आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About A Teacher In Madhurima By Santosh Musale

ज्ञानरचनावादी (तिची वेगळी वाट)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवनाला सकारात्मक अन् नावीन्यपूर्ण उद्देश गवसला की जगण्याच्या विविध कला आपोआप येत जातात. मुलांच्या माध्यमातून जगण्याच्या कला जोपासणा-या शिक्षिकेची ही कहाणी...
‘शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या माध्यमातून प्रत्येक मुलातील सुप्त गुणांची ओळख, जोपासना, नवनिर्मिती करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच मी शिकवत असलेल्या प्रत्येक मुलात काही ना काही कला आहेत, त्या सर्वांसमोर आणण्यासाठी उपक्रमांसारखे दुसरे माध्यम नाही.’ उपक्रमांमुळे विद्यार्थ्याच्या चेह-यावरील आनंद स्वत:साठी प्रेरणादायी मानून १८ वर्षांपासून कष्ट करणा-या जि. प. प्रा. शा. हिंगळजवाडी, जि. उस्मानाबाद येथील मंजूषा कमलाकर स्वामी‌/ कुरुवलकर यांचे हे उद्गार.

उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथे मंजूषाचा जन्म झाला. वडील शिक्षक. आईने डीएड करूनही घरच्या मंडळींच्या विरोधामुळे संसारात मन रमवलेले. पाच बहिणी व एक भाऊ, अशा परिवारात मंजूषाचे बालपण आनंदात गेले. मात्र आईने मनाशी एक खूणगाठ बांधली होती. ती म्हणजे माझ्या सर्व मुलींना मी स्वत:च्या पायावर शिक्षणाद्वारे उभे करेन. आणि तिने ते करून दाखविले. १९९९ साली शिक्षक उमेश कुरुवलकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. प्रेमळ सासूसासरे, गणेश व पीयूषी या मुलांच्या सहकार्यानेच त्या उपक्रम राबवत आहेत.

उस्मानाबाद-लातूर रस्त्यावर उस्मानाबादपासून १८ कि.मी. अंतरावर १७०० लोकसंख्येच्या हिंगळजवाडी या गावात पहिली ते आठवी शाळा असून त्यात १६४ विद्यार्थी शिकतात. याच ठिकाणी शिक्षणप्रेमी गावकरी व शिक्षक यांच्या सहकार्याने मॅडम नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास साधत आहेत.

- प्रश्नमंजूषा : आठवड्यातून एका ठरावीक वारी बाह्यफलकावर पाच प्रश्न देऊन विद्यार्थ्यांनी मधल्या सुटीत ते प्रश्न आपापल्या वहीत लिहून घ्यायचे. या प्रश्नांत सर्व विषयांचा समावेश असतो. शिष्यवृत्ती अभ्यासक्रमानुरूप प्रश्नांची रचना असते. स्वरूप वस्तुनिष्ठ असले तरी त्याद्वारे अनुलेखनातून शुद्धलेखनाची सवय लागते. एका पेटीत सर्व उत्तरे जमा केली जातात. त्यातून लकी ड्रॉ काढून बक्षीस िदले जाते.
- शब्द बँक : सामान्यपणे मुलांत इंग्रजी विषयाची प्रचंड भीती असते. ती दूर करण्यासाठी पाचवी ते आठवीतील मुलांसाठी शब्द बँक या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी दररोज पाच शब्द पाठ करायचे व ते लिहून एका पेटीत टाकायचे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वत:ची पेटी आहे. तीस दिवसांनंतर जो जास्त शब्द पाठ करेल तो िवजेता. याद्वारे मुलांत इंग्रजी विषयाची आवड निर्माण झाली व चुरशीने मुले शब्द पाठ करायला लागली. पहिली ते चौथीच्या मुलांनासुद्धा याचा फायदा होतो.
- भेटकार्डातून पत्रमैत्री : या उपक्रमाद्वारे मुलांची कल्पकता वापरून पोस्टकार्डवर भेटकार्ड तयार करण्यात येते. याद्वारे पोस्टकार्ड, पाकीट, आंतरदेशीय कार्डांची मुलांना ओळख झाली. ज्या मुलांनी पोस्टकार्ड पाहिलेच नाही, अशांना ते दाखवून त्यावर सचित्र भेटाकर्ड तयार करून घेतले जाते. विद्यार्थी नववर्ष, उत्सव, सण, यानिमित्त स्वरचित कविता, चारोळी, पर्यावरण, स्त्री भूणहत्या याविषयी संदेश लिहू लागले. २०१० च्या ‘जीवन शिक्षण’ मासिकात याला प्रसिद्धी मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद वाढला.
- पर्यावरणस्नेही उपक्रम : पर्यावरणास पूरक असे सण याअंतर्गत साजरे केले जातात. गणेशोत्सव काळात मातीच्या मूर्ती करणे, विसर्जन पाण्यात न करणे, सणानिमित्त अन्नाची नासाडी न करणे याचा यात समावेश केला जातो.
- माझी कविता : २००९पासून माझी कविता या उपकमांतर्गत ग्रामीण भागातील मुलांना लिहिते करण्याचा प्रयत्न मॅडमनी केला. यात त्यांना खूप यश आले. मुले लिहिती झाली. विविध विषयांवर मुले आपापल्या भावना कागदावर कवितेच्या माध्यमातून व्यक्त करू लागली. हस्तलिखित कविता शिरीष पै, विठ्ठल वाघ, प्रवीण दवणे यांच्याकडे पाठवल्या. या सर्वांनी मुलांचे कौतुक तर केलेच, त्यासोबतच आवश्यक त्या सुधारणांसह शिरीष पै यांनी कवितासंग्रहास प्रस्तावना लिहून पाठवली. या संग्रहात निसर्ग, आई, कौटुंबिक, शालेय जीवन यासह अन्य विषयांवरील कविता आहेत.
- माझे वाचन : शाळाशाळांत शासनस्तरावरून शालेय ग्रंथालयासाठी अनुदान दिले जाते, मात्र या ग्रंथालयांबाबत न लिहिलेलेच बरे. पुस्तके धूळ खात पडलेली असतात, काही ठिकाणी रद्दी म्हणून वापर असतो. मात्र या ठिकाणी मॅडमनी माझे वाचन या उपक्रमांत मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून बक्षीस योजना सुरू केली. आठवड्याला मुलांनी एक पुस्तक घरी घेऊन जायचे, पुस्तकातील महत्त्वाचे परिच्छेद, लेखक, पुस्तकाचे नाव, आवडलेल्या ओळी एका ग्रंथालय वहीत स्वत:कडे नोंदवायच्या. नंतर या वह्या तपासून मुलांना अधिकचे मार्गदर्शन गुरुजन करतात. यामुळे मुलांत वाचनाची आवड निर्माण झाली व मुले मोठमोठ्या साहित्यकांची पुस्तके सहज वाचू लागली.
- सत्कार्य नोंद रजिस्टर : या उपक्रमात विद्यार्थ्यांना जे काम चांगले वाटेल ते त्यांनी मनापासून करायचे. परोपकारी कामे, ज्यांना मदत पाहिजे अशा ग्रामस्थांना, मित्रांना मदत करायची, या सर्वांची नोंद रजिस्टरमध्ये करायची. शाळेतील मुलांसमोर अशी कामे करणा-या मुलांना शाबासकी देऊन प्रोत्साहित करायचे. यामुळे बाकीची मुलेसुद्धा चांगले काम मोठ्या हिरिरीने करताना दिसतात.
- स्वप्रश्ननिर्मिती : ज्ञानरचनावादी विद्यार्थी तयार करताना शिक्षकाची भूमिका ही सुलभकाची आहे. विद्यार्थ्यांनी स्वत: ज्ञानाची निर्मिती करणे अपेक्षित आहे. यासाठी येथे कुठल्याही विषयाचा पाठ शिकविल्यानंतर मुले स्वत: प्रश्न तयार करतात व स्वत:च उत्तरे लिहितात. यामुळे मुलांत प्रश्ननिर्मिती कौशल्य विकसन झाले आहे. जे प्रश्न चुकले असतील त्यांना मॅडम मार्गदर्शन करतात.
- प्रश्न आमचे उत्तर तुमचे : चौथी, सातवीतील मुलांचा शिष्यवृत्तीचा अभ्यास व्हावा, यासाठी आपापसात प्रश्न विचारावयाचे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. वर्गातील मुले पाठ शिकविल्यानंतर चर्चा करून एकमेकांना प्रश्न विचारतात.
- माझे लेखन : मुलांना विविध विषय देऊन त्यावर त्यांना लिहायला लावणे व नंतर ते वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाला ‘दिव्य मराठी’ने मोलाची साथ दिली. मुलांच्या भावविश्वातील संकल्पना ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध झाल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढला.
santoshmusle1515@gmail.com