आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाही देशप्रेम आणि फॉर्वडेड मेसेजस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्यापैकी बहुतेक जण स्वतंत्र विचार न करता ‘फॉरवर्ड’ नामक खेळात कळत- नकळत सामील होतात. रोजच्या रोज पळापळाने, कणाकणाने आपण आपलाच अपमान करत असतो, हे आपल्याला जाणवतदेखील नाही, खटकणे तर दूरच राहिले.

फेसबुक, व्हॉट्सअॅप वगैरे सोशल मीडिया काय किंवा टीव्ही-वृत्तपत्रातल्या चर्चा काय, अलीकडे टोकाची भक्ती आणि पराकोटीचा द्वेष यांचेच दर्शन घडत असते बघा. मग तो विषय नोटाबंदीचा असो, चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवणे आणि त्या वेळी सर्वांनी उभे राहणे अनिवार्य करणे, हा असो अथवा इतर कुठलाही धार्मिक, जातीय किंवा राजकीय विषय असो. आपण एखादा पक्ष किंवा पंथ स्वीकारला म्हणजे त्या पक्षाच्या, पंथाच्या नेत्याचे सर्व आदेश म्हणजे ईश्वराचा शब्दच जणू, अशा भावनेने त्यांचे समर्थन करणे आणि आपण त्या पक्षाचे, पंथाचे नसलो, तर तो आदेश म्हणजे माणुसकीला जणू काळिमा, अशी वक्तव्ये करणे चालू असते. आपला म्हणून काही एक विचार असू शकतो, यावर आपलाच विश्वास उरला नाहीये की काय, असा प्रश्न पडावा. सांगायचा मुद्दा, मी या सदरात असे राजकीय विषय टाळतो, त्याचे हे एक कारण आहे.

विचाराकडे विचार म्हणून न पाहता तो कुणी मांडलाय, यालाच अधिक महत्त्व येत चालले आहे. नोटाबंदीचे समर्थन करावे, तर निम्मे लोक त्यामागचे तर्कशास्त्रदेखील समजून न घेता तुटून पडणार आणि नोटाबंदीला विरोध करावा, तर निम्मे लोक मी काय बोलतोय, हे न बघताच ठोकायला धावणार. एकूणात अवैचारिक ठोकाठोकीचा काळ आला आहे खरा. त्यामुळेच आपल्यापैकी बहुतेक जण स्वतंत्र विचार न करता ‘फॉरवर्ड’ नामक खेळात कळत-नकळत सामील होतात. व्हॉट्सअॅपवर येईल तो मेसेज विचार न करताच (काही वेळा तर न वाचताच) आधी इतरांना फॉरवर्ड केला की झालं. म्हणजे, रोजच्या रोज पळापळाने, कणाकणाने आपण आपलाच अपमान करत असतो, हे आपल्याला जाणवतदेखील नाही, खटकणे तर दूरच राहिले. याचे कारण आपण स्वतंत्र विचार केला तर तो मांडायची चोरी. दोन्ही बाजूच्या टोळ्या आपल्या स्वतंत्र विचाराचे (आणि कदाचित आपलेही) लचके तोडायला धावतील, ही भीती असतेच. संसदेतदेखील हेच दिसते बघा, खूप वेळा. सत्ताधारी आणि विरोधक आपापल्या जागा बदलताच, मते नेमकी उलटी करतात. सत्ताधारी असताना ज्या गोष्टींचे समर्थन केले, त्याला विरोधक बनताच कडाडून विरोध करायचा आणि विरोधक असताना ज्या गोष्टींना प्राणपणाने विरोध केला, त्याच गोष्टी सत्ता मिळताच आपणच करायच्या. हे सगळे पाहताना हसावे का रडावे, तेच कळत नाही. बरे हे इतके उघड आणि बाळबोधपणे चालते, तरी अतिशय गंभीरपणे हे नाटक चालू राहते आणि आपणही ते नैमित्तिक कर्तव्य असावे, तसे बघत राहतो. स्वतंत्र विचार करणाऱ्यांचे प्रमाण कोणत्याही समाजात आणि कोणत्याही काळात कमीच असते, हे खरे; पण हे प्रमाण उत्तरोतर जास्तच आक्रसत जाण्याची प्रक्रिया दुर्दैवी आणि दु:खद आहे.

विचारवंत किंवा तत्त्वज्ञानी होणे, ही काही आपल्यापैकी बहुतेकांची इच्छा, आकांक्षा किंवा गरज नसते. अभ्यास, व्यासंग आणि चिंतन करण्याइतका वेळही नसतो आपल्यापाशी आणि त्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता किंवा चिकाटीदेखील नसते. सगळ्यांनीच विचारवंत बनावे, अशी कोणत्याही समाजाचीदेखील गरज नसते. एक जरा वेगळे उदाहरण देतो, माझ्या प्रिय विषयातले. समाजात थोड्याच जणांना प्रतिभेचे देणे लाभते आणि ते लेखक किंवा कवी होतात. बाकी उरलेले बहुतेक जण त्या साहित्याचा आस्वाद घेणारे वाचक असतात. सगळेच लेखक बनू शकत नाहीत. तसे थोडेच जण अभ्यास आणि चिंतनाने नवे विचार मांडतात. विचारवंत, तत्त्वज्ञानी होतात. वाचक म्हणून जसे आपण रसिकतेने वाचन करतो, तसे जगताना निदान या विचारवंतांच्या विचाराचा आपल्या जगण्यात वापर करणे अपेक्षित असते. त्यासाठी किमान ते विचार समजून घेणे आणि त्याबाबत नीरक्षीर विवेक बाळगणे आपले कर्तव्य नाही का? हा नीरक्षीर विवेक हरपत चाललाय, ही खरी व्यथा आहे. थोडक्यात, आमचा पक्ष किंवा पंथ ‘दुधाचा’ असेल तर समोर दिसतेय ते सगळे दूधच आहे, असे आम्ही म्हणणार; आणि आमचा पक्ष ‘पाण्याचा’ असेल तर त्याच द्रवाला आम्ही सरसकट पाणी म्हणणार, असा जमाना आलाय.

अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याच्या भौतिक गरजाच न भागलेल्या प्रचंड मोठ्या जनसमूहाला विचार वगैरे चैन तशीही परवडणारी नाही, आणि या भौतिक गरजा प्रमाणाबाहेर भागलेल्या छोट्या समूहाला विचार सोडून चैन कराव्या, अशा इतर अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, त्यामुळे विचार ही बहुतांशी कृतीहीन असलेल्या मध्यमवर्गीयांची मालमत्ता होते. पण सत्ता आणि पैसा या गोष्टींना सर्वाधिक घाबरणारा हा गट असल्याने, या वैचारिक धृवीकरणाच्या काळात हाही गट वर सांगितल्याप्रमाणे नीरक्षीर विवेक हरवून बसतो आणि अविचाराचे साम्राज्य सुरू होते. भवतालात घडते आहे ते काहीसे याच प्रकारचे आहे. मोठे गुन्हे किंवा उदात्त सत्कृत्ये करण्याची क्षमता न बाळगणारा हा आपला मध्यममार्गी गट रस्त्यावर सिग्नल तोडून गाडी दामटण्यापुरते बंड करतो आणि राष्ट्रगीताला उभे राहण्याइतपतच देशभक्ती करतो. (थोडक्यात, वडाला दोरे गुंडाळण्याइतकेच पतिप्रेम करण्यासारखा केवळ किरकोळ प्रतीकात अडकतो!) या दोन्हीने काही फार मोठे सकारात्मक अथवा नकारात्मक घडत नाही, पण मोठे गुन्हे किंवा उदात्त सत्कृत्ये करू शकणाऱ्यांना मतदानाद्वारे बळकटी देणारा हा मोठा गट असतो. म्हणून यांना जिंकण्यासाठी भावनिक अावाहने करून सुरुवातीला वर्णन केले तो वैचारिक धृवीकरणाचा खेळ चालतो. आहे हे असे आहे. अमलात आणता येणार नाहीत, असे उदात्त आणि आदर्श विचार मांडण्यापेक्षा जे आहे, ते तसेच मांडणे बरे नाही का? आता प्रश्न असा आहे, की वास्तव काहीही आणि कसेही असले तरी आपल्या सर्वांना आपले जगणे जमेल तितके अर्थपूर्ण आणि चांगले करायचे असतेच. भवतालात काळोख असला तरी आपल्यापुरता एखादा दिवा लावावा, असे वाटतेच आपल्याला. आजूबाजूला हे जे काही चालले आहे त्यात मग आपण काय करावे, ते तरी सांग संभाविता... सांगतो.

संभाविताचा सल्ला : आपण सगळेच काही शूरवीर शिवाजी महाराज किंवा धाडसी भगतसिंग नसतो, तेव्हा पटणार नाही त्या विचारांना कडाडून विरोध करणे आपल्याला जमेलच असे नाही. कबूल. पण निदान किरकोळ फायद्यासाठी त्याचा प्रचार आणि समर्थन करणे तर आपण थांबवू शकतो. नेता कोणीही असो, पण त्याची पप्पू किंवा फेकू यापैकी कोणत्याही प्रकारे खिल्ली उडवणे, आपल्याला पटत नसेल तर निदान असे मेसेजेस फॉरवर्ड करणे आणि त्यांचे समर्थन करणे तर आपण थांबवू शकतो ना? जगताना काही एक औचित्य आणि सभ्यता बाळगणे आपल्याला अगत्याचे वाटत असेल, तर निदान या प्रकारात आपण सामील होऊ नये, मग तो नेता आपल्या पक्षाचा असो वा विरोधी पक्षाचा. दुसरे म्हणजे, एखाद्या धोरणाला वा निर्णयाला उघड विरोध करायचे आपले धाडस नसेल तर निदान त्याचे तोंडपुजे आणि पोकळ समर्थन करणे आपण टाळू शकतोच. लक्षात घ्या सज्जनहो, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ केवळ ‘आपल्याला हवे त्याची हवी तशी अभिव्यक्ती करणे’ इतकाच नव्हे तर ‘आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याकडून अभिव्यक्ती करून घेण्याला विरोध’ हाही होतो, इकडे मी लक्ष वेधतोय. कळत-नकळत आपण या डावाला बळी पडतोय, हे समजतेय, तर जिवाला धोका न पत्करतादेखील आपण हे करू शकतोच.

नवा आणि स्वतंत्र विचार मांडण्याची आपली औकात नसली, तरी निदान एवढा साधा विचार आपण करू शकतोच ना? नको त्या अभिव्यक्तीच्या लाटेत आपण सामील व्हायची गरज नाही. एखाद्याने ‘पप्पू’ किंवा ‘फेकू’ सारखा अश्लाघ्य शब्द वापरून मेसेज पाठवला तर मी तो फॉरवर्ड न करता डिलीट करून टाकला, आणि आपल्यापैकी बहुतेकांनी असे केले तर कदाचित मोठा अनर्थ टळू शकेल. असल्या सवंगतेने जनमत बदलणाऱ्यांना समजेल, की शूर वीर नसणारी आणि रक्त वगैरे सांडायला घाबरणारी ही जनता निदान सवंग आणि खुळचट डावपेचांना बळी पडणारी नाही. नोटाबंदी आणि काळ्या बाजाराचे अर्थशास्त्र किंवा शेजारी देशाबरोबरचे संबंध आणि युद्ध हे विषय गहन आहेत. त्यावर प्रत्येकाने भावनिक बांधिलकीने बोलण्याची गरज नाही, आणि जिथे तिथे पक्षीय निष्ठा किंवा विरोध दाखवत हिंडायचीही गरज नाही, हे समजले तरी पुरे. आपली लोकशाही आणि देशप्रेम या गोष्टी आपल्या संविधान आणि कायद्याचे पालन करणे आणि आपले काम पराकोटीच्या प्रामाणिकपणे करणे यापुरत्या मर्यादित ठेवल्या तरी देश प्रचंड प्रगती करेल, याची खात्री बाळगा. दैनंदिन जगण्यातल्या अपयशामुळे येणारे फ्रस्ट्रेशन मोठ्या नेत्यांची सवंग खिल्ली किंवा न कळणाऱ्या विषयाचे समर्थन वा विरोध यांनी भरून काढायची गरज नाही. या देशातल्या एका नागरिकाला म्हणजे आपण स्वत:ला जरी प्रामाणिक कष्टाने सुखी करू शकलो तरी देशाच्या उन्नतीला सुरुवात होते.
(हा संदेश मात्र जमेल तितक्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा हो!)

- संजय भास्कर जोशी
sanjaybhaskarj@gmail.com
बातम्या आणखी आहेत...