आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेळवी नावाचा 'विकिपीडिया'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर कर्नाटकातील हेळवी समाजातील शेकडो लोकांकडे वेगवेगळ्या गावातील लोकांच्या वंशावळीची नोंद आहे. खरं तर दुसऱ्यांच्या वंशावळीची अचूक नोंद ठेवणे, हे कामच वेगळे आहे. हेळवी समाज हे काम आजपर्यंत इमाने-इतबारे करत आलाय.

जयसिंगपूर-कोल्हापूर रस्त्याच्या कडेला चिपरी फाट्याजवळ एका मोकळ्या रानात अशोक शिवराम हेळवी मुक्कामाला होता. रस्त्याच्या कडेलाच त्यांची बैलगाडी उभी होती. मोकळ्या रानात त्याची पोर आट्यापाट्या खेळत होती. बाजूला त्याच्या बायकोनं चूल पेटवलेली. आम्हाला बघून अशोक उठला. ‘या की वं आण्णा,’ असं म्हणाला. आम्ही गप्पा मारत बसलो. अशोक हेळवीकडं येण्याचं आमचं महत्त्वाचं कारण म्हणजे, त्याच्याकडे अनेक गावांतील लोकांच्या पंधरावीस पिढ्यांची नावं, त्यांचे पराक्रम, पूर्वइतिहास याची जंत्री. अशोकसारख्या उत्तर कर्नाटकातील हेळवी समाजातील शेकडो लोकांकडे वेगवेगळ्या गावांतील लोकांच्या वंशावळीची नोंद आहे. खरं तर दुसऱ्यांच्या वंशावळीची अचूक नोंद ठेवणे, हे कामच वेगळे आहे. हेळवी समाज हे काम आजपर्यंत इमाने-इतबारे करत आलाय. अशोक शिवराम हेळवी त्याच परंपरेचा पाईक. कर्नाटकातील रायबाग तालुक्यातील बिक्केरी गावचा.

अशोकला वंशावळी नोंद करण्याच्या परंपरेविषयी विचारलं. तो म्हणाला, आमच्या वाडवडिलांनी पहिल्यापासनं लोकांच्या वंशावळी ठेवण्याचं काम केलं. आमीबी तेच काम करतूया. आज रोजी माझ्याकडच्या दप्तरात १०० गावच्या १५ पिढ्यांची नोंद हाय. त्यानं उठत बैलगाडीतलं दप्तर घेतलं. एखाद्या जुन्या पोतीसारखं कपड्यात गुंडाळलेलं दप्तर, त्यात मोडी लिपीतला मजकूर. एका रेषेत लिहिलेलं. सगळी पानं मजकुरानं भरलेली. अशोक त्या दप्तराची पाने उघडायला लागला. म्हणाला, हे बघा, एक वंशावळ वाचून दाखवतो. नाकावर बोट ठेवत तो गुणगुणला, ‘सिं… ही ही वंशावळे कुळे आडनाव शिंदे, मूळगाव मोटिकान. अकराशे सव्वीसला, त्या गावात झगडा करून बाबाजी, लिंबाजी, सुभानजी, मुरारजी, मानाजी असे पाच भाव त्या गावची तीनशेसाठ एकर जमीन सोडून टोपसंभापूरला आले. त्या गावात पाटीलकीचं वतन मिळिवलं. नंतर त्याबी गावात त्येंचा झगडा झाला. नंतरच्या काळात तेबी गाव सोडलं. चौदाशे अठ्ठावीस सालात. बाबाजीचे पोटी लिंबाजी, लिंबाजीचे संभाजी, अप्पाजी, मानाजी, मुरारजी असे चार मुलगे होते. संभाजीला तुळाजी, तुळाजीला हरिबा, हरिबाला बाळा, बाळाला गोविंदा, गोविंदाला येताळा, येताळाला गणू असे झाले…अशोक एका सुरात वाचत राहिला. तो मूळच्या चार भावांपैकी एका भावाचा वंशविस्तार सांगत होता. तो फक्त नावं वाचत नव्हता, तर त्याच्याकडे अगदी बारीकसारीक तपशीलही होते. प्रत्येक माणसाकडं आजोबा, पणजोबापर्यंतची माहिती असते, पण त्यापुढचं काहीही माहीत नसतं. पण अशोकसारख्या पोशाखाने आणि भाषेने गावंढळ वाटणाऱ्या माणसाकडे १०० गावांतील अनेकांच्या खापरपणजोबाच्या खापरपणजोबांच्या नावाची माहिती होती. नावाबरोबर तो माणूस कोणत्या गावातून का आला? त्याचं विस्थापन का झालं? नव्या गावात आला तेव्हा ते गाव कसं होतं? त्या गावात जमीन कशी मिळाली? याच्या नोंदी होत्या. हे त्याच्याकडून ऐकताना एखाद्याला गमतीनं असंही वाटेल की, अशोकचा पूर्वज या लोकांच्या मागावरच होता काय? एवढे तपशील त्याच्या दप्तरात होते.

अशोक सांगत होता, ‘माझ्याकडं ११२६ पासूनची नोंद हाय. आमच्या पूर्वजानं वंशावळी लिहाय सुरुवात केली. त्यानं गावागावात जाऊन लोकांस्नी माहिती विचारली. त्यांच्याकडून जेवढी माहिती मिळाली, तेवढी लिहून ठेवली. पुढच्यांनी मागच्या माहितीत भर घातली. आमीबी तेच काम पुढं चालवूया.’

अशोक हेळवी मघाशी वंशावळ वाचत असताना ‘त्याच्याकडे एखाद्या कुळीच्या स्थलांतराचे एवढे तपशील कसे?’ असा प्रश्न पडला होता. त्याचं उत्तर आम्हाला अशोकच्या बोलण्यातून मिळालं.

पूर्वीच्या काळी हेळवी वंशावळीच्या नोंदी घ्यायला गावोगावी गेले, तेव्हा गावातील वयस्कर माणसांनी त्यांनी त्यांच्या वाडवडिलांकडून ऐकलेले सगळे तपशील त्या हेळव्याला सांगितले. ते सगळे त्याने लिहून घेतले. तो सगळा ८००-९०० वर्षांपूर्वीचा तपशील हेळव्याकडे आहे.
पूर्वजांनी ठेवलेल्या वंशावळीच्या नोंदी गावात जाऊन ऐकवणे, हाच हेळव्याचा व्यवसाय आहे. वर्षातून किमान आठ महिने हेळवी बाहेरच असतात. पावसाळ्याच्या हंगामात ते गावी असतात. ज्यांच्याकडे शेती आहे, ते शेतीकामे संपल्यावर गाव सोडतात. उत्तर कर्नाटकातील रायबाग, चिकोडी, अथणी, मंगसुळी या परिसरात हेळवी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. दक्षिण महाराष्ट्रातील मिरजजवळ खटावमध्येही हेळवी आहेत.

अशोक म्हणाला, ‘भावाभावात जमिनीची जशी वाटणी केली जाते, तशी आम्ही गावं वाटून घेतो. गावातही वेगवेगळ्या आडनावाची भावक्या वाटतो. कोणत्या हेळव्यानं कोणत्या भावकीचं वाचायचं, हेबी ठरलेलं असतया. तेबी आम्ही पाळतो. आपल्याच वाटणीच्या आडनावाचं वाचतो.’
‘वंशावळी वाचून तुम्हाला काय मिळतं?’ ‘आम्ही वाचायला गेल्यावर लोक धान्य, पैसं देतात. काही पोशाख (नवे कपडे) देतात. एखाद-दुसरा सोन्याची अंगठी देतो.’

‘तुम्ही एका गावाला वर्षातून किती वेळा जाता?’
‘दोन वर्षातनं एकदा जातो. लय गावं हायती. त्यामुळं एका गावाला दोन वर्षातनं जायला मिळतं.’
शेकडो वर्षांच्या वंशावळीची नोंद ठेवण्याचे काम करणारा हेळवी आजही ते काम मानाने करतोय. सुरुवातीला वंशावळीच्या नोंदी मौखिक स्वरूपात ठेवल्या जात. हेळवी वंशावळी तोंडपाठ करत. नंतरच्या काळात ताम्रपटावर नोंदी ठेवल्या. आता कागदावर नोंदी करण्यात येतात. प्रत्येक गावासाठी वेगळी वही असते. मध्यंतरी एका हेळव्याला एका राजकीय पुढाऱ्याने ‘कशाला हे दप्तर घेऊन फिरतोस. तुला संगणक देतो त्याच्यावर नोंदी ठेव’, असे सुचवले. त्यावर हेळव्याने, ‘साहेब, हेच माझ्या अंगवळणी पडलंय. तेच बरं हाय’ असं सांगितलं.

हेळव्यांना कन्नड-मराठी दोन्ही भाषा येतात. त्यांचे दत्परातील लिखाण मात्र मोडी लिपीत आहे. त्यांची मोडीही कन्नड-मराठी मिश्रित आहे. त्यामुळे ती हेळव्यालाच वाचता येते. हेळव्याच्या दप्तरात काही ठिकाणी कन्नड, काही ठिकाणी मराठी शब्द असतात, त्यामुळे मोडीच्या अभ्यासकांनाही हेळव्यांनी लिहिलेला मजकूर वाचता येत नाही. हेळव्यांची मराठी-कन्नड मिश्रित नवी मोडी लिपीही तयार झाली आहे. मराठी-कन्नडमधील ग्रामीण शब्द त्यात आहेत. दोन-तीनशे वर्षांअगोदर हेळव्यांच्या वाडवडिलांनी त्या काळातील बोली, शब्द जसेच्या तसे आणले आहेत. हेळवी दहा वर्षांतून एकदा सर्व माहिती नव्या वहीत लिहितो. वही जुनी झाल्यावर पाने खराब व्हायच्या अगोदर सगळी माहिती नव्या वहीत घेतो. हे काम करताना ते आळस करत नाहीत. कारण एखादे पान हरवले, तरी एका कुळीचा इतिहास पडद्याआड जाण्याची भीती असते. हेळव्याकडे एका गावच्या दोन-दोन वह्या असतात. एक त्याच्या घरी, दुसरी प्रवासात. तो वंशावळी वाचत गावोगावी फिरतो. त्या काळात त्याचा मुक्काम गावच्या सरकारी शाळेच्या पटांगणात किंवा चावडीजवळ असतो. ऊन, थंडी, वारा, पाऊस झेलत त्याची फिरस्ती सुरू असते. त्या वेळी त्याच्याजवळ गेल्या पंधरा पिढ्यांपासून जतन केलेली माहिती भिजून खराब होण्याची किंवा गहाळ होण्याची शक्यता असते. काही हेळव्यांबाबत असे घडलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाने वंशावळीचे रेकॉर्ड दोन प्रतींमध्ये लिहायला सुरुवात केली. दोन ठिकाणी रेकॉर्ड असल्यामुळे हेळवी निर्धास्त असतो. त्यांच्याजवळ असणारे दप्तर हेच त्यांचे मोठे भांडवल असते. मध्यंतरी एका हेळव्याच्या घरातील सगळे दप्तर जळून गेले. त्यांच्या संग्रहात असणारी गावे, आडनावे यांचा इतिहास जळून गेला. त्याच्याकडे उदरनिर्वाहासाठी असलेले लाखमोलाचे दप्तर जळाल्याने तो हेळव्याचे काम करायला बिनकामी ठरलाय. त्यामुळे हेळवी दप्तराला खूप जपत असतात. दप्तराशिवाय त्याचे काहीच चालत नाही.

शेकडो वर्षांपासूनच्या वंशावळीच्या नोंदी ठेवणारा हेळवी हा समाजाचा इतिहासकार आहे. समाजातील सगळ्यांच्या पूर्वजांचा इतिहास त्याच्याजवळ आहे. आज कागद जपता येत नाहीत, म्हणून शासकीय पातळीवर डिजीटल प्रणालीचा अवलंब केला जातोय. शासकीय पातळीवर कागद जपून ठेवायला अडचणी आहेत. म्हणून सरकारने आधुनिक पद्धतीने रेकॉर्ड जतन करायला सुरुवात केलीय. समाजही कागदपत्रे जपून ठेवण्याबाबत उदासीन आहे. या पार्श्वभूमीवर शेकडो वर्षांपासूनचे कागद, त्या कागदातील ऐतिहासिक संदर्भ हेळवी जपतोय. कागद खराब होऊ नयेत, म्हणून पुन:पुन्हा लिहितोय. पिढ्यान््पिढ्या तो हेच काम करत आहे. गावोगावी जाऊन प्रत्येकाला वाचून दाखवून त्या बदल्यात मिळेल ते घेऊन समाधान मानत आहे.

खरं तर हेळवी समाजाने मोठा वारसा जपला आहे. पण या वारशाला कोणी गांभीर्यानं घेतलेलं नाही. दोन वर्षातून दारात येणाऱ्या हेळव्याला काही तरी दिले की आपले काम झाले, अशी लोकांची मानसिकता आहे. तर शेकडो वर्षांपासूनच्या वंशावळीच्या नोंदी ठेवणारा, इतिहास जतन करणारा एक समाज आहे, याचा अनेक अभ्यासकांना अजून थांगपत्ताही लागलेला नाही. हेळवी वर्षानुवर्षे पाठीवर घेऊन फिरणारी दप्तरे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर अनेक गोष्टी उजेडात येण्याची शक्यता आहे. पण हे करणार कोण?
- संपत मोरे
sampatmore25@gmail.com
बातम्या आणखी आहेत...