आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागचे स सेटिंगवाले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्माता हा नाटकाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहेच; पण नाटकाचा प्रयोग सादर करण्याकरता लेखक, दिग्दर्शक, कलाकार, नेपथ्यकार, वेषभूषाकार, संगीतकार आणि प्रयोगाला तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्यांचाही सहभाग महत्त्वाचा असतो. बाकी सर्वांचं काम प्रयोगाच्या वेळी साधारण एक ते दीड तास आधी सुरू होतं आणि प्रयोग संपल्यावर अर्ध्या तासात संपतं. पण नेपथ्याचं काम करणाऱ्या सेटिंगवाल्यांचं काम मात्र दहा ते बारा तास चालतं. नेपथ्याचं सामान गोडाऊनमधून टेम्पोत भरून प्रयोगाच्या ठिकाणी तो सेट लावणे आणि प्रयोग संपल्यावर सेट परत टेम्पोत भरून ते सामान पुन्हा गोडाऊनमध्ये उतरवणे, हे सेटिंगवाल्यांचे काम.

नाटकाचा प्रयोग सकाळी अकराचा असेल तर आदल्या दिवशी किंवा प्रयोगाच्या दिवशी सकाळी सातला सेट टेम्पोत भरला जातो. बहुतेक नाटकवाल्यांची गोडाऊन्स मुंबईतील शिवडीच्या आसपासच आहेत आणि बरेचसे सेटिंगवाले जवळपास राहणारे आहेत.

पुणे, नाशिक किंवा बाहेरगावी प्रयोग असतील तर सामान नाटकाच्या बसच्या कॅरिअरवर व्यवस्थित बांधणं, हे काम सेटिंगवालेच करतात. काही नाटकावाल्यांच्या गोडाऊनपर्यंत बस जात असल्यामुळे सामान डायरेक्ट बसवरच लोड केले जाते. पण ज्यांच्या गोडाऊनपर्यंत बस जात नाही, तिथे मात्र सेटिंगवाल्यांना डबल काम पडते. नाटकाचं बॅकस्टेज करणाऱ्या सर्वांची ‘रंगमंच कामगार संघटना’ या नावाची एकच संघटना व्यवसायात कार्यरत आहे. नाट्यसंस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक बॅकस्टेजवाल्याने या संघटनेचा सभासद होणे आवश्यक आहे. प्रत्येकाचं मानधन हे संघटनेनं ठरवून दिल्याप्रमाणेच करावं लागतं. सेटिंगवाल्यांना रात्रीच्या प्रयोगाला जेवण किंवा जेवणाचा भत्ता देण्यात यावा, असा एक नियम करण्यात आला आहे. जिथे सामान पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर वाहून न्यावं लागतं, त्या नाट्यगृहातील प्रयोगाला हमालीचे वेगळे पैसे सेटिंगवाल्यांना द्यावे, असाही नियम आहे. रंगमंच कामगार संघटना आजारपण किंवा अपघातग्रस्त सभासदांना वेळोवेळी मदतीचा हात पुढे करत असते.

सेटिंगवाल्यांचं सेट लावण्याचं कसब मात्र वाखाणण्याजोगं आहे. आधी काही प्रयोग नसेल तर लवकर जाऊन सेट लावता येतो, पण इतर वेळेस एक ते पाऊण तासात सेट लावण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असते. कधीकधी तर आधीचं नाटक उशिरा सुटलं तर फार कमी वेळात सेट लावण्याची कामगिरी सेटिंगवाल्यांना पार पाडावी लागते. सेटिंगवाल्यांनी आपलं काम सोपं करण्याकरता सेटमधील प्रत्येक फ्लॅटमागे नंबर टाकलेला असतो. टेम्पोमधून सेट आणतानाच फ्लॅट उजव्या व डाव्या बाजूला ठेवून मग जोडण्यात येतो. सर्व सेटिंगवाल्यांचं एकमेकांशी को-ऑर्डिनेशनही खूप छान असतं. ज्यांचा प्रयोग नंतर असतो तो सेटिंगवाला टेम्पोतून आपलं सेटिंग स्टेजवर नेतो आणि परत जाताना आधीच्या प्रयोगाचं सामान नेतो. त्याच पद्धतीत आधीचा सेटिंगवाला आपलं सेटिंग स्टेजवरून नेतो आणि परत येताना नंतरच्या प्रयोगाचं सामान स्टेजवर आणतो. यामुळे प्रयोग सुरू होण्यास विलंब होत नाही.

नाट्यनिर्मातेही आपापल्या परीने सेटिंगवाल्यांना मदत करीत असतात. २३ जुलै २००५ रोजी मुंबईत अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला होता. जवळपास एक आठवडा सर्व नाट्यगृहे बंद होती.
अनेक बॅकस्टेजवाल्यांच्या घरात पाणी घुसून खूप नुकसान झालं होतं. त्या वेळचे नाट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळी यांच्या पुढाकाराने सर्व निर्मात्यांनी मिळून मुंबईतील दादर येथील शिवाजी मंदिर येथे एक नाट्यमहोत्सव आयोजित केला होता. या नाट्यमहोत्सवात सहभागी नाटकातील एकाही कलाकाराने मानधन घेतलं नव्हतं. शिवाजी मंदिर नाट्यगृहानेदेखील आपला सहभाग म्हणून या नाट्यमहोत्सवातील एकाही नाटकाचे भाडे आकारले नाही. ज्यांची नाटकं या नाट्यमहोत्सवात नव्हती, त्या बऱ्याचशा निर्मात्यांनी देणगी देऊन आपला हातभार लावला.

सादर झालेल्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांना आवाहन करून झोळी फिरवण्यात आली, त्यातूनही बरीच रक्कम जमा झाली. नाटकांच्या तिकीट विक्री आणि देणगीद्वारे जमा झालेल्या निधीतील काही रक्कम मुख्यमंत्री पूरग्रस्त मदतनिधीला देऊन शिल्लक रकमेचे वाटप नाट्यव्यवसायातील नुकसान झालेल्या बॅकस्टेजवाल्यांना कमीजास्त प्रमाणात वाटण्यात आली. याकरता निर्मात्यांकडे त्यांच्या संस्थेतील नुकसान झालेल्यांची यादी मागवण्यात आली होती.

नाट्यनिर्माते वैयक्तिकरीत्याही अशा प्रकारची मदत करत असतात. निर्माते संतोष कोचरेकर यांच्या एका प्रयोगाला एक सेटिंगवाला सामान बांधताना रस्सी तुटून बसवरून खाली पडला आणि त्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं. त्याच्या उपचाराचा सर्व खर्च कोचरेकर यांनी केल्याचं उदाहरण मला आठवतंय.
dinupednekar1963@gmail.com