आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचारप्रेरित द्रष्टा (प्रासंगिक)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाच्या उभारणीत कार्यकुशलतेचा दुर्मिळ आदर्श निर्माण करणारे, एकनाथजी रानडे यांच्या जन्मशताब्दी वर्षास १९ नोव्हेंबर २०१४ पासून प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख.
भारताच्या दक्षिण टोकाला कन्याकुमारी येथे समुद्रातील श्रीपाद शिळेवर उभे असलेले स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक सा-या देशाला परिचित आहे. आजवर ६ कोटीहून अधिक लोकांनी भेट देलेले आणि मुख्य म्हणजे, सर्वच राज्य सरकारांनी देणग्या दिलेले हे भारतातील एकमेव स्मारक. तीन सागरांच्या संगमस्थळी असलेल्या या स्मारक उभारणीचा इतिहास जितका चित्तवेधक आहे, तितकाच प्रेरकही.

स्वामी विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी १८६३चा. १२ जानेवारी १९६३रोजी या घटनेस शंभर वर्षे पूर्ण होत होती. जन्मशताब्दी साजरी करण्याविषयीचा विचार कन्याकुमारी येथील काही विवेकानंदप्रेमींमध्ये रुजत होता. प्रदीर्घ मंथनानंतर त्रिसागराने वेष्टित श्रीपादशिळेवर जेथे स्वामीजींना आपले जीवनध्येय सापडले, त्या स्थानी एक चिरस्मरणीय स्मारक उभे करावे, ही कल्पना पुढे आली. कल्पनेला अनुसरून एक ‘स्मारक समिती’ गठित करण्यात आली. या स्मारक समितीला खंबीर नेतृत्वाची आवश्यकता होती. नजरेसमोर नाव आले - एकनाथ रानडे यांचे. कार्याला प्रारंभ करताना सामान्य माणसापासून ते राष्ट्रपतींपर्यंतच्या सर्वांना एकनाथजी भेटले. स्मारकाच्या समर्थनार्थ तीन दिवसांत ३२३ सर्वपक्षीय खासदारांच्या सह्या त्यांनी मिळवल्या. राज्य सरकारे व केंद्र शासन तसेच उद्योगपतींच्या सहकार्याने दीड कोटी रुपये जमविले. तब्बल ३५ लाख लोकांकडून प्रत्येकी एक रुपया अशा प्रकारे देणगी एकत्रित केली. संसदेतील बहुसंख्य सदस्यांनी हे स्मारक श्रीपाद शिळेवरच झाले पाहिजे, अशी आग्रही विनंती तत्कालीन पंतप्रधानांकडे केली. नेहरूंनीही मागणीला पाठिंबा दर्शवला. स्मारकाच्या कामाला उत्साहाने सुरुवात झाली. १२ जानेवारी १९६३ रोजी समारंभपूर्वक श्रीपादशिळेवर एक स्मृतिशिळा स्थापित करण्यात आली. त्यावर कोरले होते, ‘या ठिकाणी दि. २५ डिसेंबर १८९२ ते २७ डिसेंबर १८९२ या काळात स्वामी विवेकानंदांनी तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येअखेर स्वामीजींना आपले जीवितध्येय गवसले.’ तसे पाहायला गेले तर एकनाथ रानडे आजही देशवासीयांना अपरिचितच आहेत. प्रसिद्धीपासून दूर राहून त्यागमय जीवन जगणा-या रानडे यांचे नाव कन्याकुमारीच्या त्या विख्यात स्मारकावर कोठेच कोरलेले नाही, हे स्वाभाविकच होते. रानडे यांचा जन्म महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील टिमटाला गावचा. बालपणीच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या सान्निध्यात आले आणि नि:स्वार्थ देशसेवेचे या वयातील संस्कार त्यांच्या जीवनाला वळण देणारे ठरले. संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी देशकार्यात स्वत:ला झोकून दिले. संघाचे सरकार्यवाह या स्थानपर्यंत पोहोचलेले रानडे हे एक कुशल संघटक होते. आपले सारे जीवन त्यांनी राष्ट्रार्पण केले होते. स्वामी विवेकानंद हे त्यांचे श्रद्धास्थान होते. जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली म्हणून त्यांनी विवेकानंद विचारांचा संग्रह ‘राऊझिंग कॉल टू हिंदू नेशन’(हिंदुतेजा, जाग रे!) हा ग्रंथ प्रसिद्ध केला होता. आज कन्याकुमारी येथे उभे असलेले विवेकानंद स्मारक भारतीय स्थापत्य कलेचा आगळा आविष्कार ठरले आहे. हे स्मारक तीन विभागांत उभारण्यात आले आहे. उभ्याने तपश्चर्या करणा-या पार्वतीच्या पायाचा ज्या शिळेवर ठसा उमटला, त्यावर मंदिर उभारून त्या वारशाचे जतन केले आहे. दुसरा स्वामी विवेकानंद यांचा अखंड पुतळा आणि तिसरा स्वामीजींना अभिप्रेत असलेले ओंकार प्रतीकासह ध्यान मंदिर. हे स्मारक २ सप्टेंबर १९७० रोजी तत्कालीन राष्ट्रपतींच्या उपस्थितीत रामकृष्ण मठाच्या अध्यक्षांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आले.

अर्थात, केवळ दगडमातीचे स्मारक राष्ट्र पुनरुत्थानाला पुरे पडत नसते. स्वामीजींना प्रत्यक्ष कार्य करणारे जिद्दीचे तरुण-तरुणीसुद्धा अभिप्रेत होते. केवळ भारतीय समाजाचाच नव्हे तर अखिल मानवजातीचा उत्कर्ष स्वामीजींना अपेक्षित होता. ‘विवेकानंद केंद्रा’च्या संकल्पनेमागेसुद्धा हाच विचार केंद्रस्थानी होता आणि तेच ख-या अर्थाने विवेकानंदांचे स्मारक ठरणार होते. यथावकाश स्वामीजींचे ‘मानवसेवा हीच माधवसेवा’ हे तत्त्व अंतिम ध्येय मानून ७ जानेवारी १९७० रोजी कन्याकुमारी येथे रानडे यांच्या नेतृत्वाखाली विवेकानंद केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्र कार्यासाठी ३० वर्षापर्यंतच्या अविवाहित, पदवीधर तरुण-तरुणींची ‘जीवनव्रती’ म्हणून निवड केली जाते. पहिल्या वर्षी त्यांना सेवाकार्याचे प्रशिक्षण देऊन नंतर पुढील तीन वर्षे प्रत्यक्ष कार्यानुभवासाठी केंद्राची कामे सुरू असलेल्या मागास आदिवासी भागात पाठविण्यात येते. जीवनव्रतींच्या उदरनिर्वाहाचे उत्तरदायित्व केंद्राकडे असते. पण या कार्यकर्त्यांना साध्या राहणीमानात वावरण्याची तयारी ठेवावी लागते. एकनाथजी रानडे यांनी स्थापन केलेल्या विवेकानंद केंद्राचेही काम आता भारतव्यापी बनलेले आहे. रानडे यांच्यामुळेच आज अनेकांचे जीवन उजळले आहे.
psiddharam@gmail.com