आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांचे फॅशन स्टेटमेंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबासाहेबांच्या आधुनिक विचाराला साजेशी अशीच त्यांची रुबाबदार वेशभूषा असे. अशिक्षित समाजाला शिक्षणाचं आणि आधुनिकतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी ही वेशभूषा खूप उपयुक्त ठरली. आपणही बाबासाहेबांसारखं सुटाबुटात राहावं, या विचारातून अनेकांना शिकून मोठे होण्याची प्रेरणा मिळाली.समूहमनाचा आणि समाजमानसशास्त्राचा बाबासाहेबांचा चांगला अभ्यास होता, शिवाय बाबासाहेब विदेशात शिक्षण घेतलेले जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ होते. त्यांची वेशभूषा जागतिक विचारवंताला शोभेल अशीच होती.
बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक महत्त्वपूर्ण पैलूंपैकी त्यांचं फॅशन स्टेटमेंट हा एक. ते अशासाठी की, त्या काळात अप टू डेट राहणारी केवळ तीनच माणसं भारतीय समाजकारणात अग्रेसर होती. पं. जवाहरलाल नेहरू, बॅ. मोहम्मद अली जिन्ना आणि तिसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या तिघांपैकी बाबासाहेब सोडले तर बाकी दोघे हे सधन कुटुंबातील. बालपण आणि तारुण्य सर्व सुखसोयी आणि संसाधनांनी भरलेल्या वातावरणात गेलेलं. याउलट बाबासाहेबांच्या घरी कमालीचं दारिद्र्य होतं. जातिव्यवस्थेचे, अस्पृश्यतेचे चटके अलग. तरी वकिली व्यवसायातून कमावलेल्या संपत्तीतून त्यांनी स्वतःचं एक फॅशन स्टेटमेंट तयार केलं होतं. तसे ते स्वभावाने पूर्णतः युरोपीयनच होते. पोटाला खायला मिळालं नाही तरी चालेल पण अंगावर चांगलं कापड हवं हा त्यांचा आग्रह असे.

बाबासाहेबांना सिडनहॅम कॉलेजमध्ये असताना पहिला पगार मिळाला. त्यांनी रमाईला सांगितलं की, घरातल्या सर्वांना कपड्यांची मनसोक्त खरेदी करून घे. रमाईसुद्धा जिंदादिल माणसाचीच सोबती. बैलगाडी भरून कपड्यांची खरेदी केली. हा भाग वेगळा की, त्या वेळी बाबासाहेबांना तब्बल नऊशे रुपये पगार झाला होता. बाबासाहेबांकडे उंची सूट होते. प्रत्येक मोसमात घालता येतील अशा पद्धतीने त्यांनी कापडांची निवड सूटसाठी केलेली होती. प्रत्येक सूटची शिलाई वेगळ्या ढंगाने केलेली होती. प्रत्येक सूट थ्री पीस असे. सूटच्या आत पेनांसाठी वेगळा खिसा, अचानकपणे टिपणे काढल्यानंतर कागद सुरक्षित राहावा म्हणून असलेला वेगळा खिसा अशी ठेवण असायची. त्यातल्या त्यात त्यांच्या जोधपुरी सूटची मिजास भारीच.

पंजाबात असताना त्यांनी परिधान केलेला काळा जोधपुरी सूट आणि तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्यासोबत असताना घातलेला पांढऱ्या रंगाचा जोधपुरी सूट यांची छायाचित्रे आजही अनेकांच्या घराघरांत आढळतील. त्यांची पँट मस्त ढगाळ, लांबीला भरपूर अन् पोटापर्यंत ओढलेली असायची. त्यांचे बेल्ट साधे असले तरी उच्च दर्जाचे होते. चष्म्याच्या फ्रेम त्यांनी अनेकदा युरोपात असताना बनवून घेतल्या होत्या. बाबासाहेबांचं कपाळ भव्य होतं. डोळे मोठे होते. कानसुद्धा मोठे होते. त्यांचे हात आणि हातांची बोटंसुद्धा साधारण लांबीपेक्षा मोठी होती. ही सारी गुणवैशिष्ट्ये बुद्धाच्या शरीरातही होती. ही लक्षणे प्रकांड पांडित्याची असतात. त्यामुळे गोलाकार, थोडक्यात अंडाकृती फ्रेमचा चष्मा त्यांना परफेक्ट शोभायचा. बाबासाहेब शर्टवर तसे फारच कमी असायचे. फावल्या वेळेत ते लेहंगा किंवा लुंगी नेसत. त्यांचा फक्त शर्टवरचा एकमात्र फोटो आहे तो मिलिंद कॉलेज, औरंगाबदमधला.
बाबासाहेबांच्या खिशाला एकाच वेळेस सहा पेन असत. त्यातील कित्येक पेन महागडे असायचे. तब्बल दोनशे रुपयांचे पेन असायचे ते. त्यांना शाईचे पेन आवडायचे. त्यांची पेन पकडण्याची पद्धतही वेगळी होती. इतक्या उंची पेनांचं कलेक्शन क्वचितच इतर कोणाकडे असेल. बाबासाहेब युरोपीयन स्टाइलचंं चैनीचं घड्याळ वापरायचे. तसंच त्यांच्या हातातील घड्यांळ्यांचं कलेक्शनसुद्धा फार सुंदर होतं. बाबासाहेब सूट परिधान करताना आतला शर्ट हा कोटांच्या पुढे कसा असेल आणि शर्टाला असलेली बटणं आणि पुढचं घड्याळ शिस्तीत कसं असेल, याकडे बारकाईने लक्ष ठेवायचे. तीच गत त्यांच्या बुटांच्या बाबतीत. त्यांनी वापरलेले बूट त्या काळातल्या सर्वोत्तम बुटांपैकी एक होते. त्यांनी विविध प्रकारच्या हॅट, कॅप, राउंड कॅप वापरल्या. काळ्या चष्म्यांच्या बाबतीतही तीच गत. त्यांच्याकडे निरनिराळ्या रंगाच्या टाय होत्या. कोणत्या रंगाच्या सूटसोबत कोणत्या टाय असाव्यात याबाबतचा त्यांचा चॉइससुद्धा भन्नाट होता. डायबिटीसचा त्रास झाल्यानंतर त्यांनी काठीचा आधार घ्यायला सुरुवात केली. या काठीवरही नक्षीकाम असे. काठ्यांचं कलेक्शनही तसंच स्टायलिश होतं.
बाबासाहेबांनी अनेकदा भावूक होऊन सांगितलं होतं की, न्हावी पैसे घेऊनसुद्धा त्यांचे केस कापत नसे. त्यांची बहीणच त्यांचे केस कापून देई. परंतु बाबासाहेबांनी कधी वाढलेले केस, दाढी असा अवतार ठेवला नाही. क्लीन शेव्हन असायचे ते. बाबासाहेबांचं राजबिंडं रूप खुलून दिसायचं त्यामुळे.

पुढे वाचा, अरे संसार संसार...