आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांचं शिक्षण आधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर सोलापूर या तालुक्याच्या ठिकाणापासून जवळच असलेलं मार्डी हे गाव. गावात हिंदू व मुस्लिम गुण्यागोविंदाने एकमेकांसमवेत राहतात. गावची लोकसंख्या तीन हजार, त्यापैकी मुस्लिम कुटुंबांची संख्या १०० आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी गावात जिल्हा परिषदेची मराठी व उर्दू अशा दोन्ही माध्यमातील शाळा स्थापन झाली. मात्र उर्दू माध्यमाचा पट कमीच असे, कारण गावातील बरीचशी मुलं शाळेत येत नसत. मात्र २००८मध्ये आसिया शेख नावाच्या शिक्षिका गावात आल्या आणि त्यांनी घरोघरी जाऊन महिलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. आजमितीस शेकडो मुलांना शिक्षणप्रवाहाशी जोडलं, त्यांच्याच कार्याची माहिती आजच्या सदरात घेऊ या.

सोलापूरसारख्या प्रसिद्ध शहरात आसिया यांचा जन्म झाला. आई गृहिणी तर वडील भारतीय सैन्यात. चार भावंडांचा हा परिवार. घरची परिस्थितीही जेमतेमच. अशा वेळी पोटाला चिमटा घेत आईने हिमतीने या चारही मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. वडील वर्षातून एकदा घरी यायचे. आसिया आठवीत असतानाच दुसरी-तिसरीतील मुलांना घरी शिकवत असे. कदाचित तेव्हाच शिक्षिका होण्याची बीजे रुजली होती. लग्नानंतर सासू-सासरे व पती यांनी शिकण्याची ऊर्जा दिली व यातून त्या २००८मध्ये मार्डी या ठिकाणी शिक्षिका म्हणून रुजू झाल्या.

मार्डी गावात गेल्यानंतर तेथील पालकांमधील शैक्षणिक अनास्था बघून ताईला वाटलं की, आपण या ठिकाणी बदल घडवायला हवा. मात्र ही गोष्ट सोपी नव्हती. समाजाशी एकरूप होऊन आपण यावर मार्ग काढू शकतो, हे लक्षात आल्याने तीन महिने सतत घरोघरी जाऊन त्यांनी पालकभेटी घेतल्या. शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. ते पटल्यानंतरच लोकांनी आपली मुले शाळेत पाठवली. सहा महिन्यांनंतर ही मुले शाळेतून घरी जायला तयार नव्हती. ताईच्या या पालकभेटीतून पटसंख्या वाढ उपक्रमाची दखल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली. २०१४मध्ये एकरुख या गावात उर्दू माध्यमाची नवीन शाळा सुरू झाली होती, पण तेथील पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार होत नव्हते. ताईंना तात्पुरतं या ठिकाणी पाठवण्यात अालं. तेथेही त्यांनी पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला व शाळेचा पट वाढवला. आज पुन्हा ताई मार्डी येथे आपल्या ज्ञानाद्वारे मुस्लिम मुलांना शिक्षणप्रवाहाशी जोडत आहेत.
उपक्रम :
उर्दूतून रचनावाद : रचनावाद ही संकल्पना २०१०मध्ये अमलात आणलेल्या शिक्षण हक्क कायद्यातील अाहे. यान्वये प्रत्येक मुलाने स्वतः ज्ञानाची निर्मिती करणे अपेक्षित आहे. मागील वर्षी राज्याचे प्रधान शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या अभियानाची सुरुवात करून या द्वारे रचनावाद शाळाशाळांत पोहोचवला. परंतु उर्दू भाषेत बरीच अडचण येत होती. ताईंनी स्वतः मराठी भाषेतील आरेखनांचा अभ्यास करून ती जमिनीवर रेखाटली. मुलांनादेखील यासाठी आवश्यक असणारे मणी, चिंचोके, शब्द, वाक्य पट्ट्या तयार करून एकमेकांकडून शिकायला सुरुवात केली. जिथे मुले अडखळतील तिथे सुलभक म्हणून त्यांनी भूमिका बजावली. अशा प्रकारे प्रत्येक मूल शिकायला लागलं.
गृहभेटीतून पालकसंवाद : गावात घरोघरी भेटी देताना नकळतपणे त्यांना समाजातील सामाजिक, आर्थिक, व शैक्षणिक पैलूंचा अभ्यास करता आला. सुरुवातीला पालकांमध्ये समरस होऊन त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. नंतर मुलांना शाळेत पाठवल्यामुळे काय काय फायदे होतात, हे पटवून दिले. मुलींच्या शिक्षणासाठी पालकांना प्रोत्साहित करून मुलींसाठी शिक्षणाची द्वारे खुली केली.

तंत्रज्ञानातून ज्ञान वाढवू या : आजमितीला जगात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वत्र होताना दिसतो. यात शिक्षिकाही अपवाद नाहीत. ताईदेखील तंत्रस्नेही शिक्षिका असल्याकारणाने मुलांना नावीन्यपूर्ण उर्दूतील गोष्टी, पाठ्यघटक, उपक्रम, प्रकल्प दाखवले. तसेच मुलं खेळताना, वाचताना त्यांच्या पीपीटी तयार करून नंतर ते वर्गावर्गांना दाखवले. यातून मुलांना वेगळा आनंद तर मिळालाच, सोबतच स्वतःतील उणिवा किंवा चांगल्या बाबी समजल्या.

खेळातून शाळेची गोडी : लहान मुलांना शाळेत काय आवडत असेल, असं जर विचारलं तर ती नक्कीच खेळ, असं उत्तर देतील. ताईंनी जी मुलं शाळेच्या प्रवाहात आणली, सुरुवातीला ती गोंधळलेली होती. ती वर्गात बसायची नाहीत. त्यांना खेळायला खूप आवडायचं. ताई स्वतः कबड्डी, लंगडी व खोखो या खेळात कुशल असल्यामुळे त्या वारंवार या मुलांसमवेत खेळायला लागल्या व यातूनच मुलांना हळूहळू अभ्यासाची गोडी लावली.

आत्मनिर्भर बनवू या : मुस्लिम समाजातील मुले लहानपणापासूनच थोडी का होईना स्वकमाई करताना दिसतात. ताईंनी मुलांच्या संकल्पना समजून घेऊन त्यांना गावाजवळील लघुउद्योगाला भेटी दिल्या, तेथील व्यवसाय कशा प्रकारे चालतो, तसेच कच्चा माल कोठून उपलब्ध करतात, त्यावरील प्रक्रिया याची इत्थंभूत माहिती मुलांना मिळवून दिली.
मी स्टार होणारच : मुलांमधील सुप्त गुणांना व सर्जनशीलतेला वाव दिल्यास ती निश्चितच आपल्या आवडत्या क्षेत्रात खूप नाव कमावतात. अभ्यास एके अभ्यास, होत असेल तर ती आपल्या आवडीनिवडींपासून दुरावतात. या उपक्रमांतर्गत मुलांना इतर मुलांसमोर सादरीकरणाची संधी दिली जाते. कथाकथन, शेरोशायरी, कविता, गायन याद्वारे मुलांना या उपक्रमामार्फत व्यासपीठ उपलब्ध करून दिले. जो जिंकेल त्या मुलास स्टार लावून कौतुक केले जाते.
santoshmusle1515@gmail.com
बातम्या आणखी आहेत...