आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शकार आणि शर्विलक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजप्रासादाकडे जाताना अचानक त्याला मोठा गलबला ऐकू आला. खूपसे लोक हातात भाले, खड्ग, मशाली वगैरे घेऊन राजप्रासादाच्या दिशेनं धावताना त्याला दिसले. ते ‘आर्यक! आर्यक!’ असं ओरडत होते. राज्यक्रांतीचा क्षण येऊन ठेपल्याचं शकाराच्या लक्षात आलं.
उज्जयिनीच्या राजमार्गांवर त्या अमावास्येच्या रात्री कुट्ट काळ्या अंधाराचे साम्राज्य होते. वसंतसेनेचा पाठलाग करत असलेला शकार थकला होता. वसंतसेनेनं त्याला पुन्हा गुंगारा दिला होता. गेले कित्येक दिवस शकार वसंतसेनेच्या प्राप्तीसाठी धडपडत होता. पण ती काही त्याच्या हाती लागत नव्हती.

‘उद्या पुन्हा प्रयत्न करू या. जाऊन-जाऊन जाईल कुठे ती गणिका?’ असा विचार करून शकार राजप्रासादाकडे परत निघाला. राजशालक असल्यामुळे शकार राजप्रासादातच राहायचा. यथेच्छ सुरापान करणे, उत्तमोत्तम अन्नसेवन करणे आणि बायकांचा नाद करत नगरात उंडारत फिरणे एवढीच त्याची जीवितकर्तव्ये होती.
तो नगरातल्या व्यापाऱ्यांकडून, चोरा-तस्करांकडून खंडणीही वसूल करत असे आणि राजभार्येचा प्रिय बंधू म्हणून महाराज पालकदेखील त्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष करत. शिवाय महाराज पालकांच्या पुढ्यात हल्ली एक नवंच संकट उभं राहिलं होतं. आर्यक नावाच्या एका गवळ्याच्या मुलानं त्यांच्याविरुद्ध बंड पुकारलं होतं.
महाराजांनी त्याला कारागृहात टाकलं होतं, पण तो तिथून पळून गेला होता आणि त्यानं कुठल्याशा अज्ञात ठिकाणी सैन्याची जमवाजमव केल्याच्या वार्ता येत होत्या. महाराज जराजर्जर झाले होते. कोणत्याही क्षणी आर्यक आपले सिंहासन उलथून लावेल, याची त्यांना भीती होती.
शकारालाही याची जाणीव होती, म्हणून हल्ली त्यानं अधिकाधिक खंडणी गोळा करण्याचा सपाटा लावला होता.
कधी सत्तापालट झाला तरीही आपलं पुढचं आयुष्य सुखात जाईल, यासाठी भरपूर तरतूद त्यानं करून ठेवली होती. सर्व खंडणी तो फक्त सुवर्णाच्या रूपातच स्वीकारत असे. असं प्रचंड सोनं त्याच्याकडे जमलं होतं. मात्र हे सोनं तो राजप्रासादात ठेवत नसे. त्याचा मित्र, नगरातला सर्वात कुशल चोर शर्विलक ह्याच्याकडे त्यानं ते सगळं सोनं सुरक्षित ठेवलं होतं. शकारानंच दिलेल्या माहितीच्या आधारानं शर्विलकानं राजकोषातूनही भरपूर सोनं चोरलं होतं.
राजप्रासादाकडे जाताना अचानक त्याला मोठा गलबला ऐकू आला. खूपसे लोक हातात भाले, खड्ग, मशाली वगैरे घेऊन राजप्रासादाच्या दिशेनं धावताना त्याला दिसले. ते ‘आर्यक! आर्यक!’ असं ओरडत होते. राज्यक्रांतीचा क्षण येऊन ठेपल्याचं शकाराच्या लक्षात आलं. तो एका अंधाऱ्या बोळात घुसला. आता राजप्रासादात जाण्यात अर्थ नव्हता. त्याची पावलं शर्विलकाच्या नगराबाहेरच्या सदनाकडे वळली.
तो गल्लीबोळांतून लपतछपत जाऊ लागला. बंडखोर आता मोठ्या संख्येनं राजमार्गावर उतरले होते. शकाराच्या कानी त्यांचे ओरडणे पडत होते.थोड्याच वेळात तो शर्विलकाच्या घरी येऊन पोहोचला. शर्विलक नुकताच ‘कामगिरी’वरून परतला होता. त्यानं शकाराचं स्वागत केलं. आणि हसून म्हणाला, “हे काय शकारा? आज एवढ्या अपरात्री येणं केलंस? आज कुणी प्रिया गवसली नाही वाटतं!”

“ही विनोद करण्याची वेळ नाही शर्विलका! आर्यक आणि त्याचे विद्रोही शाथीदार राजप्राशादात घुशलेत. आता शत्तापालट अटळ आहे.” (शकार ‘स’चा उच्चार ‘श’ करत असल्यानंच त्याला शकार हे नाव पडलं होतं.)

“काय सांगतोस काय? म्हणजे तू आता कधीच राजप्रासादात परत जाऊ शकणार नाहीस. पण मग करणार तरी काय तू आता मित्रा?”

“मिशा भादरीन, मुंडन करीन. भगवी वश्त्रे परिधान करून काही काळ शंन्याशाच्या वेषात राहीन. शर्व काही श्थिरश्थावर होताच पुन्हा गृहश्थाश्रमात परतेन. पण ते जाऊ दे. माझं शुवर्ण शुरक्षित ठेवलं आहेश ना?”

“निर्धास्त राहा मित्रा. तुझं आणि माझं दोघांचंही सुवर्ण अगदी सुरक्षित आहे. मात्र आज मी केलेलं चौर्यकर्म अखेरचं. आता मी मदनिकेशी लग्न करून संसार थाटणार आणि एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून जगणार.”

“मी पण जमल्याश वशंतशेनेशी लग्न करीन म्हणतो… पण ते जाऊ दे. घरात कुठं ठेवलंश शुवर्ण? तळघरात? मला बघून खात्री करून घेऊ दे एकदा.”

“हे खंडोगणती सुवर्ण मी घरात ठेवीन असं वाटतं तुला? ते मी एका अत्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवलंय. चल दाखवतो तुला.”

दोघंही घराबाहेर पडले. थोड्या अंतरावर एक जुनं स्मशान होतं. आता ते वापरात नव्हतं. शर्विलक शकाराला स्मशानात घेऊन आला.

“इथं श्मशानात का आलोत आपण?”
“ते जुनं वडाचं झाड बघतोयस ना? चल तिकडे.” शर्विलकानं बोटानं ते झाड दाखवलं आणि दोघंही झाडाकडे आले. पारंब्यांच्या विस्तीर्ण जंजाळात शर्विलक घुसला. पारंब्यांच्या आड, झाडाच्या बुंध्याशी एक माणूस शिरू शकेल असं एक भोक होतं. शर्विलक त्यात गडप झाला आणि आतूनच हाक देऊन म्हणाला, “शकारा, आत ये.”

शकार आत शिरला. ती एक विस्तीर्ण गुंफा होती. मात्र आत अंधार गुडुप होता. शर्विलकानं चकमक झाडून तिथंच पडलेला थोडासा पालापाचोळा पेटवला. त्या प्रकाशात शकाराला सोन्याच्या चमचमत्या राशीच्या राशी, खच्चून भरलेल्या संदुका दिसल्या. दहाबारा गाडे भरतील इतकं सोनं होतं ते.

“अत्यंत सुरक्षित जागा आहे ही,” शर्विलक म्हणाला, “भुताखेतांच्या भीतीनं कुणी पाऊलही टाकत नाही इथं.” शकार आश्वस्त झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी भगवी वस्त्रे परिधान केलेला, डोक्याचा तुळतुळीत गोटा केलेला, गुळगुळीत श्मश्रू केलेला एक संन्यासी राजमार्गावरून जात होता. नव्या राजाच्या स्वागतासाठी संपूर्ण उज्जयिनी नगरी रांगोळ्या, फुलातोरणांनी शृंगारली होती. जागोजागी गुढ्या उभारल्या होत्या. प्रजाजनही साजशृंगार करून उत्फुल्ल चेहऱ्यांनी राजप्रासादाकडे निघाले होते. आज नवे महाराज प्रजाजनांना संबोधित करणार होते.
राजप्रासादासमोर जमलेल्या गर्दीत तो संन्यासी मिसळून गेला. थोड्याच वेळात प्रासादाच्या सौधात महाराज आर्यकांचं आगमन झालं. प्रजाजनांनी त्यांचं हर्षोत्फुल्ल स्वागत केलं. टाळ्यांचा गजर बराच वेळ होत राहिला. मग महाराजांनी हात वर केला तशी प्रजाजनांत शांतता पसरली.
महाराज बोलू लागले, “प्रजाजनहो, तुम्ही केलेल्या स्वागतामुळे मी भारावून गेलो आहे.
मला हे सांगताना अत्यंत दुःख होतं की, पूर्वीचे महाराज पालक आणि त्यांचा संपूर्ण परिवार या क्रांतीत बळी पडला आहे. मात्र राजशालक शकार आमच्या हाती गवसला नाही. थोड्याच दिवसांत त्याचाही शोध लागेल, अशी मला खात्री आहे…” महाराज बराच वेळ बोलत राहिले. शेवटी त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली.

“प्रजाजनहो, बंडखोर, चोर आणि तस्कर यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही असा निर्णय घेत आहोत की, यापुढे राज्यात सुवर्णाला केवळ पितळेचे मूल्य असेल. हा निर्णय लगेच, म्हणजे या क्षणीच अमलात येईल.” हे ऐकताच गर्दीत महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा दुमदुमू लागल्या. त्या गडबडीत घेरी येऊन पडलेल्या संन्याशाकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. महाराज परत आत गेले. प्रजाजनही अतीव समाधानाने आपापल्या घराची वाट चालू लागले.

संन्यासी कसाबसा उठला. त्यानं स्वतःला सावरलं आणि बाजारात पितळेच्या मोडेचा भाव काय असेल, याचा विचार करीत तो नगराबाहेर जाऊ लागला. आता त्यानं कायमचं हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला होता.
कधी सत्तापालट झाला तरीही आपलं पुढचं आयुष्य सुखात जाईल यासाठी भरपूर तरतूद शकारानं करून ठेवली होती. सर्व खंडणी तो फक्त सुवर्णाच्या रूपातच स्वीकारत असे. असं प्रचंड सोनं त्याच्याकडे जमलं होतं.

गजू तायडे
gajootayde@gmail.com
बातम्या आणखी आहेत...