आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माइंड युवर व्हेइकल लँग्वेज !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातामध्ये कोणा एकाची चूक नसते. फक्त त्या चुकांची टक्केवारी आपल्याकडे कशी कमी असेल याचा आपण विचार केला पाहिजे.
आज मी तुमच्याशी खिडकीशेजारी बोलायला बसलीये! खिडकी ही प्रचंड आवडती जागा आहे माझी! प्र… चं… ड! पण खिडकी जरी मला उत्फुल्ल वगैरे करत असली तरीही काही तरी मिसिंग वाटतंय मला आज. मी शोधतेय बरं का, पण सापडतच नाहीये. तुम्हाला माहित्येय, उन्हाळा सुरू असताना माझ्या खिडकीत पाऊस बरसतोय. या अशा पावसाला काय म्हणतात माहित्येय? अवकाळी पाऊस! वेळ-काळ सांगून येत नाही हा पाऊस. असा अचानक बरसू लागतो. मी एकदा गावाला गेले होते. तिकडे हा असाच अवकाळी पाऊस पडला. म्हणजे ऊन होतंच आणि तरीही पाऊस पडत होता. किती विचित्र अवस्था आहे ना ही. तेव्हा एक लहान मुलगा मला म्हणाला, “ताई, नागडा पाऊस पडायलाय बघ…” नागडा पाऊस! किती इंटरेस्टिंग कल्पना आहे नाई. कसलंही आवरण स्वतःवर न ठेवता बरसतो, निरागसपणे, तो म्हणजे नागडा पाऊस! आपणही असंच बरसलं पाहिजे मनावर कसलंच आवरण न ठेवता! अवकाळी पाऊस हा असा निरनिराळी रूपं घेतो व्यक्तिपरत्वे. आणि म्हणूनच आजचा पाऊस अस्वस्थ करतोय मला. तो जन्मोजन्मीचं दुःख घेऊन बरसतोय असं वाटतंय मला. नक्की पाऊस बरसतोय की मी बरसतेय हे दुःखाचं ओझं घेऊन, हेच कळेनासं झालंय मला. कदाचित म्हणूनच मला त्रास होतोय. अर्थात, प्रत्येक गोष्टीला काही शास्त्रीय कारणं नसतात, तरीही मन मात्र शोधयात्रा कायम ठेवतं, त्याला सतत उत्तरं हवी असतात.

प्रश्न-उत्तरं यावरून एक आठवलं, सध्या मी ट्रॅफिकमधून गाडी चालवायला शिकलीये. खरं तर, ‘शिकलीये’ हा शब्दप्रयोग कदाचित इथे योग्य नसावा. कारण मी गाडी हातात घेतली आणि चालवू लागले. तसं म्हटलं तर शिकण्याची प्रक्रियाच नव्हती. पण असं कधीच असत नाही, नाई! म्हणजे आपण कधीच पूर्णपणे शिकलेलो नसतोच कुठली गोष्ट. आयुष्य ही एक्सपेरिमेंट्सनी ठासून भरलेली गोष्ट आहे. आणि म्हणूनच प्रत्येक अनुभवातून, प्रत्येक गोष्टीतून आपण सतत शिकत असतो. ट्रॅफिक, सिग्नल, ट्रॅफिक पोलिस, स्पीड ब्रेकर्स, खड्डे, सरळसाधा रस्ता, चढ-उतार, वाहनांसाठी असणारी पोस्टर्स, आपल्या बरोबरीने गाडी चालवणारे आपले मित्र, वाढणारा अॅक्सलरेटर, डिक्की, चावी सगळं सगळं काही इतकं इंटरेस्टिंग वाटतंय मला की विचारू नका! गाडी हे आयुष्याचं प्रतीक वाटायला लागलीये मला. हे रस्ते खुणावू लागले आहेत मला. मोहात पाडताहेत हे रस्ते, अन् तेच सावरतायतदेखील! मी काहीच करत नाहीये असं वाटतंय; पण सारं काही तर मीच करतेय. परवा मी माझ्या एका मित्राच्या गाडीच्या मागे बसले होते. तो प्रचंड वेगात गाडी चालवत होता. या त्याच्याबरोबरच्या प्रवासात आजूबाजूला पाहताना मला असं वाटलं की, माणसाची जशी आपली एक बॉडी लँग्वेज असते आणि त्यातून त्याचं व्यक्तिमत्त्व आपल्याला दिसत असतं. तसंच आमच्या पिढीची एक व्हेइकल लँग्वेज तयार झालीये. वेगात गाडी चालवण्यातून आम्ही आमच्यातली अस्वस्थता, फ्रस्ट्रेशनच दाखवत असतो जणू! आम्हाला वेगाचं प्रचंड आकर्षण आहे. आणि म्हणूनच आमचा प्रत्येक हॉर्न म्हणजे जणू काही लेट मार्कचा शेरा असतो आमच्या बॉसला. आणि तोच व्यक्ततो आमच्यातली अशांतता सतत! समोरच्या गाडीला पुढे काही तरी अडचण असेल, हे मागच्या हॉर्नच्या गावीदेखील नसतं. मला काय वाटतं माहीत्येय, आपण जितकी शांत गाडी चालवू, जितका हॉर्नचा वापर कमी करू तितके आपण अधिक समंजस, संयत बनू लागतो! आपलं अख्खं असणं आपल्या गाडी चालवण्यातून दिसत असतं. एकदा का आपण ड्रायव्हर झालो, जगण्याची किल्ली आपल्या हातात पडली की साऱ्या जबाबदाऱ्या कशा आपल्याला पेलाव्या लागतात आणि त्यातूनच आपण कुठल्या वाटा शोधू, कुठल्या वाटांची आस धरू, वळणावरून किती गांभीर्याने जाऊ, मागच्या माणसाला आपल्या दिशेचा अंदाज देऊ की न देता त्याला हुलकावणी देऊ अन् तरीही त्याची काळजी घेऊ, वनवे असला तरी चुकून किंवा मुद्दामून विरुद्ध दिशेने येणाऱ्याची आपण काळजी घेऊ की आपण निव्वळ आपल्या वाटेचाच विचार करू, स्पीड ब्रेकर्स आल्यावर आपण आपला स्पीड कमी करून आपल्या रस्त्याचा विचार करू की भरवेगात वाहत जाऊ? आपली गाडी आपण चुकीच्या ठिकाणी पार्क केली तर आपण ती बाहेर काढू शकू की अडकून बसू त्या ठिकाणी? या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या वाटताहेत मला.

परवा मी फोर व्हीलरमधून उतरले आणि रस्ता क्रॉस करू लागले तर वनवे असूनही विरुद्ध दिशेने येणाऱ्या माणसाने जोरात येऊन मला धडक दिली. मला प्रचंड वेदना झाल्या. आणि त्या माझ्या बाबांच्या वयाएवढ्या असणाऱ्या माणसाला मी रागात म्हणाले, “तुम्हाला काही अक्कल…” आणि ब्ला ब्ला ब्ला... काही वेळाने माझ्या वेदना कमी झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं होतं की, आपण असा वयाचा अनादर नको होता करायला, पण तेव्हा मी त्या काकांना सॉरी म्हणू शकणार नव्हते. मला खूप वाईट वाटलं. रस्ता आहे, आपण त्यावरून चालतो आहोत, आपण गाडी कितीही उत्तम चालवत असलो तरी समोरचा कसा चालवतो, हेदेखील महत्त्वाचं असतं. शेवटी रस्ता एकच असतो, पण प्रत्येक चालकाचा प्रवास वेगळा असतो, त्याचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आपण आपल्या जागी कितीही योग्य असलो तरीही अपघात होतातच. त्यामध्ये कोणा एकाची चूक असत नाही. चूक तर दोन्ही बाजूंनी असते. फक्त त्या चुकांची टक्केवारी आपल्याकडे कशी कमी असेल याचा आपण विचार केला पाहिजे. कारण धडक तर होणारच आहे. पण आपल्याला आणि समोरच्यालाही कमीत कमी जखमा व्हाव्यात इतकाच आपण विचार केला पाहिजे. आणि आपली वाट आपण फुलवतं गेलं पाहिजे बेभानपणे अन् तरीही भान ठेवलं पाहिजे खड्ड्यांचं, स्पीडब्रेकर्सचं! सजगपणे नियंत्रणात ठेवलं पाहिजे अॅक्सलरेटरला. तर मी काय म्हणत होते, अहो, अवकाळी पाऊस पडतोय पण तो आता त्या लहानग्याच्या नजरेतला नागडा पाऊस वाटतोय मला. चला, मनावर घेतलेली सगळी आवरणं फेकून देऊया. आणि नागडे होऊया. मनाचा तळ शोधूया.

मी गाडी काढतेय पार्किंगमधून… तुम्ही येताय माझ्यासोबत? हां, पण माइंड युवर व्हेइकल लँग्वेज!

dancershrutu@gmail.com