आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही अग्निशिखा प्रज्‍वलित ठेवा : डॉ. महाजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
६ व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. छाया महाजन यांनी मधुरिमाला दिलेल्या विशेष मुलाखतीत आजच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. दैनंदिन जीवनात माणूस म्हणून येणारे अनुभव अत्यंत धक्कादायक असून त्यांना सामोरे जाताना नवोदित लेखिकांनी आपली लेखणी नेहमी तेवत ठेवावी. तसेच केवळ आपल्या अनुभवांपुरते मर्यादित न राहता, परिसरातील इतरही घटना-अनुभवांचा मागोवा घेत परिपक्वतेने लिखाण करावे, असे मत मांडले. लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मराठवाड्यातील साहित्यिकांची सद्य:स्थिती आणि आगामी काळातील आपली ध्येयधोरणे यांविषयीचे छाया महाजन यांचे मत.. त्यांच्याच शब्दांत..

माध्यमांवर झळकणारा दहशतवाद केवळ जागतिक पातळीवर न राहता घराघरात, आपल्या घरात येऊन ठेपलाय. त्यामुळे माणूस स्वार्थी बनला. बाहेर काहीही झाले तरी चालेल, माझ्या घराची कवाडं मी बंद करेन, अशी वृत्ती फोफावत चालली आहे. या भेकड वृत्तीपायी प्रत्येक जण आपल्या कुटुंबापुरता विचार करतोय. विहिरीत पडलेली माकडीण अखेरीस पिलाच्या पाठीवर पाय देऊन आपले प्राण वाचवते, ही गोष्ट हल्लीच्या जगात तंतोतंत खरी ठरतेय. साहित्यातही दहशतवादाचे प्रतिबिंब पडत आहे; पण लेखिका संमेलनाची अध्यक्षा या नात्याने लेखिकांना मला काही सांगायचे आहे. मैत्रिणींनो, आपल्याला आलेले अनुभव लेखणीतून कागदावर उतरवण्यापूर्वी लिखाणाची प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. एखाद्या परिस्थितीवर भाष्य करायचे असल्यास, त्याविषयीचे विचार आपल्या मनात घोळतात. साचतात. ते फिल्टर होतात.

ही प्रक्रिया सुरू असतानाच याच विषयावरील आपल्या सभोवताली घडणारे अनुभव शेअर करा. वाचन, श्रवण करा. चिंतन करा. लेखणीतून उतरू पाहणारा आपला विचार या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर कागदावर उतरल्यास तो अधिक परिपक्व होईल. मग कधी तो एखाद्या पात्राचा चेहरा धारण करेल, तर कधी कवितेच्या रुपकांतून व्यक्त होईल.
आज आपल्यासोबत इतरही लोक काय लिहीत आहेत, त्यांच्या तुलनेत आपल्या लिखाणाचा दर्जा काय आहे, हे जाणून घ्यायची इच्छा सर्वांनाच होत आहे. यासाठी संवादाची मोठी गरज भासते आणि लेखिका साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ही गरज मसापने पूर्ण केली आहे, असं मला वाटतं. हा शब्दोत्सव, साहित्योत्सव नवोदित लेखिकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे.

नुकत्याच कुठे व्यक्त होऊ लागलेल्या मराठवाड्यातील लेखिकांनी आपापल्या परीने उत्तम कविता सादर केल्या; पण समस्त लेखिका आणि विशेषत: कवयित्री मैत्रिणींना माझं कळकळीचं सांगणंं आहे. काव्य प्रकार हा तसा खूप कठीण आहे. त्यामुळेच हल्ली मुक्त छंद किंवा गद्याचे माध्यम जास्त हाताळले जात आहे. कविता हा केवळ एखाद्या अनुभवावर भाष्य करणं, असा प्रकार नसून त्यातून सघन विचार मांडला गेला पाहिजे. कवितांच्या दोन ओळींमधील अर्थ (बिटवीन द लाइन्स) वाचकाला प्रतीत झाला पाहिजे. कवितेतून एक थॉट मिळावा. हा विचार बुद्धीला, मनाला वैचारिक चालना देणारा असावा. कवितेतून वेदनांचं काहूर माजतं, कवितेने मन अस्वस्थ होतं. ग्रेसची कविता दुर्बोध वाटते; पण त्यातून काही सांगण्याचा, प्रबोधनाचा प्रयत्न केला आहे. आपल्या अनुभवाशी, मतांशी प्रामाणिक असेल तरच कविता या हृदयीची-त्या हृदयी पोहोचते.

नवोदित लेखिकांनी केवळ लिखाण करून थांबू नये. आपल्या सकस लिखाणाचे उत्तम मार्केटिंग करावे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाही वापर करून घ्यावा. पूर्वी साहित्यनिर्मितीनंतर प्रकाशनाचे मोठे आव्हान होते. मात्र, इंटरनेट क्रांतीमुळे लेखनाला मोठे व्यासपीठ मिळाले आहे. कोणत्याही खर्चाविना ई-बुकच्या माध्यमातून आपले लिखाण प्रसारित करता येते. माझी काही पुस्तके मोबाइल बुकच्या माध्यमातून प्रसारित झाली आहेत. या कंपन्यांना केवळ डीटीपी करून दिल्यास पुढील सर्व प्रक्रिया ते करतात.

मराठवाड्यातील लेखिकांना प्रोत्साहन देण्यात माध्यमांचीही मोठी भूमिका आहे, असं मला वाटतं. मराठवाड्यातील कानाकोपऱ्यात दडलेल्या सकस लेखनाला माध्यमांनी शोधून काढायला हवे. अनंत भालेरावांनी मराठवाडा वृत्तपत्रातून मराठवाड्यातील लेखिकांना मोठी संधी दिली. त्यामुळेच नवोदितांचे साहित्य पुढे आले.

माध्यमांनी लेखिकांना विविध विषयांवर भूमिका मांडायला प्रोत्साहित करावे. विविध घटनांचे केवळ बातम्यांतून वार्तांकन करताना त्यांचे अनुभव भावनिक पातळीवर कुठे तरी व्यक्त होणे गरजेचे आहे. यासाठी माध्यमांतील महिलांसाठीही खास कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा माझा मानस आहे. लेखिका संमेलनाच्या निमित्ताने निर्माण झालेले व्यासपीठ ही अग्निशिखा आहे, हिला प्रज्वलित ठेवण्याचे काम प्रत्येक साहित्यघटकाचे आहे, तसेच रसिकांचेही.