आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Death Of Dignity In RASIK, Divya Marathi

मरणाचा वृथा उत्सव (वेधक)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेथ अँड डिग्निटी अॅक्टचा आधार घेत डॉक्टरांनी प्रिस्क्राइब केलेलं औषध घेऊन अमेरिकेतल्या ब्रिटनी मेनार्डने स्वत:चं जीवन संपवलं. पण, खरंच तिचं मरण सन्मानजनक होतं? निर्णय धीरोदात्त होता?
मरणापाशी येऊन सगळी दु:खं- व्यथा -वेदना थांबतात, मान्य. खरंखुरं सौंदर्य माणसाच्या जगण्यात नव्हे, मनुष्य जन्माची बीजं पेरणा-या मरणात साठवलेलं असतं, हेही मान्य. सन्मानपूर्वक जगणं हा प्रत्येक माणसाचा हक्क आणि त्या हक्कासाठी प्राणांतिक लढा देणं, हेही समजून घेण्यासारखं. पण मरण हाही माणसाचा हक्क ठरावा? त्यातही दुर्धर आजाराने त्रस्त माणसाला हा हक्क प्राधान्याने मिळावा? कशापासून सुटका हवी असते, आजाराने त्रस्त माणसाला? त्याच्या आजूबाजूच्या माणसांना? कशापासून पळ काढायचा असतो, आजाराने त्रस्त असलेल्या त्या माणसाला? त्याच्या आजूबाजूला असलेल्या माणसांना? देवा-धर्माच्या प्रदेशात शिरताना जसं बौद्धिक क्षमतांच्या वापराला सहसा नकार दिला जातो, तसा जीवघेण्या आजाराशी लढताना शरीर-मनाच्या क्षमतांचा वापर करण्यास का नकार देत असतात माणसं?
अशा चित्र-विचित्र प्रश्नांचा गुंता मागे ठेवून अमेरिकेतल्या ओरेगॉन राज्यात ब्रिटनी मेनार्ड नावाच्या ब्रेन कॅन्सरनं बेजार तरुणीनं ठरवून मरण पत्करलं. बहुतेक सगळ्यांनीच तिच्या या कृतीला धीरोदात्त ठरवलं. ठरवून मरण स्वीकारायला मोठं धाडस लागतं, हे त्यामागचं गृहीतक. अमेरिकी मीडियात इच्छामरण, दयामरण अशा सगळ्या अंगाने विचारांचं दळणवळण झालं. जगभरच्या सोशल मीडियाला ‘लाइक’ करण्यासाठी नवं निमित्त मिळालं. बरंच झालं, सुटली बिचारी एकदाची… कुणीतरी म्हणालं. कुणी असंही म्हणालं, शेवटी कॅन्सर; तोही मेंदूचा कॅन्सर झाला होता तिला. तिच्या वेदना तुम्हाला काय कळायच्या? जगून तरी काय मिळणार होतं? तिला त्रास, तिच्या नातेवाइकांना त्रास…त्यापेक्षा सन्मानाने गेली. काय वाईट झालं?
पण, खरंच ब्रिटनीचं मरण सन्मानजनक होतं?
ब्रिटनीचा निर्णय धीरोदात्त होता ?
डेथ अँड डिग्निटी अॅक्टचा आधार घेत डॉक्टरांनी प्रिस्क्राइब केलेलं औषध घेऊन प्रियजनांच्या साक्षीने स्वत:चं जीवन संपवलं, तेव्हा ब्रिटनी मेनार्डचं वय होतं २९. दिवस होता १ नोव्हेंबर २०१४. वर्षभरापूर्वी डोकेदुखीमुळे त्रस्त ब्रिटनी डॉक्टरांकडे गेली, तेव्हा प्राथमिक लक्षणांवरून आणि प्राथमिक स्वरूपाच्या काही वैद्यकीय चाचण्या करून डॉक्टरांनी, ‘तुला बहुधा चौथ्या स्टेजचा ग्लिओब्लास्टोमा या प्रकारातला ब्रेन कॅन्सर आहे, त्यामुळे सहा महिन्यांपेक्षा अधिक तुझं आयुष्य नाही’, असा निर्वाळा देऊन टाकला होता. ज्या वेगाने ब्रिटनीच्या मेंदूतली गाठ मोठी होत होती, ते पाहून तिच्यावर उपचार करू बघणारे डॉक्टरही बावचळले होते. त्यांनाही त्याचा वैद्यकीय भाषेत अर्थ लावता येत नव्हता. एका क्षणी हेच डॉक्टर तिला असंही सांगत होते की, गाठीची पूर्ण वाढ होण्यास दहाहून अधिक वर्ष जातील, तसं काळजीचं कारण नाही. अशा परस्परविरोधी मतांमुळे ब्रिटनी मात्र गोंधळली होती.
या आजारावर फारसं संशोधन झालेलं नाही, मेडिकल सायन्सला हा आजार फारसा कळलेला नाही… हे आपल्या आईचं कुणाला तरी उद्देशून असलेलं वाक्य आणि स्वत:चं याबद्दलचं अज्ञान एका टप्प्यानंतर ब्रिटनीमधली भीती वाढवत गेलं होतं. त्यात रेडिएशन थेरपीमुळे झालेल्या थोड्याफार दुष्परिणामांमुळे तिने किमोथेरपी घेण्यास जवळज‌वळ नकारच दिला होता. हे खरंच की, ग्लिओब्लास्टोमाबाबत वैद्यक विज्ञान पुरेसं आत्मविश्वासाने पुढे आलेलं नाही. संशोधनाच्या पातळीवर निधीची कमतरता आहे. पण, पेशंट आणि डॉक्टरांनी प्रयत्नांच्या स्तरावर माघार घेतली किंवा स्वत:च गोंधळलेल्या अवस्थेत वावरले तर विज्ञानात नवनवे शोध लागणार कसे, नि निधी पुरवणारे पुरस्कर्ते पुढे येणार कसे?
आजारपणाच्या प्रारंभीच्या काळातच ब्रिटनी आणि तिच्या नव-याने ‘हाऊ टु डाय इन ओरेगॉन’ ही लिवर कॅन्सरग्रस्त कोडी कर्टिस नावाच्या ५४ वर्षांच्या एका बाईवरची डॉक्युमेंट्री बघितली होती. या बाईनेसुद्धा कॅन्सरमुळे मरण येण्याआधीच स्वत:चं आयुष्य संपवलं होतं. बहुधा याचाच ब्रिटनीवर सर्वाधिक परिणाम झाला होता. जगण्यापेक्षा तिच्यातली मरणाची इच्छा प्रबळ बनली होती. हा आत्मप्रेमाचा तर विघातक अविष्कार नव्हता?
मरणाला कायद्याचा आधार मिळावा, म्हणूनच तिने आणि तिच्या नव-याने ओरेगॉन राज्यात स्थलांतर केलं होतं. ऑक्टोबर महिन्यात ‘कम्पॅशन अँड चाॅइसेस’ नावाच्या संस्थेचं व्यासपीठ वापरून इच्छामरणाला देशभरात मान्यता मिळावी, म्हणून ऑनलाइन मोहीम सुरू केली होती. १ नोव्हेंबरला डॉक्टरांनी आयुष्य संपवणारी औषधं सुचवली आणि ती औषधं घेऊन नवरा, आई, सावत्र वडील यांच्या साक्षीने तिने जगाचा निरोप घेतला.
मीडिया-सोशल मीडियात ब्रिटनी मेनार्डच्या मरणाची घटना गाजली.
पण, ज्या दिवशी ब्रिटनीने मरण पत्करलं होतं, त्याच दिवशी सिनसिनाटी राज्यातल्या माऊंट सेंट युनिव्हर्सिटीची लॉरेन हिल नावाची, डिफ्युज इनट्रिन्सिक पोन्टाइन ग्लिओमा (डीआयपीजी) प्रकारच्या ब्रेन कॅन्सरशी झुंजणारी १९ वर्षांची मुलगी १० हजार प्रेक्षकांच्या साक्षीने बास्केटबॉलची मॅच खेळत होती. मैदानावर उतरण्याआधी लॉरेन जवळज‌वळ वर्षभर किमो आणि रेडिएशनच्या उपचारातून गेलेली होती आणि आयुष्याचे काहीच महिने शिल्लक असल्याचं निदान तिच्या बाबतीतही डॉक्टरांनी केलं होतं.
स्टेडियममध्ये जमलेला प्रत्येक जण लॉरेनला चिअर-अप करत होता. त्या प्रत्येकाच्या अपेक्षेला जागत लॉरेनने पहिल्याच हाफमध्ये टीमसाठी पहिला गुण नोंदवला होता. तिचा चेहरा अभिमानाने फुललेला दिसत होता. गेम संपत असताना जोरदार मुसंडी मारत लॉरेनने दुस-यांदा बॉल बास्केटमध्ये टाकण्यात यश मिळवलं होतं. खेळ सुरू असताना फॉक्सस्पोर्ट‌्सचा एक जण मुलाखतीपूर्वी तिची ओळख करून देताना, हा बहुधा लॉरेनचा शेवटचा सामना आहे, असं म्हणाला होता. त्यावर तिने शेवटचा नव्हे; हा माझा पहिला सामना आहे, असं म्हणत त्याला अडवलं होतं. आयोजकांचाही मोठेपणा हा की, तिच्या धैर्याचा सन्मान म्हणून यापुढच्या काळातला सिझनचा पहिला बास्केटबॉल सामना ‘लॉरेन हिल ग्रे गेम’ म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणाही केली होती…
ब्रिटनीच्याच वयाची मिशेल दिजाँ. फ्लोरिडा राज्यात राहणारी. तिलासुद्धा ब्रिटनीसारखाच ब्रेन कॅन्सर झालेला. तीसुद्धा रेडिएशन, किमो या चक्रातून गेलेली. दोघींनाही प्रवासाची आवड. दोघींचीही लग्नं महिनाभराच्या फरकाने झालेली. पण तू आज मरणार, उद्या मरणार, असं विधान तिच्या डॉक्टरांनी कधीच केलं नाही. त्यामुळे आपला आज शेवटचा दिवस, या विचाराने तिने कधीच दिवसाची सुरुवात केली नाही. शिवाय ती राहते त्या राज्यात ओरेगॉनसारखा आजारी माणसाला मरणाची परवानगी देणारा कायदा नाही. इथे मरणाची परवानगी देण्यापेक्षा आजारी माणसाचं आयुष्य सुखकर कसं होईल, यासाठी संस्था-संघटना धडपडतात. तसं पाहता रेडिएशन आणि किमोचे उपचार होऊनही मिशेलचा कॅन्सर नियंत्रणाखाली आलेला नाही. तरीही ती आशावादी आहे. मोटिफ कॅन्सर सेंटरमध्ये सुरू असलेल्या संशोधनांतर्गत क्लिनिकल ट्रायलसाठी ती तयार झाली आहे. ब्रिटनीने चालवलेल्या मोहिमेत तिला अजिबात रस नाही. त्यापेक्षा तिला कॅन्सरविरोधात शेवटच्या श्वासापर्यंत लढा द्यायचाय...
माझ्या आईनेही मरण पत्करण्याचा निर्णय घेतला असता, तर आम्ही खूप काही गमावलं असतं…ब्रिटनीच्या मरणानंतर नादिन नूमान नावाच्या कायद्याचा अभ्यास करणा-या तरुणीनंही आपला आवाज सर्वापर्यंत पोहोचवला होता. तिच्या आईलाही ब्रिटनीप्रमाणेच चौथ्या स्टेजचा ग्लिओब्लास्टोमा प्रकारातलाच मेंदूचा कॅन्सर झालेला. किमो-रेडिएशन, दोन ब्रेन सर्जरी असे उपचार घेऊनही डॉक्टरांनी तिला १५ महिन्यांची मुदत दिली होती, पण २१ महिने उलटून गेले तरी नादिनची आई जिवंत आहे. आयुष्यातला प्रत्येक क्षण मनापासून जगतेय. मस्त पॅरिसपर्यंत प्रवास करतेय. उत्साहाने आप्तेष्टांच्या वाढदिवस सोहळ्यांना हजेरी लावतेय. इतकंच कशाला, ब्रेन कॅन्सर जनजागृतीसाठी आयोजित पाच मैलाच्या धावस्पर्धेत भागही घेतेय. साहजिकच नादिनला ब्रिटनीचं ‘सन्मानपूर्वक मरण’ पसंत पडलेलं नाही. तिचं म्हणणं, ब्रिटनीचं मरण सन्मानजनक नव्हे, निष्काळजीपणाचं आहे. तिचं हेही म्हणणंय की, कॅन्सरग्रस्ताचं जगणं ताण-तणावाचं असतं. त्यात भावनिक-मानसिक क्लेष असतात, पण म्हणून त्यांची काळजी घेणा-यांचं काहीही म्हणणं असू नये? तिचं असंही म्हणणं, ब्रिटनीने हटवादीपणा दाखवत मरण पत्करलंय. तिला कॅन्सरने नव्हे, तिच्या निर्णयाने संपवलंय. ब्रिटनीसारखं मरण स्वीकारण्यात नव्हे तर संघर्ष करत मरण पत्करण्यात खरा सन्मान आहे…
‘ब्रिटनीसारखं मरण स्वीकारण्यात नव्हे, तर संघर्ष करत मरण पत्करण्यात खरा सन्मान आहे’, हेच ब्रिटनी मेनार्डच्या कृतीचं ययार्थ विश्लेषण आहे.
इच्छामरणाचा, दयामरणाचा वेगळ्या परिप्रेक्ष्यात नक्कीच विचार व्हायला हवा. परंतु ब्रिटनीच्या या तथाकथित सन्मानपूर्वक कृतीने ब्रेन कॅन्सरशी हिमतीने लढा देणा-या जगभरातल्या हजारो-लाखो जणांचं काही क्षणांपुरतं का होईना, मनोधैर्य डळमळीत झालंय. या आजारावर संशोधन करणा-या देशोदेशीच्या निष्ठावंत वैज्ञानिकांचा कळत-नकळत अवमानही झाला आहे. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे, असा ठरवून मरणाचा उत्सव जागवताना वेदनेत दडलेल्या प्रेरणास्रोतांच्या, सौंदर्याच्या दुर्मिळ आकलनाला ब्रिटनी मेनार्ड मुकली आहे.