आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'नवनीत' नावाची मार्गदर्शक चळवळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजराती माणूस कोणत्याही धंद्यात यशस्वी होतो. कारण तो मेहनती असतो, चाणाक्ष असतो. त्याला इंग्रजी येत नाही, पण तो सहज स्थानिक भाषा आत्मसात करू शकतो. तो व्यापारासाठी, धंद्यासाठी आपले गाव सोडून कुठेही स्थायिक होऊ शकतो. आपल्या आजूबाजूला अनेक गुजराती कुटुंबे अशी असतात की त्यांचे मराठी समाजाशी, संस्कृतीशी, भाषेशी पिढ्यान्पिढ्या नाते असते. ते अस्खलित मराठी बोलतात. किंबहुना महाराष्ट्रात अनेक ढंगात मराठी बोलली जाते, ती मुख्यत: या गुजराती-मारवाडी समाजात. 1940च्या दशकात जितेंद्र ऊर्फ जितूभाई गाला यांचे कुटुंबीय रोजगाराच्या शोधात मुंबईत आले. सोबत गरिबी होती; पण चांगले जगण्याची आकांक्षा होती. परिस्थितीमुळे जितूभाईंचे शिक्षण फारसे झाले नाही. पण व्यवसाय करायचा तर शिक्षणक्षेत्रातच, असा त्यांचा ठाम निश्चय होता.

1960च्या दशकात बडोदा आणि पुण्यातील काही निवडक प्रकाशक गाइड प्रकाशित करायचे. ही पुस्तके अभ्यासक्रमावर आधारित नसायची. पण अशा पुस्तकांना मागणी मात्र बरी असायची. जितूभाईनी दहावीपर्यंत शिक्षण (पूर्वीचे इंटर) घेणा-या त्या वेळच्या मुलांची अडचण ओळखून अभ्यासक्रमावर आधारित गाइड बाजारात आणले. त्या वेळी गाइडबाबत शिक्षकवर्गात फारसे चांगले मत नसे. विद्यार्थी मूळ पाठ्यपुस्तक न वाचता थेट गाइडवर अवलंबून राहतात, असे शिक्षकांचे म्हणणे असे. जितूभाईचे म्हणणे मात्र वेगळे असे. ते म्हणत, ‘माझे गाइड हे व्यासंगी, विद्वान शिक्षकांनी लिहिलेले असल्याने विद्यार्थ्यांना त्यातून उलट फायदाच होणार आहे.’

पुढे जितूभाईंनी गाइडसंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आडवा-उभा पिंजून काढला. दक्षिण महाराष्ट्रातल्या गडहिंग्लजपासून विदर्भातील चंद्रपूरपर्यंतच्या शेकडो शाळांना भेटी दिल्या. शिक्षकांची मते जाणून घेतली. विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेतल्या. मुंबई-पुण्यातील विद्यार्थी आणि खेड्यापाड्यात असलेला विद्यार्थी यांच्या मानसिकतेत असलेला फरक त्यांच्या लक्षात आला. आपले गाइड हे सर्वात्तम असले पाहिजे व विद्यार्थ्याला ते आपलेसे वाटले पाहिजे, यासाठी गाइडमध्ये व्यासंगी शिक्षकांनी लेखन केले पाहिजे; जे शाळेत शिकवले जाते ते गाइडमध्ये असल्यास विद्यार्थ्यांना त्याचा अधिक फायदा होईल, हे त्यांनी हेरले आणि ‘स्टुडंट बुक डेपो’चा जन्म झाला. पण हे नाव बदलून नंतर ‘नवनीत’ असे झाले.

‘नवनीत’ हे नाव ठेवण्याची कल्पना त्यांना कशी सुचली, हा एक किस्सा आहे. 1962मध्ये जितूभाई घाटकोपरमध्ये एका शाळेत भेट देण्यासाठी गेले होते. या शाळेतील एक गांधीवादी शिक्षक आर. बी. पडिया यांनी जितूभाईना गाइडवरून बरेच सुनावले. खुद्द पडिया यांचा भौतिकशास्त्र आणि गणित या विषयात हातखंडा होता. पण जितूभाईनी पडिया यांना आपला हेतू विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचा आहे, असे पटवून दिले व त्यांना लिहिण्याविषयी गळ घातली. अखेर काही दिवसांनी पडिया लिहिण्यास तयार झाले; पण आपल्या नावाचा गाइडमध्ये उल्लेख न करता ‘नवनीत’ असे नाव दिले तरच मी लिहीन, अशी त्यांनी अट घातली. (‘नवनीत’ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ लोणी आहे) जितूभाईनी पडिया यांची मागणी विनाअट मान्य केली आणि ‘नवनीत’चा जन्म झाला. पडिया यांच्याबरोबर त्या वेळी ‘नवनीत’मध्ये फडके, नाबर, व्ही. एम. कुंडईकर, राजाराम शास्त्री अशा मातब्बर शिक्षकांनी लिहिण्यास सुरुवात केली. या शिक्षकांची विद्यार्थ्यांशी थेट नाळ जोडली गेली असल्याने ही पुस्तके लोकप्रिय होऊ लागली. इंग्रजी, गणित, विज्ञान, भाषा अशा विषयांची गाइड बाजारात येऊ लागली व गाइडबाबतचे पालक-शिक्षकांमधील गैरसमज दूर होऊ लागले.

‘नवनीत’च्या या प्रवासात ‘21 अपेक्षित संच’ हाही एक महत्त्वाचा असा टप्पा आहे. 1975मध्ये नवा अभ्यासक्रम आल्याने गाइडची रचना बदलण्याची वेळ आली. शालांत परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत काहीतरी नवे घेऊन जायला हवे, अशी गरज जितूभाईना वाटू लागली. एके दिवशी आपल्या आॅफिसमध्ये शिक्षकांशी चर्चा करत असताना त्यांना एक फॉर्म्युला गवसला. अभ्यासक्रमावर गाइड तयार करण्याची ‘नवनीत’ची पद्धत होती. आता नव्या गाइडमध्ये रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा, लघु प्रश्न, दीर्घात्तरी प्रश्न, उता-यावरचे प्रश्न असे 21 भागात प्रश्नसंच तयार केल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे सर्वांचे मत बनले आणि या 21 संचावरून ‘21 अपेक्षित संचा’चा जन्म झाला आणि बघता बघता हा फॉर्म्युला लोकप्रिय झाला. दहावीच्या परीक्षा तोंडावर येऊ लागल्या तशी दुकानदारांकडे अपेक्षित प्रश्नसंचाची आगाऊ नोंदणी होऊ लागली. विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ लागला आणि शिक्षणप्रक्रियेशी ते जोडले जाऊ लागले.

‘नवनीत’ प्रकाशनाला नुकतीच 53 वर्षे पूर्ण झाली आणि सुमारे 1000हून अधिक विषयांमध्ये नवनीत प्रकाशनची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत. या प्रदीर्घ काळात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे ‘नवनीत’शी नाते अजूनही जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे आहे. खुद्द 82 वर्षांचे जितूभाई जातीने या व्यवसायात रोज लक्ष घालत आहेत. त्यांची मुले प्रकाशन व स्टेशनरी व्यवसायात वेगवेगळे प्रयोग करत आहेत. त्यांनी आपला व्यवसाय देशभर नेला आहे. या संस्थेचा मालक गुजराती असला तरी त्यांच्या संस्थेतील सुमारे 85 टक्के कर्मचारीवर्गहा मराठी आहे. मराठी माणसाची सचोटी, ज्ञानाविषयीची त्याची अभिलाषा याबाबत जितूभाई नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असतात. या कृतज्ञतेमागे दडलेला आपलेपणाच ‘नवनीत’च्या आजवरच्या यशाचे गमक ठरला आहे.