आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक विशेष: गेट...सेट...गो...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ हा चित्रपट वैश्विक मान्यता मिळवण्याच्या उद्देशाने ऑस्कर स्पर्धेत सामील होत आहे. मराठी-अमराठी अशा दोन्ही वर्गातल्या ज्या प्रेक्षकांनी ‘कोर्ट’ पाहिला आहे त्या सगळ्यांना हा जितका ‘कोर्ट’च्या निर्मितीत सामील कलावंत-तंत्रज्ञांचा सन्मान वाटतोय, तितकाच ‘कोर्ट’ बघितलेल्या प्रत्येकाच्या रसग्रहण क्षमतेचा, समृद्ध कलाजाणिवांचाही सन्मान वाटतो आहे. व्यवस्थेच्या दडपशाहीवर आणि त्यातून सामान्य माणसांच्या वाट्याला येणाऱ्या हतबलतेवर प्रखर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने आपली गुणवत्ता भारताच्या परिघात सिद्ध केली आहे, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षकांपुढे आपले वेगळेपण सिद्ध करताना हे आव्हान शतपटीने वाढणार आहे. ते आव्हान नेमके कसे असणार आहे? स्पर्धेचा दर्जा आणि पातळी नेमकी कशी असणार आहे? आणि या निमित्ताने एक चित्रपटरसिक आणि समाज म्हणून कोणती संधी चालून आली आहे? यांचा वेध घेणारा हा विशेष लेख…
ऑस्कर स्पर्धा ही व्यावसायिक चित्रपटांची स्पर्धा मानली जाते आणि दरवर्षी लोकप्रिय आणि आर्थिक कमाई केलेल्या चित्रपटांचा या नामांकनात प्रामुख्याने सहभाग असतो. वादग्रस्त आशयघन चित्रपट आणि रंजनप्रधान लोकप्रिय चित्रपट यांमध्ये जर स्पर्धा असली तर ऑस्करचं पारडं हे लोकप्रिय चित्रपटाकडे झुकलेलं आपल्याला दिसतं. यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही. ऑस्करचा निकाल हा मोजकी ज्युरी ठरवत नाही, तर अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स अॅण्ड सायन्सेसचे शेकडो सदस्य मतदानाने ठरवतात आणि या सदस्यांनी चित्रपट पाहणं, त्यावर मत बनवणं, यासाठी निर्माता वितरकांपुढे जे आव्हान असतं, ते व्यावसायिक निर्माते अधिक चांगल्या पद्धतीने पेलू शकतात.

त्यामुळेच यंदा पीटर जॅक्सनच्या ‘हॉबिट’ चित्रत्रयीचा तिसरा भाग, क्रिस्टफर नोलनचा प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांनी डोक्यावर घेतलेला ‘इन्टरस्टेलर’ यांसारख्या श्रीमंत चित्रपटांना बाजूला ठेवत प्रायोगिक वळणाचे चित्रपट पुरस्कार नामांकनात बाजी मारू शकले, हेच खूप आश्चर्यकारक होते.

यंदाची नामांकनाची यादी फार खास होती आणि लिहायचंच तर त्यातल्या प्रत्येक चित्रपटावरही पानंच्या पानं लिहिता येतील. मात्र तो हेतू नाही. प्रमुख नामांकनातले सारेच चित्रपट उत्तम आणि पाहण्यासारखे होते, जे क्वचित घडताना दिसतं. त्यातल्या त्यात चुरस होती ती अलेहान्द्रो इन्यारितूचा ‘बर्डमॅन’ आणि रिचर्ड लिंकलेटरचा ‘बॉयहूड’ या दोन चित्रपटांत. या दोन्ही चित्रपटांनी ऑस्करआधी अनेक पारितोषिकं मिळवलेली होती.

त्यातही विशेष म्हणजे, ऑस्करचा संकेत देणारा गोल्डन ग्लोब पुरस्कार यात ‘बॉयहूड’ला (ड्रामा कॅटेगरीत) मिळाला होता, तर समांतर वळणाच्या चित्रपटांचं इण्डिपेन्डन्ट स्पिरीट अवॉर्ड हे ‘बर्डमॅन’ला मिळालं होतं. दोन्ही चित्रपट खास लक्षवेधी आणि मूलभूत प्रयोग करणारे होते, दोन्ही चित्रपटांच्या चाहत्यांना खात्री होती, की ऑस्कर त्यांच्या आवडत्या चित्रपटालाच मिळणार आणि अखेर ते ‘बर्डमॅन’ला मिळाल्यावर ‘बॉयहूड’चा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज झाला. मला यातल्या कोणालाही पारितोषिक मिळतं तरी आश्चर्य वाटलं नसतं, पण माझी पहिली निवडदेखील ‘बर्डमॅन’ हीच होती.

मला हे दोन्ही चित्रपट आवडले असले, तरी माझ्यासाठी खरं सरप्राईज पॅकेज होतं, ते डेमिअन चॅजेलचा ‘व्हिपलॅश’. ‘व्हिपलॅश’मधल्या टोकाला जाणाऱ्या शिक्षकाच्या भूमिकेसाठी जे. के. सिमन्सना ऑस्कर मिळालं. तसंच संकलन, साऊंड, मिक्सिंग अशीही पारितोषिके मिळाली, मात्र ती मिळाली नसती तरीही हा अचाट चित्रपट केवळ त्यातल्या गोष्ट मांडण्याच्या उत्कंठावर्धक पद्धतीसाठीही पाहण्यासारखा आहे. काहींना असंही वाटतं, यंदाच्या ऑस्करमध्ये हाच सर्वोत्कृष्ट चित्रपट होता, आणि माझ्या मते जरी ‘बर्डमॅन’ची निवड योग्य असली, तरी ‘व्हिपलॅश’च्या एकूण गुणवत्तेबद्दल माझ्याही मनात जराही शंका नाही.

ऑस्कर नीट कव्हर करावं म्हटलं की, प्रचंड प्रमाणात चित्रपट पाहायला लागतात, हे तर खरंच पण सामान्यत: (यंदाचा अपवाद धरून) मुख्य वर्गापेक्षा परभाषिक चित्रपट पाहण्यातच खरा आनंद असतो. भारतीय चित्रपट हा बहुधा यात पाहायला मिळत नाही, याचं वाईटही वाटतं.
असं का व्हावं, याची चर्चा नित्य केली जाते आणि त्याचं समाधानकारक उत्तर कधीही दिलं जात नाही. ते दिलं न जाण्याचं एक कारण हे म्हणता येईल की, यात काहीच रहस्य नाही. जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यात शोधण्यासारखं काही नाही.

काही गोष्टी उघड आहेत, त्या अशा. आपला मुख्य धारेतला हिंदी चित्रपट सोडला, तर आपल्याकडे विषय आणि वैविध्य यात जराही मागे नसणारा चित्रपट प्रादेशिक आणि हिंदी समांतर प्रवाहात पाहायला मिळतो. आपण मुख्य वर्गातल्या पुरस्कारांसाठी प्रचंड बजेट्स आणि स्टार्सशी स्पर्धा करू शकणार नाही, असं आजवर चित्र होतं. पण आता ‘बॉयहूड’ आणि ‘व्हिपलॅश’सारख्या चित्रपटांना नामांकनात स्थान असेल, तर ते मुद्देही आज बाद ठरलेत. पण ते एक वेळ सोडलं, तरीही आपला चित्रपट परभाषिक चित्रपटांच्या पुरस्कारापासून इतकी वर्षं इतक्या प्रमाणात का दूर राहावा, याला पटण्यासारखं स्पष्टीकरण नाही. आता हे मी एक वेळ समजू शकेल, की ऑस्करला अनाठायी महत्त्व आल्याने त्यांच्या पुरस्काराकडे एक पॉलिसी म्हणून दुर्लक्ष करणं. पण तसंही नाही, कारण दर भारतीय चित्रकर्त्याला ऑस्करची स्वप्नं ही पडतच असतात आणि दर ऑस्करच्या जवळपास येणाऱ्या चित्रपटविषयक चर्चेची सुरुवात किंवा शेवट हा भारताला ऑस्कर कधी, या प्रश्नानेच होत असतो.

एक गोष्ट आपण पहिल्याप्रथम लक्षात घ्यायला हवी की, दोष हा आपल्या चित्रपटांमध्ये नाही, तर निवडप्रक्रियेत आहे. आपल्याला अमुक एका स्पर्धेत जिंकायचं, तर त्या स्पर्धेत जिंकण्याची शक्य तितकी अधिक शक्यता असेल असाच स्पर्धक निवडायला हवा. बुद्धिबळपटूला धावण्याच्या शर्यतीत उतरवलं, तर जिंकेल थोडाच!

ऑस्करच्या परभाषिक स्पर्धेत जिंकण्यासाठी काय लागतं, याचे निकष सोपे आहेत. एक तर विषय प्रादेशिक तरीही युनिव्हर्सल लागतो. म्हणजे तो चित्रपट ज्या प्रदेशात बनला, त्या प्रदेशाची लक्षणं त्यात दिसावी लागतात, पण तो जगभरातल्या प्रेक्षकांना मूलभूत पातळीवर परका वाटणार नाही, हेदेखील पाहावं लागतं. फार चकाचक, बेतीव चित्रपट चालत नाहीत, अधिक वास्तववादी, अर्थपूर्ण निर्मिती लागते. विषय मानवतावादी असेल तर त्याचा फायदा मिळतो.
आता या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ मिळालेला आणि अनेक महोत्सवांमध्ये मिळून अठराच्या आसपास पारितोषिकं मिळवलेला ‘कोर्ट’ चित्रपट पुढल्या ऑस्करसाठी निवडला जाणं, ही एक समाधानकारक गोष्ट आहे. हा आशय आणि सादरीकरण या दोन्ही बाबतींत ऑस्करसाठी अतिशय योग्य कॅण्डिडेट आहे.
ऑस्कर कमिटी डिसेंबरच्या मध्यावर परदेशी विभागासाठी नऊ प्रवेशिकांची घोषणा करेल. त्यानंतर जानेवारीच्या मध्यावर या विभागातली पाच नामांकने जाहीर होतील. हंगेरीच्या ‘सन ऑफ साऊल' या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या जाणकारांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या वेळच्या अमोल पालेकरांच्या अध्यक्षतेखालच्या, आणि ज्येष्ठांबरोबरच रवी जाधव, डॉ. बिजू, अब्बास टायरवाला असे नव्या दमाचे चित्रकर्मी असणाऱ्या समितीने आपलं काम चोख केलेलं आहे. अर्थात, हे केवळ पहिलं पाऊल आहे. ‘कोर्ट’च्या टीमपुढे आता खरं आव्हान आहे, ते तिथे गेल्यावर आपला ठसा उमटवण्याचं, जे तसं कोणासाठीही अवघड असंच आहे. या विभागात दर देशातून एक उत्तम सिनेमा आल्याने मोठी स्पर्धा तर असते. या साऱ्या चित्रपटांमधून नऊ सिलेक्ट केले जातात आणि पुढे एक छोटी कमिटी त्यातून पाच जणांची निवड करते. विजेता निवडण्यासाठी पूर्वी एक अट होती, ती म्हणजे, मतदान करणाऱ्या सदस्यांनी सर्व नामांकनप्राप्त चित्रपटांना थिएटरमध्ये पाहिलेलं असायला हवं. याचं कारण होतं ते अर्थात सर्वांना एक निकष लागावा हे, पण त्यामुळे चित्रपटनिर्मिती संस्थांची पंचाईत होत असे. अधिक स्क्रीनिंग्ज आणि त्यात अधिक सदस्य बोलावणं हे खर्चिक तर होतच, वर त्यासाठी लॉबिंगचीही गरज पडत असे. हल्ली हा नियम शिथिल करून मेंबर्सना डिव्हीडी स्क्रिनर्स पाठवले जातात. तरीही आपला चित्रपट या मंडळींनी आवर्जून पाहावा, आपलं नाव त्यांच्या कानावर पडत राहावं, यासाठी अमाप श्रम निर्मात्यांना पडतातच. खर्चही होतो. आता हा देशाच्या नावाचा प्रश्न असल्याने त्यात मोठ्या वितरणसंस्था, चित्रपटसंस्था यांनाही मदतीसाठी योग्य नामोल्लेखासह गुंतवण्याचे प्रयत्न व्हायला काय हरकत आहे. खरं तर हे जरूर व्हायला हवं. आणि हे करण्यासाठी ‘कोर्ट’ एवढा चांगला चित्रपट आपल्याला दर खेपेस मिळेलसं नाही. असं होऊ शकलं, तर ऑस्कर हे केवळ स्वप्नच उरायचं नाही. तरीही, ऑस्कर पुरस्कारांबद्दल आपल्याकडे दोन तट आहेत. एक, या पुरस्कारांना डोक्यावर घेणारा आणि दुसरा, त्यांच्याकडे फॅशनेबली दुर्लक्ष करणारा. माझ्या मते, हे दोन्ही दृष्टिकोन अपूर्ण आहेत. ऑस्कर पुरस्कार हे व्यावसायिक चित्रपटांचं प्रतिनिधित्व करतात हे मान्य केलं, तरीही ते ज्या प्रकारे जगभर पाहिले जातात, त्यामुळे ही व्यावसायिकताही जगभरच्या प्रेक्षकांना पटणारी, काहीशी युनिव्हर्सल आहे, हे मान्य केलेच पाहिजे. जो चित्रपट इतक्या विविध प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांच्या, पार्श्वभूमीच्या लोकांशी संवाद साधतो, त्यात गुणवत्ताच नाही, असं म्हणणं हे योग्य वाटत नाही. दुसरं म्हणजे, व्यावसायिक निकषांवर पाहता त्यात जितकं म्हणून वैविध्य साधता येईल आणि जितक्या प्रामाणिकपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करता येईल तितकं करण्याचा अमेरिकन चित्रपटांचा प्रयत्न असतो. विषयांमधला वेगळेपणा आणि चित्रप्रकारानुसार विभागणी, निर्मितीमूल्यांमधली (आवश्यक तेव्हा - आवश्यक तितकी) श्रीमंती, अभिनयाचा कस लावणारी नटमंडळी आणि व्यावसायिक चौकटीत वर्षानुवर्षे काम करतानाही प्रयोग करत राहणारे हिचकॉकपासून स्कोर्सेसीपर्यंत शेकडो उत्तम दिग्दर्शक हा अमेरिकन चित्रपटांच्या केवळ व्यावसायिक चौकटीचा भाग. त्या पलीकडे असणारा इंडिपेन्डन्ट सिनेमाही आजकाल किती झपाट्याने मुख्य धारेत उतरलाय, हे या वर्षीच्या नामांकनावरूनही लक्षात येईल. ज्या परभाषिक चित्रपटांची निवड ऑस्कर प्लॅटफॉर्मवर झाली, त्यांची यादीदेखील ही निवड दरवर्षीच किती अचूक असते, याचा पुरावा ठरू शकेल. त्यामुळे या पुरस्कारांना चित्रपटांमधल्या नव्या प्रवाहांचा माग ठेवण्यासाठी, जुन्यांचा प्रवाहबदल ओळखण्यासाठी आणि योग्य गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मानलंच पाहिजे. मात्र हे करताना आपण आपल्या चित्रपटांना कमी लेखून चालणार नाही. आजवर आपल्याला सर्वात घातक ठरली आहे ती अनुकरणप्रियता. आपल्या चित्रपटांचा पहिला विचार आपण काय नवं करू शकतो, इथून सुरू न होता कोणासारखं केलं तर हमखास यशस्वी ठरेल, इथून होतो हीच आपली मोठी ट्रॅजिडी आहे. ‘कोर्ट’ याला अपवाद आहे. त्याच्याबरोबरच मसान, किल्ला, मार्गारिटा विथ ए स्ट्रॉ यांसारखे या वर्षीचे सिनेमे, अधिक नव्यातले हायवे- एक सेल्फी आरपार सारखे प्रयत्न हे चित्र आशादायक आहे. ते असंच राहावं म्हणून चित्रकर्मींनी आणि प्रेक्षक म्हणून आपणही, आपल्या जाणिवांचा परीघ विस्तारत योगदान द्यायलाच हवं. म्हणूनच केवळ कोर्टच्या टीमनेच नव्हे तर आपण सगळ्यांनीच गेट... सेट... गो... म्हणायला हवं. (एप्रिल-जून २०१५ ‘वास्तव रूपवाणी’ मधील लेखावर आधारित )
ganesh.matkari@gmail.com