आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिशूपालाचे शरसंधान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पांडव सम्राटपदी पोहोचणे, ही यादवसत्तेचा दबदबा वाढवणारी गोष्ट होती. जरासंध वध ही श्रीकृष्णाने घडवून आणलेली राजकीय हत्या (आजच्या भाषेत प्री-प्लान्ड पोलिटिकल एक्झिक्युशन) होती. आपले राजकारण फत्ते करून श्रीकृष्ण द्वारकेला गेला व पांडव राजसूयाच्या तयारीला लागले. सर्व राजांकडून खंडणी वसूल करून खजिना समृद्ध झाला की, राजसूय यज्ञाची आणखी एक अट पूर्ण होणार होती.
कुबेराच्या अधिपत्याखालील उत्तर दिशेला दिग्विजयार्थ अर्जुन सिद्ध झाला. भीमसेनाने पूर्वेकडे, सहदेवाने दक्षिणेकडे व नकुलाने पश्चिमेकडे प्रस्थान केले. अर्जुनाला प्रतिकार करणारा नरकासूर पुत्र भगदत्त राजा इंद्राचा मित्र होता. पांडूचाही सखा होता. त्याने प्रथम युद्ध केल्यानंतर आनंदाने खंडणीही दिली. अनेक राजांकडून रत्ने व अश्व मिळवून खंडणी वसूल करत एकही युद्ध न हरता अर्जुनाचा उत्तर दिग्विजय संपन्न झाला. पांचाल देशापासून प्रारंभ करून नंतर चेदी देशाकडे वळून शिशुपालाकडूनही (कृष्णाचा आत्तेभाऊ) पाहुणचार घेऊन भीम पुढे निघाला. अयोध्या व काशीराजांना जिंकून, निषादांकडून खंडणी घेऊन भीमाने विदेह (जनकाचे राज्य) देश जिंकला. चक्क मगध देशात जाऊन जरासंध पुत्र सहदेवाचाही पाहुणचार घेतला. अंग देशाचा राजा कर्णसुद्धा भीमाला शरणच गेला. पुंड्र देशाच्या बलाढ्य वासुदेवाचा पराभव करून सर्वांकडून भरपूर द्रव्य मिळवले. 

सहदेवाने शूरसेनदेश, कुंतिभोज व कृष्णाचा श्वशुर भीष्मकाकडूनही खंडणी वसूल केली. किश्किंधेच्या वानरराजांचाही पराभव करून प्रेमाने त्यांची मने जिंकली. द्रव्य मिळविले. नकुलाने मरुभूमी जिंकली. आभिर, मत्स्यांवर उपजीविका करणाऱ्यांना शरण आणून त्याने पंचनद (पंजाब) जिंकून मद्र देशाकडे मोर्चा वळवला. शल्य मामाने तर सत्कारच केला. अगणित रत्ने जमवून श्रीकृष्णाकडे दूत धाडला. कृष्णानेही भरपूर खंडणी दिली. चारही दिशांकडून धनदौलत आणल्यामुळे धर्मराजाचा खजिना समृद्ध झाला. नारदाने सांगितल्याप्रमाणे शेती, गोरक्षण, व्यापार, सावकारी सर्व व्यवसाय भरभराटीला आले होते. सर्व प्रजा सुखात होती. राजसूयाला अत्यंत अनुकूल समय प्राप्त झाल्यावर श्रीकृष्ण इंद्रप्रस्थात दाखल झाला. युधिष्ठिराने राजसूयाची दीक्षा घेण्याला कृष्णसंमती मिळवली. जरासंधाचा काटा दूर करून कृष्ण पुढील डावपेच आखू लागला.

द्वैपायन व्यास महर्षी त्यांच्या ऋत्विज प्रज्ञावंताना घेऊन आले. इतकेच नव्हे, स्वत: व्यासांनी ब्रह्मत्व स्वीकारले. यज्ञाच्या पवित्र भूमीची शास्त्रोक्त पूजा केली. ‘समस्त ब्राह्मण, राजे, वैश्य आणि प्रतिष्ठित शूद्रांना निमंत्रणे द्या’, धर्मराजाने सहदेवाला आज्ञा दिली. शुभमुहूर्तावर धर्मराजाने दीक्षा घेतली. आपले पितर इंद्रदरबारी जाणार, म्हणून धर्मराजा खूश झाला. राजसूयासाठी अनेक देशांतून सर्व विद्यांमध्ये पारंगत असलेले ब्राह्मण आले. त्यांच्या भोजनाची व दक्षिणांची चोख व्यवस्था होतीच. ब्राह्मणांना त्याशिवाय गाई, सुवर्णमुद्रा आणि दासीही (ब्राह्मणांना दासींचा उपयोग काय? आणि या दासी खिरापतीसारख्या वाटल्या जायच्या. या दासी मुख्यत: शूद्रच असणार. असो.) मिळाल्या. स्वर्गातल्या इंद्राच्या यज्ञालाही लाजवील असा युधिष्ठिराचा यज्ञ अखेर सुरू झाला. भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र, विदुर, कृष्ण व बंधू कौरवांना आणण्यासाठी नकुल स्वत: हस्तिनापूरला गेला. 

कौरवांच्या समवेत शकुनी, कर्ण, बाल्हिक, भूरिश्रवा, अश्वत्थामा, जयद्रथ हेही आले. शिशुपाल, बलराम, कृष्णाचे पुत्र हेही दाखल झाले. भीष्म, द्रोणांना स्वत: युधिष्ठिर सामोरा गेला. भोजनव्यवस्थेसाठी दु:शासनाला विनंती केली. ब्राह्मणांच्या स्वागताचे काम अश्वत्थाम्याकडे (ब्राह्मणाकडेच) दिले. राजांचे स्वागत करण्यास ‘संजय’ तयार झाला. संपूर्ण देखरेखीसाठी भीष्म-द्रोणांची योजना झाली. सुवर्ण, रत्ने सांभाळण्यासाठी कृपाचार्य निवडले गेले. दक्षिणाही कृपानेच द्यायची (ब्राह्मणाने) असे ठरले. विदुराकडे खर्चाची जबाबदारी होती, तर आलेले अहेर स्वीकारण्यासाठी दुर्योधनाची नेमणूक धर्मराजाने केली. श्रीकृष्णाने ब्राह्मणांच्या चरणप्रक्षालनाचे काम स्वेच्छेने पत्करले. राजांमध्ये युधिष्ठिराला सवर्णमोहरा व रत्ने देण्याची जणू चढाओढच लागली. देव व ब्राह्मण संतुष्ट झाले.

राजसूय यज्ञाचा एक भाग म्हणजे ‘सोमयाग’. सत्कारास पात्र असलेल्या ब्राह्मणांना अंतर्वेदीमध्ये खास प्रवेश होता. सर्वप्रथम देवर्षी सर्वज्ञ नारद अग्रासनावर बसले. अंतर्वेदीच्या आसपासही शूद्रांनी फिरकायचे नाही, असा दंडक होता. (अस्पृश्यताच नव्हे का?) केवळ व्रतस्थ ब्राह्मण, राजे व महर्षींसाठीच ती जागा ‘आरक्षित’ होती. (सभापर्व अर्धाभिहरण पर्व-३६) यज्ञमंडपात सर्व राजे स्थानापन्न झालेले पाहून भीष्माने युधिष्ठिराशी हितगुज केले. ‘इथे जमलेल्या सर्व राजांचा तू यथोचित सत्कार कर. आचार्य, ऋत्विज, आप्त, स्नातक ब्राह्मण, मित्र आणि राजा हे सहा अर्घ्यार्ह (सत्कारास योग्य) असतात. राजांपैकी प्रत्येकाचा तू सत्कार कर. त्यांच्यापैकी जो सर्वश्रेष्ठ असेल त्याचा पहिल्यांदा सत्कार कर. त्यालाच ‘आद्यपूजा’ म्हणतात.’ ‘पितामह! आद्यपूजेचा मान कोणाचा ते तुम्हीच सांगा.’ बिलंदर धर्मराजाने स्वत: निर्णय घेतला नाही. ‘युधिष्ठिरा! तेज, बल, पराक्रम या त्रिगुणांनी युक्त असलेला श्रीकृष्ण आकाशात सूर्य तळपावा, तसा यज्ञमंडपात भासत आहे. 

कृष्णाच्याच उपस्थितीने संपूर्ण सभा उत्साह, चैतन्य व तेजाने, प्रभावित झाली असूनही वातावरणात दाह नाही. शीतलता पसरली आहे. सर्वत्र प्रसन्नता आहे.’ भीष्मांची ही आज्ञा शिरसावंद्य मानून सहदेवाकरवी कृष्णपूजा पारही पडली. कृष्णाने सत्कारपूजेचा स्वीकार केला. समस्त राजांमधून राज्याभिषेक न झालेला कृष्ण आद्यपूजेचा मानकरी झाला. हा प्रकार शिशुपालाला सहन झाला नाही. ‘युधिष्ठिरा! एखाद्या ‘राजाचा’ करावा तसा सत्कार या कृष्णाचा करायला तू धजलास कसा? हा अनाचार तुला शोभला नाही. गंगापुत्र स्मृतिभ्रंश झालेला अडाणी आहे. तूही त्याच्यासारखा धर्मभ्रष्ट कसा झालास? स्वत: राजा नसलेला हा दाशार्ह (दशार्ह वंश म्हणजे यादव वंश) कृष्ण पूजेच्याही योग्यतेचा नसता, तू त्याला आद्यपूजेचा मान देऊन भीष्माचा अवमान करायला आम्हास उद्युक्त केले आहेस. 

हा कृष्ण वयोवृद्ध म्हणता येत नाही, कारण त्याचा पिता वसुदेव इथे उपस्थित आहे. वयोवृद्ध ‘राजा’ निवडायचा होता तर द्रुपद राजा निवडता आला असता. तू कृष्णाला आचार्यपदी तर नाही ना बसवलेला? मग आचार्य द्रोण तुला का दिसले नाहीत? कृष्ण ऋत्विज (ब्राह्मण) आहे, अशी जर तुझी समजूत असेल तर द्वैपायन महर्षी व्यासांची पूजा न करता तो आद्यमान कृष्णाला देऊन तू त्यांचाही उपमर्द केला आहेस. भ्रमिष्ट भीष्माची पूजा केली असतीस तरी आम्ही निमूटपणे सहन केले असते. अरे अश्वत्थामा, दुर्योधन, कृपाचार्य या सर्वांचीच अवहेलना करून तू कृष्णाची पूजा करावीस? हे युधिष्ठिरा! भीष्मक, रुक्मी, एकलव्य, शल्य यांपैकी कुणाबद्दलही आम्ही आक्षेप घेतला नसता. निदान पराक्रमी जामदग्न्य परशुरामाचा बलवान लाडका शिष्य कर्ण उपस्थित असताना कृष्णाची पूजा करण्याचे दु:साहस करून राज्याभिषेक झालेल्या व राजचिन्हे मिरवणाऱ्या समस्त मूर्धाभिषिक्त राजांचा तू घोर अपमान केला आहेस. धर्मात्मा युधिष्ठिरा, तू धर्मभ्रष्ट माणसाची आद्यपूजा केली आहेस.’ 

शिशुपालाने मोर्चा थेट कृष्णाकडे वळवला, ‘हे वृष्णीकुलांगारा कृष्णा! तू महात्म्या जरासंधाचा कपटाने वध केलास. हा सत्कार स्वीकारताना तुला जनांची नाही तरी मनाची तरी लाज कशी वाटली नाही? षंढाचा विवाह उरकावा, आंधळ्यापुढे आरसा धरावा त्याप्रमाणे राजा नसलेल्या तुझी आद्यपूजा हास्यास्पद आहे.’ शिशुपालाचे बोलणे प्रभावी नक्कीच होते. श्रीकृष्ण हा राज्याभिषेक झालेला राजा नव्हता, हेही खरेच होते. अनेक राजांची मने कलुषित करण्याचे काम शिशुपालाने चोखपणे पार पाडले. आता धर्मज्ञ भीष्म काय बोलणार, याकडे समस्त राजमंडळाचे लक्ष लागले. वासुदेव श्रीकृष्ण हा अपमान, उपमर्द सहन करणार का? राजसूय संपन्न होणार की…
- राजा पटवर्धन
संपर्क - ९८२००७१९७५
बातम्या आणखी आहेत...