आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरोगामी निसवतो तरी तो कसा आणि का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम्ही सगळेच पुरोगामी असलो, तरी आम्हा बहुतेकांच्या बायका स्वजातीतल्याच त्याही ‘शीलवान’ असलेल्या आम्ही केलेल्या असतात. आम्ही पुरोगामी मेल्यावरसुद्धा आपल्याच जाती-धर्माच्या मसणवट्यात पार्थिव जावं, अशा मनभ्रांतीत असतो. अशा कष्टप्रद मानसिक पातळ्यांवर आमचं पुरोगामीत्व ‘निसवत’ जातं...
माझा जन्म हा पूर्वास्पृश्य ‘मांग’ जातीत झालेला असल्याने सद्य:परिस्थितीत मी जन्मत:च ‘पुरोगामी’ व परिवर्तनवादी ठरतो. माझ्या ज्ञातीच्या समकक्ष आणि थोड्या वरच्या ज्ञातींमध्ये (अपघाताने) जन्म झालेल्या इतर ‘पुरोगाम्यांचे’ पण स्वत:बद्दल हेच मत आहे.
हे ज्यांना जन्मजात प्रतिगामी अथवा स्थितीवादी समजतात, अशा (महाराष्ट्र देशातील) पारंपरिक हक्काने पुस्तकी शिक्षण घेतलेल्या वर्णातील व त्यांच्या समकक्षातील ‘साक्षरांचे’ पण स्वत: ‘पुरोगामी’ असल्याचे मत आहे. या स्वयंघोषित पुरोगामी वर्णातील काही जण ‘ब्रह्मा-विष्णू-महेश’ यांच्याशी फारकत घेऊन ‘शाहू-फुले-आंबेडकरांचा’ जप करतात.
अशांना आमच्याकडून ‘पुरोगामीपणाचे’ प्रशस्तिपत्र आम्ही देतो. तेव्हा ते आणि आम्ही ‘खरे पुरोगामी’ होतो. याच्याही पुढे जाऊन ‘पुरोगामीपणाची’ व्याख्या व्यापक केल्यास महाराष्ट्र देशातील सुजाण वयातील सर्वच साक्षर वा अर्थसक्षम स्त्री-पुरुष कळत-नकळतपणे ‘पुरोगामी’ ठरतात. किंवा अशा सुजाण नागरिकांना अमनधपक्या ‘तुम्ही पुरोगामी अाहात काय?’ असा प्रश्न केल्यास ते गांगरून न जाता या प्रश्नाचे उत्तर ‘होय!’ असेच देतील. किंवा ‘मी/आम्ही (आपल्या वर्ण/जातीचे) पुरोगामीच आहोत. पण तमुक त्या जाती/धर्माचे मात्र पुराणमतवादी आहेत.’ असे पालुपद ऐकायला मिळते. तर ज्या (महाराष्ट्र) देशातील प्रत्येक सुजाण नागरिकास आपण ‘पुरोगामी’ आहोत, हा आत्मविश्वास वाटत असेल; तो समाज किती ‘प्रगल्भ’ असेल नाही!
या सकळ पुरोगाम्यांच्या म्हणण्यात तथ्यसुद्धा आढळून येईल. कारण कळत-नकळत त्यांनी परंपरा, प्रथा, धार्मिक-सांस्कृतिक रूढींना आपापल्या सोयीप्रमाणे नाकारलेले आहे आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारलेले आहे. भलेही यांनी सकळ समाजाचा विचार केला नसेल, त्यात स्वार्थ असेल! जसे : आता कुणी सार्वजनिक ठिकाणी शेंडी-संजाबाचे प्रदर्शन करीत नाही की कदाचे! चारचौघांत यज्ञोपवितात अडकविलेल्या लाचकणाने कुणी दात कोरीत नाहीत, पाठ खाजवीत नाहीत, की लघुशंकेला गेल्यावर कानावर अडकविण्याचा सोपस्कार पार पाडीत नाहीत.
सांस्कृतिक वसने कधीच त्यागलीत. आता स्त्री-पुरुष दोघेही अंतर्वस्त्र वापरतात, मुंडासे, फेटे, पागोटे, पटके, टोप्या, टोप, पगड्या, उपरणी फक्त उत्सवापुरती राहिलीत. काष्टे, नऊवारी, सहावारी, पाचवारी, साड्या, लुगडी हौसेपुरती उरलीत. सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर आणि निरोध जसे स्वीकारलेत, तसा कुंकवाचा उठाठेवासुद्धा अडगळीत गेलाय.
आता सवाष्ण स्त्रीची आयडेंटिटी टिकल्या आल्याने कुंकू, मणी-मंगळसूत्र, डोरली, चुडे, बांगड्या, जोडवी आणि मासोळ्यांपासून कधीची लांब गेलीय. पुरुष स्वत:ची श्मश्रु स्वत:च करतात, पैजारा कुंचल्याने उजळवितात; तसे देवघरातले देवसुद्धा बाईच्या पाळीबद्दल कुरकुर करीत नाहीत.
विस्मृतीत ‘घालवलेली’ अभक्ष्यभक्षण आणि अपेयपानाची खाद्य-पेय संस्कृतीची पुनर्रचना झालीय. कुणाच्याही हातचे अन्न कधी घरात; बहुतेकदा बाहेर जाऊन सेवन केलं जातंय आणि आता घरात हागण्या-मुतण्याचं कुणालाच काही वाटत नाही. या सवर्णातील पुरोगाम्यांच्या सध्याच्या पिढीच्या तोंडून ‘आम्ही आता जात-पात मानत नाही’ किंवा ‘अमुक-तमुक सणाला आम्ही दलितांना जेवायला घरी बोलावतो’ अथवा ‘आमच्या घरात दलित स्त्री-पुरुष कामं करतात’ यांसारखी ‘सिद्धवाक्ये’ ऐकायला येत नाहीत.

आता आम्ही सगळेच पुरोगामी असलो तरी, आम्हा बहुतेकांच्या बायका स्वजातीतल्याच त्याही ‘शीलवान’ असलेल्या आम्ही केलेल्या असतात. आई-वडिलांची मर्जी सांभाळण्यासाठी-लग्नात आणि नंतर सगळ्या परंपरा, रूढी, सोपस्कार, विधी केलेले असतात. आजही आम्ही आमच्या जातीतील मुलींची लग्नं आपल्याच जातीत ‘बिनबट्ट्याच्या’ घरात रीती-भाती आणि रूढी-परंपरेनुसार कशी होतील, याची काळजी घेतो. एकूण समाजाच्या कल्याणात अगोदर आपल्या जातीचं वा धर्माचं कल्याण कसं होईल, याची काळजी वाहतो.
काही एक पुरोगामी बांधव तर ‘आपली जात भूतकाळात कशी शासक, शौर्यवान, धैर्यवान, उदारमनाची होती व आजही ती कशी श्रेष्ठच आहे’ याची उजळणी करताना, ती सद्य:स्थितीत कशी मागासलेली आहे, यासाठी ‘माइम’ करतात. आम्ही पुरोगामी मेल्यावरसुद्धा आपल्याच जाती-धर्माच्या मसणवट्यात पार्थिव जावं, अशा मनभ्रांतीत असतो. अशा कष्टप्रद मानसिक पातळ्यांवर आमचं पुरोगामीत्व ‘निसवत’ जातं!

‘मनुष्य’ जेव्हा इतर प्राण्यांसारखाच केव्हा तरी ‘प्राणी’ असेल; तेव्हा मनुष्यप्राण्याचे पिलूसुद्धा इतर प्राण्यांच्या पिलांसारखेच ‘शुद्ध-प्रामाणिक-असंस्कारिक-स्वबुद्धीचे’ असेल. त्यालाही इतर प्राण्यांच्या पिलांप्रमाणेच सुष्ट-दुष्टांची, आपल्या-परक्यांची, सावली-संकटांची, रक्षक-भक्षकांमधील भेदाभेद कळणारी उपजत बुद्धी असेल, जगण्यासाठीचा सारासार विवेक जन्मत:च असेल. इतर प्राण्यांच्या पिलांमध्ये असे ‘गुण’ आजही दिसतात. पण कालौघात हा ‘विवेक’ आणि ‘उपजतबुद्धी’ मनुष्यप्राण्यांनी कुठल्या तरी अनैसर्गिक दबावापोटी मेंदूत चिणली असावी. सक्षम नर-मादी जुगायचे, प्रजनन, कुटुंब, समूह, टोळी असा तो विकासक्रम असावा. प्राण्यांच्या जगतात जे ‘कमजोर’ असतात, ते जगायला लायक नसतात.
टोळ्यांमुळे जे जगण्यायोग्य नव्हते, त्यांना जगविण्याचे कार्य त्या-त्या टोळ्यांमधील सक्षमांनी केले आणि टोळ्यांमध्येसुद्धा वर्ग निर्माण झाले असावेत. अक्षमांकडूनही सक्षम जीव जन्माला येत असावेत. तेव्हा त्यांनी मूळच्या सक्षमांना आव्हान देऊ नये, यासाठी सक्षमांनी काही नियम, निर्बंध तयार केले असावेत.
मूळच्या पाळक सक्षमांमध्ये आणि निर्बंधाने ठेवलेल्या अक्षमांमध्येही विवेकीबुद्धी असलेले जीव प्रत्येक काळात जन्म घेत असावेत आणि त्यांनी सक्षमांच्या नियमांबद्दल प्रश्न उपस्थित केले असतील. म्हणून त्यांना त्या-त्या काळातील ‘वैचारिक बंडखोर अथवा पुरोगामी’ म्हणत असावेत. बाकी सगळा मानवी संस्कृतीचा इतिहास आपण जाणतोच (असं गृहीत धरायला हरकत नाही!)

डाव्यांना जन्म देणारे उजवे!
जगभरातील सर्वच ज्ञात संस्कृतींमध्ये जी जी मनुष्याची पिलं जन्माला आली, येतात आणि येतील, त्यांना गर्भात असतानापासूनच ‘गर्भपोषणकर्त्यांची’ जात, वर्ण, धर्म चिकटवला गेला, जातो आणि जाईल. पिलू जगात आल्याबरोबर त्याच्यावर ‘संस्कार’ नामक लसीकरणाचे प्रयोग केले जातात. त्या-त्या संस्कारांप्रमाणे ते वयाच्या सहा-सात वर्षांपर्यंत वागतंसुद्धा!
पण ते पिलू जेव्हा वर्तुळांतर्गत सांस्कृतिक उपवर्तुळांच्या संपर्कात येतं, बाह्य वर्तुळातील वर्तुळांच्या परिघात ये-जा करतं, तेव्हा त्याला प्रश्न पडायला लागतात. बाळसंस्कारांच्या नावाखाली पिलांवर जे संस्कार केले जातात, या संस्कारांच्या दबावाखाली पिलू ‘धर्मदिव्यांग’ बनते खरे! पण सगळीच पिलं ‘धर्मदिव्यांग’ राहात नाहीत. काही त्यातून बरी होऊन बाहेर पडतात. अशी पिलं बहुसंख्येने असलेल्या त्यांच्याच ‘विचारपाळकांना’ खुपायला लागतात.
हे ‘विचारपाळक’ स्वत:ला हा प्रश्न कधीच विचारत नाहीत, की ‘कालपर्यंत आपलं ऐकणारं हे पिलू अचानक प्रश्न का विचारू लागलं?’ आणि आपल्याकडच्या बहुतेक समाजात, धर्मात, कुणा एकाला प्रश्न पडायला लागले, की व्यवस्थेच्या व्यवस्थापकांना, वरच्या स्तरातील लोकांना ते आव्हान वाटायला लागतं.

समाज वैचारिक, आर्थिक, भौतिकदृष्ट्या पुढे जाऊ बघत असताना, बऱ्याचदा खूप पुढे गेलेला असतानाही ज्यांना कालबाह्य रूढी-परंपरा टिकवून ठेवण्यात रस असतो, असे लोक आणि नवनवीन सामाजिक भौतिक, आर्थिक बदलांना सकारात्मक पद्धतीने सामोरे जाणारे नवे, असा हा आदिम संघर्ष असतो. वैदिक धर्माला जैन-बौद्ध मतांनी अव्हेरणे,
आपल्याकडचा भक्तिसंप्रदायाचा उदय, हे तरी दुसरं काय होतं? हे पुढंही होत राहणार आहे. आदिम काळापासून उजवेच डाव्यांना जन्म देत आहेत आणि देत राहणार आहेत. हेच सत्य आहे. फक्त ते डावे नेहमीच संख्येने अल्प असतील! कारण नियमास अपवाद असतात! जोवर उजवे-अतिउजवे होत जातील, तोवर डावे निर्माण होत राहतील!

आता कुणी सार्वजनिक ठिकाणी शेंडी-संजाबाचे प्रदर्शन करीत नाही की कदाचे! चारचौघांत यज्ञोपवितात अडकविलेल्या लाचकणाने कुणी दात कोरीत नाहीत, पाठ खाजवीत नाहीत, की लघुशंकेला गेल्यावर कानावर अडकविण्याचा सोपस्कार पार पाडीत नाहीत...
शाहू पाटोळे
shahupatole@yahoo.com
बातम्या आणखी आहेत...