आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाव घेणारा मनकल्लोळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मनात’ या वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या पुस्तकानंतर संशोधक लेखक अच्युत गोडबोले-नीलांबरी जोशी लिखित मनोविकास प्रकाशनाचं ‘मनकल्लोळ’ हे द्विखंडात्मक पुस्तक प्रकाशित होत आहे. त्याविषयी…

‘पूर्वग्रह बाळगणे हे तुमचा बहुमूल्य वेळ वाचवण्याचे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे सत्य काय आहे, ते पडताळून पाहण्यात वेळ न घालवता तुम्ही एखाद्याबद्दलचे तुमचे मत झटपट तयार करू शकता!’ असे उपरोधाने म्हटले जाते. मनोविकार जाणून घेणाऱ्या प्रत्येक अभ्यासकाला या बाबी ताडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. अल्बर्ट आइनस्टाइन या महान शास्त्रज्ञाला डिस्लेक्सिया होता. व्हॅन गॉग या सृजनशील चित्रकाराला नैराश्य आणि ‘बायपोलार डिसऑर्डर’चा विकार होता. मायकेल जॅक्सनसारख्या १३ ग्रॅमी पारितोषिक मिळवणाऱ्या जगप्रसिद्ध गायकाला नैराश्य, ‘बॉडी डिसमॉर्फिक डिसऑर्डर’ आणि इतर मनोविकारही होते. अँजेलिना जोलीसारख्या हॉलीवूड अभिनेत्रीला ‘ईटिंग डिसआॅर्डर’ आहे. बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (दीपिका आज ‘इंडियन सायकिअॅट्रिक सोसायटी’ची ब्रँड अॅम्बॅसेडॉर आहे!) नैराश्यानं काही काळ ग्रासल्याचं तिनं जाहीर सांगितलंय. परंतु, ‘मानसिक विकार असतो, तो कोणी स्वत:हून निवडलेला पर्याय नसतो.’ हे समाज लक्षात घेत नाही. म्हणूनच समाजातील चुकीच्या दृष्टिकोनामुळे प्राचीन काळापासून ते दुसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत मनोरुग्णांना भयानक छळाला तोंड द्यावे लागले.

पुढे मनोविकाराला कोणी ‘देवाचा कोप’ हे कारण मानलं, तर कोणी ‘सैतानी शक्ती’ त्यांच्यावर स्वार झाल्याचा जावईशोध लावला. चंद्राच्या चढत्या-उतरत्या कलांपासून ते चेटुक आणि करणी-भानामती अशा अतर्क्य गोष्टींपर्यंत अनेक कारणे मनोविकारांसाठी सांगितली गेली. अर्थात, यातून स्वार्थी भोंदूबाबांची चलती वाढली. मनोविकारावर उपायही कवटीला भोक पाडून सैतानी शक्ती बाहेर काढणं, फटके देणे, साखळदंडांनी जखडून ठेवणे, दुबळ्या समजुतीतून शरीराला खाचा पाडून दूषित रक्त वाहू देणे, मनोरुग्णांना खुर्चीत बसवून गरागरा फिरवणे असे अघोरी उपाय आजही ग्रामीण आणि शहरी समाजात केले जातात. या अघोरी उपायांच्या दुष्टचक्रात अडाणी समाज तर बळी पडतोच, शिवाय ‘शेवटचा पर्याय’ अशा गोंडस धारणेतून अगदी उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित समाजघटकही त्याकडे आकर्षिला जात असताना आपण पाहतो, ऐकतो नि वाचतो. या पार्श्वभूमीवर अच्युत गोडबोले-नीलांबरी जोशी द्वयीच्या ‘मनकल्लोळ’ या द्विखंडात्मक पुस्तकाने एका दुर्लक्षित, पण महत्त्वाच्या गुंत्याकडे वाचकांचे लक्ष वेधले आहे.

‘मनकल्लोळ’ भाग एक : इरेक्टाइल डिसफंक्शन आणि लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणे म्हणजे पेडोफिलिया यासारख्या सेक्शुअल डिसऑर्डर्स याबाबतचा वेध घेण्यात आला आहे. झीरो फिगरच्या आकर्षणाने खाल्लेले अन्न उलटून टाकणे, असे प्रकार ज्यात केले जातात, त्या ‘इटिंग डिसअॉर्डर्स’ची मनोप्रक्रिया मानसशास्त्रीयदृष्ट्या किती महत्त्वाची आहे, त्याची सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. अंगात येण्यासारखे प्रकार हे केवळ मानसिकतेतून घडतात, त्यात ‘सायकोसोमॅटिक डिसअॉर्डर्स’ म्हणजे काय, हेही पहिल्या ग्रंथाच्या भागात नमूद करण्यात आले आहे. दारू किंवा ड्रग्जसारख्या व्यसनाधीनतेमुळे होणाऱ्या ‘सबस्टन्स युज डिसअॉर्डर्स’, अतिचिंतेमुळे होणाऱ्या ‘अँक्झायटिक डिसअॉर्डर्स’ आणि एकाच व्यक्तिमत्त्वात अनेक व्यक्तिमत्त्वे दडलेली असणाऱ्या नाट्यमय ‘डिसोसिएटिव्ह डिसअॉर्डर्स’ या विकारांबाबत सर्वांगाने ऊहापोह करण्यात आला आहे.

‘मनकल्लोळ’-भाग दोन या पुस्तकात नैराश्य, आत्महत्येची प्रवृत्ती आणि नैराश्यातील उन्मादाच्या हिंदोळ्यांवर झुलणारी ‘बायपोलार डिसअॉर्डर’, स्वत:वर प्रचंड प्रेम करणारी ‘नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसअॉर्डर’, आणि प्रचंड संशयी किंबहुना, आत्मकेंद्री अशी ‘पॅरॉनॉइड पर्सनॅलिटी डिसअॉर्डर’, व्यक्तिमत्त्वातले बिघाड दाखवणाऱ्या इतर ‘पर्सनॅलिटी डिसअॉर्डर्स’, बलात्कारीत, युद्धसैनिक आणि युद्धकैदी यांना होऊ शकणाऱ्या ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसअॉर्डर’ या विकारांवर अभ्यासपूर्ण शैलीत विश्लेषणात्मक मांडणी करण्यात आली आहे. ‘देवराई’ या मराठी चित्रपटामध्ये रंगवलेला भ्रम आणि आभासाच्या आवर्तात गरगरणारा स्किझोफ्रेनिया किंवा ‘तारे जमीं पर’ चित्रपटामध्ये दिसणारा डिस्लेक्सिया, कंडक्ट डिसअॉर्डरपासून सेरेब्रल पाल्सी आणि ऑटिझम यांसारख्या लहान मुलांच्या विकासाच्या विविध टप्प्यांतल्या डिसअॉर्डर्स म्हणजे नक्की काय, याची ओळख करून देण्यात आली आहे. अल्झायमर, विस्मृती, पार्किन्सन्स या मेंदूच्या पेशी झिजल्यानंतर होणाऱ्या डिसअॉर्डर्स कशा निर्माण होतात, याचीही सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

प्रत्येकी साडेतीनशे पानांच्या या दोन ग्रंथांत बारा भागांमध्ये सुमारे सत्तर मनोविकारांची-त्यांच्या टेस्ट केसेस, त्या विकारांचा इतिहास, लक्षणे, कारणे आणि त्यावरचे उपचार यांची तपशीलवार माहिती दिली आहे. अशा विकारांच्या आशयावर आधारित चित्रपट आणि साहित्यक्षेत्रात उमटलेले प्रतिबिंबही या ग्रंथात नेमकेपणाने मांडण्यात आले आहे. चिंता, नैराश्य, व्यक्तिमत्त्वातले बिघाड, लैंगिक बाबतीतले बिघाड, भ्रम किंवा आभास, विस्मृती, आकलन, ग्रहणक्षमतांमधील बिघाड आणि खाण्यातले बिघाड असे अनेक प्रकार आहेत. अर्भकावस्थेपासून वार्धक्यापर्यंत मनोविकार निरनिराळ्या टप्प्यांवर गाठू शकतात. याबाबत चौफेर पूरक अंगाने मांडणी दोन्ही भागांत करण्यात आली आहे.

गेल्या दोन शतकांत फ्रॉईडचं मनोविश्लेषण, फ्रेंच मानसोपचारतज्ज्ञ पिने याचे मनोरुग्णांना चांगले वागवण्याचे अथक प्रयत्न आणि इतर अनेक मानसशास्त्रज्ञांच्या भरीव योगदानामुळे सायकिअॅट्री ही एक अभ्यास शाखा म्हणून जोम धरायला लागली. तद्वतच सायकिअॅट्री हा वैद्यकीय अभ्यासक्रम, शिक्षण आणि संशोधनाचा अविभाज्य भागही होत गेला. या पार्श्वभूमीवर मनोविकाराविषयी ‘मनकल्लोळ’मधून टाकण्यात आलेला प्रकाशझोत वाचकांच्या मनाची कवाडे उघडण्यास साहाय्यभूत ठरावा.
ग्रंथाचे नाव : मनकल्लोळ (दोन भाग)
लेखक : अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी
पृष्ठसंख्या : प्रत्येकी ७००
दोन भागांचे प्रकाशनपूर्व नोंदणी मूल्य : ~ २९९/-

- यशवंत पोपळे
yashwant.pople@gmail.com
बातम्या आणखी आहेत...