आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Ashok Saraf On Occasion Of His Birthday

अशोकपर्व! (रसिक विशेष)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विकिपीडियावर नोंदलेली जन्मतारीख खरी मानली तर आणखी दोन वर्षांनी अशोक सराफ वयाच्या सत्तरीत प्रवेश करतील. पण मराठी सिने-नाट्यसृष्टीत ‘अशोकमामा’ या टोपणनावाने सर्वपरिचित असलेल्या सराफांचं वय रसिकांनी कधी मोजलंच नाही. किंवा असंही म्हणता येईल, सराफांनी वैविध्यपूर्ण भूमिकांचा जो सातत्यपूर्ण धूमधडाका लावला, त्यामुळे त्यांच्या वयाकडे कुणाचं फारसं लक्षच गेलं नाही.
गेली तब्बल चाळीसएक वर्षं अशोक सराफ प्रायोगिक, व्यावसायिक मराठी नाटकं, मुख्य प्रवाहातले-प्रवाहाबाहेरचे हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिकांद्वारे प्रेक्षकांचं रंजन करताहेत. नुकतंच अद्वैत दादरकर दिग्दर्शित ‘लगीनघाई’ या नाटकाद्वारे त्यांचं रंगभूमीवर पुनरागमन झालं आहे. हे निमित्त साधून अशोक सराफ नावाचा प्रतिभावंत समजून घेण्याचा हा प्रयत्न...

अशाेकमामा वेळेच्या बाबतीत अगदी पक्के नि अाग्रही असतात, असे अद्वैतने सांगून ठेवल्याने आपण ठाण्यात गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे पंधरा मिनिटे अाधीच पाेहाेचतो. साेमवार खरं तर मुंबईकर-ठाणेकरांच्या दृष्टीने वर्किंग डे. पण खास अशाेक सराफांना म्हणून पाहायला अालेली मंडळी नाटकाच्या एक तास अाधीपासूनच नाट्यगृहाच्या अावारात तिकीट काढून प्रतीक्षेत उभी दिसते. ‘लगीनघाई’ हे अद्वैत दादरकर या तरुण दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेले ताज्या दमाचे नाटक. या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी अशाेक सराफ रंगभूमीवर काम करताना दिसणार, याचं मोठं अप्रूप त्या रसिक मंडळींच्या चेहऱ्यावर झळकत असतं...

अशाेक सराफांची वाट पाहत असताना आपल्याला त्यांच्या चित्रपटांचा काळ अाठवतो. ग्रामीण, त्याच त्याच पठडीतले वा तमाशापटांमधून पाटील-देशमुखांमध्ये निर्माण हाेणारे विनाेद तेव्हा हळूहळू मागे पडत चालले हाेते. त्यानंतर दादा काेंडके यांनी लाेकनाट्याचा अाधार घेत द्वैअर्थी विनाेद चित्रपटात अाणला. पण याच दादांबराेबर काम करताना विनाेदांना लिंगभावाभिव्यक्तीपुरते मर्यादित न ठेवता पलीकडे न्यायचा प्रयत्न करत अशाेक सराफ यांनी विनाेदाला शाब्दिक खेळाबराेबर मुक्त शारीरभाषेचीही जाेड दिली.

दहा मिनिटे उलटली न उलटली ताेच अापण अालाे अाहाेत, याची कुणाला जाणीवही हाेऊ न देता अगदी शांतपणे अशाेक सराफ येतात. अाेळख करून दिल्यानंतर डाेक्यावर हात ठेवत, हलकेच डोकं खाजवत, दुसरा हात कमरेवर ठेवत ‘अरे, काय बाेलायचं मी अाता माझ्याचविषयी अाणखी? नि कुठल्या अाठवणी सांगायच्या...? आता ताे मेकअपवाला माझ्या तोंडात बाेटे घालील, मग बाेलायचं काय?’ असे म्हणत कपाळावर अाठ्या पाडल्यासारखे करतात.
आपला चेहरा संभ्रमात पडल्याची खात्री करत ‘कुठून अालाय तुम्ही’ विचारतात. आपण उत्तरतो, ‘दादर’...
‘चला, मग बाेलावेच लागेल...’ म्हणत अगदी दिलखुलास हसतात. ‘चला, गप्पा मारूया...’ म्हणत सराफांनी इथेसुद्धा अचूक टायमिंग साधत फिरकी घेतल्याचे लक्षात येऊन आपल्याला हसू फुटतं. फिरकी घेतानाची त्यांची ती परिचित देहबाेली पाहताना मन पुन:पुन्हा सत्तर ते नव्वदच्या दशकातल्या त्यांच्या चित्रपटांच्या काळात जात राहतं...

मराठी चित्रपटांसाठी ताे संघर्षाचा काळ हाेता. अशा वेळी विनोदासाठी त्या-त्या व्यक्तिरेखेच्या शारीरभाषेचा वापर करत मराठी चित्रपटाला तारण्याचा प्रयत्न अशाेक सराफ यांनी केला हाेता. या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे, हा विनाेद मध्यमवर्गीय संवेदनांशी नातं सांगणारा हाेता. म्हणजेच, दादा कोंडके यांच्याबराेबर काम करताना दादांच्या मुक्त लाेकनाट्यशैलीशी जुळवून घेत अशाेक सराफ यांनी अापल्या शैलीचे वेगळेपणही ताकदीने राखले हाेते.

अर्थातच दादांच्या चित्रपटांचा विषय गप्पांच्या ओघात निघणे अपरिहार्य होते. ‘दादांचा काळच वेगळा हाेता. त्यांचा विनाेद लाेकनाट्याच्या धर्तीवरचा. मी प्रायाेगिक-व्यावसायिक रंगभूमीच्या मांडवातून चित्रपटात अालेलाे. माझी शैली कायिक-वाचिक, एकंदर अभिनयासाठी अापला चेहरा, डाेळे, अापले शरीर वापरणारी. त्यामुळे त्यांच्याबराेबर चित्रपट करणे म्हणजे एक अाव्हानच हाेते.’ अशोक सराफ प्रांजळपणे आपलं म्हणणं मांडत असतात. तेव्हा आपल्याला त्यांच्या डोळ्यांत दादांबद्दलचा आदरभाव सहज झळकताना दिसतो...

दादांनंतर अशाेक सराफ प्रामुख्याने चमकले ते लक्ष्मीकांत बेर्डे, महेश काेठारे, सचिन पिळगावकर आदींबराेबर. ‘धूमधडाका’मधील अशाेकमामांची ‘हॅहॅ...हूहू...हिहि’ ही बेरकी म्हाताऱ्याची खाेकण्याची स्टाइल त्या काळात कित्येकांनी उचलली होती. ‘एक डाव भुताचा’ चित्रपटातील भूत रंगवताना डाेळे गर्रकन फिरवणे, अभिनिवेश अशा अभिनयमुद्रांच्या वैविध्यातून त्यांनी किती तरी पात्रे चित्रपटांमध्ये रंगवली हाेती. पण खरं तर अशाेक सराफांना तेव्हाही अापल्या मर्यादा ठाऊक हाेत्या.

रवींद्र महाजनींसारखा देखणा चेहरा त्यांना मिळाला नव्हता. गंभीर भूमिकांना न्याय देणारा ताे काळ नव्हता. असे असताना भूमिकेच्या अाेघात येणारा विनाेद सहजपणे करत अशाेक सराफांनी प्रत्येक नव्या चित्रपटात ते-ते पात्र जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता. एक- दोन नव्हे, तर तब्बल ४० ते ४५ वर्षांचा काळ त्यांनी अशा वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्यात घालवलेला. मात्र, अाज हा काळ त्यांना अलिप्तपणे पाहावासा वाटताे. अशाेकमामा स्वत:पेक्षाही अापल्या सहकलाकारांच्या कामावर बाेलणे अधिक पसंत करतात. स्वत:च्या अाठवणींमध्ये ते फारसे रमत नाहीत...

एका क्षणी गप्पा सुरू असताना मेकअपमन अशाेक सराफांना थाेडा पाॅज घ्यायला सांगतात. संधी सोडतील ते अशोकमामा कसले? ते म्हणाले, ‘असे पाॅज घ्यायला सांगत चेहरा इकडे वळव, असा कर, तसा कर सांगतात, तसा अाजचा विनाेद झाला अाहे. चला अाता काॅमेडी करूया, घ्या पाेज... असे पाेज घेऊन विनाेद करणे एखादे वेळेस ठीक; पण भूमिकेच्या गरजेचे काय? कथानकाचे काय?’

भुवया किंचित उंचावत, अावाज थाेडा खालच्या पट्टीत आणत, अशाेक सराफ एकदम असा प्रश्न करत आपल्याला खिंडीत गाठतात. मग माझ्या उत्तराची वाट न पाहता पुढे म्हणतात, ‘विनाेदाला गांभीर्याने घेणारे अाता फारसे कुणी राहिले नाही, अभिनय करताना...’
असे म्हणताना त्यांचा चेहरा जरा गंभीर झालेला दिसतो... पण एरवी पोट धरून हसायला लावणारे अशाेक सराफ गंभीरही हाेतात, हे त्यांनी चित्रपटांमधूनही अनेकदा दाखवून दिले हाेतेच की. ‘अापली माणसं’सारखा चित्रपट मी विनाेदी नट म्हणून इमेज पक्की असतानाही केला हाेता. याला कारण भूमिकेची गरज. नट म्हणून माझी गरज. अभिनय अभिनय असताे, शेवटी. केवळ हसवायचं म्हणून हसवता येत नाही, तसं रडवताही येत नाही. ‘अापली माणसं’ हलवून साेडणारा चित्रपट हाेता. एक हतबल बाप मला रंगवायचा हाेता. त्या भूमिकेची संवेदनशीलता मला खाेलवर पटली, मी ती केली.’
‘आपली माणसं’ची आठवण चाळवली जात असताना, सराफांच्या भस्म, चौकट राजा, वजीर, आत्मविश्वास
आदी चित्रपटांतल्या इतरही गंभीर भूमिका आपल्या नजरेपुढे तरळून जातात.
‘भूमिकांची गरज ओळखून विनाेद केला नसता तर कदाचित इथवर अालाे नसताे. म्हणूनच विविधांगी भूमिका करताना सहज हाेणारा विनाेद महत्त्वाचा असताे. नि तितक्याच संवेदनशीलतेने गंभीर अभिनय करताना भूमिकेची तीव्रता लक्षात घ्यावी लागते. अाजचा विनाेद तसा हाेताना दिसत नाही.’ अशाेकमामा मुद्दा पूर्ण करतात, तेव्हा तो आपल्यालाही पटलेला असतो...

इतक्या वर्षांनी चित्रपट असो वा रंगभूमी; कमबॅक करणे, प्रेक्षकांनी स्वीकारणे, हे प्रत्येक नटासाठी मोठे आव्हान असते. त्यात अशाेक सराफ कधी कुठल्या गटात फारसे मिसळले नाहीत. अकृत्रिम व शिष्टपणाचा न वाटणारा माेजकेपणा अशाेक सराफांच्या बाेलण्यात असताे. पण तरीही त्यांचे वेळोवेळी कमबॅक झाले, ते मुख्यत: कार्यशैलीतील लवचिकतेमुळे. ‘मी काम हीच एकमेव अाठवण ठेवताे. अापल्याला काम करायचे अाहे नि ते कुठल्या काळात करताे अाहाेत, इतके फक्त लक्षात ठेवायचे. मी अशाेक सराफ म्हणून पडद्यावर जाणवण्यापेक्षा, माझी भूमिका लक्षात राहावी, असा माझा अाग्रह असताे. मी ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘अनधिकृत’, ‘सारखं छातीत दुखतंय’ ही नाटके याच जाणिवेतून केलीत.

‘प्राइम टाइम सक्तीचा करतंय सरकार, चांगलंच अाहे. पण लाेकांनी यायला पाहिजे. अडीचशे रुपये तिकीट काढून मराठी चित्रपट प्राइम टाइममध्ये बघायला मराठी माणूस येईल का हाे?’ असं विचारताना त्यांच्या चेहऱ्यावर मात्र एक अाशाही जाणवते की, प्रेक्षक येतील, त्यांनी यायलाच हवे.

‘अाता तुम्ही मला इतके बाेलायला लावलेत, अजून नाटकात दाेन तास मला माझा अावाज टिकवायचा अाहे...’ असं मिश्कीलपणे म्हणत पुन्हा एकदा अशाेक सराफांनी फिरकी घेतली आणि ‘लगीनघाई’तल्या एंट्रीसाठी झरझर पुढे सरसावले...

नाटक तसं हलकफुलकं. प्रसंगाच्या अाेघात विनाेदाची जागा घेणारं. रंगमंचावरचा त्यांचा तो ऊर्जाप्रवाही वावर पाहून रंगभूमीवरील अशाेक सराफ नि गतकाळाकडे तटस्थपणे पाहणारे अशोक सराफ यात कुठलीही संगती लागत नव्हती आणि दुसरीकडे अशोक सराफ नावाची ही जादू गडकरी रंगायतनमध्ये आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला मंत्रमुग्ध करत होती...

dahalepriyanka28@gmail.com