आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांचं ऋण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत मागच्या आठवड्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या चरित्राचं पुन:प्रकाशन झालं. पहिलं म्हणजे सगळ्यात आधी लिहिलेलं, पार १९४३मध्ये. छोटंसंच आहे. त्यात महाडच्या चवदार तळ्याच्या संघर्षाची गोष्ट आहे. तीन दिवस तिथे परिषद सुरू होती व त्यात डाॅ. आंबेडकर मार्गदर्शन करत होते. या परिषदेला चार ते सहा हजार स्त्रियाही उपस्थित होत्या. या स्त्रियांना उद्देशून ते म्हणतात, ‘तुम्ही आमच्या आयाबहिणी आहात. आपणास जो त्रास होत आहे तो तुम्हास माहीत आहेच. आमचे जसे तुम्ही संगोपन केले तसेच वरिष्ठ लोकांच्या बायांनीही त्यांचे संगोपन केले. आम्हास जे लोक हीन समजतात त्याबद्दल तुम्हास वाईट वाटत नाही काय?’ ते या स्त्रियांना असाही सल्ला देतात की, दारूबाज नवऱ्याला, भावाला, मुलाला जेवण देत जाऊ नका. मुलामुलींना शिक्षण द्या.
ही घटना तब्बल ९० वर्षांपूर्वीची, १९२७मधली. या परिषदेनंतर डाॅ. आंबेडकरांना संपूर्ण भारताच्या दलित समाजाचे नायकत्व प्राप्त झाले. महत्त्वाचे म्हणजे, स्पृश्य समाजातील विचारवंतांचा दृष्टिकोन बदलला आणि ते निव्वळ दलितांचे नेते राहिले नाहीत.
अस्पृश्यतेच्या विरोधात कायमच झगडणाऱ्या या कायदेतज्ज्ञाच्या मृत्यूला आज ६० वर्षं पूर्ण होतायत. त्या निमित्ताने या महामानवाला अभिवादन. आपलं सर्वांचं, विशेषकरून महिलांचं, जिणं सुधारण्यामागे बाबासाहेबांचा मोठाच सहभाग आहे, देशाची घटना तयार करताना त्यांनी लावून धरलेल्या विविध मुद्द्यांमुळे हे शक्य झालंय. कोणत्याही समाजाची स्थिती त्यातल्या स्त्रियांची स्थिती कशी आहे, यावरून ओळखता येते, असं त्यांचं म्हणणं होतं. स्त्रियांवर ओढवणाऱ्या परिस्थितीचं मूळ त्या अशिक्षित असण्यात, वा त्यांना तसं ठेवण्यात आहे, हे त्यांचं ठाम मत होतं. म्हणूनच स्त्रीशिक्षण हा त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा संघर्षाचा मुद्दा होता. कामगार स्त्रियांच्या कल्याणासाठीही त्यांनी अनेक निर्णय घेतले.
मुलींना शिकवा, असं त्यांनी सांगून नऊ दशकं उलटली, तरी अजून आपल्या देशातल्या कित्येक मुलींना शाळेची पायरीही चढू दिली जात नाही. शाळेत घातलंच तर चौथीनंतर शाळेतून काढून टाकलं जातं, हा समाज म्हणून आपली लायकी दाखवतो, असं खेदाने म्हणावं लागतं.
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...