आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजूला न सारता येणारा विषय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही वर्षांमध्ये राजकारणाची लाट गावागावांमधून वाहू लागली आहे. गल्लीबोळात सर्वत्र राजकारण दिसून येते, पण ते खरंच स्वच्छ असते काय? बहुतेक वेळा याचे उत्तर नकारार्थीच मिळते. जो तो स्वत:च्या स्वार्थासाठी याचा उपयोग करताना दिसतो. स्वार्थासाठी तर बहुतेक जण राजकारण्यांच्या मागे-पुढे करताना दिसतात. याची काहींना चीड येते, तर कुणाला त्यात काहीही वावगे वाटत नाही. सर्वसाधारणपणे महिला राजकारण नावाच्या प्रवाहापासून काहीशा दूरच असतात. आपण बरे अन् आपले काम बरे. म्हटले तिथे मारा शिक्का, राजकारणातले त्यांना काय समजते, अशी आजपर्यंत सर्वांची भूमिका होती. पण आता हे चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे. काळाप्रमाणे महिलांचेही याबाबतीत मत बदलू लागले आहे. त्यांच्याशी या विषयावर गप्पा मारल्या असता, त्यांचे राजकारणाविषयी मत काय हे कळले.
उमेदवार महत्त्वाचा
मनकर्णा मोहोड । अमरावती
पूर्वी मत देताना पक्ष महत्त्वाचा वाटायचा, पण दिल्लीत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीने मात्र पक्ष नव्हे, तर उमेदवार महत्त्वाचा वाटू लागला आहे. पूर्वी पक्षाला मत देताना उमेदवार, त्याचे चारित्र्य याकडे लक्ष देत नव्हते, पण आता जाणीवपूर्वक विचार करते. गुंड, मवाली, भ्रष्टाचाºयांच्या हातामध्ये देशाची धुरा सोपवणे कितपत योग्य आहे, असा थेट सवाल त्यांनी केला. मतदान करताना ध्येयधोरणं काय, उमेदवार लायकीचा आहे की नाही हे न पाहता पक्षाकडे पाहत आलेय. ‘मी पक्षाची’ किंवा ‘पक्ष माझा’ हाच विचार प्रत्येक वेळी असायचा, पण नंतर चूक उमगली. घरात फारसं कुणी राजकारणावर बोलत नाही, पण व्यक्तीची स्वतंत्र मतं असतात, त्याचाच उपयोग आता करणार आहे. जी चूक यापूर्वी केली, ती आता करणार नाही.
सगळे एका माळेचे मणी
चित्रा देशमुख । अमरावती
पक्ष काय नि उमेदवार काय सगळेच एका माळेचे मणी असतात. सत्तेत आल्यावर प्रत्येक जण आपल्या सात पिढ्यांचा विचार करत असतो. सामान्य माणसाला तर मतदानानंतर कुणी विचारतही नाही. महागाई, भ्रष्टाचार हे तर सामान्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. राजकारणी कितीही का मोठे असेनात, पण पांढºया कपड्यांच्या आड काळे धंदे करणाºयांना आता धडा शिकवायलाच हवा. ज्यांनी अख्खा देश पोखरून काढलाय, अशा या किडीला खरं तर नकाराधिकाराच्या जहाल विषानेच खतम करायला हवे. मी पक्षाला किंवा भ्रष्ट उमेदवाराला मत देण्यापेक्षा विश्वासू, कार्यतत्पर उमेदवाराला मत देईन. अन्यथा सरळ नकाराधिकाराचा वापर करीन बस्स! देशमुख यांनी मतदानाविषयी रोखठोक मत व्यक्त करून राजकारणाला लागलेल्या किडीवर नकाराधिकाराच्या जालीम रसायनाचाच वापर करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
प्रथम मतदानाचा उत्साह
पूनम सरदार । अमरावती
यंदा प्रथमच मतदानाचा अधिकार बजावणार आहे पक्ष नव्हे, तर उमेदवार महत्त्वाचा घटक आहे. उमेदवाराच्या कारकीर्दीकडे, चारित्र्याकडे पाहूनच मी मत देणार. सत्ता हातात आली, तरी सात पिढ्यांची सोय लावणारे राजकारण न करण्यासाठी आपणच स्वत:वर काही बंधने घातली पाहिजेत, त्यासाठी प्रवाहाबाहेर जाऊन विचार करायला हवा. प्रथमपासूनच राजकारणाची आवड असणारी पूनम म्हणते : घरी नाही, पण ग्रुपमध्ये राजकारणावर हमखास चर्चा होते. अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल हे माझे आदर्श आहेत.
स्वत:चे मत असावे
अ‍ॅड. प्रणाली शेटे । बार्शी, जि. सोलापूर
सुशिक्षित महिला स्वत: विचार करून निर्णय घेतात. अशिक्षित महिला घरच्यांच्या सांगण्यावरून मतदान करतात. दुसºयांच्या सांगण्यावरून मतदान करणाºया महिलांची संख्या जास्त आहे. सुशिक्षित महिलांमध्ये मतदानाचे प्रमाण कमी आहे.
त्यामुळे महिलांनी मतदान प्रक्रियेसाठी आता थोडे तरी जागरूक व्हावे. आपल्या सभोवतालच्या राजकारणाचा अभ्यास असावा. स्वच्छ राजकारणी कोण, कोणता पक्ष चांगला याबाबत अभ्यास करावा व आपले स्वत:चे मत बनवावे व त्यानुसारच मतदान करावे. मतदान हा आपल्याला लोकशाहीने दिलेला मोठा अधिकार आहे. तो सदसद्विवेकबुद्धीने वापरावा. निकोप समाज घडवण्याच्या दृष्टिकोनातून महिलांनी आपली भूमिका बजावावी. सुसंस्कृत समाज घडवण्याची ताकद महिलांमध्ये आहे
आणि या माध्यमातून तो त्या घडवतील, असा मला विश्वास वाटतो.
जागृत होऊन मत द्या
माधुरी बडवे । पंढरपूर
बºयाच महिला मतदानाचा स्वत: निर्णय घेत नाहीत. राजकारणात महिलांना पदे आहेत, पण निर्णय त्यांचे पती, घरची मंडळीच घेताना दिसत आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागातील अगदी सुशिक्षित, उच्चपदस्थ स्त्रियादेखील निर्णयस्वातंत्र्य वापरत नाहीत. त्यामुळे महिलांनी येऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवार कोण आहे, त्यांनी केलेले सामाजिक काम, त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेसह पोलिस रेकॉर्डदेखील पाहावे. योग्य उमेदवाराला मतदान करण्याची जबाबदारी महिलांनी घेतली पाहिजे. देश भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी, देशाची लोकशाही व्यवस्था जपण्यासाठी, राजकारणातील गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांना संपवण्यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यावा. योग्य उमेदवारांसाठी मतदान करण्याची चळवळ हाती घ्यावी.
महिलांनी सक्रिय व्हावे
नीलिमा हरिसंगम । सोलापूर
राजकारणापासून दूरच राहिले पाहिजे, अशी मानसिकता आपोआपच होते; पण आपण सक्रिय होऊन सकारात्मक बदल घडवून आणले पाहिजेत. त्यासाठी महिलांनी जागरूक राहावे. मतदान करण्यापूर्वी पक्षाचे काम, त्यांची ध्येयधोरणे, आजपर्यंतचे योगदान, सामाजिक भान आदींबाबतचा विचार करावा. महिलांना राजकारणात समान संधी मिळाल्यास त्या बदल घडवू शकतात. बºयाच वेळा आपल्याला ज्या पक्षाला मतदान करावयाचे आहे त्या पक्षाचा उमेदवार चांगला नसतो तर ज्या उमेदवाराला मतदान करावयाचे आहे त्याचा पक्ष नकोसा वाटत असतो. अशा परिस्थितीत महिलांना खूप भान ठेवून निर्णय घ्यावा लागतो. फेरनिवडणूक मागण्याचा अधिकारही मिळाला पाहिजे, असे वाटते. उमेदवाराची एकूण परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला पाहिजे. कोणतेही दडपण नसल्यास तसे करता येणे शक्य आहे. त्यामुळे महिलेला सामाजिक , कौटुंबिक अशा सर्वच ठिकाणी मोकळीक असली पाहिजे.
मोकळेपणाने मत देते
पद्मजा कुलकर्णी । सोलापूर
महिलांच्या मतदान करण्याच्या प्रक्रियेत कुटुंबातील पुरुषांचा दबाव असल्याचे चित्र अनेकदा पाहावयास मिळाले आहे. मात्र, आता दिशा, दशा आणि राजकीय परिस्थितीही बदलली आहे. स्त्री तिच्या विचारांनी, आचरणाने स्वातंत्र्य मनमुराद लुटत आहे. मी अभिमानाने सांगू शकते की, माझ्या कुटुंबात माझ्या मताला व माझ्या विचारांना खूप महत्त्व दिले जाते. मी जे विचार मांडते त्यावर मंथन होते. मी ज्या वेळी मतदानाला जाते तेव्हा माझ्यावर कोणीही दडपण आणत नाही. मी जसा मोकळा श्वास घेते तसाच प्रत्येक मतदानाचा हक्क बजावते. तेही जबाबदारीने.
मतदानाबद्दल संभ्रम
पूजा कानडे । नाशिक
चांगले लोक निवडणुकीला उभे राहत नाहीत. ज्यांना वेळ घालवायचा असतो ते राजकारणाचा पर्याय निवडतात असं वाटतं. चुकीच्या माणसाला मत देऊन आपली तत्त्वं धोक्यात आणण्यापेक्षा मत न देणेच ठीक वाटते; पण पहिल्यांदाच मत देण्याची संधी असल्याने मी मतदान करणार आहे. नव्या कार्यकर्त्यांना, शिकलेल्या व्यक्तींना मत देऊन संधी देणे मला जास्त योग्य वाटते.
मत देणार पारखून
सुनंदा काळे । नाशिक
तळागाळात काम करणारा माणूस चांगला नेता होऊ शकतो. खेड्यामध्ये किंवा शहरातील मागास भागांमध्ये काम करणारा कार्यकर्ता हा त्याच खेड्यातून मोटारीत फिरणाºया नेत्यापेक्षा मोठा असतो. मी मत देणार ते तळागाळात काम
करणाºया कार्यकर्त्याला, पारखून-निरखून. शिक्षणापेक्षा त्याचे काम आणि लोकांशी जोडलेली नाळ महत्त्वाची असते.
अभ्यासू नेता असावा
श्यामला चव्हाण । नाशिक
राजकारण हे कौशल्य आहे, राजकारणात जाणारी प्रत्येक व्यक्ती अभ्यासपूर्वक दाखल होणारी असावी. कोणत्या एका विचारसरणीचा माणूस राजकारणात गेला तर त्या पक्षाचे आणि पर्यायाने समाजाचे स्वरूपही एकांगी विचार करणारे झाले आहे, असे दिसते. यामध्ये कोणत्याही प्रकारची जात, धर्म, पंथ यांचा एकांगी विचार करणारा माणूस किंवा या गोष्टींचा प्रभाव असणारा माणूस आला तर साध्य काहीच होत नाही. पण त्रास होतो तो या वर्गांत नसलेल्या समाजाला, म्हणून एका धर्माचा प्रभाव असणारा किंवा पुरस्कर्त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान करायचे नाही हे ठरवले आहे. माणूस कितीही चांगला असला तरी तो पक्षाची तत्त्वे एकनिष्ठेने धरून चालणारा असतो, एक वेळ विद्रोही माणूस परवडला, एकांगी विचार करणारा मुळीच नाही.