आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समतेचे हे तुफान उठले...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोदावरीच्या पुरात घरं-मंदिरं बुडाली. सावित्री नदीच्या पुरात पुलासह गाड्या-माणसं वाहून गेली. काही क्षणांच्या दुखवट्यानंतर जग पुढे सरकलं. निसर्गावर विजय मि‌ळवताना आपण आपपरभाव जपला, भेदाभेदाची चौकट सांभाळून माणसांना जवळ केलं, 'तो त्याचं बघून घेईल' म्हणत वाऱ्यावर सोडून दिलं. त्याचेच दृश्य परिणाम अपघातांच्या रूपाने समोर आले. हा भेदाभेद नष्ट व्हावा, वंचितांच्या मन, भावना आणि जिवाचं मोल समाजाला कळावं, यासाठीच तर बी. विल्सन आणि टी. एम. कृष्णा यांनी आजवरचं आयुष्य खर्ची घातलं. त्यासाठीच तर त्यांना २०१६चा रॅमन मॅगसेसे हा मानाचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला. मात्र उठता-बसता मीडिया-सोशल मीडियावरून संदेश-प्रतिसंदेश प्रसवणारे राज्यकर्ते आणि संवेदनशीलतेचा आव आणणाऱ्या स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांच्या लेखी जणू अशी काही घटना घडलीच नाही...

डोक्यावरून मैला वाहून नेण्याच्या प्रथेविरोधात चळवळ उभारणारे कर्नाटकमधले दलित कार्यकर्ते बेजवाडा विल्सन आणि ब्राह्मण वर्गाची मक्तेदारी असलेल्या कर्नाटक संगीताची दारे तळागाळातील साधक-अभ्यासकांसाठी खुली व्हावीत, यासाठी प्रस्थापित संगीत व्यवस्थेविरोधात एल्गार पुकारणारे धैर्यवान गायक टी. एम. कृष्णा यांना यंदाचा मानाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार घोषित झालेल्या दोन्ही व्यक्ती जात व्यवस्थेच्या टोकाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत, परंतु समाजपरिवर्तनाचे ध्येय बाळगून केलेली बंडखोरी हा त्यांच्यातला समान गुण, समान धागा आहे. अर्थातच दोघांचीही लढाई ‘ब्राह्मिनिकल’ व्यवस्थेविरोधातली आहे. एक दलित आणि एक ब्राह्मण स्वतंत्रपणे प्रस्थापित ‘ब्राम्हिनिकल’ व्यवस्थेविरोधात लढा देतो, ही घटनाच मुळी माणुसकीच्या जिवंतपणाचे लक्षण आहे...

बी. विल्सन, कोलारच्या सोन्याच्या खाणीत काम करणाऱ्या एका कामगाराचा मुलगा. सोन्याच्या खाणीचे सान्निध्य असले तरी परंपरागत काम मात्र सोनखत गोळा करणे हेच होते. लहानपणी शाळेत भंग्याचा मुलगा म्हणून होणारी अवहेलना सोसावी लागत होती. पण शिक्षणच आपल्याला मुक्ती देईल, असा विश्वास मनात होता. पण शिक्षण संपवून सेवायोजन कार्यालयात नोकरीसाठी अर्ज दिला, तेव्हा फॉर्मवर जातीच्या रकान्यात ‘भंगी’ असा उल्लेख पाहून समोरील कारकुनाने अपेक्षित काम या रकान्यापुढे स्वत:च ‘सफाई कामगार’ असे लिहून टाकले! आपण कितीही शिकलो तरी जात आपला पिच्छा सोडणार नाही, तो सोडवण्यासाठी जातव्यवस्थेशीच संघर्ष करणे भाग आहे, याची विल्सन यांना तीव्रतेने जाणीव झाली. या एका अनुभवानंतर पुढे त्यांनी कधीही नोकरीसाठी अर्ज केला नाही. दलितांनी सफाई व्यवसाय सोडावा, यासाठी काम करण्यात आयुष्य खर्ची घातले.

दुसरे पुरस्कार विजेते थोडूर मदाबुसी कृष्णा; अर्थात टी. एम. कृष्णा. ब्राह्मण जातीत जन्मलेले, पण कर्नाटक संगीतात घुसलेले जातीय अहंकार दूर व्हावे, म्हणून व्यवस्थेतील वरच्या वर्गाशी सतत संघर्ष करणारे नावाजलेले गायक-लेखक. त्यांच्यावर प्रभाव भयापासून मुक्तीची जाणीव करून देणाऱ्या जे. कृष्णमूर्तीप्रेरित शाळेचा आणि ‘ट्रुथ इज ए पाथलेस लँड’ असे म्हणणाऱ्या जे. कृष्णमूर्तींच्या तत्त्वज्ञानाचाही. याच प्रभावाने त्यांच्यात जगण्याविषयी खोलात जाऊन प्रश्न विचारण्याचे संस्कार रुजले आणि ‘ऑर्ग्युमेेंटेटिव्ह म्युझिशियन’ अशी स्वतंत्र ओळख मिळवून दिली. कृष्णा जाहीरपणे पुकारा करतात- दलितांनी ब्राह्मणी व्यवस्थेचे वर्चस्व असलेल्या कर्नाटक संगीतात प्रावीण्य मिळवून तामीळनाडू सरकारच्या वतीने दिला जाणारा ‘कलाइमामनी’ हा मानाचा सन्मान मिळवावा. ते केवळ बोलून थांबत नाहीत, तर प्रस्थापितांच्या चेन्नई संगीतसभेला नकार देतात. रोषाला न जुमानता चेन्नईतल्याच दलित-कोळी वस्तीमध्ये शास्त्रीय संगीत महोत्सव भरवतात. प्रारंभाला नव्हे तर बैठकीच्या मध्यावर ‘वर्णम’ घेऊन परंपरेला आव्हान देतात. ब्राह्मणी व्यवस्थेतून झिरपलेल्या तथाकथित अभिजाततेला नाकारतात. कारण, त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘क्लासिकल’ आणि ‘एज्युकेशन’ या दोन सुविधा वा शब्द सुस्थापित अवस्थेतून येतात. म्हणूनच अस्पृश्य मानल्या गेलेल्या दलितांच्या मुलांना संगीताचे धडे देतात. शास्त्रीय संगीताचे ज्ञान मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातल्या वंचितांपर्यंत पोहोचावे, यासाठी धडपडत राहतात.

विल्सन आणि कृष्णा यांचे विचार माणूसकेंद्री. मूल्ये मानवतेचा पुरस्कार करणारी आणि हरघडी प्रस्थापितांविरोधात एल्गार पुकारणारी. ‘इंडिया स्टाइकिंग’ या गीता रामस्वामी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बी. विल्सन लिहितात, “मानवी मलमूत्राची सफाई माणसानेच करण्याची प्रथा जातव्यवस्थेला धक्का दिल्याशिवाय मोडणार नाही. मात्र उच्चवर्णीयांना याचीच भीती असते. ‘सफाई कामगार आंदोलना’ने निझामाबाद नगरपालिकेच्या आवारातील टोपली संडास एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून पाडायचे ठरवले, तेव्हा आमच्यावरच लेखी मनाई हुकूम बजावण्यात आला. याचा एरवी अर्थ कसा लावणार? हे केवळ आमच्या भूतकाळाचे नाही तर वर्तमानाचेही रूप आहे. भविष्यात तरी असे राहू नये.” तर कृष्णा संगीतातल्या प्रस्थापितांना शिंगावर घेताना म्हणतात, भारतातल्या शास्त्रीय गायक-वादकांनी स्वत:भोवती अाध्यात्मिक अहंगंडाचे एक वर्तुळ तयार केले आहे. त्यामुळेच त्यांना सतत वाटत राहते की, त्यांचे संगीत अत्युच्च दर्जाचे आहे. त्याला समाजकारण आणि राजकारणाचा स्पर्श होता कामा नये. परंतु ही भावना तत्त्वत: पोकळ आहे. अर्थातच केवळ वक्तव्य करून कृष्णा थांबत नाहीत, तर ऐन मोक्याच्या प्रसंगी मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर पत्र लिहून हिंदू- मुस्लिमांनी आपापसात लढायचे की गरिबीशी? हा प्रश्नच कसा विचारला जाऊ शकतो. कारण गरिबीचा थेट संबंध जात-धर्म-वर्णाशी आहे. जोवर ही व्यवस्था आहे तोवर गरिबी आहे, असे सांगण्याची हिंमतही दाखवतात.
बी. विल्सन लिहितात, “सफाई कामातून मानवाची मुक्ती व्हावी यासाठी तंत्रज्ञानाची कमतरता नाही, निधीची कमतरता नाही, कायद्याची अडचण नाही. अडचण आहे, ती आमच्या जातीय मानसिकतची. जी मुख्यत: काही लोकांना बहिष्कृत ठरवून त्यांचे शोषण करीत राहते.” अर्थातच या प्रश्नावर दोन दशके काम केल्यावर माझ्यासुद्धा असे लक्षात आले आहे की, दलितांची सफाई कामातून सुटका होणे, हे भारतीय नागरी समाजाची जातीय मानसिकता बदलत नाही तोपर्यंत शक्य नाही.

बी. विल्सन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले आदर्श मानतात. त्यांच्या सोबत निरलसपणे काम करणारी तरुणांची एक टीम आहे. त्यांच्या सांगण्यावरून आज हजारो दलित हे काम सोडून देत आहेत. सरकारकडे कागदावर तरी पुनर्वसनाच्या अनेक योजना आहेत. त्या यशस्वी होण्यासाठी दलित आंदोलनाचा रेटा तर हवाच पण शहरी नागरी समाजाचा जातीय मानसिकतेच्या वर्तुळातून बाहेर येऊन निर्माण केलेला दबाबही हवा. याच जातीय मानसिकतेची चिरफाड करताना ११ मे २०१४च्या ‘हिंदू’ दैनिकातल्या आपल्या विश्लेषणात्मक लेखात कृष्णा लिहितात, “मी कर्नाटक शैलीतील संगीतकार आहे, म्हणजेच मी उच्चवर्णीय ब्राह्मण आहे, हे न सांगताच कळण्यासारखे आहे. कारण या क्षेत्रात ९९% लोक ब्राह्मणच आहेत. परंतु जे जन्माने ब्राह्मण नाहीत, त्यांनीही ब्राह्मणी मूल्यव्यवस्थेचा स्वीकार केलेला दिसतो. मी जेव्हा या क्षेत्रातील लोकांशी बोलतो, तेव्हा त्यांच्या बोलण्यात एक वृथा अभिमान आढळतो. त्या मूल्यव्यवस्थेचे रक्षण व्हायला पाहिजे, असे त्यांना वाटते. मग त्यातून वैदिक शाळा, मंदिरांचे जीर्णोद्धार व गोरक्षा असे कार्यक्रम निघतात. ते यशस्वी होण्यासाठी अर्थातच शासनाचे पाठबळ हवे. ब्राह्मणी मूल्यांचे रक्षणकर्ते, अशी मोदींची प्रतिमा उभी राहिल्यावर ती संधी चालून आली. सर्व जण त्यांच्या मागे गेले. कारण या उच्चवर्णीय मूल्यांच्या रक्षणासाठी आवश्यक ते नियंत्रण, नियोजन व दंडशक्ती ही त्यांच्या रूपात त्यांना दिसली. नरेंद्र मोदी हे ओबीसी असूनही त्यांना या वर्गाचा पाठिंबा मिळतो आहे, तो याचमुळे. मोदी हे नेहमी शक्ती संपन्नता व निर्णयात्मकता यावर भर देतात. यातून केवळ सामर्थ्यच दिसते असे नाही, तर अधिकाराची एक उतरंडही व्यक्त होते. ज्यात इतरांनी केवळ नेत्याच्या मागे जायचे असते. मोदी जातीने ब्राह्मण नसले तरी वर्णाने उजळ आहेत, हाही उच्चवर्णीयांना विश्वास देणारा घटक वाटतो. ते आपली धार्मिक ओळख मिरवतात, तेव्हा ते मानद ब्राह्मण बनून जातात.”

विल्सन आणि कृष्णा यांचे कार्यक्षेत्र भिन्न असले तरी ते या देशातील जातीव्यवस्थेने दडपलेली प्रतिभा मुक्त करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत आहेत. दुसऱ्या बाजूला ‘उना’ प्रकरणामुळे दलितांमधील दडलेल्या असंतोषाने एका ऊर्जेचे रूप धारण केले आहे. मात्र, जातव्यवस्थेने यापूर्वी जैन, बौद्ध, बसवेश्वर अशी मोठी आंदोलने जिरवली आहेत. त्यामुळेच विल्सन व कृष्णा वा उना ही केवळ प्रतीके बनून राहता कामा नयेत. यासाठी शहरी नागरी समाजाने ‘लोकपाल’ आंदोलनाइतका जोर लावणे अपरिहार्य आहे. जेणेकरून सफाई कामगारांचे सन्मानाने पुनर्वसन करण्यासाठी परिणामकारक योजना तातडीने अमलात आणल्या जातील. सफाई कामगार जिथे राहतात ती जागा त्यांच्या नावावर करून देणे शक्य होईल. माजी सैनिकांना ज्या कृतज्ञतेने जामीन देतो त्याच कृतज्ञतेने या सफाई सैनिकांना राहते घर दिले जाईल. त्याने एक सुरक्षितता व विश्वास निर्माण होईल, आणि तोच विल्सन आणि कृष्णा यांच्या समाजपरिवर्तन कार्याचा यथायोग्य सन्मानही असेल.
दाद ना फिर्याद
भारत सरकारने ‘The Employment of planed scavangers and construction of Dry latrines (Prohibition) Act.’ असा कायदा गाजावाजा करीत १९९३मध्ये मंजूर केला, पण गॅझेटमध्ये त्याचे नोटीफिकेशन निघायला १९९७ उजाडावे लागले. कुठल्याही राज्याने २००० पर्यंत हा राज्यात लागू केला नाही. आजच्या घडीलाही १३,००,००० दलित सफाई कामगार म्हणून काम करीत आहेत. आंध्र, म. प्र., उ. प्र., हिमाचल, एवढेच नव्हे तर पुरोगामी व प्रगत महाराष्ट्रातही हे चित्र कायम आहे. शहरातील जमिनीखालील गटारी साफ करण्यातही याच जातींना गुंतवले गेले आहे. दरवर्षी शेकडो दलित गटारातील विषारी वायूच्या संसर्गाने मृत्युमुखी पडतात. त्याची दाद ना फिर्याद. मागील केवळ एका वर्षात नाशिक शहरात सहा कामगार गुदमरून मरण पावले. त्यात राष्ट्र सेवादलात काम करणारा आमचा अभ्यासू मित्र गोपी मोरे याचाही बळी गेला.
अरुण ठाकूर
akrutha58@gmail.com
बातम्या आणखी आहेत...