आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PCOD ची कथा (आहारगाथा)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच नोकरीसाठी बाहेर पडणा-या बहुतांश महिलांमध्ये आढळणा-या PCOD या आजाराविषयी...
सर्व वयातील स्त्रियांना आजच्या जीवनशैलीमुळे भेडसावणारा आजार म्हणजे polycystic ovarian disease. PCOD किंवा PCOS या नावाने ओळखला जाणारा हा आजार स्त्रियांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर परिणाम करतो. लहान मुलींना किंवा वयात येणा-या मुलींना चेह-यावर फोड येणे, अनावश्यक केस येणे, केस गळणे, त्वचा काळवंडणे, अशा लक्षणांपासून स्थूलता, पाळीमध्ये अनियमितता, अत्यल्प किंवा जास्त रक्तस्राव, चिडचिडेपणा यांसारखे शरीरापासून मनापर्यंत परिणाम पाहावयास मिळतात. ब-याच वेळेस हा आजार अानुवांशिक असल्याने लहान मुलींमध्येही सूक्ष्म स्वरूपात ही लक्षणे आढळतात.

मध्यमवयीन स्त्रियांमध्ये PCODचे परिणाम वेगळ्या पद्धतीने जाणवतात. प्रामुख्याने या आजाराचे निदान गर्भधारणा न राहणे (infertility) सारख्या लक्षणांमधून होते. याशिवाय मानेवर व कमरेभोवती काळे गडद पट्टे तयार होणे, पोटावर चरबी येणे, केस गळणे अशी लक्षणे निर्माण होतात. चाळिशी व त्यापुढील वयातसुद्धा हा आजार डोके वर काढू शकतो. यामध्ये अत्याधिक मासिक स्राव होणे, वजन वाढणे, रक्तातील काेलेस्टेराॅलचे प्रमाण वाढणे, रक्तदाब वाढणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. मासिक स्राव सुरू झाल्यापासून हा आजार होऊ शकतो. सर्व वयातील स्त्रियांमध्ये PCODचा प्रामुख्याने परिणाम त्वचा, प्रजननसंस्था व मेदाचे विकार यावर होतो. PCOD या विकाराचे कारण काय? तर अंशत: ही व्याधी अानुवंशिक असून बहुतांश वेळा ती चुकीच्या जीवनशैलीमुळे होते. यामध्ये व्यायामाचा अभाव, रात्रीचे जागरण व सकाळी उशिरा उठणे, चुकीच्या पद्धतीने आहारसेवन ही काही प्रमुख कारणे आहेैत.आहार व PCOD यांचा खूप जवळचा संबंध आहे. यामध्ये अतिस्निग्ध पदार्थांचे सेवन, शीतपेयांचा, हवाबंद पदार्थांचा, मैद्याच्या पदार्थांचा अति वापर, गोड पदार्थांचा वापर यामुळे PCOD विकाराला आमंत्रण मिळते.
PCODसारख्या व्याधीमध्ये जीवनशैली सुधारणे व समतोल आहार हा मूलमंत्र असायला हवा. मात्र अनेक वेळा हा आजार फक्त आहार व जीवनशैली सुधारून आटोक्यात येत नाही, त्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या लक्षणानुसार व गरजेनुसार उपाययोजना करावी लागते.

आहाराच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास ज्या पदार्थाचा glycemic gndea कमी आहे, असे पदार्थ सेवन करणे सयुक्तिक ठरते. त्याचप्रमाणे प्रथिनांचा समावेश आहारामध्ये यथायोग्य करावा. स्नेहांशाचे प्रमाण अत्यल्प असावे. या आजारामध्ये हृदयाला ताण देणा-या (cardio) व्यायामाला विशेष महत्त्व आहे. यामध्ये एरोबिक्स, धावणे, सायकलिंग यांसारखे व्यायाम फायदेशीर ठरतात. PCODमुळे ज्या स्त्रियांच्या त्वचेवर परिणाम झाला आहे, त्यांच्यासाठी विविध आयुर्वेदिक उपाय आहेत. ज्या मुलींमध्ये चेह-यावर, मानेवर, फोड (Acne) आहेत, त्यांनी विशिष्ट औषधी वनस्पतीचे मुखलेपन व मुखस्नेहन (face pack and herbal fecial) करावे. यामध्ये हळद, मंजिष्ठा, अनंतमूळ, ज्येष्ठमध यासारख्या वनस्पतींच्या अर्काचा उपयोग होतो. ज्या स्त्रियांच्या चेह-यावर व मानेवर काळेपणा आलेला आहे (Acanthosis) त्या स्त्रियांमध्ये विशिष्ट औषधी वनस्पतींचे लेपन उपयुक्त होते. मानसिक ताण हेसुद्धा एक कारण ही व्याधी वाढण्यासाठी कारणीभूत ठरते. यामुळे स्त्रियांमध्ये आत्मविश्वास कमी होऊन न्यूनगंड निर्माण होतो. अशा वेळेस वरील उपायासोबत शिरोधारासारखे उपाय उपयुक्त ठरतात.

या आजारामध्ये रुग्णाची अवस्था व तो डॉक्टरकडे कुठल्या कारणासाठी आला आहे यावर कुठल्या चिकित्सेला प्राधान्य द्यावयाचे याचा निर्णय घेता येतो. या व्याधीमध्ये वर वर्णन केलेली लक्षणे ही प्रामुख्याने insulinच्या अवरोधात्मक विकृतीने होत असल्याने या संप्रेरकावर कार्य करणारी वनस्पती औषधे चांगल्या प्रकारे कार्य करतात. ही चिकित्सा करत असताना ड जीवनसत्त्वाचे प्रमाण यथायोग्य राखणे गरजेचे असते. या बाबींचा विचार केल्यास PCOD नियंत्रणात राहू शकतो.
sangitahdesh@rediffmail.com