आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्रिय प्रामाणिकपणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जो लहानसहान गोष्टींतही प्रामाणिक असत नाही, त्याच्यावर महत्त्वाच्या गोष्टींतही विश्वास ठेवता येत नाही. - अल्बर्ट आइनस्टाइन
प्रामाणिकपणा हा कोणत्याही कामाचा अंगभूत आणि आवश्यक असा गुण आहे. तो नसेल तर कोणतंही काम अपूर्णच राहील. याचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. एखादं काम करताना त्या कामाप्रती आपण आपली संपूर्ण निष्ठा बहाल करायची असते. तुम्ही जर तुमच्याप्रती प्रामाणिक असाल तरच तुमच्या कामाप्रतीही तुम्ही प्रामाणिक राहता. जे काम आपल्याला दिलं गेलंय ते करण्यास आपण पात्र आहोत का, ते काम आपल्यापेक्षा इतर कोणी अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल का, हे प्रश्न आपण कधी स्वत:ला विचारले आहेत का? याचं उत्तर सहसा नाही असंच येईल. कारण असा विचार फारच कमी माणसं करतात. आणि जे करतात तेच पुढे सर्वार्थाने मोठी होतात. त्यामुळे प्रामाणिकपणा हा वरवर साधा गुण वाटला तरी त्यात अतिशय जबाबदारी भरलेली आहे. याची काही सूत्रे सर्वांनीच लक्षात ठेवण्यासारखी आणि त्याचा प्रत्यक्ष जीवनात वापर करण्यासारखी आहेत.
प्रामाणिकपणा सक्रिय हवा तरच त्याचा व्यक्तीला आणि समाजालाही काही उपयोग होईल. निष्क्रिय प्रामाणिकपणा हा स्वत:साठीही घातक ठरतो आणि समाजासाठीही. उदा. मी भ्रष्टाचार करत नाही. कारण मी प्रामाणिक माणूस आहे. पण या माझ्या प्रामाणिकतेला सक्रियतेची जोड नसेल तर हा प्रामाणिकपणा निरुपयोगी आहे. कारण मी भ्रष्टाचार करत नाही, पण इतर कोणी करत असेल तर त्यालाही मी अडवत नाही. माझा त्याच्याशी काही संबंध नाही, असं सांगून मी माझी जबाबदारी झटकून टाकतो. हा निष्क्रिय प्रामाणिकपणा झाला. समाजालाच नव्हे तर आपल्या स्वत:लाही आज सक्रिय प्रामाणिकतेची गरज आहे.
०आपण जे काम करतो त्याचे तात्कालिक फायदे न बघता दूरगामी दुष्परिणाम काय होऊ शकतील याचा विचार करा.
०प्रामाणिकता ही बोलकी नसावी, तर ती कृतिशील असावी.
०आपला अप्रामाणिकपणा इतरांनाच नाही तर आपल्यालाही घातक ठरू शकतो.
०जे चुकीचं आहे त्याविरुद्ध तुमच्या असेल-नसेल त्या सर्व क्षमतेनिशी लढा द्या.
०प्रामाणिक वागण्याने तुम्हाला कदाचित भौतिक सुखे मिळणार नाहीत, पण मनाचं समाधान आणि शांती नक्कीच मिळेल, जी कोणत्याही भौतिक साधनांनी विकत घेता येऊ शकत नाही. प्रामाणिकपणा ही आपली असहायता बनवू नका, तर आपल्या जगण्याचा, आपल्या कामाचा शक्तिस्रोत बनवा. आणि ती दुबळी बनू नये यासाठी तिला भक्कम कृतीचं पाठबळ द्या.
> सर्वात आधी स्वत:शी, आपल्या क्षमतांशी, मर्यादांशी आणि आवडींशी प्रामाणिक राहा.
> आपल्या कामाने केवळ आपल्यालाच नाही तर इतरांनाही समाधान लाभावं यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा.
> जे प्रामाणिक असतात ते त्यांच्या कामाची, त्याच्या यशापयशाचीही जबाबदारी स्वत:च घेताच.
> आपल्या कामाबाबत ते लवचिक असतात, चुका समजून त्या सुधारण्यासाठी ते कायम उत्सुक असतात.
> त्यांचा प्रामाणिकपणा हा स्वार्थाधारित नसतो आणि त्याच्यासाठी ते कोणत्याही चुकीच्या तडजोडी करत नाहीत.