आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दास्तां' मध्‍यमवर्गीय द्वंव्दाची !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक स्त्री आणि एक पुरुष अशा दोनच पात्रांचं
असलेलं गिरीश जोशी लिखित-दिग्दर्शित ‘फायनल ड्राफ्ट’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर चांगलं चाललं. केवळ दोनच पात्रं असली तरी नाटक प्रेक्षकांना आवडू शकतं, हे ‘फायनल ड्राफ्ट’ने दाखवून दिलं.
या पार्श्वभूमीवर जळगाव येथील डॉ. हेमंत कुळकर्णी यांनीही दोन पात्रांचं दोनअंकी नाटक रंगमंचावर आणलं आहे.
एकमेकांना आयुष्यात पूर्वी कधीच न भेटलेली एक स्त्री आणि एक पुरुष अचानक एकत्र येतात. एक संपूर्ण रात्र रेल्वेस्थानकावर घालवतात, ही ‘दास्तां’ या नाटकाची मध्यवर्ती कल्पना. खरं तर ही थीम मराठी रंगमंचावर नवी नाही; पण
डॉ. हेमंत कुळकर्णी यांनी त्यात जे नाट्य आणलं आहे, ते प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीयांची स्वप्नं आणि त्यांच्या आयुष्याचं वास्तव यांच्या द्वंद्वाचं दर्शन अत्यंत सोप्या पण तितक्याच प्रभावीपणे रंगमंचावर घडविण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
एका लहान गावातल्या, तितक्याच लहान रेल्वेस्थानकावर संध्याकाळी दिवेलागणीपासून दुस-या दिवशी उजाडेपर्यंतच्या वेळेत घडलेल्या नाट्याचं हे सादरीकरण आहे. पडदा उघडतो तेव्हा रेल्वेस्थानकावरील कायम बंद असलेल्या विश्रांतीगृहासमोर प्रवाशांसाठी ठेवलेल्या बाकावर बसलेली मध्यमवर्गीय स्त्री प्रेक्षकांना दिसते आणि पुरुष त्याच बाकावर बसलेल्या अवस्थेत शेवटचा पडदा पडतो. एक प्रवेश वन विभागाच्या विश्रामगृहाच्या जुनाट खोलीत, तर एक प्रवेश रेल्वेस्थानकाजवळच्या निर्जन जागेवर आहे. ही तिन्ही ठिकाणं घडीच्या नेपथ्याचा सहज सोपा वापर करत प्रभावीपणे दाखवण्यात दिग्दर्शक
डॉ. हेमंत कुळकर्णी यशस्वी झाले आहेत. अर्थात, दोन्ही पात्रांतील संवाद, खरे-खोटेपणाचे अनपेक्षित; पण योग्य जागी बसणारे धक्के आणि दोन्ही पात्रांचा दमदार अभिनय, यामुळे नाटकात प्रेक्षकांसाठी स्थानमाहात्म्य असं फारसं उरतच नाही. ते जागेपेक्षा कितीतरी अधिक दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये पुरते गढून जातात. मुलजी जेठा महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असलेल्या डॉ. हेमंत कुळकर्णी यांना नाटकाचे सर्व अंग सुपरिचित असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्याही नावं ठेवायला नाटकात अजिबात जागा नाही. संगीत, ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था पुरेशी सुसंगत आहे. तरीही काही प्रमाणात खटकतात, ती दोन्ही पात्रांना लेखकाने दिलेली रूपं. नाटकातली स्त्री एका प्राथमिक आरोग्य केंद्रात रोजंदारीवर चतुर्थश्रेणीची कामं करणारी, अविवाहित तरुणी आहे; तर पुरुष गावोगावी फिरत होजिअरीचं सामान विकणारा एक अल्प उत्पन्न गटातला विक्रेता आहे. प्रश्न इतकाच आहे की, जीवनशैली उंचावलेल्या उच्चमध्यमवर्गीयांना या पात्रांशी रिलेट करणं जमेल का? विशेषत: मुंबई-पुण्यातल्या प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून हा प्रश्न लेखकाने स्वत:लाच विचारायला हवा. या बाबतीत ‘फायनल ड्राफ्ट’च्या लेखकाचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. नाटक पाहायला येणा-या प्रेक्षकाच्या आर्थिक आणि सामाजिक स्तराशी जुळणारी पात्ररचना गिरीश जोशी यांनी निवडली आहे आणि नाटकाच्या यशात त्याचाही वाटा काही ना काही प्रमाणात नक्की असावा, याविषयी कोणाचं दुमत होणार नाही. ‘दास्तां’ हे नाटकाचं नावदेखील नाटक हिंदी आहे की काय, अशी शंका निर्माण करणारं आहे. ते बदलून एखादं मराठी सयुक्तिक नाव नाटकासाठी निवडायला हवं, असंही वाटतं. एखादं इंग्रजाळलेलं नावही शोधायला हरकत नाही.
या नाटकातली स्त्री भूमिका उज्ज्वला गाढे या नाट्यशास्त्राच्या विद्यार्थिनीने, तर पुरुष भूमिका हेमंत पाटील या प्राध्यापकाने साकारली आहे. दोघांचा अभिनय दमदार आहे, यात वादच नाही; पण व्यावसायिक रंगभूमीवर प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी एखादं तरी नाव मार्केट व्हॅल्यू असलेलं असायला हवं, असं काहींना वाटतं. डॉ. कुळकर्णी यांना मात्र तसं वाटत नाही. ‘शिवाजी अंडरग्राउंड’ या प्रचंड दाद मिळविणा-या नाटकात एक तरी कलाकार तशी मार्केट व्हॅल्यू असलेला आहे का? हा त्यांचा प्रश्न आहे. कमी पात्रसंख्या आणि नेपथ्याचं फारसं जंजाळ नसल्याने तुलनेने कमी खर्चात हे नाटक होऊ शकतं. त्यामुळे ठिकठिकाणच्या नाट्यसंस्था आणि रसिक ती संधी घेतील आणि नाटक रसिकप्रिय होईल, अशी
अपेक्षा बाळगायला हरकत नाही.