आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटकत फिरलो, भणंग आणिक...!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमचं जगणं सर्वार्थाने प्रवाहाबाहेरचं होतं. तुमचे अनुभव चाकोरीपलीकडचे होते, त्या जगण्याकडे कसं बघता तुम्ही?
आम्ही पालावर राहायचो. गावातली कच्ची घरं बांधण्याची कामं करायचो, ते काम संपलं की, पुन्हा सारं असलं-नसलं सामान गाढवांवर लादायचो आणि आमचा तळ हलायचा. हे करूनही भूक कायम पोटात वस्तीला असायची. बाप रोज संध्याकाळी दारू पिऊन यायचा. का कुणास ठाऊक, पण तो कावलेलाच असायचा. घरी आला की, तो आईला बेदम मारायचा, जमल्यास भावंडानाही झोडपायचा. तो का मारायचा, ते कळायचं नाही. मात्र त्या लहान वयात आपणही मोठं होऊन, लग्न करून बायकोला खूप झोडपून काढावी, हेच स्वप्न होतं. दारिद्र्य, भूक पिच्छा सोडत नव्हते. एकदा खूप भुकेजून पोटात खड्डा पडला. तितक्यात एक कुत्रा कुठून भाकर तोंडात घेऊन येत असलेला दिसला. कुत्र्याच्या तोंडातल्या भाकरीचा इतका अनावर मोह झाला, की जिवाच्या आकांताने कुत्र्याच्या मागे धावलो. धावता धावता कुत्रा विहिरीत पडला आणि त्याच्यासोबत भाकरही. मनातून कुत्र्याचा खूप राग आला. मग विहिरीशी शांतपणे विचार करीत बसल्यावर लक्षात आलं, आपलं आणि याचं जगणं सारखंच आहे. कुत्र्यासारखंच तर आयुष्य आपलं!
तुम्ही म्हणालात, कुत्र्यासारखं आयुष्य चाललं होतं; पण मग शाळेचा रस्ता तुम्हाला कसा गवसला?
एकदा पालं होती, एका प्राथमिक शाळेच्या पटांगणाशेजारी. तिथले शिक्षक पटांगणात डबा खायचे, तेव्हा आम्ही त्यांच्याभोवती आशाळभूतपणे घुटमळायचो. काही शिक्षिका अर्ध्या- एक पोळीसह भाजी द्यायच्या. तेव्हाच कधीतरी शिक्षकांनी, ‘मुलाला शाळेत घाला, शिकेल, चार पैसे कमावेल, तर तुमची भटकंती बंद करील हा.’ असे वडलांना समजावले, तेव्हापासून शाळा सुरू झाली. चार-पाच महिन्यांतच परीक्षा झाली. पास झालो. मात्र इकडे बापाचं काम संपलं. पालं उठली. शाळा सुटली. पुन्हा भटकंती सुरू झाली.
असेच एका मुक्कामात पुन्हा चौथीच्या शाळेतून टी.सी. घेऊन पाचवीत प्रवेश घेतला. तिथे वसतिगृह होते. रोज दोन वेळेला जेवण नक्कीच मिळायचे. कधी कधी पोलिस यायचे शाळेत, चॉकलेटचे लालूच देऊन बापाचा पत्ता विचारायचे. गोळ्या- चॉकलेटच्या मोहापायी बापाचा पत्ता सांगून द्यायचो. मग कुठे चोरी झाली असली, की आमच्या पालावरच्या माणसांचाच शोध घेत पोलिस बापाला बेदम झोडपायचे. असे पाच-सहा वेळा झाले. मग मात्र गोळ्या-चॉकलेटपेक्षा आपला व्यसनी, मारकुड्या बाप जास्त महत्त्वाचा वाटू लागला. त्यानंतर कधीच बापाचा पत्ता सांगितला नाही...
एकदा इंग्रजीचं पुस्तक जवळ नव्हतं. त्या वेळी शाळेतून पुस्तकं देत नसत. मग इंग्रजीच्या मास्तरांचा तास असेल की, खिडकीतून पळून जायचो. एक दिवस मित्रासोबत बाजारातून पुस्तक चोरायची योजना आखली व दुकानात गेलो. पुस्तक बॅगेत भरलं, ते मालकाने नाही पण नोकराने पाहिले. सारा बाजार गोळा झाला. मरतपर्यंत, कपडे फाटतपर्यंत लोकांनी मारलं! पुन्हा शाळा सोडून दिली. वस्ती शोधत परत आलो. मात्र या वेळी शिक्षक शोधत आले. पुस्तक देतो, म्हणाले. त्यामुळे दहावीपर्यंत शिकता आले. पण परीक्षा तालुक्याच्या गावी होती. सुमारे दोन रुपये तिकीट होते. जाणे- येणे रोजचे चार रुपये कुठून आणायचे? मग परीक्षा द्यायची नाही, असे ठरवले. मग एका मास्तरांनी एक शंभराची नोटच हातात दिली. त्या वेळी प्रथमच शंभर रुपये पाहिले. परीक्षा दिली. आता आपल्याला नोकरी लागेल, आपण पैसे कमवू, असे वाटले.
शिकल्यानंतर तुमच्या आयुष्यानं नवं वळण घेतलं की जुन्याच वळचणीला जाऊन ते थांबलं?
तेव्हा काही स्थानिक नेते मतांसाठी आम्हाला एकत्र करीत. तेव्हा राजकारणात फार ओढ वाटे. आपण आमदार व्हावं वाटे. त्याच दरम्यान लग्न केलं होतं. मग एक मोठा मेळावा घेतला. खर्च नेतेमंडळी करतील, असे वाटले; मात्र तो सगळा खर्च माझ्याच माथी बसला. बायकोच्या गळ्यातले एकुलते बारके डोरले विकून कर्ज फेडले. हा काळ मोठा कठीण होता माझ्यासाठी. मी चोरी केली, दारू प्यायलो, इतका की वेळी-अवेळी चौकात पडून राहिलो. माझे मूल अनाथाश्रमात राहिले. बायको सोडून गेली. मला टी.बी. झाला. कसाबसा सावरलो. मग झपाटल्यागत वाचत गेलो. सर्व प्रकारचे साहित्य वाचले. त्यातून एकच ठळकपणे कळले की, सर्वात मोठा माणूसच असतो. बाकी धर्म, जात, पैसा, देव या सर्वांहून महत्त्वाचा तो जिवंत, हाडामासाचा माणूस, त्याचं मन! आणि हे माणूसपण जपणं महत्त्वाचं!
तुमच्यातला लेखक घडण्यास एका अर्थाने हा काळ कारणीभूत ठरला, असं म्हणता येईल का?
खरं आहे. विचार करू लागलो, तसे ते व्यक्त व्हावेसे वाटू लागले आणि ‘बि-हाड’चा जन्म झाला. आज ‘बि-हाड’ ही कादंबरी पुणे आणि मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. ‘बि-हाड’नंतर ‘दर कोस दर मुक्काम’ ही नायिकाप्रधान कादंबरी लिहिली. मी स्वत: पालावरच्या स्त्रीचं जगणं, तिची दु:खे जवळून पाहिली होती. त्यामुळे त्याबद्दल लिहावं वाटलं. पण अजूनही मला ते जगणं पूर्णत: मांडता आलं नाहीये. भविष्यात मला हे स्त्रीचं दाहक जगणं लोकांपुढे मांडायचं आहे. ‘इळनमाळ’ ही त्यानंतरची कादंबरी, आता कोल्हापूर विद्यापीठात लागतेय. इळ म्हणजे दिवस व माळ म्हणजे रात्र. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, हे वास्तव अनुभवलेल्या समाजावर भाष्य करणारी ही कादंबरी आहे.
पालावरचं जगणं सोडून शहरात, मुख्य प्रवाहात सामील होण्याचा अनुभव कसा होता?
चंद्रपुरात जम बसवायला धडपडू लागलो. महिन्याचा पगार इतका तुटपुंजा होता की, तीन हजारांचा कूलरही घेता येणं शक्य नव्हते. तेव्हा कूलर घेऊन देतो, असे आश्वासन देऊन मागे खेटे घालायला लावणारे एक प्रतिष्ठित नागरिक-लेखक अजून आठवतात. आज लेखक म्हणून नाव झाल्यावर एक कूलर म्हटल्यावर लोक चार पाठवतो म्हणतात, मात्र आता माणसांची पारख मात्र झाली आहे. तरीही चंद्रपुरानं मला खूप दिलं. स्थिर केलं, भाकर दिली आणि लेखक म्हणून ओळख आणि नावही.
तुमच्या ‘पडझड’ कादंबरीला नुकताच महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे. अशा वेळी आजही पालांवरचं जिणं जगणा-या तुमच्या समाजातल्या लोकांच्या तुमच्याबद्दलच्या भावना काय आहेत?
अजूनही गावाच्या वेशीवर, मोकळ्या मैदानावर पालं ठोकलेली बघतो, तेव्हा विलक्षण ओढीने तिथे जातो. त्यांना सांगतो, तुम्ही लेकरांना शिकवा. चांगलं जगण्याचा हक्कतुम्हालाही आहे. मला माझ्या या भावंडांबद्दल लिहायचेय, त्यांच्यासाठी काहीतरी करायचेय, याचे विचार येतात आणि मी ते नक्कीच करेन.
मुलाखतकार : माधवी भट