आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘लोभस चित्रपत्रां’चा हृदयस्पर्शी व्यवहार (बाळकृष्ण कल्याणकर)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जग वेगवान झालंय, त्यामुळे पत्रं कालबाह्य झाली आहेत... हे विधान जरी वस्तुस्थितिदर्शक असलं तरीही, कालबाह्य झालेल्या या जीवनशैलीत, पत्रलेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब स्पष्टपणे दिसत होतं. महत्त्वाचं म्हणजे, बराच काळ मनात विचार घोळवायचा, मगच तो लेखणीच्या माध्यमातून पत्रावर उतरवायचा. आता इंटरनेटच्या युगात अभिव्यक्त होणे व प्रतिसाद मिळणे, या क्रिया सेकंदात घडून येतात. यात अनेकदा चित्त अस्थिर असतं, अक्षरात वेगळेपण नसतं, कुठल्याही माणसाने, जगात कुणालाही संदेश/ई-पत्र पाठवलं की, टाइप, फाँट एकच...या पार्श्वभूमीवर हस्ताक्षर चळवळ, तिचे महत्त्व, वैशिष्ट्यं व आधुनिक तंत्रसाधनांच्या वापराविना झालेल्या दोन पत्रलेखकांमधल्या व्यवहाराचे हे रंजक तपशील...
एक काळ असा होता, की ‘पत्र तुझे ते येता अवचित, लाली गाली खुलते नकळत’, अशी नाजूक भावना ‘पत्रा’शी निगडित असायची. काळाच्या ओघात संपर्काची, संवादाची माध्यमे बदलली. मोबाइलच्या आगमनानंतर तर ‘पत्रा’वर थेट संक्रांतच आली.
टपाल खात्यानेही पत्रांची संख्या ७० टक्के घटल्याची कबुली दिली. तरीसुद्धा ९४ वर्षीय बाळकृष्ण कल्याणकर यांनी जाणीवपूर्वक ‘पत्रसंस्कृती’ जपून ठेवली आहे. शिवाय आपली पत्रे ‘चित्रपत्रे’ बनवून सौंदर्याचा एक वेगळा आयाम पत्रांना जोडला आहे....

पुणेकj बाळकृष्ण कल्याणकर यांनी गेल्या सुमारे ७५ वर्षांत अंदाजे १८ हजार चित्रपत्रे लिहिली आणि पाठवली आहेत. कल्याणकर आजोबा आज ९४ वर्षांचे आहेत. पत्राशिवाय संपर्काचे कुठलेही माध्यम नसणे ते आजच्या सॅटेलाइट फोन काळापर्यंतच्या ‘संपर्कक्रांती’चे जवळपास शतकभराचे ते साक्षीदार आहेत. साधनांची प्रगती कितीही झाली तरी ‘पत्रा’चा जिव्हाळा, आपुलकी इतर कशात जाणवत नसल्याचे त्यांचे प्रांजळ मत आहे.

‘मला पत्र लिहायला खूप आवडते. ही आवड नेमकी कशी, कधी लागली, हे आज सांगता येणार नाही. मी लिहिलेल्या पत्रांमध्ये शुभेच्छापत्रांची संख्या सर्वाधिक आहे, हे नक्की. वाढदिवस, बारसे, परीक्षेतील यश, विदेशगमन (जेव्हा या गोष्टीचे कौतुक होते), लग्न, पुरस्कार, मंगलप्रसंग (वास्तुशांत इत्यादी) अशा निमित्ताने पत्रप्रसंग घडला. आमचा परिवारही खूप मोठा आहे. त्यातील प्रत्येकाशी माझी पत्रमैत्री आहे. अगदी अक्षरओळख असलेल्या पतवंडांनाही मी पत्र लिहितो,’ असे कल्याणकर सांगतात.

कल्याणकरांच्या पत्रलेखनाचे आगळेवेगळेपण म्हणजे त्यांच्या प्रत्येक पत्रावर छोटेसे तरी चित्र असतेच; तेही पत्रातील मजकूर, निमित्ताला साजेसे. अक्षरही सुवाच्य असल्याने त्यांची ही चित्रपत्रे उठून दिसतात. अक्षरांसोबत चित्र असल्याने अधिक आपलेपणा वाटतो. कल्याणकरांनी शालेय जीवनात चित्रकलेच्या परीक्षा दिल्या आहेत.
ते वळण त्यांच्या बोटांत वयाच्या ९४व्या वर्षीही टिकून आहे. शुभेच्छापत्रे अधिक असल्याने फुले, तोरण, कमलाकृती, ध्वज, कलश, मंदिराचा आकार, चौरंग, सनई, चौघडा, बासरी, मोरपीस, स्वस्तिक, रांगोळी अशी चित्रे प्रामुख्याने आहेत. ही चित्रे ते रंगीत पेनाने रेखाटतात.

‘पुण्यात मी १९४०मध्ये आलो. फर्ग्युसन कॉलेजमधून विज्ञान शाखेत पदवी मिळवली आणि लगेच ऑब्झर्व्हेटरीमध्ये इन्स्ट्रुमेंट विभागात नोकरी मिळाली. १९८१मध्ये मी निवृत्त झालो. बहुसंख्य पत्रे मी पुणे मुक्कामीच लिहिली आहेत. अपवाद कॉलेजमध्ये आणि नंतर नोकरीच्या काळात रजा घेऊन, सायकलवरून ज्या ट्रिपा केल्या किंवा कधी काही निमित्ताने बाहेरगावी गेलो, तरच बाहेरून पत्रे लिहिली. सायकलवरून राजस्थानमध्ये गेलो असताना, वडिलांना लिहिलेल्या पत्रांवर तेथील महाल, राजवाडे, हवेल्या यावरील नक्षीदार घुमटांची चित्रे रेखाटली होती’, अशी आठवणही कल्याणकर आजोबा सांगतात.

पत्रावरील चित्र, ही माझी ओळख बनली आहे. आमचे नातेवाईक, मित्रपरिवार या साऱ्यांकडे माझी पत्रे आहेत. पण मी पाठवलेल्या पत्रांची पोच मात्र फारशी कुणी दिली नाही. अर्थात, मला त्याचे दु:ख नाही. कारण कुठल्या अपेक्षेने मी कधीच पत्रे लिहिली नाहीत. पत्राला पोच देणे, हा प्रकार आपल्या मानसिकतेत फारसा नाहीच. मी मात्र प्रत्येक पत्राला आवर्जून पोच देतो. क्वचित प्रसंगी सांत्वनाचे पत्र लिहिण्याचा प्रसंग येतो, तेव्हा चित्र न काढता मी पत्रावर काळ्या रेघा देतो. त्यातूनही भावना पोहोचतात. वाढदिवसाच्या पत्रावर मात्र आवर्जून फुलांचा गुच्छ, निरांजनाची तेवणारी वात, ओवाळणीचे तबक रेखाटले जाते. ठरवून काही काढत नाही, मनात आपोआप जागे होते आणि उमटते... असे ते म्हणतात. आपल्या चित्रपत्रांविषयी कल्याणकर आजोबांच्या भावना अगदी नितळ आणि प्रामाणिक आहेत. ‘मला आवडते म्हणून मी लिहितो. पत्रोत्तराची अपेक्षा ठेवत नाही. सध्या तर कुणाला कशालाच वेळ नसतो. पण पूर्वी जगण्याला निवांतपणा होता, तेव्हाही मी पत्रोत्तराची वाट पाहिली नाही. लिहिताना, चित्र काढताना आपल्याला छान वाटते आहे, आनंद होतोय, एवढेच मला पुरेसे होते,’ असे ते सांगतात.
प्रेमपत्र नाही लिहिले...
कल्याणकर आजोबांनी आजवर हजारो पत्रे लिहिली. तुम्ही कधी प्रेमपत्र लिहिले का, या प्रश्नावर आजोबा गालातल्या गालात मनापासून हसतात. मग नकारार्थी मान हलवतात. बायकोला पत्रे लिहिली का, या प्रश्नावर ‘तिला स्वतंत्र पत्र लिहिण्याची वेळच आली नाही. सुदैवाने आम्ही कायम एकमेकांसोबतच राहिलो. तिचे माहेर अहमदनगरचे, त्यामुळे कधी माहेरी गेली तरी तीन तासांच्या अंतरावर असल्याने पत्र लिहिले नाही. तेव्हा तशी पद्धतही नव्हती. क्वचित तिच्या माहेरी पत्र लिहिलेच, तर ते सासरेबुवांच्या नावाने आणि मायन्याने असायचे. दोनच वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले. तब्बल ६१ वर्षांचे आमचे सहजीवन होते. ती ८८व्या वर्षी
गेली. तिला पत्र मात्र लिहिले नाही कधी. ते राहूनच गेले...
jayashree.bokil@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...