आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोलकर 1 वर्ष : अनिसची धार आणकी तीव्र होत आहे !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये निर्माण झालेल्या पोकळीला आता एक वर्ष पूर्ण होईल. अर्थात, ही पोकळी भरून काढायला दाभोलकरांच्या जागी तितकाच समर्थ पर्याय उभा करणे अंनिसला कधीच जमणार नाही. पण दाभोलकरांच्याच विचारधारेनुसार महाराष्ट्र अंनिसचे कार्य पुढे नेणे कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षभरात साधले आहे आणि साधत आहेत. हादेखील दाभोलकरांचाच ठेवा म्हणता येईल.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून हा अंनिसच्या कार्यकर्त्यांना खरे तर खूप मोठा धक्का होता. गेली 20-25 वर्षे एका सामाजिक चळवळीचे, संघटनेचे नेतृत्व करणार्‍या नेत्याच्या जाण्याने संघटनेचे वैयक्तिक नुकसान तर झालेच; पण एक चांगला, भविष्यदृष्टी असणारा, समाजभान असणारा, विवेकबुद्धी असणारा, तर्कशुद्ध विचार करणारा वक्ता, नेता, कार्यकर्ता महाराष्ट्राने गमावला. तरीदेखील दाभोलकरांची तर्कसंगत विचारसरणी, त्यांनी संघटनेची केलेली विकेंद्रित पद्धतीची रचना आणि प्रत्येक शाखेसाठी राबविलेले स्वायत्ततेचे धोरण यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दाभोलकरांच्या जाण्यानंतरही त्यांच्या विचारधारेलाच कायम जपत कुठलेही पूर्वनियोजन रद्द न करता आपले काम आजपर्यंत चालूच ठेवले आहे. हे वास्तविक दाभोलकरांचेच यश आहे. मात्र ते अव्याहत टिकविणे आमच्यासाठी सोपे नव्हते. म्हणता म्हणता दाभोलकरांच्या जाण्याला एक वर्ष पूर्ण होते आहे. पण या एक वर्षात त्यांच्या जाण्यानंतरही सकारात्मक ऊर्जेने काम करीत त्यांचा उद्देश सफल करण्याचा आम्ही नेटाने प्रयत्न केला आणि अजूनही करतो आहोत.

साधारणपणे 2009 ला महाराष्ट्र अंनिसला 20 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आम्ही दशकाचे नियोजन केले होते. त्यात नरबळीचे प्रकार, अंगात येणे, महिलांचे अंधश्रद्धेतून होणारे शोषण, पर्यावरणाचा ºहास करणार्‍या प्रथा, परंपरा यांना फाटा देण्यासाठीच्या उपक्रमांचा अंतर्भाव केला गेला होता. त्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे, मानसिक आरोग्यक्षेत्रात काम करणे. 2020 मध्ये पहिल्या पाच आजारांमध्ये नैराश्य हा आजार असणार असल्याचे एका जागतिक संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. निराश झाल्यानंतर व्यसन वा अंधश्रद्धांच्या आहारी जाणे, असे प्रकार घडतात. यासाठी एक प्रबोधनपर मोहीम आखण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. मानसोपचार तज्ज्ञांची संख्या भारतात कमी आहे. ‘मानसमित्र’ हा एक उपक्रम त्यामुळे आम्ही सुरू केला. चाळीसगाव येथे हा उपक्रम सध्या सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात असलेल्या या चाळीसगावमध्ये दामोशीबाबाचा एक दर्गा आहे; जिथे करणी केली, अंगात आलं म्हणून मुलींना, माणसांना कुटुंब आणतं, तिथे उपचार करण्याच्या नावाखाली शोषण केलं जातं. मराठवाडा व खान्देशातून मोठ्या प्रमाणात तिथे लोक येतात. महिनाभरासाठी रुग्णाला नातेवाईक तिथे टाकून जातात. मात्र सगळे अंधश्रद्धेच्या अमलाखालील शोषण करणारे उपचार तिथे चालतात. तिथे आमचे कार्यकर्ते सध्या मानसमित्र म्हणून प्रबोधनाचे काम करत आहेत.

‘जात’ हे आमच्या नियोजनातील दुसरे क्षेत्र आहे. अलीकडेच आम्ही ‘जात पंचायतीला मूठमाती अभियान’ सुरू केले. जात ही एक अंधश्रद्धाच आहे. जातीला कुठलाही भौतिक आधार नाही. जातीच्या आधारावर शोषण केले जाते. जातीच्या प्रभावाखाली अनेक कौटुंबिक, सामाजिक निर्णय होत असतात. ज्यात भयच अधिक असते. भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी जात हे समाजवास्तवच निपटून काढण्याचा प्रयत्न करणे, हे आमचे अत्यंत अवघड असे उद्दिष्ट आहे. त्याकरिता महात्मा फुलेंच्या विचारसरणीनुसार आंतरजातीय विवाहासारखे उपक्रम आम्ही राबवतो आहोत. ज्यात रक्तचाचणी, एड्स चाचणीला प्राधान्य देऊन जात, ग्रहतारे हद्दपार करण्याचा विचार आम्ही समाजामध्ये रुजवतो आहोत. अशा प्रकारच्या शास्त्रोक्त आणि आंतरजातीय विवाहासाठी सत्यशोधकी विवाह पद्धत आम्ही सुरू केली. अर्थात, कुठलीही व्यवस्था एकाएकी उखडून काढता येत नाही. बरखास्त करणे शक्य न झाल्यास निदान काळानुसार जात पंचायतींनी आपल्या नियमांमध्ये बदल करावेत, विचार बदलावेत, याकरिता केलेल्या प्रयत्नांमध्ये आज आम्हाला बव्हंशी यश येते आहे. जात पंचायतीने बहिष्कृत केलेल्यांना कोर्टात दाद मागता येऊ शकते, असे सांगणारे परिपत्रक सरकारने काढले ज्याबद्दल प्रबोधन करणे हे आमचे तिसरे कार्यक्षेत्र.

महाराष्ट्रात किमान शंभर वर्षांपासून चालणार्‍या यात्रांपैकी मढीची यात्रा सर्वोच्च मानली जाते. या यात्रेत यंदा जात पंचायती बसल्याच नाहीत. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी गावातील सर्वोच्च मानली जाणारी जात पंचायत यात्रेत न बसणे यामागे महाराष्ट्र अंनिसचे प्रयत्न होते. हा या यात्रेत दिसून आलेला मोठा बदल होता. असाच बदल नांदेड जिल्ह्यातील माळेगावमध्ये बघावयास मिळाला. तिथेही यात्रेमध्ये जात पंचायत बसली नाही, की तिने कुठले निर्णय आपल्या नेहमीच्या पद्धतीने घेतले नाहीत.

हे बदल अर्थात एकाएकी आणि एका वर्षात झालेले नाहीत. अंनिस आणि समाजाचा परस्पर संवाद, विवेकाने जगण्याची समाजातल्या सगळ्या घटकांस उमजत जाणारी गरज, अशा अनेक बाबी यामागे आहेत. संविधान जागृतीसारखा व्यापक उपक्रम त्यामुळेच आम्ही हाती घेतला आहे. आज भारतीय संविधानाविषयीची माहिती समाजातील अशिक्षितच काय पण सुशिक्षितांनाही धडपणे झालेली नाही. अशा वेळी माणूस म्हणून जगण्याचा भारतीय नागरिकाला संविधानाने दिलेला हक्क नेमका काय आहे, जगण्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे म्हणजे काय, हे सगळे संविधानामार्फत सांगत समाजातील तळागाळापर्यंत प्रबोधन करायचे, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. थोडक्यात, जात पंचायतींमध्ये बदल होणे, समाजातील उपेक्षित, अंधश्रद्धांमध्ये पिचलेल्या घटकांनी आवाज उठवणे हे डॉ. नरेंद्र दाभोलकर असतानाही घडत होते आणि आताही घडत आहे. अधोगतीचा त्यामुळे प्रश्नच उद्भवत नाही. सध्या आम्ही ज्याप्रकारे या सगळ्या समस्यांवर काम करतो आहोत, त्यांचे निराकरण या घडीला फारसे लक्षात येत नसले तरी त्यांचे दीर्घकालीन परिणाम मात्र अत्यंत महत्त्वाचे ठरतील, समाजात पारदर्शी विचारसरणी रुजवणारे ठरतील, हा आमचा विश्वास आहे; जो दाभोलकरांनीच रुजवला आहे, ज्याला कदापि अंत नाही.

(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष आहेत.)
avinashpatilmans@gmail.com