आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्न आणि भविष्य: वास्तवाची उभारणी स्वप्नांतून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भविष्याच्या निर्मितीसाठी स्वप्नांपेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही
- व्हिक्टर ह्यूगो
शेखचिल्लीसारखी दिवास्वप्नं पाहू नकोस, असं आपण कधी ना कधी ऐकलेलं असतं. स्वप्नं पाहणं वाईट, असा एक गैरसमज त्यातून आपल्या मनात दृढ होतो. पण स्वप्नं पाहणं हे खरंच इतकं वाईट नसतं. ती कशा पद्धतीनं पाहिली जातात त्यावर त्यांचं महत्त्व ठरतं. स्वप्नं बंद डोळ्यांनी पाहा किंवा उघड्या डोळ्यांनी पाहा, ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे ते तुमची विचार प्रक्रिया बंद न करणं आणि तुमचं मन नेहमी उघडं ठेवणं. याची सवय एकदा लागली की स्वप्नांची भीती बाळगण्याचं कारण नाही. तरीही बरेच जण स्वप्नं पाहायला घाबरतात किंवा लहानसहान नाहीतर अतिशयोक्त स्वप्नं पाहतात आणि मग ती पूर्ण झाली नाही तर कुढत बसतात. यात दोष असतो तो बघणा-याचा, स्वप्नांचा नाही. स्वप्नांना गांभीर्याने घ्या. असं म्हणतात की, तुमची स्वप्नं सांभाळून बघा. कारण ती खरी ठरू शकतात. या वाक्यात मोठा अर्थ दडलेला आहे. आधी आपण स्वप्नांच्या गांभीर्याचा विचार करू.
आपण कधी मला आज चालायचं आहे, बोलायचं आहे किंवा जेवायचं आहे, अशी स्वप्नं पाहतो का? नाही पाहत. कारण त्या सामान्य बाबी आहेत आणि त्या आपसूकच आपण करत असतो. पण ज्यांना बोलता येत नाही, चालता येत नाही किंवा एकवेळचं जेवण ज्यांच्यासाठी कठीण बाब असते त्यांच्यासाठी या सामान्य गोष्टी असामान्य ठरतात आणि त्यांची स्वप्नं ठरतात. स्वप्नं ही अशा कठीण गोष्टींचीच बघायची असतात. मग त्यांचा संबंध आयुष्यातील करिअरविषयी असेल, एखादा मोठा प्रकल्प पूर्ण करण्याविषयी असेल. ज्या आज आपल्याला अशक्यप्राय वाटतात अशाच गोष्टींची स्वप्नं पाहायची असतात. कारण ही स्वप्नं म्हणजे आपल्या त्या ध्येयाची कायम आठवण करून देणारी गाणी असतात. जी आपल्या तना-मनांत विरघळत जातात आणि आपल्या जगण्याचा भाग बनतात. तेव्हाच त्यांच्या पूर्तीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू होते. ही काही एका दिवसाची गोष्ट नसते, तर रोज होणारी गोष्ट असते. ज्याचं आपल्या जगण्यात एवढं महत्त्व असतं ते स्वप्न म्हणूनच मोठ्या विचारपूर्वक निवडायचं असतं. कारण अविचारानं पाहिलेलं एखादं स्वप्न पूर्ण झालं तर नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
स्वप्न उघड्या मनानं आणि विचारपूर्वक पाहायची असतात. ती बघताना कायम भव्य-दिव्यच बघावी. त्याची अट एवढीच की, ती अवास्तव नसावी. अतार्किक नसावी. ती क्षद्र आणि दरिद्रीही नसावीत.
ज्या क्षेत्रात तुम्ही असाल त्यातील आजवरचा जो सर्वोच्च मानदंड असेल तो मिळवण्याचं आधी स्वप्न पाहा.
तो मिळवता आला नाही तरी त्या दिशेने जाताना तुमची जेवढी काही वाटचाल होईल तिचीही यशातच गणना होईल. कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळत नसते, ही वास्तवता आहे. पण याचा अर्थ जे मिळतं तेही अपुरं नसतं. म्हणूनच स्वप्नं पाहायची असतात. आज आपण जे आहोत त्यापेक्षा आणखी काही वेगळं होण्यासाठी, आणखी काही मिळवण्यासाठी ही स्वप्नं मार्गदर्शक ठरत असतात. तुमच्या भविष्याच्या इमारती या स्वप्नांच्या विटांनीच उभारल्या जाणार आहेत. त्या जितक्या भक्कम असतील, तुमचं भविष्यही तितकंच भक्कम आणि टिकाऊ असेल.