आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यादवीच्या ज्वाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जानेवारी 2011मध्ये क्रांतीचे वारे सिरियामध्ये वाहू लागले आणि देशाची यादवी युद्धाकडे वाटचाल होऊ लागली. शिया मुस्लिम असलेल्या असद यांची सुन्नी बहुल सिरियावर 2000 सालापासून सत्ता. अरब क्रांतीच्या काळात इथल्या सुन्नी लोकांनी असद विरोधात बंड पुकारलं. आजही ते शमलेलं नाही. उलट असद यांच्या कडव्या भूमिकेमुळे सिरियाची आता यादवीकडे वाटचाल होत आहे. या युद्धात दोन्ही बाजू माघार घ्यायला तयार नसल्यानं युद्धाची तीव्रता कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. यात मुख्यत: भरडली जाताहेत, महिला आणि मुले. असं असलं तरी या युद्धानेच अनेक महिलांना आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक स्वातंत्र्याची संधीही दिली आहे. अनेक महिला आपलं व आपल्या कुटुंबाचं, शहराचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी निकराचा लढाही देत आहेत...
असद समर्थक सरकारी फौजांच्या विळख्यात अडकलेल्या दमास्कस आणि हॉम्स शहरातील विरोधी लोकांवर उपासमारीचं संकट ओढवलं. वीज, पाणी, गॅस, अन्न आणि औषधाअभावी हजारो लोकांना सरकारी फौजांच्या शस्त्रांसोबतच भुकेचाही सामना करावा लागला. याचा सर्वात जास्त परिणाम अल्पवयीन मुलांवर झाला. आजही होतोय. शरणागती किंवा उपासमारी अशा पेचात अडकलेले देशातले असद विरोधक या कठीण काळातही आपल्या विरोधावर ठाम आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत इथल्या महिला एकीकडे आपल्या नव-यांना असद विरोधात लढण्याचं बळ देत आहेत, दुसरीकडे आपल्या मुलांना जगण्यासाठी हिंमत देत आहेत. जीवनरक्षक औषधांच्या अभावी बंडखोरांचे प्राण वाचवणे अवघड होत चालले आहे. त्यामुळे ही लढाई आणखी किती काळ चालणार, एवढाच प्रश्न आहे.
दमास्कसशेजारील मौधामिया शहरात रासायनिक अस्त्रांचा वापर झाल्याने परिस्थिती अधिकच बिघडलेली आहे. इथले दैनंदिन व्यवहार कधीचे ठप्प पडले आहेत. लहान मुलं आता शाळेच्या अभ्यासाऐवजी शहरात कोणते बॉम्ब पडले, याची चर्चा करताहेत. भुकेने व्याकूळ आणि जखमांनी विव्हळणा-या मुलांच्या आया आपल्यामुळे इतरांचा धीर खचू नये, म्हणून एकांतात अश्रू ढाळताहेत. एका बाजूला बंडखोर आणि असद समर्थकांतली हिंसा अशा स्तराला पोहोचली होती की, ब्रिटिश पत्रकार जोनाथन स्टिल यांनी ऐकलेल्या वर्णनानुसार लहान मुले आणि स्त्रियांची धडापासून वेगळी केलेली शरीरे झाडांवर लटकत होती...
एकीकडे असदविरोधी बंडखोर सुन्नी महिला आहेत, तर दुसरीकडे असद समर्थक शिया महिलांचीही संख्या इथे मोठ्या प्रमाणात आहे. सिरियात महिलांवर बंधनं ही होतीच. त्या मग शिया असोत वा सुन्नी. सिरियातील यादवीने शिया महिलांना मात्र अनपेक्षितपणे स्वातंत्र्याची चव चाखायला मिळाली आहे. ज्या महिलांना कधी काळी रस्त्यावर उघडपणे जाण्याची बंदी होती, त्याच महिला आता सैनिकी पोशाख घालून हातातल्या एके-47 रायफल्स मिरवत असतात. हॉम्ससारख्या पारंपरिक शहरात जिथे महिलांवर अनेक धार्मिक बंधनं होती, तिथेच सध्या या महिला असद समर्थक सैन्यात सामील होऊन पुरुष सैनिकांच्या बरोबरीने लढा देत आहेत. दोन वर्षांचा संघर्ष आणि जवळपास 80 हजार लोकांच्या बळींनी हा बदल घडवून आणला आहे.
विशेष म्हणजे, त्यांना पुरुषांच्या बरोबरीने पगार मिळत असल्याने अनेकांसाठी तो नोकरीचा नवा मार्ग बनत आहे. तर काहींसाठी मात्र सैन्यात जाणं ही फॅशनही आहे. असद सरकार मात्र याचा आपण महिलांच्या बाबतीत किती उदार आहोत आणि आपले सरकार महिलांबाबत कसे सहिष्णू आणि निधर्मी आहे, हे जगाला दाखवण्यासाठी उपयोग करत आहे. असद विरोधक मात्र या महिलांबाबत घाणेरड्या प्रतिक्रिया देण्यात मग्न आहेत. युद्ध कोणीही लढो, त्यात दोन्ही बाजूच्या महिलांना या ना त्या स्वरूपात अत्याचारांना बळी पडावंच लागतं. सिरियातील संघर्ष आता या थराला पोहोचलाय की, दोन्ही बाजूच्या महिला हातात शस्त्रं घेऊन प्रत्यक्ष युद्धभूमीत उतरल्या आहेत. यातला अंतर्विरोध असा, की दोन्ही बाजूचे पुरुषही आपल्या महिलांना आता सन्मानाने वागवत आहेत, जे या महिलांच्या बाबतीत प्रथमच घडतंय. पण जोवर इथे शांतता नांदत नाही, तोवर या सन्मानाला काहीच अर्थ नाही.