आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पछाडलेपणाचा दाक्षिणात्य अवतार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडील मानसशास्त्रात ज्या महत्त्वाच्या संकल्पनांची चर्चा वारंवार होते, त्यात पछाडणे (हिस्टेरिया) ही एक महत्त्वाची संकल्पना मानली जाते. पण हे पछाडणे जेव्हा संपूर्ण समूहाचे होते आणि सामूहिक पछाडणी बनते, तेव्हा ती फक्त व्यक्तिगत राहात नाही तर संपूर्ण समूहाची आणि समाजशास्त्राची बनते. याची कारणे शोधण्याचा अथक प्रयत्न सुरू असला तरी नक्की कारणे अजूनही सापडत नाहीत.

आपल्याकडे दाक्षिणात्य संस्कृती हे सामूहिक पछाडणीचे उदाहरण म्हणून अनेक वेळा प्रस्तुत केले जाते. पण प्रत्यक्षात ते तितकेसे खरे नाही. मानसशास्त्राच्या मते, गणपतीने दूध पिणे हा जो काही इव्हेंट महाराष्ट्रात घडला, तोही सामूहिक पछाडणीचे उदाहरण आहे. युरोपमध्ये तर तेराव्या शतकापासून सामूहिक पछाडणीची अनेक उदाहरणे समोर येतात. योगायोगाने ही उदाहरणे प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माशीच निगडित आहेत. उदाहरणार्थ, नन्सचे मांजर बनणे. या उदाहरणात प्रथम एका ननने मांजरासारखे दोन हात जमिनीवर ठेवून चालायला सुरुवात केली आणि अनेक चर्चमध्ये नन्स मांजरासारख्या रांगू लागल्या. तेव्हा युरोपीय लोकांची सामूहिक पछाडणी होत नाही, असे समजण्याचे कारण नाही.

भारतात या संदर्भात देण्यात येणारे जे मुख्य स्पष्टीकरण आहे ते भक्तीचे आहे. भारतात भक्ती हा ९९ टक्के लोकांचा जगण्याचा मार्ग आहे. तादात्म्य ही भक्तीची आद्य अट आहे. शंकराचार्यांनी दक्षिणेत इष्ट देवतेची संकल्पना परिचित केली. त्या संकल्पनेनुसार भक्ताने त्याला इष्ट वाटेल अशी देवता निवडावी आणि भक्तीशी, त्या इष्ट देवतेशी तादात्म्य पावून मोक्ष मिळवावा. शंकराचार्यांचा हा मार्गच आताच्या सामूहिक पछाडणीमागे अप्रत्यक्षरीत्या काम करताना दिसतो. भक्ताला इष्ट देवता निवडण्याचे स्वातंत्र्य असल्याने तो एखादा राजकीय पुरुष किंवा चित्रपट अभिनेता, अभिनेत्रीही इष्ट देवता म्हणून निवडू शकतो. त्यामुळे साहजिकच सामूहिक पछाडणीला एक प्रकारची धार्मिक मान्यता मिळते.
उत्तरेकडे याज्ञिक संस्कृती असल्याने यज्ञ हाच मुख्य संस्कार मानला जाई. पण कालांतराने दक्षिणेकडचा शैवभक्तांनी सुरू केलेला भक्तीचा प्रवाह प्रथम वैष्णव होत नंतर संपू्र्ण भारतभर पसरला. मात्र यज्ञसंस्कृती संपूर्ण नाहीशी न झाल्याने सामूहिक पछाडणीला उत्तरेकडे धार्मिक मान्यता नाही. हा फरकच दाक्षिणात्य व उत्तरी संस्कृतीतला एक महत्त्वाचा फरक बनून राहिला आहे. सिग्मंड फ्रॉईडने माणूस भावना दाबून ठेवतो, असा सिद्धांत मांडला खरा; पण दक्षिणेकडे भावना दाबून ठेवण्याऐवजी संपूर्ण समाजात त्या बिनधास्त व्यक्त करणे हे सुसंस्कृत मानले जाते. साहजिकच रॅशनल लोकांना दाक्षिणात्य संस्कृती आततायी वाटते. प्रत्यक्षात हे सगळे मानदंड सापेक्ष असतात.

पण समस्या निर्माण होते, जेव्हा एखादा सामूहिक पछाडणीतला गुनसेकरन नावाचा माणूस (संदर्भ : बीबीसी न्यूज- २५ फेब्रुवारी २००३) आपली निष्ठा प्रकट करण्यासाठी स्वत:ची बोटे कापून घेतो किंवा शिहान हुसैनी नावाचा कराटेपटू (संदर्भ : इंडियन एक्स्प्रेस- २४ फेब्रुवारी २०१५) स्वत:ला खिळे ठोकून क्रुसावर चढवून घेतो. भक्तांनी जयललितांच्या बाबतीत वाढदिवसाच्या प्रसंगी वा संकटसमयी असे आणि यासारखे अनेक प्रकार यापूर्वी केल्यामुळेच सामूहिक पछाडणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किंबहुना, जयललिता यांच्या मृत्यूच्या धक्क्याने ७०हून अधिक जण (केंद्रीय तपास यंत्रणेच्या अंदाजानुसार हा आकडा ३० इतका आहे.) मरण पावल्याचा दावा अण्णा द्रमुक पक्षाने केला आहे. इतकेच नव्हे तर या सर्वांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३ लाख मदतनिधीही जाहीर झाला आहे. पूर्वी जसे जयललितांच्या भक्ताने हाताची बोटे कापून घेतली, तसाच प्रकार त्यांच्या मृत्यूनंतरही घडल्याचे पुढे आले आहे.
या वेळी बोटे छाटून घेणारा मकाली नावाचा गृहस्थ तिरुपूर जिल्ह्यातल्या उगयानूर गावचा रहिवासी आहे. पक्षाने त्याच्या उपचारांची जबाबदारी घेतल्याचेही जाहीर केले आहे. हा सगळा पक्षाची आणि जयललिता यांची प्रतिमा आणखी उजळवण्याचा राजकीय डावही असू शकतो. पण एक मात्र नक्की, की भक्तीला श्रद्धा लागते, पण ती जेव्हा अतिश्रद्धा बनते तेव्हा बळी देणे, बळी जाणे आणि बळी घेणे अशा तीन प्रकारे ती विकृत होत जाते.
अनेकदा त्या व्यक्तीला आपण काय केले, हे पूर्णपणे कळत नसते आणि आपल्या कृतीला समर्थनीय ठरेल असे स्पष्टीकरण पुरविण्यात मात्र ती वाकबगार असते. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांचा घेतलेला बळी किंवा मुस्लिम धर्मासाठी बळी जाण्यास अनेक सुसाइड बॉम्बर्सने दाखविलेली तयारी किंवा आजही आपले ईप्सित साध्य व्हावे म्हणून दिला जाणारा नरबळी, या सर्वच विकृती आहेत. या विकृती सामूहिक पछाडणीमध्ये थोड्या मऊमुलायम होतात, एवढंच. म्हणजे स्वत:चा बळी देण्याऐवजी स्वत:ची बोटे देणे वगैरे. एका अर्थाने धर्ममीमांसेत ज्याला रिप्लेसमेंट म्हटले जाते, तसा हा प्रकार असतो.

प्रश्न असा येतो की, एखादी व्यक्ती हे सर्व का करते? सर्वसाधारणपणे दक्षिणेत एखाद्या नेत्यावर किंवा एखाद्या चित्रपट अभिनेता/अभिनेत्रीवर निष्ठा दाखविण्यासाठी हे वारंवार केले जाते. कधीकधी आपल्या नेत्याच्या होणाऱ्या वेदना या आपण अंगावर घेतल्या तर त्याच्या वेदना कमी होतील, अशा गैरसमजापोटीही हे केले जाते. सामूहिक पछाडणीचा सर्वात कॉमन प्रकार म्हणजे कॉपीज्वर चढणे. कॉपीज्वरात पहिला करतो म्हणून दुसरा त्याची कॉपी म्हणून सेम कृती करतो आणि दुसरा म्हणून तिसरा, तिसरा म्हणून चौथा असे वाढतच जाते.
वर उल्लेख केलेल्या नन्सच्या प्रकारात एका ननने केले म्हणून दुसरीने केले, दुसरीने केले म्हणून तिसरीने केले, असा प्रकार घडलेला दिसतो. जयललितांच्या बाबतीत सामूहिक रडण्याबाबत हा प्रकार घडताना दिसतो. एक रडते म्हणून दुसरी, दुसरी म्हणून तिसरी व्यक्ती रडते आणि रडण्याचा काॅपीज्वर वाढतच जातो. ही सगळी कारणे अॅक्टिव्हेट व्हायला आवश्यक असलेली पार्श्वभूमी त्या संस्कृतीतच असावी लागते. उदाहरणार्थ त्या व्यक्तीचे असाधारण व्यक्तिमत्त्व. जयललितांचा विचार केला तर हे एक्स्ट्रॉऑर्डिनरी व्यक्तिमत्त्व होते, हे मान्यच करावे लागते.
सौंदर्य आणि बुद्धी यांचा हा अप्रतिम संगम होता. अनेकांना कदाचित माहीत नसेल, पण जयललिता या दहावी बोर्ड एक्झामिनेशनमध्ये संपूर्ण तामीळनाडू राज्यात पहिल्या आल्या होत्या. त्या काळातल्या त्या अशा एकमेव डान्सर होत्या, ज्यांना भरतनाट्यमपासून मोहिनीअट्टमपर्यंत सर्व काही येत होते. त्यांचे सौंदर्य तर वादातीतच आहे. अत्यंत तीक्ष्ण बुद्धी असल्याने पाच-दहा मिनिटांत त्या कुठल्याही सीन कॅच करत असत. त्यामुळेच एमजीआरसारखे व्यक्तिमत्त्व त्यांच्या प्रेमात पडले. सर्वसाधारणपणे फिल्मी नट्या म्हणजे माठ असतात, असा अनेकांचा गैरसमज आहे. जयललिता या सगळ्या गैरसमजांना पुरून उरणाऱ्या अभिनेत्री होत्या. डिबेटमध्ये त्यांना हरविणे हे अनेकदा अशक्य होई. आता अशा व्यक्तीची व्यक्तिपूजा थांबवावी कशी? कारण एमजीआरबरोबर त्यांनी तब्बल २८ फिल्म्स हिट दिल्या होत्या. त्या काळात सलग ११ चित्रपट हिट देण्याचा विक्रम त्यांच्या नावे होता, जो पुढे राजेश खन्नाने सलग १५ हिट चित्रपट देऊन मोडला. यश, सौंदर्य, बुद्धिमत्ता, एमजीआरबरोबरचे अत्यंत रोमँटिक असे प्रेमप्रकरण यामुळे जयललिता या एका पिढीच्या गळातला ताईत बनल्या, यात नवल ते काय?
त्यामुळे साहजिकच त्यांचा महिमा वाढतच गेला आणि त्या शेवटी काही जणांसाठी इष्ट देवता झाल्या.

दाक्षिणात्य संस्कृतीत राजन्य म्हणजे देव ही ठाम श्रद्धा आहे. अशा प्रकारची श्रद्धा पूर्वीच्या अनेक राजवटींमध्ये दिसते. उदा. इजिप्तमध्ये फराह हा फक्त राजा नव्हता तर तो देवही होता. दक्षिणेत राजा हा शंकर किंवा विष्णू यांचा अवतार मानला गेल्याने त्याची मूर्तिपूजा करणे हे श्रेयस्कर मानले जाते. जयललिता पुढे मुख्यमंत्री बनल्याने त्यांंना दुहेरी पूजेचा फायदा झाला. आणि त्या राजन्य झाल्या.

दक्षिणेकडे मूर्तिपूजा ही अटळ मानली जाते. मूर्तिपूजा आपण ग्रीकांकडून घेतली, असे प्रबोधनकार ठाकरेंनी म्हटले आहे. पण प्रत्यक्षात हे असत्य आहे. अलीकडेच झालेल्या अनेक उत्खननांतून ग्रीकपूर्व काळातील अनेक मूर्ती दक्षिणेत सापडलेल्या आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, मूर्तिपूजा ही दक्षिणेत किमान साडेतीन हजार वर्षे सुरू आहे. साहजिकच कुठलेही इष्ट दैवत सापडले की त्याची मूर्ती थाटायची, ही दाक्षिणात्य परंपरा आहे. अलीकडच्या काळात त्याचा विस्तार कटआऊटच्या रूपाने झाला आणि तो भारतभर पसरला.
या सगळ्या गोष्टींमुळे साहजिकच दक्षिणेमध्ये आपल्या नेत्यांचे कटआऊट‌्स उभारणे, त्यांची मंदिरे बांधणे आणि आपली सामूहिक पछाडणी समूहात उघडपणे उघड करणे, हा अभिव्यक्तीचा एक समाजमान्य उपचारच ठरून गेला आहे. त्यामुळे इष्ट देवता बदलल्या तरी सामूहिक पछाडणी तशीच राहते. एमजीआर असोत किंवा जयललिता, दोघांनाही या बाबतीत समानच न्याय दिलेला दिसतो.

हे सर्व कमी म्हणूनच की काय, दाक्षिणात्य कलापरंपरेत जेव्हा अभिनेता किंवा अभिनेत्री अभिनय करते तेव्हा तिच्यात एक दिव्यांश उतरतो, अशी प्राचीन समजूत आहे. त्यामुळे साहजिकच कथकली संपली तरी अभिनेत्याला देवाचेच रूप मानून पुजणारे लोक तिथे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. एम. जी. रामचंद्रन किंवा एन. टी. रामाराव जेव्हा एखाद्या देवतेची भूमिका करत, तेव्हा त्यांच्यात त्या देवतेचा अंश उतरतो (उदाहणार्थ राम, कृष्ण, बालाजी इत्यादी देवता), असे जनता मानत होती. त्यामुळे त्या देवतेइतकाच मान त्या नटांना किंवा नटींना मिळत असे व आजही मिळतो. त्यामुळे त्या नटनट्यांनाही असे वाटते की, आपल्यात हा अंश उतरत असेल तर आपण जनतेचे काही भले केले पाहिजे.
याच्या परिणामी कुठलाही दाक्षिणात्य नट अथवा नटी हे आपल्या भक्तांसाठी काही ना काही चांगल्या गोष्टी करताना दिसतात. त्यामुळे दक्षिणेत ज्यांनी चार शाळा काढल्या नाहीत, असा सुपरस्टार शोधूनही सापडत नाही. अगदी पवनकल्याणसारखा धसमुसळा नायकही जनहिताची अनेक कामे करताना तिथे दिसतो. या सगळ्यामुळेच पुजणारे पुजतात, पण ज्यांची पूजा होते, तेही देवतेप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करतात.

हे भक्त आणि देव यांच्यातील देणेघेणे असते आणि अनेकदा दक्षिणेबाहेरच्या लोकांना हे काय चालले आहे, तेच कळत नाही. वास्तविक हा एक प्रेमाचा व्यवहार आहे आणि व्यावहारिक प्रेमही आहे. जयललिता यांना हे भाग्य पुरेपूर लाभले, हाच या सगळ्याचा अर्थ आहे.
श्रीधर तिळवे
shridhar.tilve1@gmail.com
बातम्या आणखी आहेत...