने/ सेंटर्स स्थापित केली गेली, चालवली गेली; तसेच तिचा कायापालट व्हावा, आजच्या मुख्य प्रवाहात तिने यावे, लोकाश्रय मिळावा म्हणून त्यांना रुचावी, पटावी अशी डिझाइन्स व किमती यांचा मेळ बसवला गेला. हे सर्व करण्यात अग्रेसर आहेत श्रीमती मोनिरा इमदाद, ‘तांगाईल सारी कुटीर’, ‘रेडियंट इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइन, शांतो मरियम युनिव्हर्सिटी आॅफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी व काही तत्सम. बांगलादेशाचाही त्यात सारखाच वाटा मान्य करावा लागेल. (ही त्यांचीही तर माहेरवाशीण आहेच की!) ममता बॅनर्जींची 6 मी. तांत साडी बनते ‘धनीआकलीत’. आपली आपण कोठून घ्यायची? हिचे सर्वसाधारण रूप - ‘कलकत्ता साडी’ आपल्या चांगल्याच परिचयाचे आहे. आपला वॉर्डरोबही तिला अनोळखी नाही. परंतु या उन्हाळ्यात एक व्हर्जन अपग्रेड करायला काय हरकत आहे? तसेच लग्नसराईत हिच्या ‘जरी बॉर्डर’ वा ‘सिल्क’ अवतारास आव्हान करता येईलच! ती प्रसन्न होईलच व सर्वांना प्रसन्न करेल, याची खात्री बाळगावी.