आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवास तिळ्यांसोबतचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘प्रवास तिळ्यांसोबतचा’ या लेखमालेतला हा शेवटचा लेख. हा लेख लिहिताना मला खरोखरच भरून येतंय. जवळजवळ वर्षभर माझ्या तिळ्या मुलांबरोबर केलेल्या तीन आठवड्यांच्या हिमालयातल्या प्रवासाच्या आठवणी मी मधुरिमाच्या वाचकवर्गासोबत शेअर केल्या. या सदराला माझ्या अपेक्षेहून खूप जास्त प्रतिसाद मिळाला. खूप वाचकांनी आवर्जून इ-मेल्स लिहिल्या. बऱ्याच जणांनी असंही सांगितलं की, हे सदर वाचून त्यांनाही त्यांच्या मुलांसोबत हिमाचल प्रदेशची सफर करायची इच्छा झाली. माझ्यासाठी असे अभिप्राय म्हणजे खूप मोठं यश आहे.

ही लेखमाला लिहिता लिहिता मी गेल्या वर्षी केलेला हा तीन आठवड्यांचा प्रवास परत एकवार मनसोक्त जगून घेतला. मुलांच्या नजरेतून भारत बघणं, हा एक वेगळाच अनुभव आहे. मुलांना हा प्रवास कसा वाटला, हे मला समजावं म्हणून मी त्यांना दररोज डायरी लिहायला सांगितलं होतं. मुलांनी अगदी दररोज नाही तरी बरेच दिवस नेमाने अगदी प्रामाणिकपणे डायरी लिहिली होती. आम्ही परत पुण्यात आल्यानंतर मी जेव्हा तिघांच्याही डायऱ्या वाचायला घेतल्या, तेव्हा मी चाटच पडले. एकाच घरातली, एकाच आईच्या पोटातली, एकाच दिवशी जन्मलेली तीन मुलं, पण प्रत्येकाचा जगाकडे बघायचा दृष्टिकोन किती वेगळा होता!
हिमालयातल्या त्या प्रवासात आम्ही दर दिवशी खूप वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या, पण दिवसाच्या शेवटी जेव्हा मुलं डायरी लिहायची तेव्हा प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी आठवत असायच्या. कधी कधी तर डायरी वाचताना मलाच असं वाटून जायचं की, यांनी अनुभवलेला दिवस मी अनुभवलेल्या दिवसापेक्षा किती वेगळा आहे! आतापर्यंत मी जे जे या लेखमालेतून लिहिलं ते सर्व माझ्या दृष्टिकोनातून होतं. आजचा हा शेवटच्या लेख या प्रवासाचं माझ्या नऊ वर्षांच्या मुलांच्या नजरेतून केलेलं रेखाटन आहे, तेही त्यांच्या स्वतःच्याच शब्दात लिहिलेलं. डायऱ्या इंग्रजीत होत्या. मी फक्त अनुवाद केलाय. आशय आणि शब्द तसेच ठेवलेत. वेडंवाकडं कसंही असलं तरी वाचकांनी गोड मानून घ्यावं, ही विनंती!
मुक्काम-दिल्ली : आज आम्ही दिल्लीला आलो. विमानात मला उलटी झाली. थोडं माझ्या बुटांवर सांडलं. मला वाटलं मम्मा माझ्यावर रागावेल, पण ती काहीच बोलली नाही. आम्ही दिल्लीला इंडिया गेट बघणार. इंडिया गेट आणि गेटवे ऑफ इंडिया वेगवेगळे आहेत, हे माझ्या वर्गात खूप जणांना माहीतच नाही. तिथून आम्ही अमृतसरला जाणार. अमृतसरला मला जालियांवाला बाग बघायची आहे आणि गोल्डन टेम्पल. गोल्डन टेम्पलचं खरं नाव हरमंदिर साहिब आहे. मला सिखिजम खूप आवडतो. मम्मा म्हणते, आम्ही लहान होतो तेव्हा तिने आम्हाला सगळ्यात आधी देवळात नेलं आणि मग गुरुद्वारामध्ये. अमृतसरहून आम्ही हिमाचलला जाणार. हिमाचलला मी खूप ट्रेकिंग करणार. अप्पा मला माउंटन गोट म्हणतो, कारण मला डोंगर चढायला फार आवडतं.
-अर्जुन
मुक्काम- अमृतसर : आम्ही अमृतसरला शताब्दीने आलो. मला शताब्दी ट्रेन खूप आवडते, कारण ट्रेनमध्ये छान सूप आणि सॅण्डविच मिळतं. जेवल्यानंतर आईस्क्रीमपण देतात. मला त्या सर्व्हर भय्याने अजून आईस्क्रीम पाहिजे का, म्हणून विचारलं आणि मी हो म्हटल्यावर मला एक्स्ट्रा कप दिला. मी आणि अर्जुन क्रिकेट कार्ड‌्सने खेळलो. अनन्या नेहमीप्रमाणे पुस्तक वाचत होती. मम्मा शेजारच्या माणसाशी बोलत होती. मम्मा कुणाशीही बोलते आणि आम्हालाही बोला म्हणून सांगते. अमृतसरला पोचल्यावर आम्ही हॉटेलमध्ये गेलो. मग आम्ही जेवायला मम्माच्या मित्राच्या आई-बाबांकडे गेलो. ते सिख आहेत. त्यांनी छान पराठे केले होते. आम्ही आज सकाळी जालियांवाला बागला गेलो. तिथे भिंतीवर खूप बुलेट मार्क्स आहेत. अनन्या आणि मम्मा तिथे रडल्या. नंतर आम्ही गोल्डन टेम्पलला जाऊन दर्शन घेतलं. तिथे डोक्याला स्कार्फ बांधावा लागतो. गोल्डन टेम्पल खूप छान आहे. मला रात्री तिथे परत जायचंय. संध्याकाळी आम्ही वाघा बॉर्डरवर परेड बघायला गेलो. आधी काही बायका तिरंगा घेऊन पळत आल्या. मग काही लोकांनी डान्स केला. नंतर परेड सुरू झाली. आपले सैनिक आणि पाकिस्तानी सैनिक मार्च करून अगदी मोठ्या गेटपर्यंत जायचे. किक करताना ते किती उंच किक करत होते. तिथे लोक चिप्स विकायला घेऊन आले होते, मी घेतले नाहीत. मम्माचे खूप पैसे खर्च होतात.
-आदित
मुक्काम-पालमपूर : पालमपूरला आम्ही पागलपूर म्हणतो. पालमपूरचे खूप लोक भारतीय सैन्यात आहेत, असं मम्माने सांगितलं. आज आम्ही सकाळी मसरूरचं रॉक कट मंदिर बघितलं. अगदी महाबलीपुरमच्या मंदिरासारखं होतं. मम्माने सगळी कार्विंग्स दाखवून क्विझ केला. मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आली. मंदिरापुढे तळं आहे. तिथे खूप मोठे मोठे मासे होते. आम्ही त्यांना पिठाचे गोळे खायला दिले. नंतर आम्ही कांगडा किल्ला बघायला गेलो. खूप मोठा किल्ला आहे. मम्माने आम्हाला सगळ्यांना ऑडिओ गाइड घेऊन दिले. किल्ल्यावर कटोच राजघराण्याचं क्रेस्ट आहे. ऑडिओ गाइडमध्ये सांगितलं की, गझनीच्या मुहम्मदाने इथल्या कटोच राजाला कातडी सोलून मारलं. ते ऐकून मला खूप राग आला. पण त्याच्या मुलाने त्याचा सूड घेतला, हे ऐकून मला बरं वाटलं. किल्ल्यात एक विहीरपण आहे तिथे सगळ्या राजपूत राण्यांनी उडी मारली होती, असं ऑडिओ गाईडमध्ये सांगितलं. मी मम्माला विचारलं, त्यांनी विहिरीत का उड्या मारल्या? तलवार घेऊन फाइट का केलं नाही?
-अनन्या
मुक्काम-कुल्लू : आज आम्ही रेवलसरहून कुल्लूला आलो. वाटेत पराशरला गेलो. पराशर खूप सुंदर आहे. तिथे एक मोठं तळं आहे आणि त्या तळ्यात एक तरंगणारं बेट आहे. आम्ही मंदिरात गेलो. तिथे पुजारीकाकांनी साखरफुटाणे दिले. नंतर आम्ही मंदिरामागचे डोंगर चढलो. एक डोंगर अगदी बुकशेल्फसारखा दिसला म्हणून अर्जुन आणि मी त्याला बुकशेल्फ माउंटन असं नाव दिलं. वाटेत आम्ही खूप जंगली स्ट्रॉबेरी खाल्ल्या. डोंगरावर आम्हाला एक बकरी दिसली. इथल्या बकरीचे केस खूप लांब आहेत.

मी आणि अर्जुनने तिला गवत खायला दिलं. आम्हाला ते आवडलं. बकरीलाही आवडलं असेल, कारण तिने सगळं गवत खाल्लं. नंतर आम्ही तिथेच एका ढाब्यात दाल-चावल खाल्ला. मम्मा दररोज फक्त ढाब्यातच नेते आम्हाला दाल-चावल खायला, पण नंतर चिप्स देते कधी कधी. आम्ही डोंगरावर चालत असताना आम्हाला एक माणूस भेटला. तो तिथे बसून लोकर विणत होता. मम्मा त्याच्याशी बोलली. त्या माणसाने आम्हाला विचारलं, ‘पराशर ऋषी कोण होते माहीत आहे का?’ मी म्हटलं, ‘महाभारत लिहिणाऱ्या व्यासांचे वडील.’ तो माणूस खूप खूश झाला.
-आदित
मुक्काम- शोजा : आज आम्ही ज्या मोनॅस्टरीत राहात होतो तिथल्या लामांना भेटलो. मी त्यांना विचारलं, दलाई लामांना ‘दलाई’ का म्हणतात? ते हसले आणि म्हणाले ‘दलाई’ हा तिबेटी शब्द नाही. दलाई म्हणजे सरोवर. मंगोलियन लोकांनी दलाई लामांना हे नाव दिलं. मग आम्ही शोजाला आलो. तिथे रेस्टहाउस बंद होतं. मग मी आणि आदितने एक लाकूड मिळवलं आणि दगडाने क्रिकेट खेळायला लागलो. मम्मा आणि अनन्या वाचायला लागल्या. खूप वेळाने तिथले काका आले. आम्ही आमची रूम बघितली. छान आहे. इथे दोन कुत्रे आहेत, ते नेहमी आमच्या मागे मागे येतात. एक काळा आहे त्याचं नाव आम्ही शॅडो ठेवलंय आणि एक ब्राउन आहे त्याचं नाव गोल्डी.
-अर्जुन
मुक्काम- सरहान : सरहानचं देऊळ खूप सुंदर आहे. सगळीकडे लाकडावर कार्विंग आहे. आम्ही मंदिरातच गेस्टहाउसमध्ये राहिलो. संध्याकाळी चालायला गेलो. तिथे एक खूप मोठा कुत्रा होता. मम्माने त्याला ‘ब्रुनो’ म्हणून हाक मारली. तो लगेच शेपटी हलवत आला. त्याच्या मागे एक मुलगी उभी होती, तिने मम्माला विचारलं, ‘त्याचं नाव ब्रुनो आहे हे तुम्हाला कसं कळलं?’ मम्मा म्हणाली, ‘माहीत नाही. असंच वाटलं मला.’ आम्ही चालत गावात गेलो. तिथे काही मुलं क्रिकेट खेळत होती. आदित, अर्जुनपण त्यांच्याबरोबर खेळले. मग आम्ही रात्री आरतीला गेलो. मम्मा यलो साडी नेसली होती. सगळे तिलाच बघत होते.
-अनन्या
मुक्काम - काल्पा : आज आमचा इथला शेवटचा दिवस आहे. मम्माने विचारलं, तुम्हाला कसं वाटतंय? मला थोडं आनंदी वाटतंय आणि थोडं दुःखी. आता आम्ही घरी जाणार, अप्पाला भेटणार, म्हणून आनंद होतोय. पण हिमाचल मला खूप आवडलं म्हणून सॅड वाटतंय. मम्माने विचारलं, तू काय शिकलास या ट्रिपमध्ये. मी काही गोष्टी शिकलो त्या म्हणजे
१) थोडीशी पहाडी बोलायला शिकलो.
२) ढाब्यांमध्ये दाल-चावल खायला शिकलो.
३) न दमता खूप चालायला शिकलो.
४) डोंगरावरच्या झऱ्याच्या पाण्याने पाण्याची बाटली भरायला शिकलो.
५) कुठलीही स्क्रीन नसताना राहायला शिकलो.
६) कुठेही झोपायला शिकलो.
-आदित
मुक्काम - काल्पा : मम्माने मला विचारलं, या ट्रिपमध्ये तू काय शिकलास. मी पहाडी कुत्र्यांशी दोस्ती करायला शिकलो. मी मम्माकडून इतिहास शिकलो, मी चांगले फोटो घ्यायला शिकलो, मी हाय अल्टिट्यूडमध्ये खूप चालायला शिकलो, अनोळखी लोकांशी बोलायला आणि क्रिकेट खेळायला शिकलो आणि दाल-चावल खायला शिकलो. मला परत पुढच्या वर्षी हिमाचलला यायचंय.
-अर्जुन
मुक्काम काल्पा : काल मी आणि मम्मा चालायला गेलो होती तिथे आम्हाला एक छोटी मुलगी दिसली. तिची आई आणि ती गवत डोक्यावर घेऊन आणत होते. मम्माने माझ्याकडे नुसतंच बघितलं. मला कळलं तिला काय सांगायचं होतं ते. आम्ही किती लकी आहोत, ते मी शिकले या ट्रिपमध्ये.
-अनन्या
बातम्या आणखी आहेत...