आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमाने के साथ चलो ...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अत्याधुनिक गॅजेट्सने केवळ नव्या पिढीवरच गारूड केलेले नाही, तर ज्यांची निम्म्याहून अधिक हयात कोणत्याही गॅजेट्सविनाच सरली, त्यांच्याही थेट शयनकक्षात या गॅजेट्सने आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे. टीव्ही असो, कॉम्प्युटर असो, की मोबाइल; या सा-याला सुरुवातीला नाके मुरडणा-या आजच्या साठीतल्या वा त्यावरच्या पिढीची लाइफ स्टाइलदेखील या सा-यामुळे बघता बघता अगदी पार बदलून गेली आहे. संबंधित गॅजेट्सची उपयुक्तता, सोय, सुविधा आणि काही अंशी अपरिहार्यता ही त्यामागची प्रमुख कारणे असल्याने आजच्या वेगवान जमान्यात ही युजरफ्रेंडली गॅजेट्स ज्येष्ठांचे खरे सोबती बनून गेली आहेत. अगदी तीन दशकांपूर्वी टीव्हीसुद्धा आपल्याकडे दुर्मिळच होता. चारचाकी तर सोडाच, दुचाकी वाहनांचेदेखील कोण अप्रूप असायचे. कॉम्प्युटर, मोबाइल वगैरे बाबी तर कल्पनेपलीकडच्याच होत्या. (गंमत म्हणजे, अशी कोणतीही कल्पना प्रत्यक्षात अवतरली की, पुराणातल्या एखाद्या निव्वळ कल्पनाविस्ताराचा दाखला देत ‘आपल्याकडे तर हे अगोदरच ज्ञात होते...’ असा कांगावा करण्यास संस्कृती रक्षक वा प्रतिगाम्यांमध्ये अहमहमिकाच लागते.) जेव्हा या बाबी आपल्याकडे प्रवेशकर्त्या झाल्या, तेव्हा पहिल्या टप्प्यावर त्याला नकारात्मकतेचाच सामना करावा लागला. टीव्हीमुळे संस्कृती धोक्यात येईल, कॉम्प्युटरमुळे बेरोजगारी वाढेल, मोबाइल म्हणजे निव्वल फॅडच... या प्रतिक्रिया सर्वांनाच आठवत असतील. पण, आज अगदी याच्या विरोधी चित्र समाज जीवनात पाहायला मिळत आहे. ज्या टीव्हीमुळे आपली संस्कृती धोक्यात येणार होती, तो टीव्ही आज बहुतांशाने एकाच घरात दोन वा अधिक संख्येने दिसतो. दिवाणखान्यातून तो थेट शयनगृहात पोहोचला आहे. विशेषत: दिवसभरातले एकटेपण घालवण्यासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत टीव्ही हा ज्येष्ठांच्या हक्काचा विरंगुळा बनला. तसेच काहीसे कॉम्प्युटरचेही झाले. अगोदर त्याबाबत साशंक असणारे अनेक ज्येष्ठ आता इंटरनेटशीसुद्धा अगदी ‘युजरफ्रेंडली’ बनल्याचे दिसते. मोबाइलची कथाही काही वेगळी नाही. दहा-बारा वर्षांपूर्वी मोबाइलवर बोलणा-यांकडे असूयेने पाहणारे आज त्याचबद्दल अत्यंत आत्मीयतेने बोलतात. कारण, घरी एकटे असताना अथवा रात्री-बेरात्री काही अडचण उद्भवली किंवा मदत लागली, तर अनेकांना सर्वात सोयीचा अन् हक्काचा पर्याय वाटतो मोबाइलचाच. त्यामुळे अगदी झोपतानाही बहुतेक ज्येष्ठांच्या उशाशी मोबाइल असतोच असतो. थोड्याफार फरकाने अशीच कहाणी स्वयंपाकाचा गॅस, गॅस गिझर, मायक्रोवेव्ह ओव्हन, दुचाकी-चारचाकी वाहने आणि आपल्या आजूबाजूच्या इतर अनेक जिनसांची सांगता येईल. आणखी जरा मागे गेलो, तर धोतरापासून तुमानीपर्यंत, भिंगापासून आय ग्लासेसपर्यंत अन् दिवा पेटवण्यासून तो लावण्यापर्यंत झालेले सगळेच बदल आपण पिढी दर पिढी आपसूकपणे स्वीकारल्याचे दिसून येईल. त्यातून सहजपणे उमगेल की, अशा बदलांचा अंगीकार म्हणजेच तर बदलती जीवनशैली! मग, उगाच त्याबद्दल त्रागा का?