आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथा जरा संधाची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलशाली राजा हरिश्चंद्र समस्त राजांचा सम्राट होता. अपयश माहीत नसलेल्या राजाने संपूर्ण पृथ्वी तिच्या सातद्वीपांसह जिंकली होती. त्यानंतरच त्याने राजसूय यज्ञ सिद्धीस नेला.
थोडक्यात ‘राजसूय’ यज्ञ पूर्ण झाला की इंद्राच्या दरबारात ‘आरक्षित’ स्थान पक्के होते, असेच नारदाने सांगितले होते. युधिष्ठिर राजसूय यज्ञाच्या विचाराने पछाडला गेला. त्याने पक्का निर्धारच केला. अमात्य, बंधू, ऋत्विजांसमवेत धौम्य व द्वैपायन व्यास यांचाही होकार मिळवला.
केवळ स्वत:च्या बळावर कार्यसिद्धी कशी होणार? हानकारार्थी विचार मनात येताच धर्मराजाला जगत् श्रेष्ठ श्रीकृष्णाची आठवण झाली. श्रीकृष्ण साथीला असेल तर अशक्य काहीच नाही. पांडवांचा दूत इंद्रसेन श्रीकृष्णास घेऊनच द्वारकेहून निघाला. इंद्रप्रस्थी दाखलही झाला. ‘राजा युधिष्ठिरा! राजसूय यज्ञ करण्यास तू सर्व दृष्टीने योग्य आहेस. तरी काही गोष्टी मी तुला सांगणे गरजेचे आहे.’ कृष्ण बोलू लागला.
‘मथुरा म्हणजे मध्यदेशाचाही राजा आता बलशाली जरासंध झाला आहे. ययातीच्या वंशकुळातील भोजवंशीय राजे जरासंधाचे मांडलिक झाले आहेत. महाप्रतापी चेदीदेशाचा राजा शिशुपाल जरासंधाचा सेनापती बनला आहे. करुष देशाचा वक्र आणि तुझा पिता पांडूचा मित्र प्राग‌्ज्योतिषपुराचा यवनाधिपती भगदत्त त्याचा दोस्त झाला आहे. पौंड्रक वासुदेव ज्याचा वध न करता मी सोडून दिला, तोही जरासंधाशीच संधान बांधून आहे.
खुद्द माझा श्वशुर भीष्मक (अमरावतीचा रुक्मिणीचा पिता) मगधाधिपती जरासंधाचाच अनुयायी झाला आहे. युधिष्ठिरा! भोजांची कित्येक घराणी उत्तरेकडून पश्चिमेकडे आपला देश सोडून जरासंधाच्या भीतीनेच परागंदा झाली आहेत.
उत्तरेकडचे अन्य राजे जरासंधाच्याच भीतीने दक्षिणेकडे स्थलांतरित झाले आहेत. जरासंधाच्या अस्ति आणि प्राप्ति या कन्यांचे कंसाने अपहरण करून जरासंधाशी सैख्य केले होते. (कंस हा जरासंधाचा जावई) बलरामाच्या मदतीने कंसाचा भाऊ सुनामा व कंस यांचा मीच वध केला. जरासंध अत्यंत शिरजोर झालेला आहे.
आम्ही द्वारकावासी झालो, कारण जरासंधाचे प्रचंड सैन्य! आम्ही महारथी असूनही मथुरा सोडली. युधिष्ठिरा! जोपर्यंत जरासंध जिवंत आहे, तोपर्यंत हा महाबली तुझा राजसूय यज्ञ यशस्वी होऊ देणार नाही. गिरीव्रजात जरासंधाने डांबून ठेवलेल्या राजांची आपण मुक्तता केली, तरच तुझा यज्ञ पूर्ण होईल.
थोडक्यात, जरासंधाचा वध ही तुझ्या यज्ञाची ‘पूर्वअट आहे समज.’ कृष्णाच्या युक्तिवादाने धर्मराजाला आपले सम्राटपदाचे स्वप्न विरून जाणार, असेच वाटले. ‘कृष्णा! तुझा दुर्दम्य प्रभाव मी जाणतो. तूही जरासंधामुळे त्रस्त दिसतोस.
मला हे सांग की केशवा! तू, बलराम, भीमसेन वा अर्जुन यापैकी जरासंधाचा वध करण्यास कोण धजावेल?’ हे ऐकून भीमाने जणू गर्जनाच केली. ‘कृष्णाची राजनीती, माझे बाहुसामर्थ्य आणि नेहमी विजयी होणारा अर्जुन मिळून आम्ही तिघे जण जरासंधाचा नाश करू शकतो.’
राजनीती निपुण कृष्णाने भीमाची युक्ती उचलून धरली. ‘पशुपती शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणखी चौदा राजे डांबले की, शंभर राजांचा एकदम नरबळी देण्याचा त्याचा विचार पक्का आहे. हा नरयज्ञ थांबवणाऱ्यालाच उज्ज्वल यश प्राप्त होईल.’ कृष्णाने धर्मराजाकडे पाहिले.

‘कृष्णा! तू माझे मन आहेस. भीमार्जुन हे माझे नेत्र आहेत. माझ्या सम्राट बनून राजसूय यज्ञ पूर्तीसाठी मी तुम्हा तिघांचा जीव धोक्यात घालू इच्छित नाही. अपेक्षित घडण्याऐवजी विपरीतच घडणार असेल तर राजसूय यज्ञाचा बेत मी न केलेलाच बरा. जरासंधाच्या अफाट सैन्यासमोर साक्षात यमही पळ काढील.’ युधिष्ठिराचे नामर्दाला शोभणारे वक्तव्य ऐकून गांडीवधारी अर्जुनाने मौन सोडले.
‘मांधाता, कीर्तवीर्य, सहस्त्रार्जुन, भरत, आणि मरुत्त अशा पाच सम्राटांची यादी कृष्णाने ऐकवली, ती शत्रूंवर मात करण्याची वृत्ती जागवण्यासाठीच. राजा! गांडीव धनुष्य, शस्त्र, बाण, दिव्य रथ आणि पक्षपाती श्रीकृष्ण असताना माझ्या यश आणि सामर्थ्याबद्दल कुणीही शंका घेऊ नये.
राजसूय संपन्न व्हावा म्हणून गिरीव्रजात डांबलेल्या राजांची मुक्तता यापेक्षा अधिक स्मृहणीय काय? जरासंध वध हाच जातिवंत क्षत्रियाचा धर्म आहे.’ आता कृष्ण सुखावला. ‘तीन अक्षौहिणी सैन्याच्या स्वामीला (जरासंध) युद्धभूमीत गाठायचेच नाही. आपल्या मनातील विचाराचा कुणालाही सुगावा लागणार नाही, याची दक्षता घेऊन शत्रूच्या राजवाड्यात थेट प्रवेश करून जबरदस्त धडक देऊ या. जरासंधाचा वध झाल्यावर जर त्याचे सैन्य आपल्यावर उलटले तरी बंदी केलेले राजे मुक्त करण्याचा प्रयत्न स्पृहणीयच ठरेल. अशा कामात मृत्यू आला, तरी स्वर्गप्राप्तीच होईल.’
राजसूय यज्ञातला अडथळा दूर झालाच, असे धर्मराजाला वाटले. ‘कृष्णा! तुझ्यासमोर हा दुष्ट जरासंध आजपर्यंत जिवंत राहिलाच कसा?’ धर्मराजाच्या प्रश्नाने कृष्ण बोलता झाला. ‘धर्मराजा जरासंध आहे तरी कोण, असे तू विचारत आहेस?’ आता यापुढची कथा श्रीकृष्णच सांगतोय म्हटल्यावर पांडवबंधूंनी कान टवकारले…‘पराक्रमी जरासंधाचे असंख्य अपराध पराक्रमी असलेल्या वृष्णीवीरांनी का सहन केले, ते ऐक. मगधाधिपती ‘बृहद्रथ’ राजा तीन अक्षौहिणी सैन्याचा स्वामी होता. सूर्यासारखा तेजस्वी, कुबेरासारखा ऐश्वर्य संपन्न, यमासारखा क्रोधी आणि पृथ्वीसारखा क्षमाशीलही होता.
याने काशीराजाच्या जुळ्या दोघी बहिणींशी विवाह केला. संपूर्ण तारुण्य या राजाने विषयोपभोगात व्यतीत केले. वंशसातत्यासाठी होमहवन, पुत्रप्राप्तीची हमी देणारे पुत्रकामेष्ठी यज्ञही वाया गेले. काशी राजाच्या कन्यांची कूस काही उजवली नाही. बृहद्रथ पराक्रमी असूनही निर्वंशी राहणार, म्हणून खिन्न होता. तो निरीच्छ, विरक्त झाला. गौतमवंशीय ‘चंडकौशिक’ नावाचा ऋषी तप:सामर्थ्याने युक्त आहे, असे बृहद्रथ राजाला समजले. योगायोगाने चंडकौशिक मुनी एका आम्रवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेला त्याला दिसला. ऋषीला योग्य अशा भेटवस्तू देऊन ऋषीची प्रसन्नता वाढविली. ‘हे बृहद्रथा! मी तुझ्यावर प्रसन्न आहे.
तुझी मनोकामना पूर्ण होईल!’ दोन्ही भार्यांसह राजाने ऋषीला वंदन केले. ‘मी राज्य सोडून तपोवनात जाण्यासाठी प्रस्थान ठेवले आहे. माझ्यासारख्या निपुत्रिकाने राज्य किंवा वराची आशा का धरावी?’ तेवढ्यात ध्यानस्थ ऋषीच्या मांडीवर आम्रफळ पडले. फळ हातात घेऊन ऋषीने काही मंत्र म्हटले. अभिमंत्रित फळ त्याने राजाला दिले. ‘राजा तू भाग्यवान आहेस. तू वनात न जाता राजप्रासादात जा.’ बृहद्रथ राजाने ते आम्रफळ कापून दोघी राण्यांना दिले.
तपस्विनी भार्यांनी मोठ्या श्रद्धेने आम्रफलाचे सेवन केले. मुनीचे वचन अन्यथा होणार नाही, याची खात्री राजा बृहद्रथ व राण्यांना होतीच. गर्भवती पत्नींच्या दर्शनानेच राजा प्रसन्न झाला. त्याचे नैराश्य व वैराग्य नष्ट झाले. तो हर्षभरित झाला. ऋषीने दोन राण्यांना दोन आम्रफळे का दिली नाहीत? धर्मराजाच्या चेहऱ्यावर चिंतेची रेषा उमटलीच. पण कृष्णाने कथा पुढे चालू केली.

‘प्रसूतीचा समय आला. दोन्ही राण्यांना अर्धे शरीर असलेली शकले झाली. या अभद्र दर्शनाने राण्या किंचाळल्याच. असहाय्य बहिणींचे बाळंतपण म्हणजे गर्भपात आहे, असे दासींचे मत झाले. वस्त्रात गुरफटलेली शकले घेऊन दासी अंत:पुरातून बाहेर पडल्या. दासींनी चव्हाट्यावर टाकलेले मांसल गोळे जरा राक्षसीने पाहिले. जरेने दोन्ही शकले एकत्र ठेवताच सांधली गेली (म्हणून जरासंध). हे पांडवांनो! एक वीरकुमार निर्माण झाला. राक्षसीही अाश्चर्यचकित होऊन या अद्भुताने भांबावली. नवजात बालकाचे रडणे मेघगर्जनेसारखे होते.
जरेने बालकाला खाऊन टाकण्याचा विचार सोडून दिला. तिने सुंदर स्त्रीचे रूप धारण केले. राजवाड्यातून सर्व जण बाहेर आले. रूपवान स्त्रीच्या हातातील त्या बालकाच्या दर्शनाने दोन्ही राण्यांना पान्हा फुटला. ‘राजा बृहद्रथा, ऋषीच्या प्रभावाने तुझ्या राण्यांच्या उदरी जन्मलेल्या तुझ्या पुत्राचा स्वीकार कर. तुझ्या दासींनी याला चव्हाट्यावर फेकून दिला होता.’ युधिष्ठिरा, काशीकन्यांनी दुग्धधारांनी बाळाला अंघोळच घातली. त्यानंतर बृहद्रथ राजा जरेला म्हणाला, ‘हे शोभने, मला पुत्रप्राप्ती करून देणारी तू कुणीतरी देवताच असावीस.’

जोपर्यंत जरासंध जिवंत आहे, तोपर्यंत हा महाबली तुझा राजसूय यज्ञ यशस्वी होऊ देणार नाही. गिरीव्रजात जरासंधाने डांबून ठेवलेल्या राजांची आपण मुक्तता केली, तरच तुझा यज्ञ पूर्ण होईल. थोडक्यात, जरासंधाचा वध ही तुझ्या यज्ञाची ‘पूर्वअट आहे समज.’
राजा पटवर्धन
patwardhanraja@hotmail.com
लेखकाचा मोबाइल क्र. - ९८२००७१९७५
बातम्या आणखी आहेत...