आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमारा बजाज (ब्रँडबाजा)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकाच औद्योगिक घराण्यातील दोघा-दोघा व्यक्तींना संसद सदस्य बनता यावं, दोघा-दोघा व्यक्तींना पद्म पुरस्कार लाभावेत, हे फारच अपवादानं घडलं. पण तसं घडलं, बजाज घराण्याच्या बाबतीत.

जमनालाल बजाज हे बजाज उद्योगसमूहाचे संस्थापक. त्यांच्या जन्माचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव पार पडल्यालाही आता पाच वर्षं झाली. १८८४चा त्यांचा जन्म. वयाच्या ४२व्या वर्षी त्यांनी उद्योगात पाऊल रोवलं, ते एक पोलाद कारखाना आणि साखर कारखाना विकत घेऊन. ते वर्ष होतं १९२६.

१९४२मध्ये जमनालालजी गेले. मुलं लहान असल्यानं त्यांच्या बंधूंनी व्यवसायाची धुरा सांभाळली, १९४५मध्ये. ‘बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड’ या नावानं त्यांनी कंपनी स्थापन करत दुचाकी-तिचाकींची आयात सुरू केली. १९५४मध्ये कमलनयन बजाज केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून भारतात आले. त्यांनी काकांकडून व्यवसायाची धुरा स्वीकारली. जगभरच्या उद्योगांमधला पहिल्या पन्नासात गणला जाणारा एक सर्वाधिक विश्वासार्ह ब्रँड म्हणून बजाजचं नाव पुढल्या काळात झालं, त्याचे खरे शिल्पकार होते, कमलनयनजी!

जानकीदेवी बजाज या जमनालाल बजाज यांच्या पत्नी, कमलनयनजींच्या मातोश्री. बजाज उद्योगसमूहानं कमावलेल्या पैशातील मोठा वाटा सामाजिक उपक्रमांसाठी खर्च केला जातो, त्यामागची प्रेरणा जानकीदेवींची. भारत सरकारनं पद्मविभूषण किताबानं त्यांना गौरवलंच; परंतु त्यांचे नातू, कमलनयन बजाजांचे ज्येष्ठ पुत्र आणि बजाज उद्योगसमूहाचे विद्यमान अध्यक्ष राहुल बजाज यांनाही पद्मभूषण किताबानं सन्मानित केलं.

बजाज घराण्याचे महात्मा गांधींशी खूप निकटचे संबंध. त्यामुळेच जमनालालजींचे ज्येष्ठ पुत्र कमलनयन बजाज यांना कॉँग्रेस पक्षानं वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली आणि सलग तीन वेळा (१९५७-१९७१) कमलनयनजी संसद सदस्य बनले. १९६९मध्ये कॉँग्रेस दुभंगली, कमलनयनजी बजाज मोरारजी देसाईंसोबत गेले. १९७१ची निवडणूक त्यांनी पुन्हा एकदा लढवली, परंतु ते हरले. पुढल्या काही महिन्यांतच वयाच्या ५७व्या वर्षी, त्यांचं अकाली निधन झालं. राहुल बजाज यांनाही संसद सदस्यत्वाचा सन्मान लाभला; परंतु त्यांना या पदावर मनोनीत (नियुक्त) केले तेे राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप आणि शिवसेना या तीन पक्षांनी मिळून, एकत्रितपणानं!

कमलनयन बजाजांचा जन्म २३ जानेवारी १९१५चा. यंदाचं वर्ष हे त्यांच्या जन्माला १०० वर्षं पूर्ण होत असल्याचं. १९७१मध्ये ते गेले; परंतु तत्पूर्वीच १९६५मध्ये राहुल बजाज व्यवसायात आले होते आणि १९६८मध्ये तर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची धुराही स्वीकारली होती. कमलनयन बजाजांचा सामाजिक कार्याचा वसा मात्र सांभाळला, तो त्यांचे धाकटे बंधू रामकृष्ण बजाज यांनी. वर्ल्ड असेंब्ली फॉर यूथचे अध्यक्ष म्हणून ते १९६१मध्येच निवडून गेले होते. विश्व युवक केंद्रांमध्ये ज्याचं पुढे रूपांतर झालं, त्या इंडियन यूथ सेंटर्स ट्रस्टचे ते कार्यकारी विश्वस्तही होते.

ऑटोरिक्षांच्या उत्पादनाला प्रारंभ जमनालालजींनी केला; परंतु दुचाकी-तिचाकी बनवण्याचा परवाना बजाज घराण्याला मिळाला तो १९५९मध्ये. १९६०मध्ये कंपनी पब्लिक लिमिटेड बनली. पहिल्या दहा वर्षांतच एक लाखावं वाहन रस्त्यावर आलं आणि बजाज ऑटोनं अक्षरश: क्रांती घडवली. सत्तरचं दशक समाजवादी समाजरचनेचं, उद्योगाला फारसं पूरक वातावरण नसणारं.

या काळात वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी, १९६८मध्ये राहुल बजाज ऑटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. वर्षाला अवघ्या २० हजार दुचाकी बनवण्याचा परवाना बजाजला देण्यात आला होता. मागणी नोंदवल्यानंतर ग्राहकाला दहा-दहा वर्षे वाट पाहत बसावं लागायचं, असा तो काळ. वस्तुत: बजाजला परवानगी होती, एक लाख वाहनं बनवण्याची; परंतु उत्पादनक्षमतेच्या २५ टक्के इतकीच वाहनं बनवता येत असत. राहुल बजाजांनी थोडं धाडस दाखवत सरकारी आदेशाविरोधात जाऊन उत्पादनक्षमतेपेक्षा अधिक वाहनं बनवायला सुरुवात केली. नियमांचा भंग केल्याबद्दल सरकार कारवाई करेल, ही भीती त्यांना घालण्यात आली. परंतु महात्मा गांधींचा पाचवा पुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमनालालजींचा मी नातू आहे, ब्रिटिश सरकारच्या विरोधात स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याबद्दल तुरुंगवास भोगलेल्या वडलांचा आणि आजोबांचा मी वारस आहे, मी कारावासात जायला घाबरत नाही, असं बाणेदार उत्तर राहुल बजाजांनी दिलं आणि ऑटोची घोडदौड सुरूच ठेवली.

राहुल बजाजांचा जन्म बंगालमधला, १० जून १९३८चा. दिल्लीच्या स्टिफन्स कॉलेजमधून इकॉनॉमिक्समध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी घरच्याच उद्योगात चार वर्षं उमेदवारी केली. ती उमेदवारी सुरू असतानाच त्यांनी कायद्याची पदवी पदरात पाडून घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्योगात पडायचं, हे त्यांनी शाळेत असतानाच मनाशी ठरवलं होतंं. एका कंपनीपासून सुरू झालेला व्यवसाय सुमारे ३६ कंपन्या आणि २८ हजार कोटी डॉलर्सच्या वार्षिक उलाढालीपर्यंत नेऊन पोहोचवला तो त्यांनीच. आता त्यांच्या बरोबरीनं बजाज घराण्याची चौैथी पिढी राजीव आणि संजीवच्या रूपानं व्यवसायात आहे. बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह, बजाज इलेक्ट्रिकल्स, बजाज अलायन्स, बजाज आल्मंड ऑइल, बजाज कॅपिटल, बजाज व्हेन्चर्स, महाराष्ट्र स्कूटर्स, मुकुंद इंटरनॅशनल, हिंद लॅम्प्स अशी किती तरी नावं. त्या निमित्तानं बजाज समूह ऑटो, इलेक्ट्रिकल्स, इन्शुरन्स, आयर्न, स्टील, मिनरल्स, इन्व्हेस्टमेंट, होल्डिंग्ज, सिक्युरिटीज अशा किती तरी क्षेत्रांत उतरला.

सामाजिक सेवेचा वसा जानकीदेवींकडून बजाज घराण्याकडे आलेला होताच. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या सरकारी परिभाषेत तो वसा बसवून बजाज समूहानं त्याला व्यापक रूप दिलं. प्रतिवर्षी शंभर कोटींहून अधिक रक्कम बजाज घराण्यातर्फे अशा कामांवर खर्च होते. शिक्षणाच्या क्षेत्रात बजाज घराण्यानं प्रचंड काम केलं. वर्ध्याची शिक्षा मंडळ ही संस्था तर हिंदी आणि मराठी भाषेच्या परीक्षा घेणारी, त्यासाठीची पाठ्यपुस्तकं सर्वप्रथम याच संस्थेनं तयार केली. सात महाविद्यालयं आणि दहा हजारांहून अधिक विद्यार्थी असलेली ही संस्था.

जानकीदेवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, कमलनयन बजाज हॉस्पिटल, जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ गांधीयन स्टडीज, बजाज-वायसीएम हॉस्पिटल, जमनालाल बजाज फाऊंडेशन, जमनालाल कानिराम बजाज ट्रस्ट, जमनालाल बजाज सेवा ट्रस्ट अशा कितीतरी संस्था, आणि जानकीदेवी बजाज पुरस्कार फॉर रुरल आंत्रप्रेनरशिप, रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी अ‍ॅवॉर्ड‌्स, जमनालाल बजाज अ‍ॅवॉर्ड‌‌‌्स असे कितीतरी राष्ट्रीय पुरस्कार. शंभरहून अधिक वर्षांचा सामाजिक कामाचाच वारसा लाभलेला असा हा बजाज. प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श करणारा, सर्वार्थाने ‘हमारा’ वाटावा असा...

sumajo51@gmail.com