आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुमोल ग्रंथऐवज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकरी कामगार पक्षाच्या संंस्थापक सदस्यांपैकी एक असलेले उद्धवराव पाटील हैदराबाद मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही अग्रेसर होते. त्यांची विधानसभा, लोकसभा आणि जाहीर सभेतील भाषणे सर्वत्र गाजली. मात्र, अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे कार्य लिखित स्वरूपात कोठेच उपलब्ध नाही. ज्येष्ठ पत्रकार भारत गजेंद्रगडकर यांनी ते पुस्तकरूपात प्रकाशित केले आहे. वृत्तपत्रातील लेख, स्मरणिका आणि शाेध निबंधांच्या संपादनातून ‘श्रमिकांचा नेता भाई उद्धवराव’ हे पुस्तक तयार झाले. हे पुस्तक उद्धवरावदादांचे आत्मचरित्र नसले तरी नवीन पिढीला त्यांच्या कार्याची माहिती देण्यास पूरक आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी, श्रमिकांचे नेते म्हणून उद्धवराव पाटील यांचे महत्त्वाचे स्थान अाहे. मराठवाड्यात १९४९मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. मराठवाड्यात पक्षाची भूमिका रुजवण्याचे काम त्यांनी केले. १९५६मध्ये एस. एम. जोशी यांनी महाराष्ट्राच्या चळवळीच्या कार्याला गती देण्यासाठी सर्वपक्षीय संघटना स्थापन करण्यासाठी पुण्यात बैठक बोलावली. या वेळी संयुक्त महाराष्ट्र समितीत ‘शेकाप’चे प्रतिनिधी म्हणून उद्धवरावदादांचे नाव नमूद करण्यात आले. यामुळे मराठवाड्यातील उद्धवराव संयुक्त महाराष्ट्र आणि सीमा लढ्याचे नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे नेते झाले. ते तीन वेळेस विधानसभेवर तर एकदा लोकसभा आणि राज्यसभेवर निवडून गेले. विधानसभेत ते विरोधी पक्ष नेतेही राहिले. ग्रामीण जनतेच्या प्रश्नांप्रमाणेच शहरी भागातील कामगार चळवळीतही ते सहभागी झाले. मुंबई गिरणी कामगार संघाचे ते उपाध्यक्ष होते. हैदराबाद विधानसभेतील त्यांचे कुळकायद्यावरील भाषण, दुष्काळ, मराठवाड्याचा विकास, सहकार, शिक्षण क्षेत्रातील समस्यांवरील भाषणे त्यांची असामान्य बुद्धिमत्ता, ध्येयनिष्ठा आणि सर्वसामान्यांबद्दलची तळमळ दर्शवत. आणीबाणीत त्यांना सोलापूरच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. शासनाचा सुटकेचा प्रस्ताव धुडकावत ते संपूर्ण शिक्षा भाेगूनच बाहेर पडले. १९८४ मध्ये त्यांचे निधन झाले. अशा हरहुन्नरी नेत्याचे जीवंतपणी फार दखल घेतली गेली. विद्यापीठ स्तरावर काही शोधनिबंध आहेत. पण ते विद्यापीठातच बंदिस्त राहिले. बार्शीचे प्रा.व.ना.इंगळे यांनी एक साहित्यिक मार्गाने जाणारे पुस्तक लिहिले आहे. काही स्मरणिकेत त्यांच्यावर लिखाण आहे. तर उद्धवरावांनी स्वत:बाबत ३० पान टाइप करून ठेवले आहेत. एकूणच मोठ्या प्रमाणात लिखाण उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या कार्याचे फारसे मूल्यमापन झालेले नाही. गजेंद्रगडकर यांच्या ‘श्रमिकांचा नेता भाई उद्धवराव’ या पुस्तकाने ही कसर भरून काढली आहे.
पुस्तकाचे नाव : श्रमिकांचा नेता भाई उद्धवराव
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
संपादन : भारत गजेंद्रगडकर,
साहाय्य : व्ही. के. देशमुख, धनंजय पाटील
मूल्य : ~ २५०/-
- महेश जोशी, औरंगाबाद
mahitri@gmail.com
बातम्या आणखी आहेत...