आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही घेतो कौशल्य दिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांना दप्तराचे ओझे होऊ नये, म्हणून शासनाने विद्यार्थ्याचे वजन आणि त्या प्रमाणात दप्तराचे वजन किती असावे, हे ठरवून दिलेले आहे. मुलांनाही दप्तराचे ओझे आवडतच नाही. मग आठवड्यातून एक दिवस शाळा बिनादप्तराचीच असेल तर? होय बिनदप्तराची शाळा.
शनिवार आमचा अर्धा दिवस शाळा दिवस आहे. हा दिवस बिनदप्तराची शाळा भरते. त्या दिवशी मुलांकडे कसलेच दप्तर नसते. विद्यार्थी खूपच आनंदाने या दिवसाची वाट पाहात असतात. खूप मजा येते त्यांना. दप्तराविना शाळा म्हणजे मग रिकामच फिरायचं का या दिवशी? काय शिकत असतील त्या दिवशी मुलं? आठवड्यातील एक दिवस वायाच जात असेल.
असे प्रश्न काहींना पडले असतील. पण प्रत्येक शनिवार हा बिनदप्तराची शाळा म्हणजे ‘कौशल्य दिन’ आम्ही साजरा करतो. या दिवशी मुलं खूप काही शिकतात तेही बिनादप्तराचे, बिना लिखाणाचे.
या दिवशी गावामध्ये ज्या कुणाला एखादे कौशल्य अवगत असेल. उदा. गायन, चित्र रेखाटन, रांगोळी काढणे, रंग भरणे, मातीकाम इ. अशा कौशल्य निपुण व्यक्तीला शाळेमध्ये बोलावून विद्यार्थ्यांसमोर ते आपल्या कौशल्याचे सादरीकरण अगदी अनौपचारिकपणे करतात.
दररोजपेक्षा सर्वच वेगळे असते, म्हणून मुले अगदी लक्षपूर्वक पाहतात, ऐकतात. शक्य तेव्हा लगेचच कृतीही करतात. कधीकधी कृतीही नंतर करावी लागते. कधीकधी सुतारकाम, लोहारकाम, कुंभारकाम अशी कौशल्ये आम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन मुलांना दाखवतो.
कधीकधी शाळेतील एखाद्या विद्यार्थ्याच्या अंगी असलेले कौशल्य सादरीकरण केले जाते. तर कधी शाळेतील शिक्षक आपले कलाकौशल्य सादर करतात.
कधीकधी अवांतर वाचनाचा छंद त्या दिवशी जोपासला जातो. तसे अवांतर वाचन हे विद्यार्थी रोजच आपल्या आवडीप्रमाणे करतात. पण कौशल्य सादर करणारे कोणीच भेटले नाही तर आवांतर वाचन, सामान्य ज्ञान, प्रश्नमंजूषा, शब्दांची अंताक्षरी, शब्दांची रेल्वे, स्मरणशक्तीवर तसेच कल्पनाशक्तीवर आधारित स्पर्धा, कविता वाचन, प्रकट मुलाखत असे वेगवेगळे ज्ञान आणि मनोरंजनावर अाधारित उपक्रम घेतले जातात.
या विविध उपक्रमांमुळे अध्ययनात आनंद, उत्साह तर येतोच, पण समंजस वृत्ती, सहकार्य वृत्ती, दुसऱ्याचे एेकून घेण्याची क्षमता, सांघिक प्रवृत्ती, आपलेपणाची भावना, सृजनशीलता, अभिव्यक्ती, सभाधीटपणा अशा अनेक गुणांचा विकास होतो. जो केवळ पुस्तकी ज्ञानाने होत नाही, त्याला अनुभवच लागतो.

एका शनिवारी दुसरीतील विद्यार्थी क्रिश येडे याची आजी विमल येडे आपली गायन कला सादर करण्यासाठी या शाळेमध्ये आल्या. त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून टाकले. त्या दिवसापासून त्यांचा नातू क्रिश एका वेगळ्याच आत्मविश्वासाने वागतो. आजीने वेळात वेळ काढून आपल्या नातवासाठी शाळेत येऊन गायन सादर केले.
शाळेशी त्यांचा जिव्हाळा वाढला. त्या दिवशी मुले टाळाचा ठेका कसा धरावा, लय, ताल यांचे जवळून निरीक्षण करून शिकली. त्यानंतर एका शनिवारी मी स्वत:च विद्यार्थ्यांना मातीकाम शिकवले.
गणपती बाप्पाच्या आगमनावेळी गणपती मूर्तींची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. पैसा खर्च होतो. शिवाय या गणेश मुर्तींमुळे पर्यावरणाचे (पाण्याचे) मोठे नुकसान होते (विसर्जनामुळे). हे सर्व टाळण्यासाठी शाळेतच पर्यावरणस्नेही गणपती बनवायचे ठरले. मुलांनी छान, बारीक मातीचा, शाडूचा चिखल आणला आणि सर्वांनी मिळून छान, सुबक अशा गणपती मूर्ती बनवल्या. त्यांना सजवण्यासाठी जुन्या साडीच्या, ड्रेसच्या टिकल्या ओल्या चिखलामध्ये चिकटवल्या. ड्रेसचे स्टोन चिकटवले.
अशा प्रकारे साजशृंगारासह शाळेमध्ये पर्यावरणस्नेही छान छान गणपती मूर्तींची निर्मिती झाली. छोट्या छोट्या हातांची सुबक कलाकुसर पाहून ग्रामस्थही चकित झाले. कित्येक महिलांनी विद्यार्थ्यांकडून गणपती बनवून घेतले आणि घरोघरी याच गणपतीची स्थापना झाली.
अशा प्रकारे या कौशल्य दिनातून आनंद मिळून कलाकौशल्य वाढीस लागून पैशांची बचत झाली. पर्यावरणाचे रक्षण झाले आणि आपल्याच चिमुकल्यांचे कौशल्य पाहून ग्रामस्थही या उपक्रमात आनंदाने सक्रिय सहभागी झाले आणि कुणालाही त्रास न होता, औपचारिकता न करता सहजासहजी पर्यावरणविषयक समाजप्रबोधन होऊन पर्यावरणाचे रक्षण झाले.
तेव्हाच दीपावलीच्या पणत्याही मातीचाच वापरायच्या, असे ठरवून पुढे पणत्याही एका कौशल्य दिनानिमित्त बनवल्या व पालकांनी मातीच्या पणत्यांचा स्वीकार करत स्वदेशीला महत्त्व दिले. शाळेमध्ये कौशल्य दिन घेण्याचे असे अनेक फायदे आहेत.
उर्मिला भोसले,
जिप प्रा.शा. महालदारपुरी, उस्मानाबाद

प्रत्येक शनिवार हा बिनदप्तराची शाळा म्हणजे ‘कौशल्य दिन’ आम्ही साजरा करतो.
या दिवशी मुलं खूप काही शिकतात तेही बिनादप्तराचे, बिना लिखाणाचे.
urmilabhosale75@gmail.com
बातम्या आणखी आहेत...