आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... आणि मी गाडी शिकले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गृहिणी असो वा नोकरदार महिला... बाइक ही महिलांसाठी आवश्यक बाब बनली आहे. मार्केटमध्ये जाण्यापासून मुलांना शाळेत, क्लासला सोडणे-आणणे ही सर्व कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी आधी गाडी शिकून घेणे महत्त्वाचेच आहे.

झुंझुरत्या पहाटेची वेळ. मऊ दुलईत अर्धवट झोपेत, अर्धवट जागेपणी मी साखरझोप घेत गादीवर लोळते आहे. या साखरझोपेत समोर येतो तो काळा कुळकुळीत, डांबरी रस्ता. या टोकापासून त्या टोकापर्यंत हायवे. कडेला उभी ती निळी स्कूटर. अगदी हळुवार पावले टाकत मी स्कूटरजवळ जातेय. वर निळं आकाश, समोर काळाभोर लांबवर पसरलेला मऊसूत डांबरी रस्ता. त्या सरळ रस्त्यावर पृथ्वीच्या त्या टोकापर्यंत मी स्कूटर चालवते आहे. सपसप तोंडाला लागणारा वारा, कानापाशी भिणभिणणारा वारा मला सुखावतो आहे. मी जात असताना माझी गाडी चालवण्याची पद्धत, बसण्याची ऐट पाहून मीच सुखावते आहे. गाडी पाहत पाहत मी जागी होते.

हे स्वप्न मला बहुतेक नेहमीच पडायचं आणि या स्वप्नातील प्रत्येक गोष्ट परतपरत व स्पष्ट आठवायची. जाग आल्यावर खूप प्रसन्न वाटायचं. संपूर्ण दिवस आनंदात जायचा, वाटायचं आज झोपेत का होईना पण आपण स्कूटर चालवली. कारण जागेपणी मी स्कूटर चालवणं ही अगदी अशक्यप्राय गोष्ट होती. एक तर मी लहानपणी सायकलही शिकले नव्हते. दुसरे म्हणजे स्कूटरबद्दल जितके आकर्षण होते तितकीच चालवायला शिकताना पडून हातापायाला लागेल ही भीती होतीच.

एक दिवस हे बाहेरून येताना वाटेत त्यांचा दोस्त भेटला. त्याच्याशी बोलत थांबत यांनी तेथेच खेळणाऱ्या गौरवला गाडी घरी नेऊन ठेव म्हणून सांगितले.

त्याला जणू ते खेळणेच हाताळायला मिळाले. त्याने जे गाडीला हात लावला ते चुकतमाकत चार दिवसात कोणाचाही सल्ला व आधार न घेता लुना व्यवस्थित चालवू लागला. अगदी थोड्याच दिवसांत त्याने गाडी चालवण्याचे सर्व बारकावे, रहदारीचे नियम आत्मसात केले. अगदी सराईतपणे गाडी चालवू लागला.

येथेच माझ्या मनाला थोडी ठेच पोहोचली. वाटलं, आपण वर्षानुवर्षे जे फक्त स्वप्न पाहत आलोय ते स्वप्न या चिमुरड्याने इतक्या लहान वयात आत्मसात करावं? मन अगदी बेचैन झालं. आणि मनाशी पक्का निश्चय झाला. आता वाट्टेल ते झालं तरी गाडी शिकायचीच.

गाडी सुरू करायला शिकण्यातच दोन दिवस गेले. आता गाडी सुरू करून त्यावर बसण्याचे धैर्य माझ्यात आले. मी गाडीला किक मारली की शुकशुकाट असल्याप्रमाणे गल्ली मोकळी व्हायची आणि मग मी हाताला पूर्ण स्वातंत्र्य देऊन गाडी चालवायचे. माझे गाडी चालवणे एक प्रेक्षणीय कार्यक्रम झाला.

मी गाडीवर बसून पुढे आणि गौरव मागे पळत असे. मी गाडी चालवणे चालू केल्यापासून एकेकाचे एकेक अनाहूत सल्ले चालू झाले.
‘अहो, तुम्हाला सायकल येते का हो?’
‘नाही!’
‘तुम्हाला गाडी चालवता येणे शक्यच नाही. प्रथम तुम्ही सायकल शिका. त्याचा एकदा बॅलन्स आला की, गाडी शिका. हा नसता नाद सोडून द्या.’ माझ्या जिद्दीला थोडंसं भोकसं पाडून ते सद््गृहस्थ चालू लागले. त्यांच्या मागे त्यांच्या मिसेस डुलतडुलत येत होत्या. त्या माझा गाडी प्रयोग पाहत बोलल्या, ‘तुम्ही असं करा, ही गाडी शिकण्याची भानगड थोडी सोडून द्या आणि दहा एक किलो तरी वजन कमी करा. वजन कमी झालं की, तुम्हाला न शिकताही गाडी आपोआप येईल. हडकुळ्या माणसांना गाडीचा बॅलन्स खूप लवकर येतो.’
एकदा एक मैत्रीण भेटायला आली.
‘काय, गाडी शिकण्याचे चालू आहे वाटते.’
‘हो गं. शिकावं म्हणते.’
‘तुझं काय बाई बरं आहे. तुला दोन तासांतच गाडी फिरवता येईल.’
‘ती कशी काय गं?’ मी उत्सुकतेने विचारलं.
‘अगं, तू नेहमी तुझ्या मिस्टरांबरोबर गाडीवरच फिरत असतेस ना? त्यामुळे तुला त्यातले बारकावे माहीत असणार. फक्त गाडी सुरू करायला आली की झालं. मी सांगते बघच तुला खूपच छान गाडी चालवता येणार!’

असं करताकरता बऱ्यापैकी गाडी चालवता येऊ लागली. मी रोज परिपाठ ठेवला घरापासून वाचनालयापर्यंत, तेथून मार्केट व भाजी घेऊन कितीही गर्दी असली तरी गाडीवरच जायचे. घरून निघताना मुलं गाडी सुरू करून द्यायची. वाचनालयात वॉचमन सुरू करून द्यायचा. मार्केटमधून निघताना मीच प्रयत्नपूर्वक चालू करायची. आठ, पंधरा दिवस गेले. आता मला छानपैकी गाडी चालवता येऊ लागली.
आणि एक दिवस नेहमीच्याच रस्त्यावर गाडी फिरवत असताना अचानक बंद पडली. गाडी चालवणं हेच फक्त माहीत. बंद गाडीचं काय करायचं? तेथे छोटी मुलं फुटबॉल खेळत होती. ती मुलं जवळ आली व म्हणाली, ‘आंटी, काय झाल?’
‘काय कुणास ठाऊक रे,’ माझा रडकुंडी आवाज त्यांनी आपल्या बालबुद्धीने गाडीची तपासणी केली. ‘आंटी, जवळच रिपेअरचं दुकान आहे तेथे नेऊ या का? तो दोन मिनटांत रिपेअर करील.’
हो-ना करता मी चला म्हणाले. त्याबरोबर सातआठ पोरं, त्यांचा फुटबॉल, मी, माझी गाडी असे सगळे रिपेअरिंगच्या दुकानात गेलो.
दुकानदाराने एक मिनिटांत चेन निघाली होती ती बसवली. एक चेन बसवण्यासाठी इतके जण येणारे बहुदा त्याच्या दुकानातले आम्ही पहिलेच गिऱ्हाईक असावे.
गाडी सुरू झाल्यानंतर मुलांना खूप आनंद झाला. याऽऽहु करत गाडी परत ग्राऊंडवर नेण्यात आली.
मीही दानशूर कर्णाची प्रतिमा मनात आणून प्रत्येकाला एकेक फेरी फुकट गाडी फिरवायला दिली.
या सगळ्यात जास्त प्रोत्साहन कोणाचे असेल तर माझ्या गौरवचे आहे. त्याने खूप व्यवस्थित गाडी शिकवली. वेचक व उपयोगी पडतील असे सल्ले आणि सूचना मला िदल्या. उदा. ‘आई, घाबरू नको. चालवताना मध्येच दचकून गाडी थांबवू नको. पाय खाली टेकवू नको. सीटचा पुरेपूर वापर कर. उशीर झाला तरी चालेल, पण ओव्हरटेक करू नको. ताठ बस, आरामात चालव.’
त्याच्या या प्रत्येक सल्ल्याचे मन:पूर्वक आणि व्यवस्थित पालन केले म्हणूनच मला गाडी चालवता येऊ लागली.
माझं स्वप्न साकार झालं.